अमित शाहांनी फडणवीसांचा, शरद पवारांनी अजितदादांचा केला गेम?

२७ नोव्हेंबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार कोसळलं. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या या दोन कर्तृत्ववान नेत्यांच्या राजकारणाचा आलेख खटकन खाली आला. दोघांचंही राजकारण संपलेलं नाही. पण त्याला मोठा ब्रेक नक्की बसलाय. त्यांना पुढचा काही काळ चाचपडत राहावं लागेल. यामागे आहे तरी कोण? त्यांच्या नेत्यांनाच त्यांचं ओझं झालं नव्हतं ना?

भीमाशंकर, घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर, परळीचा वैद्यनाथ आणि औंढ्याचा नागनाथ अशी बारातली पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात असल्याचा मराठी माणसाचा दावा असतो. तरीही ही पाच जागृत ज्योतिर्लिंग सोडून देवेंद्र फडणवीस विधानसभेसाठी मतदान झाल्यानंतर उत्तराखंडमधल्या केदारनाथाच्या दर्शनाला गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर केदारनाथाचंच दर्शन घेतलं होतं.

हेही वाचाः प्रोटेम स्पीकरच्या नेमणुकीने फडणवीसांचे सत्तास्थापनेचे मनसुबे उधळले

केदारनाथ कोपला आणि अमित शाहही

पण केदारनाथ मोदींना पावला, तसा फडणवीसांना पावला नाही. उलट कोपलाच. केदारनाथला जाऊन फडणवीसांनी राष्ट्रीय राजकारणात जाण्याचा इरादा अप्रत्यक्षपणे जगजाहीर केला होता. त्यांचे भक्त `नरेंद्रनंतर देवेंद्रच` असं सांगत त्यांना पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करत होतेच. त्यासाठी `इंटलेक्चुअल्स फॉर देवेंद्र` आणि `लष्कर ए देवेंद्र` असे ग्रुप कामाला लागले होते. 

संघाचं बाळकडू प्यालेले, खास नागपूरचे, त्यात ब्राह्मण. त्यांनी सर्वात तरुण महापौर ते यशस्वी मुख्यमंत्री असा त्यांचा कडक बायोडेटा होता. ते शरद पवारांच्या राजकारणाचा शेवट करून दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनण्यासाठी उत्सुक होते. केंद्रीय मंत्रिमंडळात जाऊन राष्ट्रीय पातळीवरही ठसा उमटवण्याचे त्यांचे प्लान असल्याचं सांगितलं जात होते. पाच वर्षांत हे झालं असतं तर ते २०२४मधे मोदींचे पंतप्रधानपदाचे वारसदार म्हणून नक्कीच प्रबळ दावेदार ठरले असते.

फडणवीस पंतप्रधानपदाचे एकमेव स्पर्धक

अशावेळेस पंतप्रधानपदाचे सध्याचे दावेदार अमित शाह यांना त्यांच्या या महत्त्वाकांक्षा बोचल्या नसत्या तरच नवल. मोदी पुढच्या वर्षी ७० वर्षांचे होतील. अमित शाह त्यांच्यापेक्षा चौदा वर्षांनी लहान आहेत तर फडणवीस वीस वर्षांनी. शाह आणि फडणवीस यांच्या वयात फक्त सहाच वर्षांचं अंतर आहे. अमित शाह यांच्यासोबत गुजरातपासून काम करणाऱ्या एका सहकाऱ्याने कोलाजला सांगितलं, ते असं – 

`अमित शाह यांना पंतप्रधानपद खुणावू लागलंय, यात शंका नाही. मोदींचे समवयस्क त्यांनी स्वतःच संपवलेत. आता योगी आदित्यनाथ यांच्यासारखे नवे स्पर्धकही बाजूला पडलेत. नव्याने कुणी स्पर्धक उभा राहू नये, यासाठी शाह अत्यंत सावध आहेत. अशावेळेस फडणवीस हेच त्यांच्यासाठी भविष्यातले स्पर्धक आहेत. त्यामुळे त्यांचा पत्ता कट करण्याचे प्रयत्न शाहांनी आधीच सुरू केलेत. फडणवीसांसमोर भविष्यातही अनेक आव्हानं उभी राहतील. बघाच तुम्ही.`

मणिपूर, गोवा यांसारखी छोटीछोटी राज्यंही बहुमत नसतानाही आपल्या ताब्यात राहावीत यासाठी अमित शाह यांनी आकाश पाताळ एक केलं होतं. महाराष्ट्राबरोबर निवडणुका झालेल्या हरयाणातला पेचही त्यांनी दोन दिवसांत संपवला. पण महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात मात्र त्यांनी हातपाय हलवलेच नाहीत. यामागचं दुसरं कारण सापडत नाही.

हेही वाचाः २२० पारचा नारा देणाऱ्या भाजपला अपयशाचं तोंड का बघावं लागलं?

अमित शाह एवढं शांत का राहिले?

पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभेत त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. यावेळेस मात्र ते तुलनेने फारच कमी आले. त्यांनी सारी जबाबदारी फडणवीसांवर टाकली. तिकीटांचेही निर्णय घेऊ दिले. सोबत फडणवीसांना चुका करू दिल्या. त्याच्या गुंत्यात फडणवीस अडकत गेले आणि अपेक्षेपेक्षा खूपच कमी जागा भाजपच्या पदरात आल्या. त्यात त्यांची सत्तेची सगळीच समीकरणं बिघडली.

फडणवीसांशी संपर्क तोडल्यानंतर उद्धव ठाकरे अमित शाहांच्या फोनची वाट पाहत होते. तसं त्यांनीच नंतर पत्रकार परिषदेत सांगितलं. एका फोनवर किंवा भेटीत शिवसेनेला खिशात टाकणं अमित शाहांसाठी कठीण नव्हतं. लोकसभेत त्यांनी ते करून दाखवलं होतं. पण त्यांनी ते टाळलं. उलट या साऱ्या प्रकरणात दीर्घकाळ शांत राहिले. सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी बोलावलं तेव्हाच मुख्यमंत्री बनण्याची फडणवीसांची इच्छा होती. पण शाहांनी ते होऊ दिलं नाही. 

पुढचा काळ फडणवीसांसाठी मुश्कील

पुढच्या काही दिवसांत फडणवीसांनी पक्षातल्या दुसऱ्या एखाद्या नेत्याला मुख्यमंत्री बनू दिलं असतं, तरी शाहांनी कदाचित हा पेच सोडवला असता. पण तेही झालं नाही. आता भाजप तोंडघशी पडल्याचा सारा दोष फडणवीसांच्या अहंकाराला आणि अतिआत्मविश्वासाला दिला जातोय. त्यांचे राजकीय डावपेच अगदीच बालिश असल्याचं सिद्ध होतंय. खडसे, तावडे, मुंडे अशा पक्षातल्या विरोधकांना संपवण्याचे गेम त्यांनी खेळल्याचे उघड आरोप होताहेत. अजित पवारांची साथ घेतल्याने त्यांच्या प्रतिमेलाही तडा गेलाय. त्यांच्यावर ब्राह्मणी शिक्काही बसलाय. अशावेळेस त्यांचं राजकारण किमान दहा वर्षं मागे गेल्यास आश्चर्य नाही.

देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच्या हातानेच हे सगळं अधःपतन करून घेतलंय, हेही खरंच. मात्र अमित शाहांनी ते होऊ दिलं. त्यांनी ठरवलं असतं तर ते रोखू शकले असते. इतर राज्यांत सत्तास्थापनेसाठी ते सक्रीय मदत करतात. तशी त्यांनी फडणवीसांना केल्याचं दिसत नाही. पण फडणवीसांची खरी परीक्षा यापुढेच आहे. पराभूत मुख्यमंत्र्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देण्याची पद्धत मोदींनी आधीच मोडीत काढली आहेच. त्यानुसार शाह फडणवीसांना दिल्लीत येण्यापासून रोखण्याची शक्यता खूप आहे. उद्या त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले, तर शाहांचा गेम सुरूच असल्याचं धरून चालावं लागेल.

हेही वाचाः विधानसभा निकालाने कुणाला पैलवान ठरवलं, कुणाची पाठ लावली?

काकांना पुतण्याची अडचण होती?

विधानसभा निवडणुकीपासून शरद पवारांचं राजकारण बदललंय. हे नवं राजकारण प्रस्थापित विरोधाचं, सर्वसमावेशकतेचं, प्रामाणिकपणाचं आणि विश्वासाचं आहे. या राजकारणात भ्रष्ट्राचाराचे आरोप असलेल्या अजित पवारांना स्थान नाहीय. काँट्रॅक्टर, धनदांडगे आणि गुंडांना एकत्र आणून मराठा जातीच्या तोंडवळ्यांचं राजकारण करण्याचा अजितदादा पॅटर्न मोदींच्या जादूनेच कालबाह्य ठरला होता. पवारांच्या नव्या राजकारणात तो आणखी मागे फेकला गेला.

अजित पवार खरं तर राज्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांत प्रशासन, जनसंपर्क, संघटन या बाबतींत सर्वोत्तम ठरू शकतात. इतकी त्यांची धडाडी आहे. पण त्यांचा फटकळपणा, सरंजामदारी आणि भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे त्यांच्याविषयी राज्यभर निगेटिविटी आहे. शरद पवार नवा राष्ट्रवादी आणि नवं सरकार घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात अजित पवारांना मुख्यमंत्री करणं तर सोडाच पण उपमुख्यमंत्री करणंही अडचणीचं होतं.

अजित पवारांची कोंडी झाली की केली?

अजित पवारांना काकांच्या सावलीतून आज ना उद्या बाहेर पडावं लागणारच होतं. त्यांना तरुणपणापासून स्वतंत्रपणे कारभार हाकण्याची सवय होती. पण शरद पवार महाराष्ट्रात पुन्हा सक्रिय झाल्यानंतर अजित पवारांना अनेकदा आपल्या निर्णयांवर आवर घालावा लागत होता. आपण मुख्यमंत्री बनणार नाही आणि आपल्यावरची कारवाईची तलवार कायम टांगती राहिल, हे स्पष्ट झालं होतं. त्यांची कोंडी झाली होती. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार ही पवार कुटुंबातली दोन पॉवर सेंटर राज्यातही प्रभावी होत होती. 

पक्षात, सरकारमधे दुय्यम स्थान स्वीकारावं किंवा भाजपबरोबर जावं, हेच दोन पर्याय त्यांच्यासमोर होते. त्यातला दुसरा त्यांनी स्वीकारला. ही परिस्थिती ओढवून घेण्यात अजित पवारांचा स्वभाव आणि `सत्कर्म` कारण होतीच. पण शरद पवारांच्या ट्रॅपमधे ते फसत गेले, असाही त्याचा अर्थ लावता येईल. अजित पवारांच्या बंडामुळे ना त्यांचा स्वतःचा फायदा झाला ना फडणवीसांचा. यात शरद पवार तेल लावलेल्या पैलवानाप्रमाणे निसटूनच आलेले नाहीत. तर विजयी गुलाल उधळत आहेत. नवं बेरजेचं राजकारण करताना त्यांनी त्यातून अजित पवारांना वजा केलंय. त्यात त्यांनाही दुसरा पर्याय नव्हताच.

हेही वाचाः 

हा तर देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत पराभव

सत्ता संघर्षाच्या पेचात देवेंद्र फडणवीस एकाकी

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचं ऐतिहासिक महाभारत

इलेक्टोरल बॉण्डमुळे मोदी सरकारच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह