अण्णाभाऊंच्या विचारांची जयंती साजरी व्हायला हवी

०१ ऑगस्ट २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंचा आज जन्मदिवस. त्यांचं आयुष्य जिद्द, चिकाटी, मेहनत, संघर्ष याची प्रचिती देणारं आहे. भारत ते रशिया हा त्यांचा साहित्यिक प्रवास प्रेरणा देतो. त्यांच्या नावाचा उदोउदो करण्यापेक्षा त्यांना अपेक्षित असणारा समाज घडवण्याचा प्रयत्न करायला हवा. येणाऱ्या नवीन पिढ्यांना अण्णा भाऊ साठे समजावून सांगत घराघरात त्यांच्या फोटो सोबतच त्यांचे विचारही पोचवायला हवेत.

दरवर्षी ऑगस्ट महिना उजाडला की, संपूर्ण महाराष्ट्रात अगदी खेड्यापाड्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ढोल, ताशा, मिरवणुका आणि डीजेच्या तालावर ठेका धरणारी तरूणाई सुध्दा 'ओ शेठ तुम्ही नादचं केलाय थेट' म्हणत मोठ-मोठ्याने घोषणा, शिट्ट्या मारताना दिसते. आता हे चित्र कोणत्याही महापुरूषांच्या जयंतीत सवयीचं होत चाललंय.

समाजात याला अपवाद नाहीत असं मुळीचं नाही, पण यापेक्षा वेगळं चित्र क्वचितच पाहायला मिळतं. यावर्षी आपण साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची १०१ वी जयंती साजरी करत असताना खरंच आम्ही अण्णा भाऊ साठे समजून घेतले आहेत का? हा महत्वाचा प्रश्न अनुत्तरीतचं आहे. कारण आम्हाला अण्णा भाऊ साठे माहित होतात ते फक्त १ ऑगस्ट आणि १८ जुलैला. इतर दिवशी आम्ही त्यांचा विचार सुध्दा करत नाही.

हेही वाचा: साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंनी लोककलेला आधुनिक रुप दिलं

अन्याय, अत्याचारावर लेखनीतून प्रहार

धगधगत्या निखाऱ्याप्रमाणे अण्णांच्या आयुष्याचा जीवन प्रवास आहे. १ ऑगस्ट १९२० ला सांगली जिल्ह्याच्या वाटेगावात त्यांचा जन्म झाला. निवडुंगाच्या काटेरी छायेसारखी दु:खं लहानपणीच अण्णांच्या वाट्याला आली.

अस्पृश्याची वस्ती म्हणून मांगवाड्याकडे पाहणारी गावगाड्यातली व्यवस्था जातीयवादाच्या विचारातून वागत आणि बोलत होती. त्याच जातीयवादाचे चटके अण्णा भाऊ साठेंच्या कोवळ्या मनाला अगदी बालवयातचं सोसावे लागले.

शिक्षण व्यवस्था सुध्दा जातीय उतरडीच्या विळख्यात सापडली होती. म्हणूनच अण्णा भाऊना शाळेचा सहवास फारचं कमी मिळाला. परंतु जिद्द, चिकाटी, मेहनत आणि इच्छाशक्तिच्या जोरावर त्यांनी साहित्याच्या प्रांतात अतुलनीय कामगिरी केली. सर्वसामान्यांची सुख-दु:खं मांडली.

अन्याय आणि अत्याचारावर त्यांनी त्यांच्या लेखनीतून प्रहार केला. डफावरती थाप मारून वंचिताची व्यथा सांगितली. शेतकरी, महिला, गावगाडा, गरीबी, तमाशा, लोककला, मानवी मूल्ये, संस्कृती अशा असंख्य विषयावर मौलिक लेखन केलं. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत शाहीरीबाणा दाखवून दिला.

भिंतीवरच्या अक्षरांनी शिकवलं

वाटेगावात पोटाची खळगी भरत नाहीत म्हणून अनंत हालअपेष्टा सहन करत अण्णा भाऊ साठे आपल्या कुटुंबासह २७२ मैलाचं अंतर पायी चालत मुंबईत दाखल झाले. आणि इथूनचं अण्णा भाऊंच्या परिवर्तनवादी प्रवासाची सुरवात झाली. गरीबीची जाण असलेले अण्णा मुंबईत हाती पडेल ते काम करून कुटुंबाला मदत करू लागले. अगदी फेरीवाला ते इस्त्रीवाला अशी अनेक कामं अण्णांनी मुंबईत केली.

त्यांना मुंबईत अचानक एके दिवशी गावचा ज्ञानू भेटला. दोघांनाही आनंद झाला. एकमेकांची विचारपूस झाली आणि ज्ञानूने अण्णांना आपल्या रूमवरती नेलं. तिथं अण्णांना ज्ञानू वाचतो-लिहितो याची माहिती झाली. त्यामुळे अण्णांना आपल्या अडाणीपणाची लाज वाटू लागली. म्हणूनच अण्णांनी साक्षर होण्याचा निर्णय घेतला आणि ज्ञानूच्या मदतीने अक्षरज्ञानाचा श्रीगणेशा करून जुजबी अक्षरं शिकून घेतली.

त्यानंतर अण्णांभाऊनी मागे वळून पाहिलं नाही. दिसेल ती पाटी, दिसेल तो बोर्ड वाचून काढला. दुकानावरच्या पाट्या आणि भिंतीवरची अक्षरं वाचून अण्णा साक्षर झाले आणि इथंच एका साहित्यिकाच्या साहित्याची मुहर्तमेढ रोवली गेली.

हेही वाचा: सगळ्या उत्सवी वातावरणामधे अण्णा भाऊ समजून घेणं राहू नये!

३२ कादंबऱ्यांची देण

दिड दिवस शाळेत गेलेल्या अण्णांनी आपल्या अवघ्या ४९ वर्षाच्या आयुष्यात विपुल प्रमाणात लेखन केलं. कामगार, दिनदुबळे, दलित, कष्टकरी, शेतकरी यांचं दु:ख शब्दांच्या माध्यमातून समोर आणलं. मराठी साहित्यातला 'वगनाट्य' हा प्रकार अण्णांनी जन्माला घातला. त्यामुळे शाहीर म्हणून त्यांचा बोलबाला आणि दबदबा आहे.

अग्निदिव्य, आग, अलगूज, आघात, अहंकार, चंदन, गुलाम, केवड्याचं कणीस, कुरूप, आवडी, डोळे मोडीत चाले राधा, जिवंत काडतूस, चिमा, मंगला, चिखलातील कमळ, फुलपाखरू, फकीरा, पाझर, तारा, रत्ना, मूर्ती, मास्तर, माकडीचा माळ, मथुरा, वारणेच्या खो-यात, रूपा, रानबोका, रानगंगा, संघर्ष, वैर, वैजयंता अशा ३२ कादंबऱ्या अण्णा भाऊंनी लिहिल्या.

त्यातून त्यांनी गावकी-भावकीचा कलह, गावगाड्याचे प्रश्न, नाते संबंधातली मानवी मूल्यं, महिलांच्या व्यथा, कलावंताचं जीवन जगा समोर आणलं. त्यांच्या ७ कादंबऱ्यांवर सिनेमा निघालेले आहेत.

कथासंग्रहांमधे १५० कथा

गावगाड्यातले वाढते संघर्ष मांडताना अण्णांनी चिंतनशील कथासंग्रहही लिहिले. त्यांच्या प्रत्येक कथेतून भविष्यासाठी बोध मिळतो. नाते संबंधात वाढत असलेला दुरावा, लोकांचं एकमेकांशी सोयीने वागणं, बदलत असलेली मानवी जीवन मूल्यं, नव्या संस्कृतीचा होत असलेला उदय, औद्योगिकरणाने वाढवलेली बेकारी, तंत्रज्ञानामुळे समाजात वाढलेली दरी असे अनेक पैलू अण्णांच्या कथांनी समोर आणले.

अमृत, फरारी, आबी निकारा, रानगा, भुताचा मळा, स्वप्नसुंदरी, लाडी, राम-रावण युध्द, गुन्हाळ, चिरानगरीची भुतं, भानामती, बरबंद्या कंजारी, रामवेली, मुरारी, कृष्णकाठच्या कथा, ठासलेल्या बंदुका, गजाआड, खुळंवाडी, पिसाळलेला माणूस असे काही अण्णांचे प्रसिध्द कथासंग्रह आहेत. त्यामधे दर्जेदार अशा जवळपास १५० कथा आहेत.

हेही वाचा: ही पृथ्वी दलिताच्या तळहातावर तरलीय, वाचा अण्णा भाऊंचं गाजलेलं भाषण

मराठी साहित्याला 'वगनाट्य' दिलं

अण्णा स्वतः एक उत्कृष्ठ कलावंत होते. त्यांनी काही सिनेमात छोट्याशा भूमिकासुद्धा केल्या आहेत. त्यामुळेच त्यांनी आपल्या साहित्यिक लेखनामधे वगनाट्याचाही समावेश केला. जगण्या-मरणाची लढाई अनुभवाने जगणाऱ्या अण्णांनी कलेलाही वास्तवाची जोड दिली.

आपल्या संपूर्ण साहित्यात अण्णांनी कल्पनेला कुठेही थारा दिला नाही. मी जे पाहाते, मी जे जगतो, मी जे अनुभवतो तेच आणि तेच मी लिहितो, असं अण्णांनी किती-तरी वेळा सांगितलं होतं. त्यामुळेच समाजातले समकालीन प्रश्न, आंदोलनं, मोर्चे लक्षात घेऊन त्यांनी विडंबनात्मक दृष्टिकोनातून वगनाट्य लिहिली.

दुष्काळात तेरावा, पुढारी मिळाला, मुंबई कुणाची, बेकायदेशीर, बिलंदर बुडवे, नवे तमाशे, मूक मिरवणूक, इनामदार, लोकमंत्र्याचा दौरा, पेंद्याचं लगीन, देशभक्त घोटाळे, खापऱ्या चोर, शेटजींचं इलेक्शन ही त्यांची गाजलेली वगनाट्य आहेत. सोबतच त्यांनी 'माझी मैना गावावर राहिली' ही अभूतपूर्व रचना लिहिली.

साहित्य सातासमुद्रापार

'माझा रशियाचा प्रवास' हे प्रवास वर्णन आणि १२० पोवाडे आणि लावण्या लिहिल्या. १९६१ ला त्यांच्या 'फकीरा' या कांदबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. त्यांची 'चित्रा' ही कांदबरी रशियन भाषेत प्रकाशित झाली. अण्णा भाऊ साठेंच्या साहित्याचा डंका सातासमुद्राच्या पार गेला.

अण्णांचं साहित्य हे १४ भाषा आणि ६ परदेशी भाषेत उपलब्ध आहे. म्हणूनचं ते जागतिक किर्तीचे लेखक मानले जातात. अण्णा भाऊ साठेंची 'फकीरा' ही कादंबरी औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिवर्सिटीच्या अभ्यासक्रमात तर 'माझा रशियाचा प्रवास' हे प्रवासवर्णन पुण्याच्या सावित्रीबाई फुले युनिवर्सिटीच्या अभ्यासकमात समाविष्ठ आहे.

त्यांच्या साहित्यावर देशभरातल्या अनेक युनिवर्सिटीमधे संशोधन झालंय. जनप्रबोधन आणि वैचारिक लेखनाच्या बळावरचं त्यांना १९५८ ला झालेल्या 'दलित साहित्य संमेलनाचं' अध्यक्षपद देण्यात आलं होतं.

हेही वाचा: अण्णा भाऊंच्या कथेबद्दल आचार्य अत्रे काय म्हणतात?

सामाजिक क्रांतीचं विद्यापीठ

सामाजिक प्रबोधनाचा वसा घेऊन साहित्य विश्वात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अण्णा भाऊ साठेंची जगभरात किर्ती असतानाही त्यांच्या वाट्याला नेहमी उपेक्षाच आल्याचा इतिहास आहे. अण्णांना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं 'अध्यक्ष'पद का मिळालं नाही? त्यांच्या साहित्याला 'ज्ञानपीठ' पुरस्कार का मिळाला नाही?

महाराष्ट्रातल्या एखाद्या युनिवर्सिटीला 'अण्णा भाऊ साठे' हे नाव का देण्यात आलं नाही? सर्वात महत्वाचा प्रश्न की, त्यांना 'भारतरत्न' पुरस्कार का दिला जात नाही? असे प्रश्न त्यांचे असंख्य वाचक, संशोधक, अभ्यासक, दलित, बहुजन अशा सर्वांना पडले आहेत. अण्णा भाऊ साठे आज असते तर मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर चालणारा सावळा-गोंधळ आणि विकोपाला गेलेले साहित्यिक वाद पाहून त्यांनी स्वत:हून निवडणुकीत उभं राहाण्याचं टाळलं असतं.

दुसरं म्हणजे कोणत्याही युनिवर्सिटीला अण्णांचं नाव जरी दिलं गेलं नाही, तरी अण्णाचं साहित्य आणि अण्णाभाऊ हे स्वत:चं 'सामाजिक क्रांतीचं विद्यापीठ' आहे. अण्णांना जरी 'भारतरत्न' मिळाला नाही तरी रशियाच्या एका लहानशा चिमुरडी पासून ते रशियाच्या अध्यक्षांसह सर्वसामान्यांच्या मनात त्यांच्या विषयी असणारं प्रेम आणि जिव्हाळा हाच खरा 'भारतरत्न' आहे. यशवंतराव चव्हाण आणि कर्मवीर भाऊराव पाटलांच्या मनात अण्णांविषयी असणारी आपुलकी हाचं खरा 'ज्ञानपीठ' आहे.

विचारांची जयंती साजरी व्हावी

अण्णांच्या आयुष्यातला १९२० ते १९६९ हा काळ जिद्द, चिकाटी, मेहनत, संघर्ष याची प्रचिती देणारा आहे. भारत ते रशिया हा त्यांचा साहित्यिक प्रवास प्रेरणा देणारा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचं योगदान आजही दीपस्तंभ आहे. कल्पनेच्या जगात न वावरता वास्तवाची जोड देऊन साहित्यिकांच्या यादीत आपलं वेगळेपण टिकवून ठेवणारे अण्णा भाऊ साठे खऱ्या अर्थाने 'साहित्यातला विश्वतारा' ठरतात.

त्यामुळे अण्णांची केवळ पारंपारिक जयंती साजरी न करता त्यांच्या विचारांची जयंती साजरी व्हायला हवी. ढोल-ताशे आणि डिजे वाजवून मिरवणूक काढण्यापेक्षा त्यांची साहित्यिक पुस्तकं वाटून जयंती साजरी करण्याची गरज आहे. दारू पिऊन उड्या मारण्यापेक्षा त्यांचं साहित्य वाचून अन्याय आणि अत्याचाराच्या विरुद्ध उड्या मारायला काय हरकत आहे? त्यामुळे अण्णांची जयंती साजरी करताना त्यांचा एखादा विचार आत्मसात करा.

त्यांच्या नावाचा उदोउदो करण्यापेक्षा त्यांना अपेक्षित असणारा समाज घडवण्याचा प्रयत्न करा. संघटनामधे त्यांचा मानवी कल्याणाच्या विचारांचे बीज पसरावा. येणाऱ्या नवीन पिढ्यांना अण्णा भाऊ साठे समजावून सांगा. घराघरात अण्णांच्या फोटो सोबतच त्यांचे विचारही पोचवा. तेव्हाच खऱ्या अर्थानं अण्णा भाऊ साठेंची जयंती साजरी होईल आणि ते साहित्यातला विश्वतारा ठरतील.

हेही वाचा: 

विचारवंतांचं लेटर वॉर हे लोकशाहीचं विदारक वास्तव

बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती तीनवेळा का जाळली?

आपल्या ताटातल्या प्रत्येक घासामागे दडलंय पैशांचं गणित

‘युगानयूगे तूच’: समग्र बाबासाहेबांकडे घेऊन जाणारी कविता

खरंच, बाबासाहेबांना महाड सत्याग्रहापर्यंत फुले परिचित नव्हते?