अमेरिकेत ट्रम्प निवडून येणं हीच असेल जगासाठी मोठी दुःखद बातमी

१६ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ७ मिनिटं


कोरोनाच्या संकटामुळे अमेरिकेत हाहाकार माजलाय. त्यामुळे आता तरी अमेरिका आपलं नेतृत्व बदलेल अशी आशा निर्माण झालीय. पण दुसरीकडे कोरोनाच्याच नावाखाली राष्ट्रवादाचा मुद्दा वर काढत द्वेष उत्पन्न करणारा प्रचार ट्रम्प यांनी चालवलाय. अमेरिकेतलं नेतृत्व ही संपूर्ण जगासाठी महत्त्वाची बाब असते. त्यामुळे कोरोनानंतर अमेरिकेच्या सत्तास्थानी कोण बसणार ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची झालीय.

निवडणुका पार पाडण्यासाठी सर्वांत जास्त काळ ब्रिटिश घेतात. तर भारतीय लोक सर्वाधिक संख्येने मतदान करतात. मात्र अमेरिकेतली अध्यक्षीय निवडणुका होतात, तेव्हा लोकशाही मताधिकाराचा जगातील सर्वांत महत्त्वाचा कार्यक्रम पार पडतो. गेल्या शंभर वर्षांहूनही अधिक काळापासून आजपर्यंत असंच घडत आलं आहे. कारण अमेरिका हे जगातलं सर्वाधिक श्रीमंत आणि बलवान राष्ट्र आहे. ते जगाचं नेतृत्व करते आणि संपूर्ण मानवजातीवर त्याचा प्रभाव असतो.

ब्रिटनचे राष्ट्राध्यक्ष बोरिस जॉन्सन यांच्या धोरणांमुळे युरोपबाहेर क्वचितच काही तरंग उमटत असतील. नरेंद्र मोदींच्या धोरणांचा दक्षिण आशिया खंडाबाहेर खरोखरच काही फरक पडत नाही. पण अमेरिकेच्या अध्यक्षांनी केलेल्या, अथवा न केलेल्या एखाद्या कृतीचा संपूर्ण जगावर परिणाम होऊ शकतो. जॉर्ज बुश यांच्या ऐवजी अल गोर हे २००० मधे अध्यक्षीय निवडणूक जिंकले असते, तर कदाचित इराक युद्ध टळलं असतं आणि आजचं जग अधिक सुरक्षित झालं असतं.

हेही वाचा : अमेरिकेला हवं असणारं मलेरियाचं औषधं भारतात कसं आलं, त्याची गोष्ट

आजचं जग असुरक्षित झालंय

अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक जगाच्या दृष्टीने नेहमीप्रमाणेच महत्त्वाची असली तरी, कोविड १९ मुळे २०२० मधे तिला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पहिला कार्यकाळ अमेरिकेसाठी चांगला होता की नव्हता, याविषयी अमेरिकन लोक सांगू शकतील. मात्र जगासाठी तो वाईट होता, याविषयी शंका नाही. आज जग असुरक्षित आणि असंतुष्ट झालंय.

पॅरिस करारातून अमेरिकेनं घेतलेल्या माघारीमुळे पर्यावरणबदलाचा धोका अधिक गंभीर झाला आहे. नव्या तरतुदींसह इराणवर घातलेल्या निर्बंधांमुळे मध्य-पूर्वेतली नेहमीच संवेदनशील असणारी परिस्थिती अधिकच अस्थिर बनली आहे. ट्रम्प यांच्याच धोरणांचा परिणाम म्हणून निर्वासितांच्या समस्यांमधे वाढ झाली आहे. आशिया आणि आफ्रिकेतल्या लोकांविषयी त्यांनी वापरलेल्या अपरिपक्व आणि वंशद्वेष पसरवणाऱ्या भाषेची परिणती अधिक वैरभाव आणि अनिष्ट इच्छा निर्माण होण्यात झाली आहे. ते अमेरिकेच्या किंवा जगाच्याही दृष्टीने हितावह नाही.

आजचं जग हे २०१७च्या तुलनेत कमी सुरक्षित आणि अधिक असंतुष्ट आहे. अर्थात याला खतपाणी घालणारे इतरही अनेक घटक आहेतच. पण ट्रम्प आणि त्यांची धोरणं नक्कीच त्याला कारणीभूत आहेत. त्यामुळेच अमेरिकन नागरिक नसणारे अनेक लोकदेखील अमेरिकन अध्यक्षपदासाठीच्या चढाओढीकडे आस्थेने लक्ष ठेवून आहेत. या निवडणुकीत ट्रम्प पराभूत न होता पुन्हा विजयी झाले, तर जग अधिक सुरक्षित आणि संतुष्ट बनण्याची शक्यता फारच कमी आहे.

हेही वाचा : युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?

बायडेन अमेरिकेला आपलंसं करू शकतील?

फेब्रुवारीमधे मी अमेरिकेत होतो आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांमधील वादविवादाच्या कार्यक्रमाचा काही भाग मी पाहू शकलो. व्हरमॉन्टचे सिनेटर बर्नी सँडर्स हे त्या मंचावर अग्रस्थानी होते. माझे अमेरिकन मित्र याबाबतीत दोन मतांत विभागले गेले. काहींचं असं म्हणणं होतं की, पांढरपेशा वर्गावरच्या आणि तरुणांवरच्या स्वतःच्या प्रभावामुळे केवळ सँडर्स हेच डेमोक्रॅटिक पक्षाच्या मतदारांना सध्याच्या अध्यक्षांविरुद्ध लढा देण्यासाठी प्रेरित करू शकतात. काहींचा मात्र असा विश्वास आहे की, कुठलाही पश्चात्ताप न बाळगणारं सँडर्स यांचे ‘डावे’पण त्यांचं अतोनात नुकसान करू शकतं. कदाचित त्यांच्या जीवावरही बेतू शकतं.

मार्चच्या सुरवातीला मी न्यूयॉर्कहून निघण्यापूर्वी जो बायडेन यांनी सँडर्स यांना गाठलं होतं आणि डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठीच्या शर्यतीत ते लवकरच सँडर्स यांना मागे टाकणार होते. आता त्यांनी डेमोक्रॅटिकच्या वतीने उमेदवारी निश्चित केली आहे. 

माझ्या काही मित्रांचं असं म्हणणं आहे की, बायडेन यांची शालीनता आणि दृढता श्वेतवर्णीय मतदारांच्या एका गटाला नक्कीच पुन्हा जिंकून घेईल. त्याचबरोबर माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्याशी असणारे त्यांचे संबंध आफ्रिकन-अमेरिकनांना मोठ्या संख्येने सोबत राहण्यास प्रोत्साहित करतील. याउलट काहींना असा विश्वास वाटतो की बायडेन यांचं वय, जोमदारपणाचा अभाव आणि त्यांच्या मुलाची युक्रेन-मधील कृत्यं हे घटक ट्रम्प यांना पायउतार करण्याच्या ‘डेमोक्रॅटिक’च्या आकांक्षेला मारक ठरू शकतील.

आपली पापं डब्लूएचओच्या माथी

कोविड-१९ या आजाराच्या वायरसचा उदय आणि अमेरिकेत झालेला त्याचा फैलाव यामुळे निर्माण झालेले प्रश्न अजूनही ताजे आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांची त्याबाबतची पहिली प्रतिक्रिया नाकबूल करण्याची आणि बढाईखोर होती. या वायरसमुळे निर्माण होऊ शकणारा धोका त्यांनी कमी लेखला आणि असा खोटाच दावा केला की, त्यांच्या सरकारने पुरेसे प्रतिबंधात्मक उपाय योजले आहेत. 

नोंदणीकृत रुग्णांची संख्या नाट्यमय पद्धतीने वाढली, तेव्हा त्यांनी उशिराने हालचाल सुरू केली. कोविड-१९ निवारणार्थ योजना मंजूर करण्यासाठी त्यांनी अमेरिकन काँग्रेसचं अधिवेशन बोलवलं आणि मग आखलेल्या योजनेनुसार मोफत तपासणी आणि आपत्कालीन पगारी रजा देऊ करण्याचं ठरवलं. भागधारकांसोबतच्या नेहमीच्या बैठका स्थगित केल्या. त्याचदरम्यान एका भाषणात वंशद्वेषी वक्तृत्वाचे दर्शन घडवत, या वायरसला ‘चायनीज वायरस’ असं संबोधलं.

कदाचित सल्लागारांच्या दबावामुळे चीनवर आर्थिक निर्बंध लादण्याची कल्पना त्यांनी सोडून दिली. मात्र आता त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेला बळीचा बकरा बनवण्याचं ठरवलंय. त्यांनी असा दावा केला की, इतक्या झपाट्याने हा वायरस पसरला, त्याची गती ओळखण्यात जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्लूएचओ कमी पडली आणि त्यामुळेच अमेरिकेनेही त्यासंबंधी तात्काळ काही कृती केली नाही.

हे कोरोना स्पेशलही वाचा :

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

बाहेरून आणलेलं सामानं वायरस फ्री कसं करावं?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

हा तर शुद्ध दांभिकपणाच!

जागतिक आरोग्य संघटनेच्या बाबतीतलं त्यांचं हे म्हणणं दोन कारणांनी दांभिकपणाचं होतं. पहिलं कारण म्हणजे त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेसारख्या राष्ट्रसमूहासाठी काम करणाऱ्या संस्थांबाबत नेहमी अनादरच दर्शवला आहे. अमेरिकन सरकारद्वारे त्या संघटनेला दिल्या जाणाऱ्या निधीमधे त्यांनी कपात केली आहे आणि याआधीच्या त्यांच्या सल्ल्यांविषयीही तुच्छतादर्शक उद्गार काढले आहेत.

दुसरं कारण म्हणजे जानेवारीच्या उत्तरार्धात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे उद्योगविषयक सल्लागार पीटर नवारो यांनी ‘कोरोना वायरसचे संकट अमेरिकन अर्थव्यवस्थेला उद्‌ध्वस्त करेल आणि या वायरसमुळे अनेक मृत्यू होतील,’ असा इशारा दिला होता. नवारो म्हणाले की, या वायरसचा सामना करण्यासाठी कोणतीही लस सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे पुरेशा संरक्षणाअभावी हा कोरोना वायरस पूर्णतः फैलावलेल्या अशा साथीच्या आजारात रूपांतरित होऊन, लाखो अमेरिकनांचे प्राण संकटात येण्याचा धोकाही वाढला आहे. 

न्यूयॉर्क टाइम्सने नवारो यांच्या निवेदनावर टिप्पणी करताना २९ जानेवारीला असं नोंदवलं आहे की, अमेरिकेला असणारा धोका ट्रम्प हे सुरुवातीला कमी लेखत होते. नंतर मात्र ते सांगू लागले की, इतक्या उद्‌ध्वस्त करणाऱ्या संकटाची कल्पनाही कुणी केली नव्हती. याच- दरम्यान नवारो यांचे वक्तव्य पुढे आलं.

कोरोनानं ट्रम्पला खाली खेचलं की मदत केली?

कोविड-१९ ने ट्रम्प यांच्या पुन्हा निवडून येण्याच्या शक्यतेमधे अडथळा निर्माण केला आहे की मदतच केली आहे, हे सांगता येणं या घडीला अवघड आहे. एका बाजूला ट्रम्प यांचे अस्थिर व्यक्तिमत्त्व ही या कामातील एक वाढीव अडचण आहे. त्यामुळे एखादा असा विचार करू शकतो की, कोरोनाच्या या संकटामधे निदान काही प्रमाणात किंवा बहुसंख्येनेही मतदार खात्रीलायक आणि सुस्थिर असणाऱ्या बायडेन यांच्याकडे वळतील. दुसऱ्या बाजूला, हा वायरस म्हणजे दगलबाज शत्रू राष्ट्रामधून येऊन अमेरिकेच्या किनारी धडकलेलं परदेशी संकट आहे, असं चित्र निर्माण केलं जाऊ शकतं.

२०१६ मधे झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या वेळी, परदेशा-विषयी द्वेष उत्पन्न करणाऱ्या भावनांनी ट्रम्प यांना निवडून येण्यास मदत केली होती. त्याच प्रकारच्या भावना ते पुन्हा उद्दीपित करत आहेत. त्यांच्या भाषणांमधे ते टोकाच्या देशाभिमानाची रणनीती वापरत आहेत. याचा वापर आपल्या पंतप्रधानांनीही २०१९ ची निवडणूक जिंकण्यासाठी केला होता. महत्त्वाच्या राष्ट्रीय आपत्तीमधे जो कुणी सत्तेवर असेल त्याच्याभोवती नागरिक एकवटतात, असेही एक निरीक्षण आहे. मग ते युनायटेड किंगडममधे बोरिस जॉन्सन असोत, भारतात नरेंद्र मोदी असोत किंवा अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प.

ट्रम्प यांचं २०१६ मधे निवडून येणं ही  जगासाठी दुःखद बातमी होती. तर त्यांचं पुन्हा निवडून येणं त्याहूनही अधिक दुःखद असणार आहे. हवामानबदलाने मानवजातीसमोर उभं केलेलं आव्हान अधिकच संकटाचं होत चाललेलंय. मध्य-पूर्वेतली यादवी युद्धं अधिक तीव्र होऊ शकतात. अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध कदाचित पूर्वीपेक्षा बिघडतील. असंच काहीसं अमेरिका आणि युरोप यांच्या संबंधांबाबतही होईल. जागतिक आरोग्य संघटना आणि निर्वासितांसाठीचे संयुक्त राष्ट्रांचे उच्चस्तरीय मंडळ यांसारख्या राष्ट्रसमूहांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्था अधिकच ढासळतील.

हेही वाचा : ट्रम्प यांच्या धमकीला घाबरून भारतानं औषधावरची निर्यातबंदी उठवली?

अमेरिकेच्या निवडणुकीची फळं सगळं जग भोगतं

कोविड-१९च्या उदयानंतर, या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारानं जिंकावं म्हणून अमेरिकाबाह्य जगातून गुंतवण्यात आलेल्या भागभांडवलात वाढच झालीय. या वायरसचे आर्थिक, सामाजिक आणि मानसिक मूल्य अवाढव्य असणार आहे, ज्याची तुलना केवळ दोन महायुद्धांशी करता येईल. कोविड-१९ची साथ ओसरेल, किंवा तो सौम्य होईल, तेव्हा जग पूर्वपदावर आणण्यासाठी असामान्य प्रमाणात ऊर्जा, बुद्धिमत्ता आणि सहानुभूती लागेल.

या प्रयत्नांमधे आपणा सर्वांनी प्रमुख राष्ट्रांनी एकत्र येऊन काम करण्याची यापूर्वीपेक्षाही अधिक गरज भासेल. नवी लस सर्वांसाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावी लागेल. व्यापार आणि दळणवळणाचे नेहमीचे मार्ग पुन्हा सुरू करून द्यावे लागतील. आर्थिक यंत्रणांवरील विश्वास पुन्हा मिळवून द्यावा लागेल. डोनाल्ड ट्रम्प हेच पृथ्वीवरील सर्वाधिक शक्तिशाली राष्ट्राच्या अध्यक्षपदी पुन्हा निवडून येणार असतील, तर त्यांच्या लहरी पद्धती मात्र राष्ट्रा-राष्ट्रांतील विधायक सहकार्यासाठी ज्याची जगाला तातडीची गरज आहे प्रतिकूल आहेत.

नित्य नियमाप्रमाणे, अमेरिकेची प्रत्येक अध्यक्षीय निवडणूक हा लोकशाहीचा अत्यंत महत्त्वाचा आणि जगातील सर्वांत मोठा कार्यक्रम आहे. त्यासाठी केवळ अमेरिकन नागरिकच मतदान करू शकत असले तरी, त्याचे परिणाम अमेरिकन नसलेल्या लाखो व्यक्तींचे प्राक्तन आणि भविष्य ठरवू शकतात. या अर्थाने २०२०ची अध्यक्षीय निवडणूक या आधीच्या सर्व निवडणुकांपेक्षाही कदाचित अधिकच महत्त्वाची आहे.

हेही वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर

क्वारंटाईनमधेही लोकांना जातीची माती का खावी वाटते?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

जय शेंडुरे: कोरोना आणि ट्रम्प प्रशासनाला पुरुन उरणारा रांगडा कोल्हापूरकर

(या लेखाचा सुहास पाटील यांनी केला असून 18 एप्रिल 2020 च्या साधना साप्ताहिकात हा लेख पुर्वप्रकाशित झाला आहे)