एक्झिट अंदाजः १४ मतदारसंघात कोण जिंकतंय ते इथे वाचा

२४ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ८ मिनिटं


देशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा नरेंद्र मोदीच हवेत किंवा देशातली लोकशाही टिकवायची असेल तर नरेंद्र मोदी नकोतच, या अशा कोणत्याही राष्ट्रीय मुद्द्यावर आज २३ एप्रिलचा महाराष्ट्रातल्या मतदानाचा तिसरा टप्पा लढवलाच गेला नाही. जे काही मतदान झालं ते गटातटाच्या राजकारणावर आणि जातीच्या समीकरणावर. या जमिनीवरच्या मुद्द्यांचा विचार करून बांधलेले हे कयास.

आज २३ एप्रिल हा लोकसभा मतदानाचा देशभरातला सगळ्यात मोठा टप्पा होता. त्यात महाराष्ट्रातल्या १४ जागांसाठी मतदान झालं. त्यात उत्तर महाराष्ट्रातले जळगाव रावेर हे दोन, मराठवाड्यातले औरंगाबाद आणि जालना हे दोन, कोकणातले रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड हे दोन, तसंच पश्चिम महाराष्ट्रातले कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, सातारा, माढा, अहमदनगर, पुणे आणि बारामती हे आठ असे एकूण सतरा मतदारसंघ मतदानात रंगले.

साताऱ्यात एकच नारा उदयनराजे

पुन्हा एकदा सातारा मतदारसंघात लढत तशी झालीच नाही. उदयनराजे हाच एकमेव ब्रँड तिथे चाललाय. निवडणूक लढवण्यासाठी नवी मुंबईतून गावी गेलेले माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील फक्त चर्चेत आले. त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपच्या जवळ आणि तिथून शिवसेनेत असा प्रवास करून आपली विश्वासार्हता का गमावली, याचं उत्तर कदाचित त्यांच्याकडेही नसावं.

कोल्हापुरात मुन्ना महाडिक अडचणीत?

कोल्हापुरात महाडिकांचाच अंमल चालणार, हा दावा या आपल्या मतदानातून खोटा ठरवण्याचं कोल्हापूरच्या मतदारांनी ठरवलेलं दिसतंय. याच मतदारांच्या जोरावर धनंजय उर्फ मुन्ना महाडिक ऐन मोदी लाटेतही राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले होते. पण त्यानंतर महाडिक कंपनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची कळ काढत राहिले. त्यामुळे या सगळ्यांनी मिळून महाडिकांना अडचणीत आणलंय.

पण महाडिकांची स्वतःची यंत्रणा आहे. त्यातून त्यांनी महिला, दलित आणि मुस्लिम यांचं एकतर्फी मतदान स्वतःकडे खेचलं असेल, तर पुन्हा एकदा सगळ्यांचे दावे खोटे ठरवत मुन्ना जिंकू शकतात.

हेही वाचाः दक्षिण महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई

हातकणंगलेत शेट्टींसमोर आव्हान, तरीही सेफ

दिल्ली गाजवलेल्या राजू शेट्टींना ही निवडणूक वाटली होती, तितकी सोपी गेली नाही. त्यांची आंदोलनं, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चर्चा झालीच नाही. यावेळेस शेट्टींची जात काढली गेली. अल्पसंख्याक जैन समाजाचे शेट्टी त्यामुळे अडचणीत आले. तरीही शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने शेट्टींच्या उंचीपर्यंत पोचू शकले नाहीत. थेट मोदींना आव्हान देणं शेट्टींना भारी पडलं.

भाजपने आपली सगळी ताकद पणाला लावली. विनय कोरेंची रसदही त्यांच्या मदतीला आली. तरीही शेट्टी हरण्याची शक्यता मात्र फारच कमी. त्यांना हरवू शकते ती वंचित बहुनज आघाडी. त्याचे उमेदवार हाजी अस्लम सैय्यद यांना चांगलंच मतदान झाल्याचे अनपेक्षित रिपोर्ट आहेत. त्यांनी लाखापेक्षा जास्त मतं घेतली, तर शेट्टींना मोठा फटका बसू शकतो. कारण ही सगळी मतं शेट्टींचीच आहेत.

सांगलीत वसंतदादांची पुण्याई अजूनही प्रभावी

सांगलीतही राजू शेट्टींची बॅट चालली. विशाल पाटील यांना दिलेली उमेदवारी दिली, इथेच अर्धी लढाई जिंकल्यासारखी होती. २०१४च्या निवडणुकीतही काँग्रेसला पावणेचार लाख मतं मिळाली होती. ती फक्त वसंतदादांची पुण्याई आहे. आता तो आकडा वाढू शकतो. आणि तोच विशाल पाटलांना तारून नेऊ शकतो. अर्थातच विद्यमान आमदार भाजपचे संजयकाका पाटील यांना हरवणं सोपं नाहीच.

पण वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर हे बऱ्यापैकी चाललेत. तिथल्या धनगर मतांना नवबौद्ध मतदारांनी साथ दिल्यामुळे ते रेसमधे आहेत. मात्र संजयकाकांची हक्काची मतं सोबत राहिली नसावीत, असा अंदाज आहे. त्यांचा भाजपमधूनच हातचं राखून पाठिंबा मिळाल्याचं पत्रकार सांगताहेत. नाहीतर या अडचणीतही ते हमखास जिंकून येऊ शकले असते.

हेही वाचाः एक्झिट अंदाज: दुसऱ्या टप्प्यात कोण जिंकलंय, कोण हरलंय?

रायगडचा बालेकिल्ला यावेळी घड्याळाकडे?

पूर्वीचा रत्नागिरी आणि आताचा रायगड मतदारसंघ, नाव बदलला तरी नेमाने शिवसेनेच्या अनंत गीतेंना निवडून देत होता. या बालेकिल्ल्यात २०१४ला मोदी लाट असताना गीते कसेबसे निवडून आले होते. त्याला राष्ट्रवादीचे सुनील तटकरे तेव्हाही तगडे उमेदवार होते आणि आताही आहेत. यावेळेस तर त्यांच्या सोबत शेकापही आहे. शिवाय आता मोदी लाटही नाही.

ही सारी गणितं या प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही काम करताना दिसली. गीतेंकडे केंद्रीय मंत्री म्हणून केलेली फारशी लक्षणीय कामं नव्हती. होती ती ते मतदारांपर्यंत पोचवू शकले नाहीत. जातीचं गणित त्यांच्या बाजूने होतं. पण त्याला अँटिइन्कबन्सीने धक्का दिलाय.

रत्नागिरी सिंधुदुर्गात राणेयुगाचा अस्त?

शिवसेनेसाठी एका हाताच्या बोटावर मोजता येतील अशा कन्फर्म जागा होत्या, त्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग एक मानली जात होती. कारण नारायण राणे हा फॅक्टर तिथे चालताना दिसतच नव्हता. प्रत्यक्ष मतदानातही तो चालला नाही. रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक मतदानकेंद्रांवर राणेंचे बूथही नव्हते. शिवसेनेबद्दल प्रेम म्हणून नाही तर राणे नकोत म्हणून इतर सगळे पक्ष विनायक राऊतांच्या सोबत राहताना दिसले. त्यामुळे या निवडणुकीतून तळकोकणातल्या राणेयुगाचा प्रभाव संपल्यावर शिक्कामोर्तब होऊ शकतं.

हेही वाचाः रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगडमधे राणे, तटकरेंच्या लीडरशीपची परीक्षा

माढा मतदारसंघात मामांचीच चलती

विद्यमान खासदार सोलापूर जिल्ह्यातल्या राजकारणातले दिग्गज विजयसिंह मोहिते पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली ताकद पाठिशी उभी केली होती. पण ते पेलवण्याची ताकद काँग्रेसमधून भाजपमधे आलेले रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यात नव्हती. त्यांच्यासमोर मात्र शरद पवारांचे उमेदवार संजयमामा पाटील यांचं घड्याळ चाललं. सर्वसामान्यांमधे मिसळणारा उमेदवार आणि मोहिते पाटील विरोधकांची एकी यामुळे राष्ट्रवादी मतदानाच्या दिवसापर्यंत आघाडीवर असताना दिसली.

अहमदनगरातही विखे विरोधक एकत्र

सुजय विखे पाटील यांचं बंड हे शरद पवारांना फारच मोठं आव्हान होतं. पण अहमदनगर हा विखेंचा पारंपरिक मतदारसंघ नाही. तिथे विखे आल्यामुळे त्यांचे सगळे विरोधक एकत्र आले. पवारांनी त्यांना ताकद दिली. त्यामुळे अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विखे पाटलांच्या अजस्र यंत्रणेला जोरदार आव्हान दिलं. इथे कोण जिंकेल हे सांगता येणं आजघडीला कठीण असलं तरी पारडं थोडंसंच पण जगतापांच्या बाजुला झुकलेलं दिसतंय. मोदी सरकारच्या विरोधात सर्वसामान्य शेतकऱ्यांचा असलेली नाराजी जगतापांच्या मदतीला आलीय. ती निर्णायक ठरू शकते.

हेही वाचाः माढा, अहमदनगरः जुनी घराणी विरुद्ध नवे राजकारणी या संघर्षाची कहाणी

औरंगाबादेत खान, बाण की ट्रॅक्टरचा फॅक्टर

महाराष्ट्रातली सगळ्यात तगडी फाईट झालेल्या औरंगाबादेत रात्री उशिरापर्यंत मतदान झालं. चार उमेदवार मैदानात असल्यामुळे मतदानाची ही टक्केवारी वाढून ६५ टक्क्यांवर गेलीय. मतदानाची टक्केवारी वाढल्याने सलग चारवेळा निवडून आलेल्या चंद्रकांत खैरे यांची सीट धोक्यात आलीय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा जावई हर्षवर्धन जाधव यांचा ट्रॅक्टरचा फॅक्टर जोरात चालला. खैरेंना कंटाळलेल्या पारंपरिक हिंदू मतदारांना ट्रॅक्टरचा पर्याय मिळाला.

दुसरीकडे काँग्रेससाठी धोक्याचा असलेला एमआयएमचा पतंगही उंच उंच उडताना दिसला. यामुळे काँग्रेसचे सुभाष झांबड हे रिंगणाबाहेर गेल्याचं सध्यातरी दिसतंय. आतापर्यंत खान आणि बाणच्या प्रचाराचा नेमका नेम लागत नसल्याने खैरे यांच्या चिंता वाढल्या. पण मतदानाच्या दिवशी पुन्हा खान आणि बाणचा प्रचार चालताना दिसला. पण नेमकं कोण जिंकणार याचा सुगावा मात्र मतदारांनी कुणाला लागू दिला नाही.

जालना कोणालाही चकवा देण्याच्या मनस्थितीत

अँटी इकम्बन्सीची हवा असलेल्या जालन्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि काँग्रेसच्या विजय औताडे यांच्यात थेट लढत झाली. ६५ टक्क्यांच्या घरात मतदान झालं. सलग चारवेळा जिंकून येणाऱ्या दानवेंना यावेळी वैयक्तिक तसंच सरकारविरोधी नाराजीचा सामना करावा लागला. औरंगाबादमधे भाजपमधल्या काहींनी उघडपणे दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी काम केलं. त्यामुळे याची जालन्यात दानवेंविरोधात रिअक्शन उमटेल असं बोललं जात होतं. पण तसं प्रत्यक्ष होताना दिसलं नाही. पण पैठण आणि जालना मतदारसंघात दानवेंविरोधात मोठा रोष दिसला.

सिल्लोडमधे आमदार अब्दुल सत्तार यांनी अप्रत्यक्षपणे दानवेंना पाठिंबा दिला. पण त्यांचे आतापर्यंतचे काँग्रेसमधे सहकारी मात्र पक्षाच्या उमेदवारासाठीच काम करताना दिसले. दुसरीकडे औताडे यांच्यासाठी त्यांचा राजकीय प्रभाव असलेला गोतावळा सक्रीय दिसला. तरीही दरवेळी विरोधकांना चकवा देण्यात माहीर असलेल्या दानवेंचं पारडं जड आहे. पण गेल्यावेळी मोदीलाटेत सहज शक्य झालेला विजय यंदा मात्र कागदावर दिसतो तेवढा सोप्पा नाही.

हेही वाचाः महाराष्ट्रातली सर्वात टफ फाईट औरंगाबादेत होतेय

जळगावमधे भाजपमधल्या बंडाळीचा राष्ट्रवादीला फायदा

जळगावमधे भाजपचे आमदार उन्मेष पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांच्या सरळ लढत झाली. पण ऐनवेळी उमेदवार बदलल्याने तसंच विद्यमान खासदाराचं तिकीट कापल्याने भाजपचा प्रचार खूप विस्कळीत झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत तगडं संघटन असतानाही मतदानाचं पॅकेजिंग करताना भाजपच्या नाकीनऊ आलं.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांचं पक्षातलं महत्त्व कमी केल्याने मतदारसंघात प्रभावी असलेला लेवा पाटीदार समाज भाजपवर नाराज आहे. तसंच अमळनेरमधे प्राबल्य असलेल्या स्मिता वाघ यांची उमेदवारी कापल्याने जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचा गटही दुखावलाय. यात भर म्हणून विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांनीही प्रचारात म्हणावा तसा सहभाग घेतला नाही. भाजपच्या बालेकिल्ल्यातच ही सगळी बंडाळी राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडताना दिसतेय.

रावेरमधे खडसेंचा बालेकिल्ला शाबूत

जळगाव जिल्ह्यातल्या रावेरमधे भाजपने माजी मंत्री एकनाथ खडसे यांची सून खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली. काँग्रेस आघाडीच्या वाटाघाटीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला. पण उमेदवार न मिळाल्याने राष्ट्रवादीने हा मतदारसंघ ऐनवेळी काँग्रेसला दिला. काँग्रेसने इथून इच्छूक असलेल्या उल्हास पाटील यांनाच उमेदवारी दिली.

शेवटच्या टप्प्यापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसशी जागेसाठी झगडाव्या लागलेल्या पाटील यांना प्रचारासाठी म्हणावा तसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे खडसेंचा बालेकिल्ला असलेल्या रावेरमधे काँग्रेसची डाळ शिजताना दिसली नाही.

हेही वाचाः जळगाव जिल्ह्याचा कंट्रोल कुणाकडे हे ठरवणारी निवडणूक

पुण्यात बापटांसाठी गणित सोप्पं, पण

भाजपची पक्की सीट समजल्या जाणाऱ्या पुण्यात राज्यातलं सगळ्यात कमी म्हणजे ५३ ते ५५ टक्के मतदान झालंय. काँग्रेसच्या मोहन जोशी यांच्याविरुद्धच्या थेट लढतीत भाजपच्या गिरीश बापट यांना खूप मोठी लीड अपेक्षित असलेल्या त्यांच्या कसबा मतदारसंघातच ४५ टक्क्यांच्या घरात मतदान झालंय. त्यामुळे गेल्यावेळी तीन लाख मतांनी निवडून आलेल्या भाजपच्या उमेदवाराला यावेळी किती मतं मिळणार हे अजून गुलदस्त्यातच आहे.

शेवटच्या टप्प्यात मोहन जोशी यांनीही जोरदार प्रचार केला. भाजपच्या बालेकिल्ल्यातच कमी मतदान झाल्यामुळे कोण जिंकून येणार हे स्पष्ट होत नसलं तरी बापट यांचं पारडं जड आहे. अर्थात वाढलेलं मतदान हे काँग्रेसला मानणाऱ्या भागातलं असेल तर मात्र बापट यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. तसंच वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारही चालताना दिसला नाही.

बारामतीत पुन्हा पवार पॉवरफूल

बारामतीत राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या कांचन कुल यांच्यात थेट लढत झाली. गेल्यावेळी ६० हजार मतांनी निवडून आलेल्या सुळे यांचा म्हणजेच शरद पवार यांचा पराभव करण्यासाठी भाजपने आपली शतप्रतिशत ताकद पणाला लावली होती. त्यामुळे पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्या असलेल्या सुळे यांना आपला मतदारसंघ सोडून प्रचारासाठी दुसरीकडे जाता आलं नाही.

गेल्यावेळी लीड कमी झाल्याने पवार फॅमिलीस यंदा सुरवातीपासूनच कामाला लागली होती. मतदानाची टक्केवारी गेल्यावेळसारखीच ६५ च्या घरात असल्यामुळे  सुळे यांच्या विजयाचं गणितं सोप्पं झालंय. तरीही कुल यांनी दिलेली लढत जोरदारच ठरलीय. यावेळेसही मोठ्या लीडचं सुप्रिया सुळेंचं स्वप्न पूर्ण होताना दिसणार नाही.

हेही वाचाः 

चंद्रपूर, गडचिरोलीत विरोधकांना साथ की सत्तेला साथसोबत?

वर्धाः लोकसभेचा निकाल ग्रामपंचायतीच्या निकालात शोधता येईल?

यवतमाळ-वाशिमः जिंकण्यासाठी हवा राळेगावमधला वाढलेला टक्का