प्रचाराच्या दरम्यान अस्वस्थ असणारे सोलापुरात सुशीलकुमार शिंदे आज थोडे निर्धास्त असू शकतील. पण काँग्रेसचे दुसरे बडे नेते अशोक चव्हाण मात्र अजूनही अस्वस्थच असण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात वंचित बहुजन आघाडी चाललीय. पण त्यांचे नेते प्रकाश आंबेडकर त्यांच्या दोन्ही जागांवर जिंकण्याची शक्यता फारच कमी आहे. तर विदर्भात शेतकऱ्यांची नाराजी निर्णायक ठरतेय.```
मराठवाड्यातल्या हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड आणि परभणी या सहा, विदर्भातल्या अकोला, अमरावती आणि बुलडाणा या तीन तर मराठवाड्याला जोडून असणारी पश्चिम महाराष्ट्रातली सोलापूर ही एक. अशा एकूण दहा मतदारसंघात आज १८ एप्रिलला मतदान झालं. त्याची ५ वाजेपर्यंतची आकडेवारी समोर आलीय. त्यावरून अंदाज बांधणं कठीण असलं, तरी स्थानिक पत्रकारांशी बोलून केलेला हा रिपोर्ट.
अपेक्षेप्रमाणे सोलापुरातली तिरंगी लढत मतदानाच्या दिवसापर्यंत रंगलीय. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, लिंगायतांचे धर्मगुरू डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी आणि रिपब्लिकन नेते प्रकाश आंबेडकर असे तीन वजनदार उमेदवार शेवटपर्यंत आपली ताकद लावत राहिले. ही निवडणूक हिरीरीने लढली गेली.
सोलापुरात २०१४ला ५५.६८ टक्के मतदान झालं होतं. ५ वाजेपर्यंतचं आजचं मतदान होतं. ५१.९८. त्यामुळे शेवटच्या तासात ते कसंबसं मागच्या वेळच्या टक्क्यांपर्यंत जाऊ शकेल. अपेक्षेप्रमाणे संपूर्ण मतदारसंघातली नवबौद्ध मतं प्रकाश आंबेडकरांबरोबर राहिली. लिंगायत मतं स्वामींबरोबर राहिली. स्वामींना सोबतच शहरातल्या पद्मशाली समाजाचा आणि पांढरपेशांचा पाठिंबा दिसला. पण विक्रमी सभांमुळे मुसलमान आणि धनगर मतं आंबेडकरांकडे जातील अशी अपेक्षा होती. ती अपेक्षेइतकी वळताना दिसली नाही.
हेही वाचाः सोलापुरात रंगलीय दिग्गज उमेदवारांची तीन पायांची शर्यत
तुलनेने पंढरपूर-मंगळवेढा आणि मोहोळ या मतदारसंघात भरघोस मतदान झालंय. हा ग्रामीण मतदार पंजाला उघडपणे सांगून मतदान करताना दिसला. तसंच सहकारमंत्र्यांच्या दक्षिण सोलापुरातलाही ग्रामीण मतदार शिंदेंबरोबर गेला. त्यात आश्चर्यकारकपणे मराठा समाजाचं प्रमाण मोठं होतं. आता प्रणिती शिंदे, सिद्धराम म्हेत्रे, भारत भालके, रमेश कदम या आघाडीच्या आमदारांनी सर्व समाजातला काँग्रेसचा मतदार ईवीएमपर्यंत आणला असेल, तर शिंदेंना शेवटच्या निवडणुकीत बऱ्यापैकी विजय मिळू शकेल.
सोलापूरला लागून असलेल्या उस्मानाबादमधे सोलापूरचीच हवा दिसतेय. तिथे पहिल्यांदाच काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र मिळून प्रचार करताना दिसली. त्यामुळे राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह यांचं पारडं जड झालंय. कारण शिवसेनेत उभी फूट पडताना दिसलीय. तिथे जुने शिवसैनिक आणि नवे शिवसैनिक अशी गटबाजी होती. ती इतकी होती माजी खासदार रवी गायकवाड यांनी थेट शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात पोलिस तक्रारच नोंदवली.
उस्मानाबादमधे वंचित बहुजन आघाडी चालली नाही, ती नांदेड आणि बीड या सेलिब्रेटी मतदारसंघात चालताना दिसली. त्यामुळे काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांच्यासाठी अडचण उभी केलीय. बीडमधे विद्यमान खासदार प्रीतम मुंडेंना लोकसभेचा रस्ता सोपा झालाय. पण त्यांना पूर्वीसारखी विक्रमी लीड मिळू शकत नाही. अशोक चव्हाणांची मात्र नांदेडमधे प्रतापराव पाटील चिखलीकरांनी चांगलीच कोंडी केलीय.
हेही वाचाः परभणी, हिंगोलीः बालेकिल्ले असूनही शिवसेनेची शेवटपर्यंत कोंडी
नांदेडच्या शेजारी हिंगोलीत नांदेडमधून आलेले शिवसेनेचे हेमंत पाटील आणि शिवसेनेत काँग्रेसमधे आलेले सुभाष वानखेडे यांच्यात चांगली लढत झालीय. तिथे इतके परस्परविरोधी मुद्दे प्रभावी असल्यामुळे नेमकं कोण जिंकेल हे सांगणं कठीण झालंय. तेच काहीसं परभणीतही दिसतंय. परभणीत विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव आणि राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांच्यात सामना रंगलाय. तिथेही अटीतटीचा संघर्ष आहे. पण विटेकरांचं पारडं जड मानलं जातंय. पण अगदीच थोडंसं.
तर लातुरात भाजपचे सुधाकर श्रृंगारे आणि काँग्रेसचे मच्छिंद्र कामंत हे उमेदवार प्रत्यक्षात लढत आहेत. पण दोन्ही उमेदवार नवखेच आहेत. खरी लढत भाजपचे मंत्री संभाजीराव निलंगेकर आणि काँग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुख यांच्यातच झालीय. त्यात सत्तेमुळे लोकांमधे आतवर घुसलेल्या निलंगेकरांनी जोर मारलाय.
११ तारखेला पहिल्या टप्प्यात विदर्भातल्या सात मतदारसंघात मतदान झालं. तेव्हाच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शेतकऱ्यांची नाराजी नजरेत भरण्याइतकी दिसली होती. तोच ट्रेंड दुसऱ्या टप्प्यातल्या विदर्भातल्या तिन्ही जागांवर कायम राहताना दिसला. अमरावती, अकोला आणि बुलडाणा या तिन्ही मतदारसंघात मुस्लिम, दलित आणि शेतकरी हे तिन्ही भाजपच्या विरोधात एकत्र आल्याने काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूने विदर्भातली हवा फिरताना दिसतेय.
अमरावतीच्या नवनीत राणा युवा स्वाभिमान या त्यांचे पती रवी राणा यांच्या पक्षाच्या उमेदवार होत्या. त्यांना राष्ट्रवादीने आपल्या वाट्याला आलेली जागा दिली. त्या मतदारांना आपल्या वाटतील अशा उमेदवार नव्हत्या. तरीही त्यांना ग्रामीण भागांतून चांगलं मतदान झाल्याचे रिपोर्ट आहेत. त्याला शेतकऱ्यांच्या मनात असलेली नाराजीच कारण आहे. शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना पुन्हा का निवडून द्यायचं याचं कारण ते देऊ शकले नाहीत.
अमरावतीत चालला नाही तो वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर बुलडाण्यात मात्र लक्षात येण्याइतपत चालला. तिथले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बळीराम शिरस्कार हे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या माळी समाजाच्या मतांना नवबौद्ध मतांची जोड मिळाल्याने त्यांचा टक्का वाढला. एरवी ही मतं राष्ट्रवादीच्या राजेंद्र शिंगणेंकडे गेली असती, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता शिरस्कार किती चालले यावर शिंगणे किंवा त्यांचे नातेवाईक असणारे बुलडाण्याचे सध्याचे खासदार शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांचं भवितव्य अवलंबून आहे.
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर अकोल्यात उभे होते. तिथे मोदी सरकारची कामगिरी आणि जात हे दोन्ही मुद्दे चालले नाहीत. कारण त्याहीपेक्षा मोठा मुद्दा तिथे होता. तो होता धर्म. प्रकाश आंबेडकर बौद्ध, काँग्रेसचे हिदायत पटेल मुस्लिम आणि संजय धोत्रे हिंदू अशी मतविभागणी उघडपणे झाली. त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे.
हेही वाचाः नांदेडः अशोक चव्हाणांच्या अस्तित्वाची लढाई