खरंच, बाबासाहेबांना महाड सत्याग्रहापर्यंत फुले परिचित नव्हते?

२० मार्च २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा जोतीराव फुले यांना आपल्या गुरुस्थानी मानलं. पण बाबासाहेबांना १९२७ च्या चवदार तळे सत्याग्रहाआधी फुल्यांची ओळखच नव्हती, असं नरहर कुरुंदर यांचं म्हणणं आहे. पण यात तथ्य नाही. कारण खुद्द बाबासाहेबांनीच याविषयी बहिष्कृत भारतमधे सविस्तर लिहून ठेवलंय. आज महाड सत्याग्रह दिनानिमित्त या सत्याग्रहाचं महत्त्व आणि फुले-आंबेडकर संबंधावर टाकलेला हा प्रकाश.

जागतिक मानवाधिकार इतिहासात फ्रेंच राज्यक्रांतीला फार महत्त्व आहे. तितकंच मोल भारतीय मानवमुक्ती आंदोलनात महाड परिषदेला आहे. महाड इथं ९३ वर्षांपूर्वी म्हणजे १९२७ च्या १९ आणि २० मार्चला भरलेल्या कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेच्या अधिवेशनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अध्यक्षपदावरून दिलेला हा विचार आजही कालबाह्य झालेला नाही.

परिषदेला ३००० पेक्षा अधिक उपस्थिती होती. परिषदेचे स्वागताध्यक्ष संभाजी तुकाराम उर्फ दादासाहेब गायकवाड होते. हे म्हणजे नाशिकचे दादासाहेब गायकवाड नाहीत. आपल्या घरातील पाण्याची विहीर अस्पृश्यांसाठी खुली केली त्या महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्मशताब्दी १८२७-१९२७ या वर्षाच्या निमित्ताने महाडला ही परिषद भरवण्यात आली होती. परिषदेत बाबासाहेबांनी केलेलं भाषण आणि मांडलेले ठराव आजही प्रेरणादायी आणि कालसुसंगत आहेत.

हेही वाचा : बाबासाहेबांनी पहिला मोर्चा दलितांसाठी नाही तर शेतकर्‍यांसाठी काढला

सत्याग्रहासाठी महाडच का निवडलं?

खरंतर महाडऐवजी ही परिषद पंढरपूरला घ्यावी असा प्रस्ताव बाबासाहेबांसमोर होता. परंतु ही परिषद महाडला घेण्यामागे काही खास कारणं होती. त्यांचा उल्लेख बाबासाहेबांनी आपल्या भाषणात प्रारंभीच केलाय.

एकेकाळी कोकण ही अस्पृश्यांची जागृत भूमी होती. महात्मा फुल्यांचे जिवलग मित्र गोपाळबाबा वलंगकर यांनी स्थापन केलेली ‘अनार्य दोष परिहारक मंडळी’ कोकणात स्थापन झालेली. या संस्थेच्या बहुमोल योगदानाचा बाबासाहेबांनी आवर्जून उल्लेख केला होता.

बाबासाहेबांचे बालपणाचे काही दिवस दापोलीला गेले. त्यांचं मूळगाव आंबावडे किंवा आंबाडवे हे महाडपासून जवळच होतं. त्यामुळे आपला परिसर हाही आपुलकीचा भाग होताच. सत्यशोधक आमदार सी. के. बोले यांच्या विधीमंडळातल्या ठरावानुसार महाडचं चवदार तळं सर्वांना खुलं करण्याचा निर्णय महाडचे नगराध्यक्ष सुरबानाना टिपनीस यांनी घेतला होता.

सुरबानाना महाडचे असल्याने या तळ्यावरच सत्याग्रह करावा, असा त्यांचा आणि त्यांचे मेहुणे चित्रे यांचा आग्रह होता. बाबासाहेब नुकतेच आमदार झाले होते. कायद्याची अंमलबजावणी करावी, मानवाधिकार स्थापन करावा आणि आपले गुरू जोतीराव फुले यांना जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन करावं असे अनेक उद्देश महाडची निवड करण्यमागे होते.

१९२७ चे मुद्दे आजही उपयोगाचे

महाड सत्याग्रहापर्यंत बाबासाहेबांना महात्मा फुले परिचित नव्हते, असं नरहर कुरूंदकर म्हणतात. ते कुरूंदकरांचं अज्ञान आहे. कुरूंदकरांनी ३ एप्रिल १९२७ चा बहिष्कृत भारत वाचला असता तर त्यांनी असलं निराधार आणि असत्य विधान केलं नसतं. या अंकात बाबासाहेबांनी महाड परिषदेचा सविस्तर वृत्तांत छापलेला आहे.

त्यात पान नंबर ६ वरच बाबासाहेब जोतीरावांचा गौरवपुर्ण उल्लेख करतात. वलंगकरांनी ‘अनार्य दोष परिहारक मंडळी’ या संस्थेमार्फत अस्पृश्यांच्या फक्त अडचणी दूर केल्या नाहीत तर लेखनाद्वारे पुष्कळ जागृती निर्माण केली. सत्यशोधक समाजाचे अध्वर्यू जोतीराव फुले यांचे अनेक खरे साथीदार आणि उत्साही शिष्य या संस्थेचे संचालक होते. गोपाळबाबांनी केलेली जागृती अनुपम होती, असं बाबासाहेब सांगतात. दीनबंधूंच्या फायली त्याच्या साक्षीदार असल्याची नोंद बाबासाहेब करतात.

अस्पृश्यता आणि जातीनिर्मुलन करण्यासाठी आंतरजातीय विवाह केले पाहिजेत, सार्वजनिक पाणवठे सर्वांना खुले असावेत, मेलेली जनावरं ओढण्याचं आणि मृतमांस खाणं बंद केलं पाहिजे, शिक्षण आणि दारूबंदी सक्तीची करायला हवी, आचार, विचार आणि उच्चार यांची शुद्धी व्हायला हवी, अनिष्ठ विचारांचा मनावर बसलेला गंज साफ करायला हवा, सरकारी नोकरीत शिरलं पाहिजे, शेतीचा व्यवसाय करायला हवा, सहकारी बॅंका स्थापन करायला हव्यात, सहकारी पतसंस्था स्थापन करायला हव्यात, सरकारी पडीक जमिनी ताब्यात घेऊन त्या कसल्या पाहिजेत, लष्कर, पोलीस, शाळाखाते अशा महत्त्वाच्या जागांवर अस्पृश्यांची नेमणुक व्हायला हवी, महारकी सोडली पाहिजे, मुलगा २० वर्षांचा आणि मुलगी १५ वर्षांची झाल्याशिवाय लग्नं करू नयेत, शाळा, वसतीगृहे, शिष्यवृत्त्या सुरू कराव्यात आदी मुद्दे आजही मार्गदर्शक ठरावेत असेच आहेत.

हे कोरोना स्पेशलही वाचा

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया

कोरोनाशी पंगा घेणारी बाईः हॉस्पिटलमधे न जाता कोरोना केला बरा

भारत कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजमधे गेलाय, म्हणजे धोका किती वाढलाय?

विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, मुंबईची पत्रकार सांगतेय स्वानुभव

जय शेंडुरे: कोरोना आणि ट्रम्प प्रशासनाला पुरुन उरणारा रांगडा कोल्हापूरकर

लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं जगभर होतंय कौतूक

ओंजळभर पाण्यानं क्रांती केली

लिहिताना आणि बोलताना बाबासाहेब भीडभुर्वत बाळगीत नसत. एक मुलगा बी. ए. झाल्यानं समाजास आधार होईल तसा एक हजार मुले चौथी पास झाल्याने होणार नाही. सरकारी नोकरीचं महत्त्व फक्त ब्राह्मण, मराठे आणि मुसलमान यांनाच समजलंय. सरकारी नोकर म्हणजे सरकारचं हृदय. तेव्हा अस्पृश्यांनी सरकारी नोकऱ्या मिळवाव्यात. आपल्यापेक्षा आपल्या मुलाबाळांची परिस्थिती काकणभर सुधारलेली असावी, असं ज्या आईबापास वाटत नाही ते आणि जनावरे यात फरक नाही. सद्गृहस्थहो, स्वत:साठी नाही तर किमान आपल्या संततीच्या उज्वल भवितव्यासाठी तरी माझ्या म्हणण्याकडे लक्ष द्या, असं बाबासाहेब कळकळीने सांगतात.

बाबासाहेब द्रष्टे होते. ज्ञानार्जन, ज्ञाननिर्मिती, स्त्रीपुरूष समता, आंतरजातीय विवाहातून जातीनिर्मुलन, समाजजागृतीसाठी, मानवाधिकारासाठी आंदोलनं ही पायाभूत भूमिका या परिषदेत त्यांनी मांडली, ती रूजवली. परिषदेच्या समारोपात चित्रे यांनी मांडलेल्या पूर्वनियोजित ठरावानुसार तळ्यावर जाऊन पाणी पिण्याचा क्रांतिकारक कृतीकार्यक्रम राबवण्यात आला. या ओंजळभर पाण्याने जागृतीचा अग्नी पेटवला. तो आज विझूविझू झालाय. तो पुन्हा पेटवण्याची गरज आहे.

हेही वाचा : ‘युगानयूगे तूच’: समग्र बाबासाहेबांकडे घेऊन जाणारी कविता

बाबासाहेबांची धारदार लेखणी

बाबासाहेबांची वाणी आणि लेखणी किती धारदार होती. त्याचा आजच्या मरगळलेल्या मनांना परिचय व्हावा यासाठी पान नंबर ७ वरचा पुढील उतारा नक्की वाचा -

‘आज अस्पृश्य वर्गात समाविष्ट होणार्याब जातींपैंकी ***जात म्हणजे एक भिकार लोकांचा तांडा आहे, असं म्हणावयास काही हरकत नाही. दररोज हक्काने दारोदार शिळे तुकडे टोपल्याच्या टोपल्या गोळा करून चरितार्थ चालवण्याची या जातीला सवय पडून गेलेली आहे. या प्रघातामुळे या जातीला मुळी गावात इज्जत नाही. मान, मरातब नाही. या रिवाजामुळे या जातीचा स्वाभिमान नष्ट झलाय. काहीही म्हणा! जोड्यात वागवा! पण मला तुकडा वाढा अशी या जातीची वृत्ती बनून गेलेली आहे. या रिवाजामुळे या जातीला स्वतंत्रतेने आपल्या उन्नतीचा मार्ग आक्रमणे शक्य नाही. अशारितीने शिळ्या आणि उष्ट्या तुकड्यांसाठी आपली माणुसकी विकणे ही गोष्ट मोठ्या लाजेची आणि शरमेची आहे.’

‘पेशवाईत अस्पृश्यांना चालताना स्पृश्यांवर सावली पडेल म्हणून वळसा घेऊन जावे लागत असे. थुंकीने रस्ता विटाळेल म्हणून गळ्यात गाडगे अडकवून हिंडावे लागत असे व ओळख पटावी म्हणून हाताला काळा दोरा बांधावा लागत असे.’  हा प्रसंग पान नंबर ५ वर नोंदवण्यात आलाय. कालच्या ‘एक महानायक’ या हिंदी मालिकेमधेही हा प्रसंग दाखवण्यात आलाय.

हेही वाचा : 

दलितांना पुन्हा पॉलिटिकल करण्यातूनच होईल क्रांती

शेणगोळ्यांची फुलं करणाऱ्या सावित्रीबाईंची शौर्यगाथा

ग्लोबल लोकल मेळ घालायचा, तर महात्मा फुले हवेतच

बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती तीनवेळा का जाळली?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार

रोहित, आज आंबेडकरांचाही खूप राग येतोय रे! एका कार्यकर्त्याचं पत्र

महात्मा फुलेः जितके मोठे समाजसुधारक, तितकेच यशस्वी उद्योजकही

(लेखक हे सामाजिक, राजकीय प्रश्नांचे विश्लेषक आहेत. हरी नरके यांच्या फेसबुक पोस्टचा हा संपादित अंश आहे.)