सावित्रीआईचं एनजीओ नको करुया

०३ जानेवारी २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


आज सावित्रीआईचा जन्मदिन. राज्य सरकारने तो 'महिला शिक्षण दिवस' म्हणून साजरा करायचा निर्णय घेतलाय. ते चांगलंच आहे. पण जोतिबांचे आणि त्यांचे विचार सोडून फक्त कामाचा विचार करण्यासाठी त्या काही आजच्यासारख्या समाजसेवक किंवा एनजीओवाल्या नव्हत्या. त्यांनी एक नवं तत्त्वज्ञान जन्माला घातलं होतं. त्यातून अनेक गोष्टी घडत गेल्या. त्यातली एक गोष्ट म्हणजे त्यांचं सामाजिक काम.

नवं वर्ष आलंय. जुनं विसरून जग नव्याकडे आशेने पाहतंय. पण हे मान्य करावंच लागेल की कोरोनाने काचेलाच तडा दिलाय. काही केल्या सांधता येत नाही. कितीतरी जवळची माणसं गेली. कितीतरी देशोधडीला लागली. आज एकविसाव्या शतकात कोरोनाच्या साथीने आपण इतके खचलोय. तर १८९६, ९७ ला प्लेग भारतात आला तेव्हा किती मोठं संकट ओढावलं असेल?

कमालीचं दारिद्र्य, आरोग्यव्यवस्था नाही, औषधं नाहीत, त्यात अंधश्रद्धांचा पगडा. परिणाम देशात प्रत्येक वीस जणांपैकी एक प्लेगने मृत्युमुखी पडला. वीस वर्षांत एक कोटी लोक प्लेगने मेले. अशा काळात एक वीरांगना प्लेगशी लढण्यासाठी मैदानात उतरल्या होत्या. त्यांचं नाव सावित्रीबाई फुले. त्यांचे एकुलते एक चिरंजीव यशवंतराव मिलिट्रीत डॉक्टर होते. दक्षिण आफ्रिकेत पोस्टिंग होती. जगभऱात सुरू असलेलं प्लेगचं थैमान पाहत होते. त्यांनी आईला सांगितलं, घराबाहेर पडू नकोस.

सावित्रीआईंना प्लेगने गाठलं

सावित्रीआईही जवळची माणसं प्लेगने जाताना पाहत होत्या. पण सावित्रीआईंसमोर एकच प्रश्न होता, आज जोतिबा असते तर इतक्या मोठ्या संकटात बसून राहिले असते का? सावित्रीआईंनी तार करून यशवंतरावांनाच पुण्यात बोलावून घेतलं. ते रजा टाकून आले. पुण्यात हडपसरला ससाणेनगरच्या माळावर झोपड्या बांधून दवाखाना सुरू केला. तेव्हा अस्पृश्यांची परिस्थिती सर्वात भयानक होती.

नतद्रष्ट शिवाशिवीमुळे त्यांच्यापर्यंत सरकारी उपाययोजना पोचत नव्हत्या. आईची मायाच ही वेदना समजू शकत होती. सावित्रीआईंनी दलित वस्त्यांमधे कामाला सुरवात केली. अभ्यासक हरी नरके सांगतात की, सावित्रीआईंनी मुंढव्यातल्या पांडुरंग गायकवाड या अस्पृश्य मुलाला वाचवल्याची नोंद सापडते. अकरा वर्षांच्या पांडुरंगला प्लेग झाला. सावित्रीआईंनी त्याला चादरीत गुंडाळलं. पाठीवर घेतलं. मुंढव्यापासून ससाणेनगरपर्यंत ८ किलोमीटर चालत गेल्या. दवाखान्यात दाखल केलं.

पांडुरंग वाचला. पण सावित्रीआईंना प्लेगने गाठलं. त्यांनी जोतिबांनी दिलेला विचारांचा वसा चालवण्यासाठी माणुसकीच्या लढ्यात हौतात्म्य स्वीकारलं. पुढे यशवंतरावही आईच्या पावलावर पाऊल टाकून प्लेगमधेच शहीद झाले. विशेष म्हणजे सावित्रीआईंनीच जोतिबांच्या पश्चात त्यांना डॉक्टर बनवलं होतं.

हेही वाचा: आपण खरंच सावित्रीच्या लेकी आहोत का?

जोतिबांच्या वंशजांना बहिष्कृत केलं

यशवंतरावांना सावित्रीआईंनी जन्म दिलेला नसला तरी त्यांची नाळ कापली होती. जोतिबांच्या प्रेरणेतून सावित्रीआईंनी अन्यायग्रस्त ब्राह्मण विधवा आणि त्यांच्या मुलांना आधार दिला होता. अशा एक विधवा काशीबाईंचा मुलगा म्हणजे यशवंत. जोतिबा आणि सावित्रीआईंनी त्यांना रीतसर दत्तक घेतलं होतं. एका विधवा भटणीच्या मुलाला दत्तक घेणं जोतिबांच्या भाऊबंदांनी कधीच मान्य केलं नाही.

पण सर्व भेदाभेदांच्या पार गेलेले जोतिबा-सावित्रीमाई त्याला पुरून उरले. यशवंतरावांच्या मृत्यूनंतर मात्र त्यांच्या पत्नी आणि मुलीचे हाल झाले. जोतिबा-सावित्रीआईची सून चंद्रभागा पुण्यातल्या रामेश्वराच्या देवळाजवळ निराधार बनून गेली. मुलीला एका बिजवराशी लग्न करावं लागलं. बाबा आढाव या शोकांतिकेचं कारण सांगतात, हे सारं घडलं कारण जातिबाहेरच्या मुलाला दत्तक घेतल्यामुळे सगळ्यांनी जोतिबांच्या वंशजांना बहिष्कृत केलं होतं.

आजही एका माजी मुख्यमंत्र्याने कधीतरी वीसेक वर्षांपूर्वी आंतरजातीय लग्न केलं होतं म्हणून तो अकरामाशी ठरतो. तो निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा बनतो. त्याला पराभव पत्करावा लागतो. त्या नेत्याची तरी काय बाजू घ्यायची? तोही मुख्यमंत्री असताना सरकारी बंगल्यात एका बुवाच्या पादुकांची पूजा करून तीर्थ पिण्याचा सोहळा करतो. हे सारं आजही घडतं, त्यामुळे एक समाज म्हणून, तथाकथित पुरोगामी महाराष्ट्राचे रहिवासी म्हणून आपण जोतिबा-सावित्रीआईंचं नाव घेण्याची लायकी कधीचीच गमावलीय. कारण आपण त्यांचा विचार सोडलाय.

सामाजिक कामाचाच उदो उदो

जोतिबा-सावित्रीआईंनी मुलींसाठी, अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या. अस्पृश्यांसाठी विहीर खुली केली. हॉस्टेल सुरू केली. ही सगळी कामं नि:संशय महत्त्वाची आहेतच. अख्ख्या देशात त्याच्या तोडीचं काम कुणी केलेलं नाही. पण जोतिबा आणि सावित्रीआई म्हणजे फक्त हे काम नाही. आज समाजसेवक किंवा एनजीओवाले एखाद्या क्षेत्रात जसं सोशलवर्क करतात, तसं हे नाहीय.

जोतिबांनी एक क्रांतिकारक विचार मांडलाय. जगण्याचं अफाट असं तत्त्वज्ञान दिलंय. गुलामगिरीवरचा तो आधुनिक भारतातला पहिला महत्त्वाचा घाव आहे. त्यातून अनेक गोष्टी घडल्यात आणि आजही घडतायत. त्या तत्त्वज्ञानातून जन्माला आलेला एक पैलू हा त्यांच्या सामाजिक कामाचा आहे. जोतिबांनी दिलेला हा विचार आपल्यापर्यंत पोचूच नये म्हणून फक्त त्यांच्या सामाजिक कामाचाच उदो उदो केला जातो. त्यांचा विचार सांगितलाच जात नाही.

प्रचलित समाजशास्त्राची चिरफाड

जोतिबांनी भारतीय समाजाच्या ऱ्हासाचं मूळ ब्राह्मणांच्या जातवर्चस्ववादी मानसिकतेला मानलं. धर्माच्या नावाखाली ब्राह्मणांनी इतरांच्या चालववेल्या शोषणाला मानलं. त्यांनी त्याविरुद्ध मोठा यल्गार केला. सत्यालाच सर्वस्व मानत त्यांनी सत्यापर्यंत पोचण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाला नाकारलं. वेदपुराणांपासून सबंध धर्माची चिकित्सा केली. नवं नीतिशास्त्र, सौंदर्यशास्त्र आणि त्यातून नवं दर्शन उभं केलं.

त्यात इतिहासाची नवी मांडणी होती. प्रचलित समाजशास्त्राची चिरफाड होती. धर्मात नव्या सुधारणांचा पुकारा होता. स्त्रिया, शूद्र आणि अतिशूद्र यांना एकच मानून त्यांच्यावरच्या अन्यायाचा पाढा त्यांनी वाचला. जोतिबांना खात्री होती की हे सारं शिकून उद्या मुली पेटून उठतील. पुरोहितांना प्रश्न विचारलीत. धर्माच्या नावावर उभ्या असलेल्या सगळ्या शोषणव्यवस्थेला उद्ध्वस्त करतील. कारण त्यांच्यासमोर सावित्रीआईंच्या रूपाने उदाहरण होतं.

हेही वाचा: फुलेंनी मुलींची पहिली शाळा भरवलेला भिडेवाडा इतका दुर्लक्षित का?

विद्या म्हणजे जोतिबां, सावित्रीआईंचा विद्रोह

जोतिबांच्या शिकवणीमुळे त्यांनीही भटशाहीची चिकित्सा केली. पेशवाईंची निंदा केली. वाईटाच्या मुळावर घाव घातले. पण आज सावित्रीच्या लेकी म्हणवणाऱ्या मोठमोठ्या डिग्री घेत आहेत आणि मार्गशीर्षातल्या गुरुवारांची व्रतं करतायत. साठ वर्षांपूर्वी लिहिलेल्या वैभवलक्ष्मी व्रताच्या पुस्तिका धार्मिक पोथ्या म्हणून पूजत आहेत. `विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, सारे अनर्थ एका अविद्येने केले.`

भारतीय समाजाच्या ऱ्हासाचं जोतिबांनी `शेतकऱ्यांचा असूड`मधे मांडलेलं समीकरण त्यांची ओळख बनलंय. यातली विद्या म्हणजे फक्त शाळाकॉलेजातलं शिक्षण असं आपण धरून चालतो. पण तसं नाहीय. इथे विद्या म्हणजे जोतिबां-सावित्रीआईंनी सांगितलेला विद्रोह आहे. स्वतंत्र विचार करण्याची कुवत आहे. ती विद्या आपण आजही मिळवलेली नाहीच. त्यामुळे आजही स्त्री, शूद्र, शूद्रातिशूद्र खचलेले आहेत. जोतिबा, सावित्रीआईंनी केलेलं काम आज जसंच्या तसं करण्याची गरज उरलेली नाही.

जगण्यात करुणा सोबत टोकाचा विद्रोहही

काळ बदलला आहे. पण त्यांचे विचार आज तेव्हापेक्षाही जास्त महत्त्वाचे ठरत आहेत. ते काळाला पुरून उरले आहेत. जोतिबा हे ब्राह्मणविरोधी नव्हते, या सर्टिफिकेटाची गरज ना कधी इतिहासाला होती ना असेल. जोतिबांचे अनेक मित्र, सहकारी, सहानुभूतीदार ब्राह्मण होते. त्यांच्या शाळेतल्या मुलीही ब्राह्मणच होत्या. त्यांनी ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेतलं. `ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणासी। धरावे पोटाशी बंधूपरी।।` यात ब्राह्मणांना भाऊही म्हटलं.

जोतिबा-सावित्रीआई ब्राह्मण सोडाच, कोणत्याही जातीचा द्वेष करूच शकत नव्हते, इतके ते व्यापक होते. टोकाची करुणा आणि त्या करुणेतून जन्माला आलेला टोकाचा विद्रोह यांचं अद्भूत मिश्रण त्यांच्या जीवनात आढळतं. तरीही त्यांनी ब्राह्मणी वर्चस्वाचा विरोध का केला, याचा विचार आपण जोवर समजून घेणार नाही, तोवर आपण जातीच्या पलीकडे जाण्याची शक्यता नाही.

सर्व भेदाभेदांच्या पलीकडे माणूस म्हणून जगण्याची शक्यता नाही. त्यामुळे सावित्रीआईच्या जन्माचा उत्सव करायचा असेल, तर तो याच विचारासाठी आहे. फक्त त्यांच्या कामाचं गुणगाण गाण्यासाठी नाही.

हेही वाचा: 

शेणगोळ्यांची फुलं करणाऱ्या सावित्रीबाईंची शौर्यगाथा

कवयित्री सावित्रीबाईंची ओळख करून देणाऱ्या कविता

ब्रिटनची युरोपियन संघातली 'ब्रेक्झिट' कुणाच्या फायद्याची?

डॉ. जयसिंगराव पवार: इतिहासाला वर्तमानाशी जोडणारे संशोधक

२०२० ला अलविदा करण्याच्या भानगडीत पडू नका ते जाणारं वर्ष नाहीय

(साभार - दिव्य मराठी)