अनिल गोटेंनी राजीनामा का दिला - घेतला?

१९ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ७ मिनिटं


धुळे महापालिकेची निवडणूक ९ डिसेंबरला आहे. प्रचाराला सुरवात व्हायच्या महिनाभर आधीपासून धुळ्याच्या भाजपमधे चांगलाच वाद पेटलाय. धुळ्याचं नेतृत्व कुणाकडे, आमदार अनिल गोटे की संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, हा तिढा सुटेपर्यंत हा वाद संपणारा नाही. भले गोटे राजीनामा देवोत किंवा परत घेवोत.

संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि आमदार अनिल गोटे दोघेही चार वर्षांपूर्वी भाजपमधे आले. ते दोघे आले तेव्हापासून त्यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. धुळे महानगरपालिकेचं वातावरण तापल्यानंतर या आरोपांना आणखीच जोर चढला. हे भांडण विकोपाला गेलं ते विजय संकल्प मेळाव्यात.

११ नोव्हेंबरला भाजपने धुळ्यात विजयी संकल्प मेळावा घेतला होता. मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचीही उपस्थिती होती. मेळाव्याचं आपल्याला साधं निमंत्रणही दिलं नाही आणि बॅनरवर फोटोही छापला नसल्याचं सांगत आमदार गोटे अचानक स्टेजवर चढले. भाषण देऊ लागले. परंतु भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखलं. यावरून मेळाव्याच्या ठिकाणी वाद झाला.

निवडणुकांच्या तोंडावर पक्षात गुंडांना प्रवेश देण्याचा मुद्दा या वादामागील कारण असल्याचं सांगितलं जातं. तरीही गोटे आणि स्थानिक भाजप पदाधिकारी यांच्यातील वादाचं हे प्रकरण जुनं आहे. त्यामुळे गोटेंचं राजीनामानाट्य रंगून संपलं, तरीही वाद शमण्याची लक्षणं नाहीत.

 

भाजप प्रवेशापासूनच वादाचाही प्रवेश

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी गोपीनाथ मुंडे यांनी ‘माधव’ प्रयोग पुन्हा राबवण्यासाठी अनिल गोटे यांना धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. माधव म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी या मोठ्या ओबीसी जातींना एकत्र आणणं. गोटे धनगर आहेत. कधीकाळी संघात असलेले गोटे लोकसभा तिकीटासाठी भाजपमधे आले. मात्र ऐनवेळी शिवसेनेतून आलेल्या डॉ. सुभाष भामरे यांना भाजपात घेऊन त्यांना लोकसभेची उमेदवारीही दिली.

भामरेंकडे थेट अमित शाह यांचा वशिला होता म्हणे. शिवाय ते मराठा असल्याचं कारण देत त्यांना लोकसभेची उमेदवारी आणि पुढे केंद्रीय मंत्रीपदही मिळालं. तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या गोटेंनी गोपीनाथ मुंडे यांना चक्क ‘कपटी मित्र’ म्हणत भाजपवर टीका केली होती. धनगर आणि वंजारी समाजाने भाजप विरोधात नोटाचा उपयोग करावा, असं आवाहनही केलं. मात्र मुंडे समजुत काढल्यानंतर गोटेंनीही लगेच नरमाईची भूमिका घेतली.

त्यानंतर विधानसभेच्या ऑक्टोबर २०१४ मधील निवडणुकीवेळी गोटेंच्या उमेदवारीला स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध केल होता. नाराजी व्यक्त करायला स्थानिक नेत्यांनी थेट एकनाथ खडसे यांना गाठलं. मात्र खडसेंनी गोटे हेच धुळे विधानसभेचे उमेदवार असतील, असं सांगत स्थानिकांच्या जखमेवर मी चोळलं होतं. भाजप कार्यकर्त्यांना खडसेंमुळे विरोध आवरता घ्यावा लागला होता.

 

आमदार भाजपचे, काम लोकसंग्रामच्या नावाने

२००९ मधे स्वबळावर निवडून आलेले अनिल गोटे २०१४च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर जिंकले. असं असलं तरी त्यांनी त्यांचा जुना लोकसंग्राम पक्ष भाजपमधे विलीन केला नाही. उलट लोकसंग्राम संघटनेच्या माध्यमातूनच त्यांनी आपलं काम सुरू ठेवलं. त्यामुळेही गोटे आणि स्थानिक भाजप नेते यांच्यात धुसफूस सुरूच होती.

अनिल गोटे यांनी पांझरा नदीकाठी सरकारी जमिनीवर चौपाटी बांधली. न्यायालयानं ही चौपटी अतिक्रमित असल्याचा निकाल दिल्याने ती प्रशासनाने जमीनदोस्त केली. चौपाटी पाडण्यासाठी पक्षातूनच रसद पुरवली गेली, असा आरोप करत गोटेंनी थेट सुभाष भामरेंना जबाबदार धरलं. गोटेंनी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांवरही जहरी टीका केली. यामुळे संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी अनिल गोटे यांना काळं फासण्याची तयारी केली. वरिष्ठ नेत्यांनी समजूत घातल्याने तेव्हा वातावरण शांत झालं.

लोकसभेच्या तिकीटापासून सुरू झालेला गोटे आणि भामरे यांच्यातील संघर्ष तीव्र झाला तो मनमाड धुळे ते इंदूर रेल्वेमार्गाच्या श्रेयावरून. मनमाड ते धुळे रेल्वेमार्गाचा प्रश्न गेल्या पंचवीस वर्षांपासून भिजत पडलाय. गोटेंनी आमदार झाल्यानंतर या रेल्वेमार्गासाठी प्रयत्न सुरु केले. २००७ मध्ये आंदोलनही केलं. त्यावेळी आघाडी सरकारने या मार्गासाठी निधी देण्याची तयारी दाखवली होती.

सुभाष भामरेंनी निवडून आल्यावर या रेल्वेमार्गासाठी पाठपुरावा सुरु केला. त्यातच ऑगस्ट २०१८ मध्ये केंद्र सरकारने या मार्गाला मंजुरी दिली. यानंतर अनिल गोटे आणि सुभाष भामरे यांच्यात श्रेयाची लढाई सुरु झाली आणि ती वाढतच राहिली.

 

मिस्टर गोटे नाही, मिस्टर खोटे’

चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेला जवान चंदू चव्हाण याला भारतात परत आणण्यासाठी सुभाष भामरेंनी प्रयत्न केले. तेव्हा त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे  गोटेंनी भामरेंवर टीका केली. तर अनिल गोटे यांनी शहीद जवान योगेश भदाणे यांच्या वारसांना एक कोटी रुपयांचे साहाय्य मिळवून देईन, असं आश्वासन दिलं होतं. तेव्हा हे आश्वासन म्हणजे निव्वळ दिशाभूल असून मिस्टर गोटे हे तर मिस्टर खोटे आहेत, अशी टीका भामरेंनी केली होती.

अनिल गोटे यांनी धुळ्यात नदीच्या काठाने रस्ते बनवण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलाय. त्यासाठी त्यांनी जुन्या धुळ्यात नदीकाठी असलेलं मंदिर पाडलं. यावर स्थानिक भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार टीका केली. त्यामुळे गोटे आणि स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमधील दरी अधिकच वाढली.

 

गुंडगिरी विरुद्ध गोटेगिरी

अनिल गोटे यांनी स्वतःची आक्रमक राजकारणी अशी ओळख तयार केलीय. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांच्यासमोर मुख्य आव्हान असायचं ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवर्धन कदमबांडे यांचे. राजवर्धन कदमबांडे यांच्यासोबत गुंड प्रवृत्तीची माणसं असतात आणि ते काळ्या धंद्यांमध्ये गुंतलेत. कदमबांडेंच्या आशीर्वादानेच या गुंडांवर कुठलीच कारवाई होत नाही, असे आरोप करत गोटे निवडणूक लढायचे.

यंदा मात्र कदमबांडे यांच्यासोबत असणाऱ्या अनेकांनी भाजपमधे प्रवेश केला. गोटे यांनी यंदाही त्यालाच मुख्य मुद्दा बनवला. स्टॅम्प घोटाळ्याच्या तेलगी प्रकरणात ४ वर्ष तुरुंगात राहून आलेल्या गोटे यांच्या भात्यातलं गुंडगिरी हे आता प्रमुख अस्त्र आहे.

२०१३ मधे महापालिका निवडणुकीवेळीही अनिल गोटे यांनी गुंडगिरीचा मुद्दाच लावून धरला होता. गुंडाराजला उत्तर म्हणून त्यांनी महिलाराजचं स्वप्न दाखवलं होतं. त्यांनी त्यांच्या लोकसंग्राम पक्षातर्फे फक्त महिलांना उमेदवारी दिली. त्यात त्यांना यश मिळालं नाही. आता अनिल गोटे भाजपमधे असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांच्याही अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यांनाही आपल्या गळ्यात नगरसेवकपदाची माळ पडण्याचे वेध लागलेत.

 

दोघांच्या भांडणात इच्छुकांची गोची

कार्यकर्त्यांना खुश करण्यासोबतच महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने आपला प्रभाव दाखवण्याची संधी गोटेंना सोडायची नाहीय. त्यासाठी महापालिका निवडणुकीची सुत्रं आपल्या हातात राहावीत, यासाठी गोटेंनी प्रयत्न सुरू केले होते. ‘आमदार आपल्या दारी’ उपक्रम राबवत गोटेंनी शहरात सभा घ्यायला सुरवात केली. याच दरम्यान, भाजपने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी निवडणूक प्रभारी म्हणून नेमणूक केली आणि गोटेंच्या संतापाचा पुन्हा उद्रेक झाला.

मधल्या काळात गप्प गप्प असणाऱ्या गोटेंनी भाजप नेत्यांवर उघड उघड टीका करायला सुरवात केली. या सगळ्याला रावसाहेब दानवे जबाबदार असून काही दिवसांत भाजप प्रदेशाध्यक्ष बदलला जाईल. त्यानंतर निवडणुकीची सुत्रं आपल्याकडेच येणार असल्याचं ते सांगायचे. उमेदवार ठरवण्याचे अधिकार आपल्याकडे राहणार असल्याच्या थाटात ते इच्छुकांच्या मुलाखती घ्यायला लागले. यातून मोठा गोंधळ उडाला. इकडे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही मुलाखती घ्यायला सुरवात केली. त्यामुळे इच्छुकांची गोची झाली. या गोंधळात काहींनी दोन्हीकडं हात धुवून घेतला.

 

विरोधी पक्षांना उकळ्या

भाजपमधल्या अंतर्गत लाथाळ्यांमुळे विरोधी पक्षांना उकळ्या फुटू लागल्या. भाजपला यावेळीही संधी मिळणार नाही, अशी चर्चा रंगू लागली. अनिल गोटेंचा भाजपच्या स्थानिक पुढाऱ्यांनी गेम केला, असंही बोललं जाऊ लागलं. चार वर्षांपूर्वी भाजपमधे आलेल्या सुभाष भामरेंना पक्षात महत्त्व दिलं जातंय, यावरून गोटेही इरेस पेटून पक्षाविरोधात बोलू लागले. या सगळ्यामुळे विरोधी पक्षांना ही निवडणूक आपल्याला सोपी जाणार, अशी स्वप्नं पडायला लागली.

या सगळ्यात पक्षाची भूमिका स्पष्ट असावी यासाठी स्थानिक नेत्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना धुळ्यात विजय संकल्प मेळाव्याला बोलावलं. या मेळाव्याच्या बॅनरवर गोटेंचा फोटो नव्हता. साधं निमंत्रणही दिलं नव्हतं. मेळाव्यात दानवेंचं भाषण सुरू होताच अचानक प्रकटलेल्या गोटेंनी माईकचा ताबा घेत आपलं गाऱ्हाणं मांडायला सुरवात केली. मात्र स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या हातातून माईक हिसकावून घेत त्यांना स्टेजवरून खाली उतरवलं.

वादानंतर भाषण करताना रावसाहेब दानवेंनी अनिल गोटेंना थेट आव्हान देत म्हटलं, ‘कुणी आडवं आलं तर त्याच्या मुंडक्यावर पाय देऊन महापालिका निवडणूक जिंकू.’ या घटनेने संतापलेल्या गोटेंनी रावसाहेब दानवे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, सुभाष भामरे आणि गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. गुंडांना उमेदवारी दिली तर आपण कोरी पाटी असलेल्यांना उमेदवारी देऊ, अशीही घोषणा त्यांनी केली.

एवढंच नाही तर आमदारकीचा राजीनामा देण्याची भाषा ते बोलू लागले. सोमवारी १९ नोव्हेंबरला विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांच्या हातावर टेकवू, असा इशाराही गोटेंनी एका पत्राद्वारे दिला. गोटेंनी भाजपच्या आमदारांना लिहिलेलं हे  सविस्तर पत्रं १३ नोव्हेंबरच्या रात्रीच वायरल झालं.

 

संघाचं कार्ड आलं कामाला

या पत्राच्या सुरवातीलाच गोटेंनी आपली जडणघडणच भाजपची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत झाल्याचं स्पष्ट केलंय. जनसंघात संघटनमंत्री म्हणून काम केलेल्या गोटेंना संघातल्या नियोजनानुसारच शरद जोशींच्या शेतकरी संघटनेच्या कामात सहभागी होण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार गोटे शेतकरी संघटनेच्या कामाला लागले. पुढे शरद जोशींसोबत वाद झाल्यानं आपण शेतकरी संघटनेचा राजीनामा दिला, असं गोटेंनी पत्रात म्हटलंय. आपण मराठा नसल्याने पक्षात आपल्याला किंमत नसल्याची खंत गोटेंनी पत्रात व्यक्त केली.

आता भाजप दीनदयाळ उपाध्याय आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांवर चालणारा पक्ष राहिला नाही, अशी टीकाही गोटे यांनी केली. आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं सांगणाऱ्या गोटेंनी आता फक्त मुख्यमंत्र्यांनी बोलावलं तरच चर्चेसाठी जाऊ, असं सांगत अनिल गोटेंनी पुन्हा पॅचअपसाठीचा मार्ग मोकळा ठेवला होता.

गोटे यांनी गुन्हेगारांना दिल्या जाणाऱ्या प्रवेशावरून टीका केल्यावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी गोटे यांची पाटीही कोरी नसून त्यांच्यावरही १६ गुन्हे दाखल आहेत. स्टॅम्प घोटाळ्यात ४ वर्ष तुरुंगात राहून आलेल्या गोटे यांना भाजपनेच प्रवेश देऊन पवित्र केल्याची टीका केली होती.

 

अधिवेशनाच्या आधीच गोटे थंड

यानंतर रविवारी १८ नोव्हेंबरला गोटे यांना मुंबईत बोलावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढली. त्याच दिवशी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सुभाष भामरे, गिरीश महाजन, जयकुमार रावल यांच्याप्रमाणे गोटेही आमच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांचंही नेतृत्व या निवडणुकीत असेल, असं स्पष्टीकरण दिलंय. गोटेंनीही सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राजीनाम्याचा विषय काढला नाही.

गोटेंना साईडलाईन करून धुळे महापालिका निवडणुका लढवण्याचा घाट भाजपने घातला होता खरा. गोटेंना प्रभावहीन करण्यासाठी सुभाष भामरेंनी दिल्लीपासून धुळ्याच्या गल्लीपर्यंतच्या भाजपला आपल्यासोबत घेतलं. मात्र गोटेंनी आपलं उपद्रवमूल्य चांगलंच दाखवून दिलंय. त्यासाठी आपल्या जनाधारापासून जातीपर्यंत आणि संघनिष्ठेपासून राजीनाम्याच्या धमकीपर्यंत सगळं काही पणाला लावलं.

सध्यातरी जुन्या काळातले संघाचे कार्यकर्ते असलेल्या गोटेंना शांत करण्यात भाजपच्या श्रेष्ठींना यश आलंय. पण स्थानिक कार्यकर्ते आणि जुनेजाणते गोटे यांच्यातला हा वाद कायमचा मिटलाय, असं गोटेंच्या वाद परंपरेवरून म्हणता येणार नाही. हा वाद कुठवर मिटलाय, हे महापालिका निवडणुकीत दिसेल.

गोटेंच्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळेल का? गोटे भाजपसाठी खरंच काम करतील का? महाजनांचा निवडणूक जिंकण्याचा फॉर्म्युला धुळ्यातही चालेल का? ९ तारखेला मतदानात धुळेकर कुणाचा निकाल लावणार? आणि धुळ्यातल्या भाजपचं नेतृत्व नक्की कोणाचं आहे? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं धुळे महापालिकेच्या निवडणुकाचे निकालच देणार आहेत.

(व्यवसायाने आयटी इंजिनियर असणारे लेखर मुक्त पत्रकार आहेत)