खऱ्या गांधींच्या विसरत चाललेल्या आठवणी

१४ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : १० मिनिटं


स्वातंत्र्यसैनिक, संपादक अनंत भालेराव यांच्या जन्मशताब्दी वर्षांला आज सुरवात होतेय. निजामाच्या तावडीतून हैद्राबाद संस्थान मुक्त व्हावं म्हणून लढा देणाऱ्या भालेरावांनी मराठवाड्याच्या विकासासाठी संघर्ष केला. ‘मराठवाडा’ दैनिकाचे संपादक म्हणून त्यांनी मराठवाड्याच्या विकासाचा मुद्दा लावून धरला. त्यानिमित्ताने भालेरावांच्या लेखनाची झलक नव्या पिढीला करून देणारा एक महत्त्वाचा लेख.

येत्या दोन ऑक्टोबरला गांधीजींचा वाढदिवस येतो. कोण हे गांधी? गांधी म्हणजे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी. थोडक्यात सांगायचं झालं तर खरे गांधी. त्यांची जयंती पूर्वीपासून ‘चरखा जयंती’ म्हणून साजरी होत असतं. गांधीजींनीच आपली जयंती साजरी न करता चरख्याची करा असं सांगितलं आणि तशी प्रथा पाडली. लोकांना गांधी या व्यक्तीत स्वारस्य होतं.

पुष्कळ जण स्वत:ला ‘गांधीवादी’ ‘गांधाईट’ म्हणवून घेऊ लागले होते. तेव्हा बापूजी त्यांना म्हणाले, की माझ्या नावाने मिरवण्यात अर्थ नाही. असली विभूतीपूजा योग्य नाही. त्यातून मी गांधी नावाचा माणूस ‘चांगले आणि वाईट’ या दोन्हींचा वाहक आहे. तुम्हाला मान्य असेल तर चरखा हा माझ्या विचारांचा आणि कार्याचा प्रतीक आहे. गांधीपेक्षा त्याचं महत्त्व अधिक. त्याचं नाव धारण करा. दक्षिण आफ्रिकेत असतानाच त्यांनी ही चरखा जयंतीची कल्पना व्यक्त केली होती. लोकांनी शेवटी जे करायचं होतं तेच केलं. चरख्याचे नाव घेऊन गांधीजींचीच जयंती ते साजरे करु लागले.

गांधीजी मोठ्या अभिमानाने सांगत की, मी जन्मजात लढाऊ माणूस आहे. ‘I am a born fighter’ एका लढाईतून मला दुसऱ्या लढाईसाठी बळ मिळतं. गांधीजींचं हे म्हणणं अगदी बरोबर होतं. १८९४ ते १९४८ पर्यंत म्हणजे जवळपास अर्धा शतकभर ते आफ्रिकेत आणि भारतात एकामागे एक असे अनेक संघर्ष करत होते. गांधीजींइतकं संघर्षांनी व्यस्त असं जीवन जगामध्ये इतर कोणाचेही दाखवता येत नाही. लेनिनचा नंबरही त्यांच्या नंतरच.

गांधींच्या आणि इतरांच्या संघर्षात मूलत:च फरक होता. ते म्हणत की, माझा संघर्ष अगर माझी लढाई कोणाच्याच विरुद्ध नसते. त्यामुळे मी कोणाला हरवत नाही, कोणालाच जिंकीत नाही. त्याचप्रमाणे मलाही कोणी हरवत किंवा जिंकीत नाही. माझा हा संघर्ष असला तर माझ्याविरुद्धच असतो. माणसाच्या चुकांनी आणि दोषांनीच तो आपल्यावर नको ती परिस्थिती ओढावून घेतो. आपलं पारतंत्र्य आपल्याच दोषातून निर्माण झालंय. त्यांच्या या दृष्टीमुळे त्यांचे कोणीच शत्रू बनू शकले नाही.

एक चर्चिल सोडता सर्वांनीच गांधीच्या महनीयतेची स्तुती केलीय. त्याचं एक उदाहरण देण्यासारखं आहे. गांधीजीनी आपल्या राजकीय जीवनाची सुरवात दक्षिण आफ्रिकेत केली आणि तिथे अनेक लढे दिले. तेव्हा तिथे मुख्य प्रशासक जनरल स्मटस् हा होता. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींना गोऱ्या नागरिकांकडून आणि आफ्रिकी शासनाकडून त्रास झाला. अनेकदा त्यांच्यावर हल्ले झाले. मारहाण झाली. अपमानांना तर सीमाच नव्हती. अशा स्थितीत गांधीजी भारतीयांच्या वतीने लढत राहिले.

फिनिक्स आश्रम आणि टॉलस्टॉय फार्म या विधायक कार्याच्या दोन मोठ्या संकल्पना तिथेच उद्य पावल्या आणि विकसित झाल्या. गांधींनी नंतर दक्षिण आफ्रिका सोडली आणि ते भारतात आले. त्या वेळी जनरल स्मटस् याने गांधीजींविषयी काढलेले उद्गार त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि त्यांच्या कार्याच्या गुणवत्तेवर लख्ख प्रकाश टाकतात. गांधीजींचा ७० वा वाढदिवस होता. त्या प्रसंगाने त्याला आफ्रिकेतले गांधींचे ते दिवस आठवले.

तो म्हणतो, माझे दैवच असं होतं की, ज्याच्याविषयी मला तेव्हा निरतिशय आदर होता आणि आताही आहे, त्याच माणसाला मला विरोध करावा लागला. त्यांचं तेव्हाचं कार्य माझी परीक्षा पाहणारं आणि मला त्रासदायक होतं. त्यांचं कार्य त्यांच्या पद्धतीनुसार सुरु होतं. पण माझ्यावर कायदा आणि सुव्यवस्थेची  जबाबदारी होती म्हणून प्रत्येक क्षण हा माझी कसोटी बघणाराच होता. अशा कामांत लोकप्रियता लाभत तर नाहीच उलट संबंधित कायदा आणि व्यवस्था बदलण्याची अगर रद्द करण्याची पाळी येते तेव्हा तर लोकांची नाराजीच पदरी पडते. गांधींसाठी हे यशस्वी ठरणारेच उपक्रम होते. त्यांचा विशेष असा कि, त्यांच्या प्रत्येक कृतीला व्यक्तिगत संबंधाचा स्पर्श झालेला असे. आफ्रिकेत त्यांना तुरुंगात जावं लागलं तेव्हा त्यांनी तिथे स्वत: सँडल्स तयार केल्या आणि सुटका झाल्यावर त्यांनी मला त्या भेट दिल्या. तेव्हापासूनच बऱ्याच उन्हाळ्यात मी या सँडल्स वापरल्या. मला अजूनही असंच वाटतं की, एवढ्या मोठ्या माणसाने भेट दिलेली ही पादत्रानं वापरण्याची माझी लायकी नाही. I am not worthy to stand in the shoes of so great a man.’

गांधींचे आणि त्यांच्या चळवळीचे महत्त्व गिल्बर्ट मुरु यांनी हिब्बर्ट जर्नल (१९१४) च्या अंकात पुढीलप्रमाणे व्यक्त करुन ठेवले आहे. ‘सत्तेत असणाऱ्या माणसांनी या माणसाशी वागताना फार काळजी घ्यायला हवी. हा माणूस फार निराळा आहे. त्याला इंद्रियगम्य सुखांची तमा नाही. त्याला श्रीमंती नकोच आहे. ऐषआराम, प्रशंसा आणि सोयी-सवलती त्याच्या जवळपास फटकू शकत नाहीत. त्याला जी गोष्ट बरोबर वाटते ती करण्याचा त्याचा निर्धार असतो. तो फार धोकादायक आणि अस्वस्थ करुन सोडणारा शत्रू आहे. कारण त्याच्या शरीरावर तुम्हाला नेहमीच विजय मिळविता येतो पण त्याचा आत्मा तुम्हाला अंशमात्रानेही विकत घेता येत नाही.’

गांधींच्या इतका माणसांचा संग्रह फार कमी नेत्यांनी केला असेल. त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते फार जपत असत. १९३९ मध्ये कॉँग्रेसच्या त्रिपूरी अधिवेशनाच्या वेळी त्यांचे आणि सुभाषबाबूंचे मतभेद झाले. गांधींनी अध्यक्षपदासाठी पट्टाभि सीतारामय्या यांना उभं केलं होतं. सुभाषबाबू त्यांचा पराभव करुन निवडून आले. पुढं हे मतभेद खूपच टोकाला गेले.
ऐन अधिवेशनाच्या वेळी सुभाषबाबू खूप आजारी पडले. मतभेद असूनही गांधी सुभाषबाबूंच्या प्रकृतीविषयी काळजी घेत होते. मुद्दाम डॉक्टर पाठवीत होते. सुभाषबाबू तसे हट्टीच. डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला की, त्यांनी कलकत्याला जावून आराम करावा परंतू ते कोणाचेच ऐकेनात. शेवटी गांधीजींनीच त्यांना कलकत्याला पाठवलं आणि मी आज्ञा देईपर्यंत हलू नका, असं सांगितलं आणि सुभाषबाबूने त्यांचं ऐकलं. 

वल्लभभाई एकदा असंच आजारी पडले. गांधीजींनी त्यांना उरळी कांचनच्या निसर्गोपचार केंद्रात पाठवलं. मात्र त्या आधी ते त्या केंद्रात स्वत: राहिले आणि वल्लभभाईंना थोडादेखील त्रास होउ नये, अशी त्यांनी व्यवस्था करुन दिली.

नवाखालीत दंगली झाल्या तेव्हाची गोष्ट. गांधींवर हिंदू आणि मुसलमान दोन्ही जमातीतील लोकांचा राग होता. त्यांच्यावर हल्लेही करण्यात आले. त्यांच्या प्रार्थना सभा उधळण्यात आल्या. एकदा तर त्यांना हिणवावं म्हणून काही मंडळींनी त्यांची भेट घेऊन त्यांना ज्या गोष्टींचा तिटकारा त्याच वस्तू भेट म्हणून दिल्या. त्यात पत्त्यांचा जोड आणि सिगारेटची पाकिटं होती. गांधींनी स्वभावाप्रमाणे त्या वस्तूंचा स्वीकार केला आणि त्या तिथे जमलेल्या लोकांना देऊन टाकल्या. सिगारेटची पाकिटे मात्र त्यांनी ठेवून घेतली आणि ती आपण जवाहरलालला देऊ असं सांगितलं. नंतर खरोखरीच पंडीतजी आले तेव्हा त्यांनी ती पाकिटे त्यांना आठवण ठेवून दिली. तसे त्या वस्तू भेट देणाऱ्याला कळविले. टिंगल करायला आलेले गांधींचे अनुयायी होऊनच परतले. 

डॉ. सुशीला नायर या प्यारेलाल यांच्या बहिण. ते गांधीजींचे पीए होते. प्यारेलाल शिक्षण सोडून गांधीकडे आले. हे त्यांच्या लक्षात आलं. हे त्यांच्या आईला पटलं नाही. त्या गांधींकडून आपला मुलगा परत आणण्याच्या विचाराने गेल्या. गांधींनी परवानगी दिली पण सेवाग्राममध्ये काय जादू झाली कोण जाणे. प्यारेलालजींची आई आपली मुलगी सुशीला ही त्यांच्या स्वाधीन करुन आली. पुढं तर त्या स्वत: गांधीजींच्या सत्याग्रही फलटणीतच दाखल झाल्या. असे किती तरी स्त्री-पुरुष गांधींच्या लोहचुंबकाने ओढून घेतले होते. सर्व जगभराचे आणि सर्व धर्माचे.

कलकत्त्याला काही दिवस काढल्यानंतर बापूजींनी उपोषण सुरु केलं. वातावरण अत्यंत प्रतिकूल आणि प्रक्षुब्ध होतं. रोज शेकडो माणसं येत आणि गांधीना शिव्यांची लाखोली वाहून परतत. गांधीजींना या काळात मानसिक त्रास झाला आणि या धीरोदात्त पुरुषाने हा सर्व त्रास शांतपणे सहन केला. हिंदू म्हणत, तुम्ही मुस्लिमधार्जिणे. तुम्हीच यांना लाडावून ठेवलं. तर मुसलमान म्हणत, तुम्ही मुस्लिमद्वेष्टे. जिथे मुस्लिम मारले गेले तिथे न जाता तुम्ही नवाखालीत आला. तुम्ही अखेर हिंदूंचेच दु:ख बघणार. अशा अवस्थेत उपवास सुरु झाला आणि दोन-चार दिवसांत यक्षिणीची कांडीच फिरली. हिंदू-मुस्लिम तरुणांचे गट गांधींना भेटून उपवास सोडा म्हणून सांगू लागले. घरोघरी उपवास करु लागले. हट्ट धरुन त्यांच्या निवासस्थानी बसू लागले.

गांधींजी म्हणायचे, मी ७८ वर्षाचा म्हातारा. माझे मार्ग तुम्हाला पसंत नाहीत मग मला सुखाने मरु द्या ना! असं म्हणताच शेकडो माणसांची अंत:करणं अक्षरश: पिळवटून निघायची. सर्व बंगालमध्ये विलक्षण स्वरुपाची सहवेदना पसरली. कचेऱ्या सुटल्यावर नोकर मंडळी घरी जात. बायका म्हणत, जेवण तयार आहे, तुम्ही जेवून घ्या. आम्ही अन्न ग्रहण करणार नाही. अशी शेकडो घरं अनेक दिवस अन्नत्याग करु लागली! हे नोकर लोक बापूजींना भेटत आणि घरची अवस्था सांगत.

कालांतराने गांधीजींनी लोकांना त्यांनी चोरुन ठेवलेली शस्त्रास्त्रं आणून टाका असं सांगितलं. प्रथम टाळाटाळ, आदळआपट झाली परंतू नंतर दररोज ढीगभर शस्त्रं जमा होउ लागली. शेवटी लोक टेकीला आले आणि गांधींचेच झाले. गांधींनी नंतर उपोषण सोडलं. गांधीपाशी काय जादू होती कोण जाणे? इतकं असूनही जातीय दंगली देशभर आलटून पालटून चालूच होत्या. गांधी आपल्या मर्यादा ओळखून होते. परंतू एकाच वेळी देशभर ते पोचू शकत नव्हते. ते म्हणायचे, दु:खही परमेश्वराप्रमाणेच सर्वव्यापी बनलं आहे. त्याला बंदिस्त करण्याइतकी शक्ती माझ्यात नाही. मीच कमी पडतो आहे.

बंगालमध्ये थोडं स्थिर झाल्यावर गांधीजी बिहारला आणि दिल्लीला गेले. बंगालमध्ये मुस्लिम लीगने केलेल्या हिंदूच्या कत्तलीचा बदला बिहारमध्ये आणि दिल्लीत घेण्यात आला. तेवढ्याच व्यथित अंत:करणाने गांधी आभाळाला ठिगळ लावण्यासाठी धावले आणि त्यात त्यांना यशही आलं. बंगाल सोडतानाच असं ठरलं की, स्वातंत्र्यदिन दोन्ही जमातींनी मिळून साजरा करायचा आणि बापूंनी त्या वेळी कलकत्त्याला यावयाचे. त्याप्रमाणे बापू आले. प्रार्थना सभा होउ लागल्या. सभेत प्रश्नोत्तरं आणि राग-लोभ झडू लागले. लोकांच्या मनातील क्षोभ अजूनही शांत झालेला नव्हता.

एकदा एका सभेला खूप गर्दी जमली. तेव्हा बंगालचे मुख्यमंत्री हसन शहीद सुहरवर्दी हे होते. बंगालच्या कत्तलीत त्यांचा फार मोठा भाग होता असा लोकांचा वहीम होता. स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे ठरले परंतू लोकांना संशय आला की, सुहरवर्दी बापूंच्या निवासस्थानी लपून बसलेत आणि ते प्रसंगाचा परत फायदा घेत आहेत. लोक चिडले. सुहरवर्दीला बाहेर काढा म्हणून ओरडू लागले. गोंधळात काय चाललयं हे बापूंना समजेना. त्यांनी लोकांना शांत करुन काय हव ते विचारलं. लोकांना सुहरवर्दी हवे होते. बापू ताडकन उठले आणि आत जाऊन ते सुहरवर्दीचा हात पकडून त्याला घेऊन आले.

सुहरवर्दी मुख्यमंत्री पण त्यावेळी ते आरोपी होते. बापूंचे म्हणणे की, लोकांना भिण्याचे कारण नाही. त्यांच्यापासून काही लपवूनही ठेवता कामा नये. लोक ताडताड बोलत होते. शेवटी शांतता प्रस्थापित झाल्यावर सुहरवर्दी हात जोडून म्हणाले, बंगालमध्ये जे काही झालं त्याबद्दल मला लाज वाटते. मी तुमच्या सर्वांची माफी मागतो.

प्रसंग तर पार पडला परंतू लोकांना सुहरवर्दीचा विश्वास नव्हता. त्यांचं गांधींच्या बरोबर फिरणं त्यांना मान्य नव्हते. गांधी म्हणायचे, माझ्या परिवारात मी कोणालाच मनाई करीत नसतो. सुहरवर्दी चांगले असोत, वाईट असोत ते माझ्याबरोबर आहेत. त्यांचा माझ्यावर परिणाम होतो का माझा त्यांच्यावर हे वेळच ठरवेल. शेवटी शेवटी तर सुहरवर्दी स्वत:ला गांधीचे मानसपुत्र म्हणवू लागले. जो काय परिणाम झाला तो सुहरवर्दीवर. पुढं ते पाकिस्तानातचे राहिले आणि नाना लटपटी करुन इस्कंदर मिर्झांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले.

दिल्ली आणि पंजाबमध्ये तर अक्षरश: रानच पेटलं होतं. लाखो निर्वासितांचे लोंढे येत होते. शासनाची आणि सर्वांचीच परीक्षा होती. व्यक्तिगत जीवनामध्ये सुख-दु:खाचे प्रसंग तर नित्यच येत असतात परंतु संपूर्ण राष्ट्र एवढे व्यथित आणि भांबावलेले कधीच आढळले नाही. सर्वत्र वेदनाच किंचाळत होती. सर्वच अनिश्चित होते. अशाही काळात लोकांना गांधींचा आधार वाटत होता. या परिस्थितीतून तारु शकतील तर तेच असा लोकांना विश्वास होता.

गांधीनी आपले काही सहकारी पंजाबला पाठवले. पानिपत आणि जालंदर या दोन्ही रेल्वे स्टेशनांना लागूनच पाकिस्तानातून आलेल्या शीख आणि हिंदू निर्वासित यांचे मोठे तळ होते. या दोन रेल्वे स्टेशनांवर माणुसकीला छेद देणाऱ्या अनेक घटना घडत होत्या. जालंदरच्या निर्वासित कँम्पचा प्रमुख एक शीख गृहस्थच होता. तो असाच निवांतपणे पहुडला असताना दोन-चार लोक त्याच्याकडे धावत आले आणि म्हणाले की, रेल्वे स्टेशनवर लोकांनी एका मुस्लिम उतारुला खाली खेचले आहे आणि त्याला सर्वांनी घेरले आहे. बहुधा ते त्याला मारुन टाकण्याच्या विचारात आहेत. हे ऐकताच हा शीख गृहस्थ आहे त्या स्थितीत स्टेशनकडे धावला आणि घटनास्थळी पोचला. त्याने त्या मुसलमान उतारुला सोडवून आणले.

योगायोग कसा विचित्र ते बघा. सोडवून आणलेला हा उतारु म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून पुढच्या काळात भारताचे राष्ट्रपती झालेले डॉ. झाकिर हुसेन होते आणि त्यांना वाचवणारे हे शीख गृहस्थ सरदार दरबारसिंग होते. हेच दरबारसिंग पुढं पंजाबचे मुख्यमंत्री झाले.

गांधी या संपूर्ण काळात चांगल्या आणि वाईट टीकेचे पहिले आणि शेवटचे लक्ष्य बनले होते. अनेक ठिकाणी लोकांनी त्यांना त्यांच्या तोंडावर सुनावलं की, त्यांनी आता हिमालयाचा रस्ता धरावा. देशात राहू नये. गांधी म्हणत, माझा हिमालय लोकांमध्येच आहे. मी गिरकंदरात जाणारा साधक नव्हे. गांधींना या काळात फार सोसावे लागले. रोज अनेक लोक त्यांना येऊन भेटत. हिंदू आणि मुसलमान, शीख आणि पारशी सगळेच पोळलेले होते. त्यामुळे संतप्त होते. राग काढण्याचे हुकमी स्थळ एकच होते आणि ते गांधींचे. गांधी निमूटपणे सर्व सहन करीत होते आणि काम करीत होते.

बंगालमध्ये त्यांनी उपोषण सुरु केलं तेव्हा त्यांची खूप हेटाळणी झाली परंतू कालांतराने त्या उपोषणाचे परिणाम जाणावू लागले. संयुक्त राष्ट्र संघटनेत पाकिस्तानचे प्रतिनिधी खान जफरुल्लाखान यांनी भाषण करुन गांधींचे अभिनंदन केले आणि या जागतिक परिषदेसमोर असं प्रतिपादन केलं की, गांधींच्या उपोषणामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत सामंजस्याची आणि सहानभूतीची लाटच निर्माण झाली. काही तरी अभूतपूर्व घडत आहे आणि त्याचे सर्व श्रेय गांधींकडे आहे.

गांधींना उपरोधाने लोक म्हणत की, तुमच्या कार्याला खरा वाव आहे तो पाकिस्तानात. तुम्ही तिकडे का जात नाही? आम्हालाच का अहिंसेचे धडे देता? गांधी लोकांना समजावून सांगत, क्वचित टीका गिळून टाकीत. परंतू एकदा त्यांनी जाहीरपणेच सांगून टाकले की, मी पाकिस्तानात जाण्याचा विचार करीत आहे. त्यांच्या मनाने घेतले की, मग ते मागे-पुढे बघत नसत. गांधींनी पाकिस्तानात जाण्याचे ठरवलं. त्यांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून दिनशा आणि जहांगीर यांना पाकिस्तानात पाठविले.

बँ. जिनांशी आणि इतरांशी बोलून दिनशा आणि जहांगीर परत दिल्लीला आले. हे दोघे गांधींच्या निकटच्या परिवारातले आणि त्यांच्याबरोबर काम करणारे. दिल्लीला ते आले तेव्हा त्यांच्याबरोबर पाकिस्तान सरकारच्या वतीने बोलण्यासाठी जमशेद मेहता आले होते. जिनांनी गांधींच्या पाकभेटीला सशर्त मान्यता दिली. त्यांचे म्हणणे होते की, गांधींनी भारतीय जनतेला आणि भारत सरकारात असलेल्या लोकांना हे सांगितले पाहिजे की, त्यांनी पाकिस्तानचे वास्तव मोकळ्या मनाने मान्य करावे आणि ही दोन्ही राष्ट्रे परत एकत्र येतील असा कधी विचार करु नये. गांधींना जिनांच्या या अटी मान्य होत्या की नाही हे कळण्याची संधीच मिळाली नाही.

३० जानेवारी १९४८ ला दिल्लीत गांधींचा खून झाला. जिनांची इच्छा असो वा नसो दिल्ली आणि इतर भारतीय शहरांइतकेच पाकिस्तानातील कराची शहरही हळहळले. राजकीय नेते आपल्या प्रतिक्रिया हात राखूनच देत होते परंतू लोकांना गांधींच्या मृत्यूने खरोखरीच दु:ख झाले होते. गांधींच्या बाबतीतच हे शक्य होते.

(३० सप्टेंबर १९८९ रोजी मराठवाडा दैनिकात प्रसिद्ध झालेला हा लेख ऋतू प्रकाशनानं काढलेल्या ‘कावड’ पुस्तकातून साभार.)