अस्वस्थ वर्तमानात स्नेहभावाचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर

१४ मे २०२१

वाचन वेळ : ७ मिनिटं


महात्मा बसवेश्वर यांची आज जयंती. आयुष्यातल्या अनेक प्रसंगातून मानवी संवेदना कशी जपावी याचा कृतिशील संदेश त्यांनी जगाला दिला. आज कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर लोकांना मदत करणं, कोरोनाग्रस्त लोकांना प्रेमाचे दोन शब्द बोलून त्यांचं मनोबल वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचा उत्सव करण्यापेक्षा त्यांचे विचार समजून घेऊन अस्वस्थ वर्तमानातल्या प्रश्नांची उत्तरं शोधायला हवीत.

द्रष्टा युगपुरुष आणि दक्षिण भारतातल्या समग्र क्रांतीचा उद्गाता म्हणून बसवेश्वरांचं स्थान लोकांच्या हृदयात कायम आहे. मानवजातीचा दीपस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कर्मकांड, व्रतवैकल्य, नवससायास, मूर्तिपूजा, मंदिरमहात्म्य, मुहूर्त संकल्पना, फलज्योतिष, विटाळ, पंचसुतक, सर्व प्रकारची विषमता या विवेकाला न पटणाऱ्या गोष्टी त्यांनी नाकारल्या.

समता, बंधुता, सत्य, अहिंसा, भूतदया, विवेकनिष्ठा, उद्योगशीलता या चिरंतन मूल्याच्या आधारे बाराव्या शतकात बसवेश्वरांनी कल्याणक्रांती घडवून आणली. बसवेश्वरांनी आपली कृती, उक्ती आणि लेखणीतून ज्या मूल्यांची उपासना केली, ती मूल्य चिरंतन स्वरूपाची आहेत.

त्यांचं वचन साहित्य म्हणजे चिरंतन सत्याचा अखंड शोध आहे. म्हणून प्रत्येक काळाशी ते संवादी ठरतं. काळाच्या उदरातून निर्माण झालेल्या नवनवीन आव्हानांना सामोरं जाण्याचं बळ देतं. एकविसावं शतक प्रचंड उलथापालथीचं आणि गुंतागुंतीच्या आव्हानाचं गतिमान शतक ठरलं.

हेही वाचा: महात्मा बसवण्णाः ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारणारा महापुरूष

संकटाला कसं सामोरं जायचं?

जागतिकीकरणातली जीवघेणी स्पर्धा, मानवी  मूल्यांचा ऱ्हास, आर्थिक विषमतेची दरी, पर्यावरणाचं ढासळतं संतुलन, वाढत विसंवाद, वैफल्य, बेरोजगारी, महागाई, रोगराई अशा अनेक समस्यांनी या शतकातला माणूस घेरला आहे. एक वर्षांपासून कोरोना वायरसच्या साथीने संपूर्ण जग हादरून गेलंय. जगाला एका वेगळ्या वळणावर घेऊन जाणारं हे संकट सर्वार्थाने अभूतपर्व आहे.

आज प्रत्येक माणूस प्रचंड धास्तावलेला आहे. साथरोगाचा इतिहास पाहिला तर 'कुछ हैजेसे मरे तो कुछ हैबतसे मरे।' या म्हणी प्रमाणे आजारापेक्षा धास्तीने अधिक लोक दगावले. धास्तीतून संकट टळत नसून त्याची तीव्रता वाढत असते. यामुळे देशात उद्या मनोरुग्णांची संख्या वाढणार असल्याचा मानसोपचार तज्ज्ञांचा दावा आहे.

या दृष्टीने बसवेश्वरांचं पुढील वचन महत्वाचं ठरतं. 'भिऊन नाही चालत, भेदरून नाही चालत, वज्रपंजरी राहून नाही चालत, काकुळतीला येऊन नाही चुकत हो, धीर खचून हतबल झाले तरी, होणारे नाही टळत कुडलसंगम देवा' भीतीपोटी संकटाची धास्ती घेण्यापेक्षा धैर्य ठेवून विवेकाने संकट समजून घेऊन त्याला सामोरं जाणं फायद्याचं असल्याचं बसवेश्वर सांगतात.

देव आपल्या अंतरंगात

कोणतीही साथ वर्ण, जात, धर्म, पंथ, प्रांत, गरीब-श्रीमंत, ज्ञानी-अज्ञानी अशा गोष्टी पाहत नाही.  म्हणून असे कृत्रिम भेद बाजुला करून माणसाला माणूस जोडण्याचा संदेश बसवेश्वरांनी दिला. 'हा कोणाचा, हा कोणाचा, हा कोणाचा म्हणवू नका हो.  हा आमचा, हा आमचा, हा आमचा म्हणवा हो' या  त्यांच्या उक्ती प्रमाणे सर्व भेदभाव विसरून एकत्र येण्याची ही वेळ आहे.

कोरोना वायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारण्यात आला. यात जगातली सगळी मंदिरं आणि प्रार्थनास्थळंही बंदीस्त झाली. यामुळे घरातच उपासनेचा नवा मार्ग चोखाळणं भाग आहे, असा मार्ग बसवेश्वरांनी बाराव्या शतकातच दाखवला.

देव मंदिरातला नश्वर धातू, दगड आणि लाकडाच्या मूर्तीत नसून आपल्या अंतरंगात आहे. आपला देहच देवालय आहे. 'धनवान बांधिती शिवालय, देवा गरीब मी करू काय? मम पायच खांब, देह देऊळ, शिर पहा सुवर्णकळस, कूडलसंगम देवा ऐका हो, स्थावर पावे नाश, परी जंगम असे अविनाश' असं बसवेश्वर सांगतात.

हेही वाचा: बसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं

आपलं शरीर हीच संपत्ती

आता मंदिरात जाण्याचा अट्टाहास करण्यापेक्षा मिळालेल्या एकांतात आपल्या देहातला देव शोधणं आज अधिक हिताचं ठरणार आहे. आपल्या आत डोकावून आत्मबल उंचावणं आवश्यक आहे. आपल्या शरीरालाच देवालय समजून म्हणजे जगातल्या अनमोल संपत्ती समजून देह निरोगी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

आज आपल्याकडे किती भौतिक संपत्ती आहे हे महत्त्वाचं नाही, तर आपलं शरीर किती बळकट आहे हे महत्त्वाचं आहे. रोगप्रतिकार शक्ती आज अत्यंत महत्त्वाची आहे. संपत्ती मिळवण्यासाठी धावपळ करून शरीराकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा या शरीराला आज सर्वोच्च संपत्ती मानली पाहिजे. परमेश्वर उपासनेच्या नावाखाली उठसूट उपवास करत बसण्यापेक्षा चौरस आहार घेऊन योगासनं, प्राणायाम, व्यायाम करणं आवश्यक आहे.

बसवेश्वरांचा स्नेहभावाचा संदेश

संकट काळात सामाजिक स्नेहभाव आणि एकोपा हा खूप महत्त्वाचा असतो. कोरोना साथीत गर्दी टाळणं आणि सामाजिक अंतर राखणं आवश्यक आहे. असं असलं तरी साथीचा शिकार ठरलेल्या लोकांना भावनिक ओलावा देणं गरजेचं आहे. कोरोनाग्रस्त व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबावर अप्रत्यक्षपणे बहिष्कारच घातला जात आहे.

कोणताही गुन्हा नसताना पूर्ण कुटुंबाला अस्पृश्यतेच्या तीव्र वेदना सहन कराव्या लागत आहे. सामाजिक अंतर राखून त्यांना मदत केल्यास आणि प्रेमाचे चार शब्द बोलल्यास आपल्याला कोरोना संसर्ग होत नाही. आजारी व्यक्तींना मानसिकदृष्ट्या आधार देणं आज नितांत गरजेचं आहे. म्हणून कोरोना साथीच्या नावाखाली आत्मकेंद्रित न होता समाजाभिमुख होणं आवश्यक आहे.

सामाजिक स्नेहभावाचा संदेश देण्याच्या भूमिकेतून महात्मा बसवेश्वर म्हणतात, 'काय हो आलात, सर्व ठीक आहे ना म्हटल्यास, तुमचे ऐश्वर्य उडून जाईल का? बसून घ्या म्हटल्यास पडेल का खळगा जमिनीस? तात्काळ बोलल्यास डोक्याची कवटी फुटून जाईल का? नाही दिलेत तरी देण्याची बुद्धी नसेल, तर  नाक कापल्याशिवाय सोडेल का, कुडलसंगमदेव ?'

संकटात सापडलेल्या माणसाला मदत करणं, त्याला भावनिक ओलावा देणं, कोणत्याही परमेश्वर पूजेपेक्षा श्रेष्ठ आहे, हा संदेश महात्मा बसवेश्वरांच्या वचनातून मिळतो. सामाजिक स्नेहभाव न जपता आत्मकेंद्रित जीवन जगणारा स्वार्थी माणूस परमेश्वराच्या दृष्टीने नाही त्याज्यच असतो. महात्मा बसवेश्वरांनी वरच्या वचनात सांगितल्याप्रमाणे समाजाप्रती संवेदनशीलता जोपासली, सामाजिक एकोपा जपला तर अशा कितीही साथ आल्या तरी माणूस समर्थपणे त्याचा मुकाबला करेल.

हेही वाचा: आपल्याला कोणता आणि कसा हिंदू धर्म हवाय?

संपत्तीपेक्षा माणूस जोडायला हवा

आज देशातल्या ६१ टक्के संपत्ती केवळ एक टक्के लोकांकडे साचलेली आहे. ही आर्थिक दरी उत्तरोत्तर वाढतच आहे. सध्याच्या साथीतून उद्भवलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी श्रीमंताकडे साचलेला जास्तीचा पैसा वापरात येणं गरजेचं आहे असं अर्थतज्ज्ञ सांगत आहेत. अतिरिक्त संपती ही समाजाची चोरी आणि पाप असल्याचं बसवेश्वर सांगतात.

'सोन्याचा एक कण, वस्त्राचा एक धागा जरी आजच्यासाठी, उद्यासाठी पाहिजे म्हणालो तर तुमची शपथ, तुमच्या प्रमथांची शपथ' ही बसवेश्वरांची भूमिका या देशातले आजचे कुबेर काही अंशी जरी स्वीकारले तरी देश आर्थिक संकटातून बाहेर पडेल. दुष्काळात उपाशी पोटी झोपणाऱ्या चोरांच्या लेकरासाठी बसवेश्वर आपल्या पत्नीच्या अंगावरचे दागिने काढून देतात.

संपत्तीपेक्षा माणूस जोडणं आणि जपण्यावर बसवेश्वरांचा भर होता. सामाजिक स्नेहभाव जोपासण्याचा संदेश त्यांनी आपल्या अनेक वचनातून दिला. आज माणसातला संवाद काही अंशी तुटत चालला आहे. अशा संकटातून तरी सामाजिक स्नेहभाव जोपासण्याचा धडा घेणं गरजेचं ठरतं.

बसवेश्वरांचा सामाजिक न्यायाचा धडा

आज कोरोना साथ काळात जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करून चढ्या दराने विक्री करणारे काही महाभाग दिसतात. यातले काही धार्मिकतेचा आव आणून वावरतात. अशा लोभी आणि दांभिक प्रवृत्तीचा बसवेश्वरांनी धिक्कार केलाय. 'छप्पन वाचले काय आणि छप्पन ऐकले काय? आशा सुटत नाही, रोष जात नाही, मज्जन घालून फल काय वागण्या-बोलण्यात मेळ नसलेल्या ढोंग्यांना पाहून हसतो आमचा कुडलसंगमदेव' अनेक नफेखोर लोक लॉकडाऊनमधे साठेबाजी करून आज देशासमोरच्या समस्येत भर घालत आहेत.

अशा संकटात आपल्या सभोवतीच्या लोकांना मदत करणं ही राष्ट्रसेवा आणि परमेश्वर पूजा ठरणार आहे.  'भाताचे एक शीत पाहता कावळा, हाक न मारी का आपल्या परिवारास? घासभर अन्न दिसता कोंबडी, न बोलवी का आपल्या कुलबांधवास? ' या वचनातून कावळा कोंबड्या सारख्या पक्षापासून तरी सामाजिक न्यायाचा धडा माणसाने घेतला पाहिजे, अशी अपेक्षा बसवेश्वर करतात. अशा संकटातही आपलाच स्वार्थ साधणारे लोक बसवेश्वरांच्या दृष्टीने कावळा कोंबड्यापेक्षा हीन ठरतात.

हेही वाचा: कलाकारांनी भूमिका घेत जनतेसाठी आपला मोठा आवाज वापरणं योग्य?

बसवेश्वर माणसाकडे कसं पाहतात?

कोरोना साथीच्या दुसऱ्या तडाख्यात आपल्यातली अनेक माणसं हे जग सोडून जाताना दिसत आहेत. मानवी जीवनाची नश्वरता, क्षणभंगुरता काय असते? ते आज पहायला मिळत आहे. तरीही त्यातून कोणता बोध न घेता अशाही परिस्थितीत माणूस माणसाला लुबाडत आहे.

काही डॉक्टर प्रामाणिकपणे रुग्ण सेवा करत आहेत, ही जमेची बाजू असली तरी काही ठिकाणी मात्र रुग्णसेवेच्या नावाखाली होणाऱ्या लुबाडणूकीच्या घटना ऐकल्यानंतर माणुसकीवरचा विश्वासच उडत आहे. रेमडिसीवर सारख्या इंजेक्शनचा काळाबाजार माणसाला हादरवून सोडणारा आहे.

माणसाच्या मृत्यूनंतर प्रेत ताब्यात घ्यायलाही लाच द्यायला लागत आहे. मरणाच्या दारातही माणसाला लुटण्याचा हा किळसवाणा प्रकार पाहिल्यानंतर महात्मा बसवेश्वरांच्या वचनाची गरज आज लक्षात येते.

'सनाला आणलेली नवसफेडीची मेंढी, तोरणाची पाने चरत आहे . मरणार असल्याची जाणीव तिला नाही,  पोटाची खळगी भरून घेत आहे . जशी जन्मली, तशी मेली  तिला मारणारे अमर राहतील, कुडलसंगमदेवा ?' अशा साथरोगात आपल्या डोळ्यादेखत मरणाऱ्या माणसांना निर्दयीपणे लुटणारे आपल्यालाही मरण आहे हे मात्र विसरत आहेत. पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्याचं सामर्थ्य असलेला सर्वश्रेष्ट जीव म्हणून बसवेश्वरांनी माणसाकडे पाहिलं.

हेच बसवेश्वरांना खरं अभिवादन

कोरोना वायरसमुळे आलेलं संकट म्हणजे आपलं माणूसपण सिद्ध करण्याची कसोटीच आहे. अशा संकट काळात ऑक्सिजन सिलेंडर, रेमडेसिविर इंजेक्शन, औषधं आणि जीवनावश्यक वस्तुंची साठेबाजी करून त्याचा काळाबाजार करणं म्हणजे आपलं माणूसपण नाकारणं.

महात्मा बसवेश्वरांनी आपल्या आयुष्यातल्या अनेक प्रसंगातून संवेदना कशी जपावी? याचा कृतिशील संदेश जगाला दिला. आज कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लोकांना मदत करणं, कोरोनाग्रस्त लोकांना प्रेमाचे दोन शब्द बोलून त्यांचं मनोबल वाढवणं हीच खरी महात्मा बसवेश्वरांना आदरांजली ठरेल.

अशावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचा रस्त्यावर उत्सव करण्यापेक्षा त्यांच्या विचाराची उपासना करून त्यात अस्वस्थ वर्तमानातल्या प्रश्नांची उत्तरं शोधणं गरजेचं आहे. सध्याच्या कोरोना साथीत महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची ऊर्जा घेऊन आलेल्या संकटावर मात करणं हेच महात्मा बसवेश्वरांना जयंतीनिमित्त सार्थ अभिवादन ठरेल.

हेही वाचा: 

सुवार्ता दिब्रिटोंची अन् पत्थरांचा मारा सनातन

गोमंतकीय साहित्याचा ओला दुष्काळ आता दूर करायला हवा!

वसईचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, कारण

आजच्या किती लेखिका आजूबाजूच्या घटनांवर भूमिका घेतात? : अरुणा सबाने