प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथातल्या अनुभव मंटपचा इतिहास माहीत आहे?

२९ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


राजधानी नवी दिल्लीत २६ जानेवारी २०२० ला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महात्मा बसवण्णा प्रणित अनुभव मंटपची प्रतिकृती सादर करण्यात आली. या चित्ररथाला उपस्थितांची चांगली दाद मिळाली. इंग्लडच्या मॅग्नाकार्टा सनदेपेक्षाही खूप आधी आपल्या भूमीत बसवण्णांनी अनुभव मंटपच्या माध्यमातून लोकसंसद उभी केली होती़. अनुभव मंटपाची सर्वंकष ओळख करून देणारा हा विशेष लेख.

नालंदा आणि तक्षशिला अशी समृद्ध आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या युनिवर्सिटी भारतात होऊन गेल्या. इसवी सन पूर्व काळात या युनिवर्सिटीचा जगभरात बोलबाला होता. या युनिवर्सिटी प्रामुख्याने उत्तर भारतात होत्या. पण मध्ययुगात म्हणजेच बाराव्या शतकात बसवण्णा स्थापित अनुभव मंटप ही दक्षिण भारतातली पहिली युनिवर्सिटी होती.

दक्षिण भारतातलं मुक्त ज्ञानपीठ

शरण साहित्याचे अभ्यासक राजू जुबरे सांगतात, 'अनुभव मंटप ही दक्षिण भारतातली पहिले युनिवर्सिटी होती. ते एक मुक्त ज्ञानपीठ होतं. या युनिवर्सिटीत ज्ञान घेण्यासाठी देशाच्या कोनाकोपऱ्यातून लोक एकत्र आले. आंध्र, तेलंगणातून किन्नरी ब्रह्मय्या, गुजरातहून आदय्या, ओरिसातून शरण दसरय्या, तामिळनाडूहून मातंग चेन्नय्या, काश्मीरहून महादव भूपाल, मध्य प्रदेशातून सुज्ञानीदेव, अफगाणिस्तानहून मरुळशंकरदेव, रामेश्वर, उरिलिंगपेद्दी, सोलापूरहून सिध्दरामेश्वर, मलेनाडु मध्य कर्नाटकातून अक्कमहादेवी, अल्लमप्रभु आदी शरण अनुभव मंटपात सहभागी झाले.’

अनुभव मंटप विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्या काळातले महाज्ञानी, अनुभवी, योगीयांचा योगी अशा अल्लमप्रभुंची निवड करण्यात आली. यातही एक वैशिष्ट्य म्हणजे अनुभव मंटपाच्या स्थापनेनंतर तब्बल १२ वर्षांनी अल्लम प्रभुंची अध्यक्षपदी निवड झाली. म्हणजे महात्मा बसवण्णा आणि शरणगण या अनुभव मंटपाच्या अध्यक्षपदासाठी योग्य व्यक्तीच्या शोधात होते. तेही १२ वर्ष. अल्लमप्रभु जन्माने शूद्र असले तरी त्यांचा ज्ञानयोगी म्हणून गौरव करत या शून्यपीठाच्या अध्यक्षपदाची धुरा महात्मा बसवण्णांनी त्यांच्याकडे सोपवली होती, ही बाब महत्वाची आहे.

हेही वाचाः कलाकारांनी भूमिका घेत जनतेसाठी आपला मोठा आवाज वापरणं योग्य?

अनुभव मंटपचे तीन नियम

एकूणच लिंगायत तत्वज्ञानाची सैद्धांतिक मांडणी करणारे, षटस्थल सिद्धांताचे प्रवर्तक चन्नबसवण्णा हे अनुभव मटंपाचे कार्याध्यक्ष होते. या अनुभव मंटपाचे ७७० प्रतिनिधी होते. त्यात ७० महिला होत्या. हे ७७० प्रतिनिधी समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांतून आलेले होते. अनुभव मंटपाची एक स्वतंत्र नियमावली होती. त्यानुसार,

१) समतेचे प्रतीक असलेले इष्टलिंग सर्वांनी गळ्यात धारण करावं.

२) आपल्या उदरनिर्वाहासाठी सत्य-शुद्ध कायक केलेच पाहिजे.

३) कायकातून मिळवलेली संपत्ती आपल्या किमान गरजेपुरती ठेवून, शिल्लक संपत्तीचा समाजातल्या दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी दासाह करावा.

अनुभव मंटप सदस्यांनी हे तीन नियम पाळणं आवश्यक होतं. या अनुभव मंटपातल्या सकाळच्या सभेत तात्त्विक विषयांची चर्चा होत असे. संध्याकाळच्या सभेत सामान्य विषयांची चर्चा होत असे. त्यात हे सर्व श्रमजीवी शरण सहभागी होत. प्रत्येक जण आपले अनुभव सांगत. या सभेच्या नियमाप्रमाणे इथे वेदप्रामाण्य अथवा ग्रंथप्रामाण्य मानले जात नसे. फक्त  अनुभावप्रामाण्य मान्य केलं जाई.

सामूहिक चर्चेतून वचन निर्मिती

सामूहिक चर्चेअंती एकमताने संमत झालेले विचार 'वचन' रूपाने लिहिले जात. ही वचनं ताडपत्रावर लिहिली जात. अशा वचनांचं स्वतंत्र संग्रहालय निर्माण करण्यात आलं होतं. त्यास 'वचन भांडार' असं म्हटलं जायचं. हे एका अर्थाने ग्रंथालय होते. या वचन भांडाराचे प्रमुख 'शांतरस' होते. शांतरस म्हणजे आजच्या काळातले ग्रंथपाल होय. ते विषयानुरूप वचनांचे गढे व्यवस्थित भांडारात लावून ठेवत असत.

प्रसारासाठी जाणाऱ्या जंगमांना वचन ताडपत्रांच्या अनेक प्रती तयार करवून देत असत. अशी एक शैक्षणिक शिस्त असलेली ही संस्था म्हणजे आजच्या भाषेतली एक युनिवर्सिटीच आहे. अनुभव मंटपातले शरण आपले कायक करत ज्ञानदासोहाचे कार्य करत.

राजू जुबरे यांच्या मते, भारताच्या धार्मिक इतिहासात अद्वितीय गणला गेलेला अनुभव मंटप इतर मतपंथांहून अगदीच वेगळा होता. त्यामधे सामुहिक भोजन, अंतर्विवाह, आध्यात्मिक सत्संग वगैरे व्यवहार जात, वर्ण, पंथ, लिग, वय, वर्ग, स्थान, उद्योग इत्यादी प्रकारच्या कोणत्याही भेदभावाला इथे थारा नव्हता. प्रारंभी अनुभव मंटपाची सभा महात्मा बसवण्णांच्या वाड्यातल्या एका खुल्या दालनात चालत. त्या दालनाला सुरवातीच्या काळात महामने किंवा महाभवन) म्हणत. नंतर त्यालाच 'अनुभव मंटप’ असं नाव पडलं.

हेही वाचाः हिंदी सिनेमांचा नवा हिंदूस्तान, राजकीय सत्ता आणि फेक राष्ट्रवादाचा तडका

दुसऱ्यांना श्रेष्ठ समजण्याची शिकवण

या धार्मिक अनुभव मंदिरात प्रत्येक सभासद इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजत. त्या सभासदांच्या निवासासाठी अनुभव मंटपापासून काही मैल अंतराच्या परिसरात ठिकठिकाणी गुहा खोदलेल्या होत्या. अनुभव मंटपात प्रकट झालेला अनुभव कोणा राजाचा, पंडिताचा नव्हता, तर सर्वसामान्य लोकांचा होता, जनसमूहाचा होता. हा सुखाचा, मिजासखोरीचा, ऐश आरामीचा अनुभव नव्हता. जीवनातल्या दु:खाचा परिचय होता.

पांडित्याची जुगलबंदी नाही तर जीवनाच्या आंतरिक दर्शनाची समज होती. दांभिकतेचा देखावा नाही, तर आत्मपरीक्षण करण्यासाठी मुक्त संधी होती. जीवनाकडे एकूणच निकोपपणे पाहण्याचा दृष्टीकोन अनुभव मंटपाची धारणा होती. दयेला धर्म करून, क्रियेला कर्म करून मानवतेच्या शिखरावर चढून जाण्यासाठी निर्माण केलेली वैशिष्ट्यपूर्ण देणगी म्हणजे अनुभव मंटप होय, असं राजू जुबरे यांना वाटतं.

भक्तीमधे बसवण्णा, ज्ञानामधे चन्नबसवण्णा, योगामधे सिद्धराम, वैराग्यामधे अक्कमहादेवी, जंगमत्वामधे अल्लम प्रभुदेव, कष्ट करणाऱ्यांमधे अंबिगर चौडय्या, नुलिय चंदय्या, मडिवाळ माचीदेव, घट्टिवाळय्या, उरिलिंग पेद्दी, काळव्वे, गोग्गव्वे, वेश्या संकव्वा इत्यादी वचनकारांनी अनुभव मंटपाच्या चर्चेमधे आपलं योगदान दिलंय. त्यामुळे या वचनकारांचं व्यक्तिमत्त्व एका अर्थाने सामाजिक होतं. त्यातून जनसमूहाद्वारे व्यक्तिमत्त्वाची ओळख होते.

शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचा प्रकल्प

व्यक्ती जनसमूहाद्वारे आपले व्यक्तित्व दाखवताना ते समाजातल्या समानतेचे प्रतिक बनले. असे अनेक अर्थपूर्ण प्रसंग, वैशिष्ट्यपूर्ण साधना वचनकारांच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी जाणवतात. विचारांच्या परिषदेशिवाय कोणतंही आंदोलन यशस्वी होत नाही. जना प्राप्त करून देण्यासाठी शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करणारं लिंगायत आंदोलन हे सामाजिक, धार्मिक आंदोलन होतं. म्हणून बसवण्णांनी अनुभव मंटपाची स्थापना केली. त्याद्वारे कायकप्रधान शिक्षण पद्धती अमलात आणली. त्याचा प्रसार करण्यासाठी स्वतंत्रपणे काही शरणांची नेमणूक केली. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अरिविन मारितंदे होत. ते ज्ञानदासोहाचे कायक करत.

बसवण्णांनी आपल्या राज्यात अनेक ठिकाणी कायक शिक्षण केंद्रांची स्थापन केली होती. बसवप्रणित कायक शिक्षण पद्धतीत महिलांना शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य होतं. महिला शिक्षणाची जबाबदारी बसवण्णांनी आपली बहीण अक्क नागम्मा, पत्नी गंगांबिका आणि नीलम्मा यांच्यावर सोपवली. जंगम ही ज्ञानप्रसारक यंत्रणा उभी केली. शरण हे खऱ्या अर्थाने लोकशिक्षक झाले. शिक्षणाचं माध्यम मातृभाषा होती.

शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण केल्यामुळे समाजातल्या सर्व घटकांना ज्ञान मिळालं. त्यांना अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य मिळालं. विचारांची देवाणघेवाण करता आली. वैशिष्ट्यपूर्ण असं वचन साहित्य उदयास आलं. एकाच घालावर १७९ शरणांबरोबर म्हणजेच पुरुषांबरोबर जवळपास ३५ शरणी अर्थात महिलांनी वचनं लिहिली.

हेही वाचाः महात्मा बसवण्णाः ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारणारा महापुरूष

प्लेटोच्या संभाषणांची आठवण

अनुभव मंटपामधे लिंगायत धर्माच्या तात्त्विक आणि व्यावहारिक अशा दोन्ही बाजूंवर चर्चा व्हायची. तिथल्या संभाषणाचे मुद्दे आणि स्वरूप यांची माहिती ‘शून्य संपादने' या १६व्या शतकात संपादन केलेल्या वचनसंग्रह ग्रंथामधे सापडते. ती संभाषणं आपल्याला जगप्रसिद्ध ग्रीक फिलॉसॉफर प्लेटोच्या संभाषणांची आठवण करून देतात.

आध्यात्मिक अनुभवात्मक जीवनातल्या विविध स्थित्यंतरांची सविस्तर माहिती व्हावी म्हणून महात्मा बसवण्णांनी षटस्थल सिद्धांत म्हणजेच सहा पायऱ्यांचं आसन निर्माण करून त्याला 'शून्य सिंहासन' असं नाव दिलं. अल्लमप्रभू हे त्या सिंहासनावर विराजमान होणारे पहिले अध्यक्ष होते. त्या सहा पायऱ्यांवर आधारित लिंगायत तत्त्वज्ञानाला 'षटस्थल तत्त्वज्ञान' म्हणतात. त्या सहा पायऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारे अनेक शरण अनुभव मंटपात होते. ते ज्या पायरीवर पोचलेले, त्या पायरीच्या किंवा स्थलाच्या नावाने ते ओळखले जात.

ज्या त्या स्थलावरून त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीची सर्वांना कल्पना येई. बसवेश्वरांची भक्ती, चेन्नबसवेश्वरांचे ज्ञान, मडिवाळ माचिदेवांचे शुद्ध हृदय, अजगण्णांचे ऐक्य वगैरे गोष्टी प्रसिद्ध आहेत. अल्लमप्रभूंना श्रेष्ठ, मानाचे स्थान असे. कारण त्यांनी शेवटचं स्थल 'ऐक्यस्थल' किंवा 'लिंगांगसामरस्य' प्राप्त केलं होतं. म्हणूनच प्रभुदेवांना 'शून्य सिंहासन' बहाल करण्यात आलं होतं.

बसवण्णांच्या विचारांना नवी चालना मिळेल

या चित्ररथाचे कला दिग्दर्शक शशिधर अडपा यांच्या मते, ‘महात्मा बसवण्णा आणि कल्याण पर्वातील शरणगण यांचा आपल्या देशातल्या पुरोगामी चळवळीला मोठा वारसा लाभलाय. इंग्लडच्या मॅग्नाकार्टा सनदेपेक्षाही खूप आधी आपल्या भूमीत महात्मा बसवण्णा यांनी अनुभव मंटपाच्या माध्यमातून लोकसंसद उभी केली होती़. त्यामधे कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान अधिकार होते. हा प्रकल्प आपल्या हातून घडावा यापेक्षा मोठं भाग्य नाही़. प्रजासत्ताक दिन संचलन हे मोठे व्यासपीठ आहे, हा माझा नसून त्या विभूतींच्या विचारांचा गौरव आहे.’

बसव समितीचे अध्यक्ष अरविंद अण्णा जत्ती सांगतात, ‘अनुभव मंटप ही जगातली पहिली धर्मसंसद म्हणूनही ओळखली जाते. प्रजासत्ताक दिनाच्या संचालनामधे त्याचा समावेश झाल्याने देशातल्या पुरोगामी विचारांचा गौरव झालाय. दोन वर्षापूर्वी महात्मा बसवण्णा यांच्या वचनांचा सर्व भारतीय भाषांमधे झालेल्या अनुवाद ग्रंथांचे प्रकाशन झालं होतं. त्यानंतर आता या अनुभव मंटपामुळे बसवण्णा यांचे काळाच्या कितीतरी पुढे असलेल्या विचारांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नव्याने चालना मिळणार आहे.’

हेही वाचाः 

बसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं

आपल्या आतला विवेकाचा आवाज म्हणजे गुरू

तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?

गोरोबांच्या भूमीत साहित्याची नवी वाट तयार झालीय

केंद्राच्या कायद्याला राज्य सरकार आव्हान देऊ शकतं का?