आनंद कुंभारः एक क्लार्क शिलालेख अभ्यासक बनतो त्याची गोष्ट

०३ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


इतिहास संशोधक आनंद कुंभार यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महावितरणमधे कामाला लागलेल्या कुंभार यांनी आपल्या इतिहासवेडापायी नोकरी सोडली. आणि सोलापूरचा फर्स्ट हँड इतिहास शोधायचा संकल्प घेतला. या झपाटलेपणाने प्रेरित होऊन सोलापुरातल्या काही तरुणांनी आनंद कुंभारांवर एक डॉक्युमेंट्री तयार केली. या डॉक्युमेंट्रीची खुद्द डायरेक्टरने सांगितलेली ही स्टोरी.

पडदा उजळतो तेव्हा दिसतं, कुंभाराचं चाक फिरतंय. मागे सनईपेक्षा जरा किनरा आवाज असलेल्या ‘सुंद्री’ वाद्याचे स्वर ऐकू येताहेत. मातीचा गोळा घेतलेले दोन हात येतात आणि तो गोळा चक्रावर थापतात. कॅमेरा त्या मातीच्या गोळ्याचा क्लोजप घेत पुढे सरकतो आणि पडद्यावर ‘आनंद कुंभार’ असं नाव झळकतं.

पुढे दिसतं, एका अरुंद गल्लीत पाठमोरी व्यक्ती सायकल चालवत निघालीय. एका दारासमोर ती थांबते आणि सायकल उचलून आत घेऊन जाते. कॅमेराही त्यांच्याबरोबर आत जातो. कोपऱ्यात बदामाचं झाड, दोन बसक्या पत्र्याच्या खोल्या आणि त्यामधून वाट काढत निघालेले हे आनंद कुंभार.

साठी उलटून गेलेली, डोक्यावर तुरळक केस, उन्हात रापलेला रंग, अगदी साधा शर्टपँट घातलेला हा सडपातळ माणूस आपल्या खोलीत प्रवेश करतो. सुंदरीचा आवाज कमी होऊन, तानपुऱ्याचा झंकार सुरु होतो तसं आपले कान आणि डोळे टवकारले जातात. मग पुस्तकांची कपाटं दिसतात. ऑडीओ-विडीओ कॅसेटचे ढीग दिसतात.

एका बाजूला पलंग, पण त्यावरही पुस्तकं, वह्या, कॅसेट्स, टेपरेकॉर्डर वगैरेंची गर्दी. खाली मासिकांचे गठ्ठे. साधारण दहा बाय वीसची ही पत्र्याची खोली चारी बाजूंनी छतापर्यंत अशा विविध वस्तूंनी आणि मुख्यत: पुस्तकांनी भरलेली दिसते. कुंभार टेपरेकॉर्डरमधे एक कॅसेट टाकतात आणि डोळे मिटून ऐकू लागतात, ‘हुँ अभी मैं जवाँ...’

हेही वाचाः बसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं

इतिहासाला वाहून घेतलेला माणूस

कोणतीही रंगीत तालीम न करता एका साध्या हँडीकॅमवर शूट केलेला हा लघुपट. कुंभारांना म्हटलं, ‘तुमची दिनचर्या पहायचीय. मी तुमच्यामागे कॅमेरा घेऊन येतो. अधून मधून काही प्रश्न विचारेन इतकंच.’ पुढे अनेक दिवस आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र फिरलो. चर्चा केल्या.

पूर्णपणे इतिहासाला वाहून घेतलेला हा माणूस. हे त्यांचं इतिहासावरचं प्रेम म्हणजे केवळ पोवाडे गाणारं शाहिरी प्रेम नव्हतं. अनेक ऐतिहासिक पुराव्यांचा स्वत: शोध घेऊन, तज्ञांचं मार्गदर्शन घेऊन, दुर्मिळ ग्रंथांचं वाचन करून अभ्यासानं उपजलेलं हे डोळस प्रेम होतं. शिलालेखांचं वाचन हा त्यांचा ध्यास आणि त्या अनुषंगानं मग इतर अभ्यास. त्यांच्या ‘संशोधन-तरंग’ पुस्तकामुळे माझी त्यांची ओळख झाली. मैत्री झाली.

आनंद कुंभार यांची जीवन-कहाणी, त्यांचं संशोधन, त्यासाठी घेतलेले कष्ट, हे सारं इतकं प्रेरणादायी होतं, की मला ते कॅमेऱ्यात साठवून, त्याचं दस्तऐवजीकरण करून ठेवावंसं वाटणं अगदी साहजिक होतं. अनेक तासांच्या या चित्रीकरणाचं ३० मिनिटांचं संकलित रूप म्हणजे हा लघुपट.

कॅमेरा ‘संशोधन तरंग’ची अर्पणपत्रिका टिपतो. ‘ज्ञात आणि अज्ञात अशा भारतीय कोरीव लेखांच्या कोरक्यांना समर्पण’ इथेच या माणसाचं वेगळेपण लक्षात येतं. मग तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, रा. चिं. ढेरे यासारख्या विद्वानांबरोबरचे त्यांचे फोटो दिसतात. पाठोपाठ, त्यांना मिळालेले मानसन्मान, समारंभाचेही फोटो दिसतात. हे सगळं बघताना आज आपण किती मोठ्या असामीची ओळख करून घेतोय, हे लक्षात येतं. 

शेवटी कॅमेरा त्यांच्या तरुणपणीच्या फोटोवर स्थिरावतो आणि खणखणीत सोलापुरी हेल असलेला आनंद कुंभारांचा आवाज ऐकू येतो. ‘माझा जन्म सोलापुरामधे २७ मे १९४१ रोजी झाला. आडनावाप्रमाणे आमच्या घरात पिढीजात धंदा कुंभारकामाचा होताच. मी त्यात सगळी मदत करायचो. दिवसा पेपर टाकायचो आणि रात्री नाईट हायस्कूलमधे जायचो. त्याकाळचे माझे सहअध्यायी म्हणजे आताचे भारताचे उर्जा-मंत्री सुशीलकुमार शिंदे.’

हेही वाचाः बाबरानं मंदिर पाडून मशीद बांधली नाही, तरीही निकाल रामलल्लाच्या बाजुने का लागला?

सुरवातीला आर्मीत नोकरी

पडद्यावर आता फिरत्या चाकावरची माती, भांड्याचा आकार घेत असलेली दिसते. ‘१९६० साली मी आर्मीमधे भरती झालो. नाशिक, जम्मू-काश्मीर, कलकत्ता इथे होतो. तिथे अनेक प्रसंगात नियतीनं मला यमपाशातून सोडवलं. तिच्या मनात काही योजना असावी असं आज मला वाटतंय.’ सोबत त्या काळातले फोटो दिसत राहतात. ‘परत आल्यावर मी सोलापुरातल्या वीज वितरण केंद्रात क्लार्क म्हणून काम पाहू लागलो. पुढे मीटर रीडिंग, बिल कलेक्शन अशी कामं करत मी १९९९ ला सेवामुक्त झालो.’

आता कॅमेरा स्वयंपाक घरात शिरतो. एका कोपऱ्यातल्या देवघरासमोर कुंभारांच्या पत्नी पूजा करत असलेल्या दिसतात. मागे ‘हर हर बोले नम: शिवाय’चा गजर ऐकू येतोय. दिसतं, कुंभार काही घरगुती कामं करत आहेत. मग त्यांच्या दाम्पत्य जीवनातले काही फोटो दिसतात. यावेळी मात्र ‘जमाना तू ही हैं, तू ही मेरी मोहिनी’ हे नवरंगमधलं गाणं ऐकू येतं. एवढ्याने त्यांच्या समाधानी सहजीवनाची कल्पना येते. इथे त्यांच्या आयुष्यातले खासगी संदर्भ संपतात.

पुन्हा मातीला आकार देणारं फिरतं चाक. आनंद कुंभारांच्या आयुष्याला येत गेलेल्या आकाराचं प्रतीक. पुन्हा सुंद्रीचे सूर. वाद्य-संगीतात सोलापुरी सुंद्रीची विशेष ओळख आहे. त्यामुळं सोलापूरच्या पार्श्वभूमीवर चित्रित झालेल्या या लघुपटात तिचं असणं अनिवार्यच होतं.

ऐतिहासिक साधनं मलाही सापडतील का?

‘मी आर्मीतून परत आलो तेव्हा हिराचंद नेमचंद वाचनालयाचा सभासद झालो. इतरांसारखंच ललित साहित्य वाचता वाचता एकदा विदर्भ संशोधन मंडळाचे वार्षिक अंक माझ्या हाती लागले. त्यातले संशोधनपार लेख वाचताना मी अक्षर: भारावून गेलो. विशेषतः महामहोपाध्याय मिराशींचे लेख वाचताना मी मोहून गेलो. नाणी, शिलालेख, ताम्रपट यांचा शोध, त्यांच वाचन, त्यामुळे इतिहासात पडणारी भर हे वाचून मी थरारून गेलो.’

‘मी विचार करू लागलो यांना सापडतात तशी ऐतिहासिक साधनं मलाही सापडतील का? वीज विभागात काम करताना मला खूप फिरावं लागायचं. मग माझ्या विभागात मी असा शोध सुरु केला. सोलापूर जिल्ह्यातल्या चार तालुक्यांचा अगदी गावागावात जाऊन मी सर्वे केला. तिथली मंदिरं, मशिदी, वेशी, पंचायतीपुढे किंवा गावाबाहेर उघड्यावर पडलेली शिल्पं. सगळं पालथं घातलं. आणि मला बरेचसे शिलालेख मिळाले.’

हे सगळं ऐकू येत असताना पडद्यावर वाचनालयाची जुन्या इमारतीपासून नव्या इमारतीपर्यंत वाटचाल फोटोंतून दिसते. कुंभारांचा त्यातला वावर दिसतो. संशोधन मंडळाचे अंक दिसतात. कुंभार आता जुन्या वास्तुंतून फिरतानाची दृश्यं दिसतात. सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यातल्या शिलालेखांकडे कॅमेरा वळतो.

‘शिलालेख तर सापडले, पण यातले किती प्रसिद्ध झालेत हे पाहण्यासाठी पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळात, ग. ह. खरे, मिराशींशी संपर्क साधला. त्यांनी मला मार्गदर्शन केलं. पुस्तकं वाचायला सांगितली, मासिकांचे संदर्भ दिले आणि एक लक्षात आलं की सोलापूर जिल्ह्यात इतिहास संशोधनाचं फारसं काम झालेलं नाहीय. बरेच शिलालेख हे अप्रकाशित आहेत. मग मी खरेंकडूनच शिलालेखांचे छाप घेण्याचं तंत्र शिकून घेतलं. दर शनिवार, रविवारी जाऊन मी ठसे घेण्याचं काम सुरु केलं.’

कन्नड शिलालेखांवरच पुस्तक

आता कुंभार आपल्याला प्रत्यक्ष ठसा घेताना दिसतात. पहिल्यांदा लेखाचा दगड पाण्यानं साफ करणं, मग विशिष्ठ पांढरा कागद पाण्यात ओला करून दगडाला चिटकवणं, त्यावर तारेच्या ब्रशनं थोपटणं, मग काळी पावडर लावत ठसा उमटवणं. सगळी पद्धत क्रमवार दाखवली जात असताना कुंभार बोलतच असतात.

‘...आता पुन्हा एक प्रश्न निर्माण झाला. या लेखांची लिपी आणि भाषा दोन्ही मला अनभिज्ञ होत्या. मग मी धारवाडच्या प्राचीन पुराभिलेख विभागाचे प्रमुख श्रीनिवास रीत्ती यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून बरंचसं वाचन करून घेतलं. दक्षिणेच्या मध्ययुगीन इतिहासावर नवीन प्रकरणं लिहिता येतील अशी महत्वाची माहिती त्यातून बाहेर आली. रीत्तींनी स्वत: खर्च करून कन्नड शिलालेखांवरच पुस्तक प्रसिद्ध केलं. नंतर १९८८ मधे साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुदानानं मराठी आणि संस्कृत शिलालेखांवरचं पुस्तक प्रसिद्ध झालं, संशोधन तरंग. लगेच या पुस्तकाला राज्य सरकारचा पुरस्कारही मिळाला.’

दृश्य बदलतं. दोन नद्यांचा संगम दिसतो. एका हेमाडपंती म्हणता येईल अशा देवळाच्या पडवीत बसून कुंभार बोलायला लागतात. ‘आपण जो परिसर पाहतोय, हा दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल नावाचं स्थान आहे. हे इथलं संगमेश्वर मंदिर. मंदिराच्या तुळईवर केवळ अडीच ओळींचा देवनागरीतला लेख आहे. याच्या वाचनानं हे सिद्ध झालंय, की हा मराठीतला स्पष्ट-कालोल्लेखित पहिला शिलालेख आहे. ‘वाछि तो विजयां होइवां’ म्हणजे जो हा ‘लेख वाचेल त्याचा विजय होईल’ अशी आशीर्वादपर ओळ वाचून तर मी अगदी रोमांचित झालो.’ 

इथेही कुंभार आपल्याला त्या शिलालेखाचा ठसा घेताना आणि एक एक ओळ वाचताना दिसतात. पुढचं दृश्य सोलापुरातल्या गजबजलेल्या सरस्वती चौकातलं दिसतं. ठरलेली टोपी घालून कुंभार सायकलवरून येतात आणि फुटपाथला लागून असलेल्या संगमेश्वर रद्दी डेपोत जातात.

हेही वाचाः अंधारात आनंद आहे, असं सांगणाऱ्या अक्किथम यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार

रद्दीचं दुकानच माझ्यासाठी ज्ञानभांडार

‘गेली चाळीसेक वर्षं रोज दोनदा मी या दुकानात येतोय. माझ्यासाठी हे ज्ञानभांडार आहे. अनेक जुनी पुस्तकं, मासिकं, दिवाळी अंक मला इथे पाहायला मिळतात. लोक नित्यनियमानी देव दर्शनासाठी जसं देवळात जातात, तसा मी इथे येतो. प्रत्येक फेरीत मला काही ना काही मिळून जातं.’ त्या टपरीवजा दुकानात रद्दीच्या गठठ्यावर बसकण मारून कुंभार नुकतीच आलेली पुस्तकं चाळायला लागतात. बाहेर वाहनांचा गोंगाट सुरु असतो. चाळताना कुंभारांना एका दिनदर्शिकेचं पान दिसतं ज्यावर प्राचीन नाण्यांचा फोटो छापलेला असतो. कॅमेरा त्यावर झूम होत असतानाच दृश्य बदलतं.

आता कुंभारांच्या हातात तशी नाणी दिसतात. ‘माझ्याकडे अगदी दोन अडीच हजार वर्षांपासूनची नाणी आहेत. क्षत्रप, सातवाहन, चालुक्य, मुसलमान काळातली, ब्रिटीश काळातली चलनात नसलेली खूपशी नाणी आहेत.’ कुंभारांभोवती आता नातवंडं गोळा झालेली असतात. ते उत्साहानं आपल्याकडची नाणी त्यांना दाखवत असतात. आणि कुंभारांच्या पत्नी दारात बसून कौतुकानं हा खेळ पाहत असतात.

पत्र्याच्या छताखाली फिरणाऱ्या फॅनकडे पाहत कॅमेरा खाली येतो. कुंभार आपल्या टपोऱ्या सुवाच्च्य अक्षरात लिखाण करत असतात. ‘मी वेळोवेळी अनेक अॅकॅडेमिक जर्नल्समधे लेख लिहिलेत. मे. पु. रेगेंनी मला यासाठी खूप प्रोत्साहन दिलं. आतापर्यंत साधारण दीडशेहून अधिक शोधनिबंध लिहिलेत.’ नुकत्याच लिहिलेल्या लेखावरून कॅमेरा फिरतो. त्यात काही आकृत्याही दिसतात.

पहिलं प्रेम म्हणजे पुस्तकं

‘माझं पहिलं प्रेम म्हणजे पुस्तकं. वाचनालयात मिळत नाहीत, पण माझ्या अभ्यासाला उपयोगी अशा चार भाषेतल्या पाच-सहा हजार पुस्तकांचा संग्रह माझ्याकडे आहे. नियतकालिकांचे संच आहेत’ हे सांगत असताना कुंभार हे सोलापुरातल्या सुप्रसिद्ध मंगळवार बाजारात, वेगवेगळ्या वस्तू हाताळत फिरताना दिसतात. अनपेक्षितपणे पडद्यावर जुन्या सिनेमातल्या तारे-तारकांचे फोटो त्यांच्या मूळ सहीसकट दिसायला लागतात.

कुंभार यांच्या आणखी एका छंदाचं दर्शन घडतं आणि कळतं की या छांदिष्टानं सिनेमांच्या वेडापायी हजार एक विडीओ कॅसेट्स आणि चार हजार ऑडीओ कॅसेट्स जमवल्यात. आता लघुपट शेवटच्या टप्प्यात येतो. सोलापूरचा भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, चार पुतळा परिसर, सोलापूर महापालिका, संभाजी तलाव अशा अनेक ठिकाणी सायकलवरून फिरत कुंभार आपलं मनोगत व्यक्त करत आहेत.

‘माझी जन्मभूमी, कर्मभूमी असलेल्या सोलापूरबद्दल माझ्या मनात फार अभिमान आहे. आपल्या गावातली झाडी, तळी, मैदानं, बागा, जुन्या वास्तु यांचं जतन झालं पाहिजे. जो समाज आपला इतिहास जपतो, त्याचा भविष्यकाळही उज्वल असतो. देवांचे आणि नेत्यांचे नुसते उत्सव साजरे करून कसं चालेल, त्यांची शिकवणूक आचरणात आणण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.’ हे सांगत असताना त्यांची सायकल आंबेडकर चौकातून जाताना दिसते.

स्वतःला समृद्ध करणारा प्रवास

आता कुंभार भर गर्दीत आकाशाकडे पाहताना दिसतात. वरून हेलीकॉप्टर उडत जातं. त्यातून ग्रामदैवत सिद्धेश्वरावर पुष्पवृष्टी होत असते. हा संक्रांतीचा काळ सोलापुरात मोठी जत्रा असते. त्यात काठ्यांची मिरवणूक निघते. ज्यात हजारो सोलापूरकर शुभ्र बाराबंदी घालून सहभागी होतात. हा सोहळा पाहायला दरवर्षी लाखो लोक सोलापुरात येतात. कुंभारही या गर्दीत चालताना दिसतात. तरीही ते त्या गर्दीचा भाग नसतात, कारण सगळी गर्दी ज्या दिशेनं चालली असते त्याच्या बरोबर उलट्या दिशेनं ते चालताना दिसतात.

‘माझ्या मागून किती जण येत आहेत, हे मी पाहत नाही. आपल्याच नादात मी वाट चालतो.’ कॅमेरा मागे सरकत जातो तसं कुंभारही मिरवणुकीत हरवून जातात. शेवटी काठ्यांची मिरवणूकच दिसत राहते आणि श्रेयनामावली येते. हळू हळू अंधार होतो. या लघुपटाचं दिग्दर्शन करताना कलात्मकतेपेक्षा ‘आपल्या वारशाचं दस्तऐवजीकरण’ करणं या भावनेला महत्व दिलंय.

आर्थिक अनुकुलता नसताना आणि फारसं शिक्षणही झालेलं नसताना केवळ इतिहासाच्या ध्यासापोटी, अथक मेहनतीनं संशोधनासारख्या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर लौकिक मिळवणाऱ्या आनंद कुंभारांचं हे झपाटलेपण, काहीअंशी कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचा मी प्रयत्न केला. जो मला स्वतःलाच खूप समृद्ध करून गेला.

हेही वाचाः 

भरकटलेल्या समाजात राहणाऱ्या भटक्यांची एक गोष्ट

श्रमिक कष्टकऱ्यांचा आवाज लोकशाहीर द ना गव्हाणकर

तंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय होणार?

डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकरः गोव्याचे तपस्वी इतिहास संशोधक

अमित शाहांनी फडणवीसांचा, शरद पवारांनी अजितदादांचा केला गेम?