झारखंड विधानसभेसाठी पाचही टप्प्यांचं मतदान संपलं. मतदान संपलं तसं एक्झिट पोलही आले. या एक्झिट पोलमधे भाजपसाठी धक्कादायक संकेत आहेत. पोलनुसार, जनमत भाजपच्या विरोधात आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खालेले विरोधी पक्ष नवी उभारी घेताना दिसताहेत. या एक्झिट पोलमधून निघणारे चार अर्थ.
अब की बार ६५ पारचा नारा देणाऱ्या भाजपला एक्झिट पोलनं चांगलंच निराश केलंय. जवळपास सगळ्याच पोल्सनी भाजपच्या हातातून सत्ता निसटण्याचं भाकीत वर्तवलंय. लोकांनी लोकसभेत भाजपला भरभरून मतदान करताना विधानभेत विरोधाचा कौल देत डबल इंजिन सरकारचं एक इंजिन काढून घेण्याचे संकेत दिलेत.
२०१४ मधे ३१.८ टक्के मतांसह ३७ जागा मिळवत भाजप सगळ्यांत मोठा पक्ष झाला होता. भाजपने पाच जागा जिंकलेल्या ऑल झारखंड स्टुडन्ट युनियन अर्थात आजसूला सोबत घेत सरकार बनवलं. झारखंड मुक्ती मोर्चा अर्थात झामुमो २०.८ टक्के मतांसह १९ जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला. त्याखालोखाल झारखंड विकास मोर्चा अर्थात झाविमो आठ तर काँग्रेसला सहा आणि इतरांना सहा जागा मिळाल्या.
यंदा सत्ताधारी भाजपने ८१ पैकी केवळ ७९ जागांवरच उमेदवार उभे केलेत. आजसूचे नेते सुदेश महतो यांच्याविरोधात उमेदवार दिला नाही, तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. मावळत्या सरकारचा भाग राहिलेल्या आजसूने स्वबळावर निवडणूक लढवत ५३ उमेदवार उभे केलेत. झामुमो, काँग्रेस आणि राजद यांच्या महागठबंधनने ८१ जागांवर उमेदवार दिले. यात झामुमो ४३, काँग्रेस ३१ आणि राजदचे ७ उमेदवार आहेत. झाविमो हा एकमेव पक्ष आहे, ज्यांनी सर्व ८१ जागांवर उमेदवार उभे केलेत.
इंडिया टुडे, माय एक्सिसच्या पोलनुसार, भाजप २२-३२, महागठबंधन ३८-५०, आजसू ३-५, झाविमो २-४, तर छोट्या पक्षांसह अपक्ष मिळून इतर ४-७ जागा मिळू शकतात. महागठबंधनमधे झामुमोला २४ ते २८, काँग्रेसला १२ ते १८ तर राजदला २ ते ४ जागा मिळू शकतात.
एबीपी, सी वोटरच्या पोलनुसार, भाजप ३२, महागठबंधन ३५, आजसू ५, झाविमो २ आणि इतरांना ७ जागा मिळतील. झारखंड कशिश न्यूजने आपल्या एक्झिट पोलमधे, भाजप २५-३०, महागठबंधन ३७-४९, आजसू २-४ आणि इतर २-४ असा अंदाज वर्तवलाय.
टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलमधे भाजप २८, महागठबंधन ४४, आजसू ००, झाविमो ३ तर इतरांना सहा जागा देण्यात आल्यात. भाजपला एका पोलच्या अंदाजावरून काहीसा दिलासा मिळू शकतो. न्यूज ११ भारतच्या पोलनुसार, भाजप ३०-३५, तर महागठबंधन २८-३६, आजसू ८-१२, झाविमो ४-६ आणि इतर ६ असं विधानसभेचं चित्र असू शकतं.
हेही वाचा : काँग्रेसने शेवटच्या टप्प्यात प्रियंकास्त्र बाहेर काढण्यामागची चार कारणं
पाचही एक्झिट पोलच्या आकड्यांवर नजर टाकल्यास एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे, झारखंडमधे भाजपच्या विरोधात जनमत आहे. इंडिया टुडे आणि एक्सिस यांच्या एक्झिट पोलमधे भाजपला पराभवाचा सामना करावा लागताना दिसतोय. झामुमो, काँग्रेस आणि राजद यांच्या महागठबंधनला स्पष्ट बहुमत मिळेल. भाजपची पराभवाकडे तर महागठबंधनची विजयाकडे वाटचाल सुरू आहे.
दुसरीकडे सी वोटर एक्झिट पोलच्या मते, झारखंडमधे त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येऊ शकते. त्रिशंकू विधानसभेतही भाजपचा रस्ता काही सोप्पा नाही. कारण त्रिशंकू विधानसभेत छोट्या मोठ्या पक्षांसोबतच अपक्षांना एकत्र घेत सरकार बनवणं कठीण आहे. कारण डाव्या पक्षांच्या वाट्यालाही काही जागा जाताना दिसताहेत. आणि डावे पक्ष भाजपला पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. आणि हीच गोष्ट भाजपसाठी नवं सरकार बनवण्यासाठी अडचणीची आहे.
एक्झिट पोलचा दुसरा अर्थ म्हणजे, मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या सरकारविरुद्धचा हा स्पष्ट जनादेश आहे. गेल्यावेळी बिनचेहऱ्याने निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या भाजपने यंदा रघुवर दास यांना आपला चेहरा बनवलं. पण सुरवातीपासूनच त्यांच्याविरोधात लोकांमधे नाराजीचा सुर होता. एक्झिट पोलच्या आकडेवारीतही लोकांची नाराजी दिसून येतेय.
इंडिया टुडेच्या पोलमधे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक २९ टक्के लोक झामुमोचे नेते हेमंत सोरेन यांना पसंती देताहेत. त्याखालोखाल २६ टक्के लोकांनी रघुवर दास यांच्या नावावर मोहोर उमटवलीय. म्हणजेच जनमत भाजपसोबतच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेल्या रघुवर दास यांच्याविरोधातही आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, रघुवर दास यांच्यावर भाजपमधला एक गटही नाराज आहे. मावळत्या सरकारमधे मंत्री राहिलेले सरयू राय थेट मुख्यमंत्र्यांविरोधातच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
हेही वाचा : झारखंडच्या लिटमस पेपरवर मोदींचं यशापयश मोजावं लागणार
झारखंडबद्दलच्या एक्झिट पोलने आणखी एक गोष्ट समोर आलीय. ती म्हणजे, विधानसभेच्या निवडणुकीत प्रादेशिक, स्थानिक मुद्देच महत्त्वाचे असतात. राम मंदिर, नागरिकत्व दुरुस्ती कायदा यासारख्या राष्ट्रीय मुद्यांचा मतदानावर कुठलाच परिणाम होताना दिसत नाही. भाजपने या दोन्ही मुद्यांसाठी सारं रान पेटवलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या प्रचारात हेच मुद्दे लावून धरले. दोघंही आपल्या भाषणात अधिकाधिक वेळ या दोन मुद्यांभोवतीच राहिले.
शेवटच्या दोन म्हणजेच चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात तर भाजपचा सारा प्रचार राम मंदिर आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा या दोन मुद्यांभोवतीच फिरला. गृहमंत्री शाह यांनी येत्या चार महिन्यात अयोध्येत राम मंदिर उभारणार असल्याचा दावा करत मतदारांत ध्रुवीकरणाची खेळी खेळली. पण एक्झिट पोलने राम मंदिर आणि नागरिकत्व हे दोन्ही मुद्दे निकालात काढलेत.
झारखंड हे आदिवासीबहुल राज्य आहे. आदिवासींच्या हितांचं संरक्षण करण्यासाठी या राज्याची निर्मिती झाली. तरीही भाजपने रघुवर दास यांच्या रूपाने गैर आदिवासी व्यक्तीला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवलं. बहुमताच्या जोरावर मौका मिळताच भाजपने गैर आदिवासी माणसाला मुख्यमंत्री बनवण्याचा धोका पत्करला. पण भाजपची ही खेळीच त्यांच्या अंगलट आल्याचं एक्झिट पोलच्या आकडेवारीवरून दिसतंय.
सी वोटरच्या मते, आदिवासी मतदार भाजपच्या विरोधात गेलाय. आदिवासी मतदारांनी भाजपला नाकारलंय. याउलट महागठबंधनला गेल्यावेळच्या तुलनेत आदिवासी पट्ट्यातून सातेक टक्के जास्तीचा जनाधार मिळतोय.
हेही वाचा :
झारखंडच्या निवडणुकीत काय सुरू आहे?
झारखंडमधे नरेंद्र मोदींच्या सभेला लाखोंची गर्दी, पण