गोमंतकीय साहित्याचा ओला दुष्काळ आता दूर करायला हवा!

०९ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ९ मिनिटं


'बिल्वदल साखळी' या संस्थेकडून गोव्यातल्या सत्तरीत तालुका पातळीवर सातव्या मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी अध्यक्ष म्हणून डॉ. अनुजा जोशी यांनी केलेलं भाषण फारच गाजलं. या भाषणात गोव्यात निसर्गदत्त हिरवाळीसोबतच सरकारी अर्थिक भरभराट असतानाही इथल्या साहित्यात आलेल्या दुष्काळावर त्यांनी बोट ठेवलं. त्यांच्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत.

मराठी साहित्य संमेलनांचा अखिल भारतीय,  राज्यस्तरीय,  विभागीय,  तालुकास्तरीय ते ‘बिल्वदल’सारख्या होतकरू संस्थांची संमेलनं असा खूप व्यापक पैस आहे. या खूप मोठ्या पार्श्‍वभूमीवर एका तालुकास्तरीय संमेलनाचं अध्यक्षपद हा छोटासा अधिकार आहे. पण मराठीच्या खूप मोठ्या प्रवाहाचं प्रतिनिधित्व हे छोटंसं संमेलन करतं आहे. मी खूप कौतुकाने यासाठीच या संमेलनाला ‘गागर में सागर’ असं म्हणते. 

अलीकडच्या काळात महाराष्ट्रातला मुख्य मराठी साहित्यप्रवाह आणि गोवा,  कर्नाटक,  हैद्राबाद,  तेलंगणा,  छत्तीसगड,  मध्य प्रदेश,  गुजरात या प्रांतातला बृहन्महाराष्ट्रीय साहित्यप्रवाह अशी विभागणी झाली आहे. तसेच मराठीच्या विविध बोली हे मराठीचं वैभव आहे. उदा. सत्तरीत आजही टिकून असलेली चित्पावनी बोली. या बोलीभाषांमधलं मराठी साहित्य आणि ग्रामीण भागात बोलली जाणारी मराठी ही मराठीची बलस्थानं आहेत. ढोबळमानाने मांडलेल्या या आकृतिबंधाबरोबरच विविध साहित्यप्रकारांचे विविध रचनाबंध अभ्यासणंही खूप रोचक आहे. 

जगण्याच्या शक्यता तपासणारी कविता

मी नेहमी वेगवेगळे साहित्यप्रकार हाताळून बघत असले तरी ‘कविता’ हा नेहमीच अधिक जिव्हाळ्याचा विषय. काव्य ही तर माणसाची आदिम प्रेरणा आहे. जखमी क्रौंच पक्ष्याच्या युगुलाला पाहिल्यानंतरचा ओठी आलेला पहिला उद्गार हा ‘काव्य’ होता. 

अगदी एका काव्य या साहित्यप्रकाराबाबतीतच सांगायचं तर महाकाव्यांपासून सुरू करून निर्मितिप्रक्रिया, प्रतिमा,  रूपक, मिथक, अलंकार,  वृत्त, छंद, लय, ताल, मुक्तछंद असं करत करत ग्रामीण, महानगरीय, स्त्रीवादी, दलित, विद्रोही, उत्तरआधुनिक अशी विविध जाणिवांची कविता अशा अंगाने कवितेचा अभ्यास करता येतो. ४-५ वर्षांपूर्वी ‘शब्दांच्या अल्याड-पल्याड’ नावाने एक सदर मी एका पेपरात वर्षभर चालवलं होतं. 

त्यानिमित्ताने मला हा अभ्यास करता आला होता. नवीन लिहिणार्‍यांनी असा अभ्यास आवर्जून करायला हवा. फक्त अभ्यास आणि लेखन असं म्हणून नव्हे तर जगण्याच्या विविध शक्यता तपासण्यासाठी कविता लिहिली जावी. लिहिली जाते. मी तर म्हणते की, 

कविता सांगत नाही काहीच
ती दाखवते फक्त
जगण्याच्या शक्यता ठासून भरलेल्या!
तिचे हात घेऊन
ज्याने त्याने उचलायचं
आपापल्या कुवतीनुसार
एकेक ओझं!

शब्दांच्या अल्याड आणि पल्याडही अजून बरंच काही व्यापून राहिलं आहे. लेखनाच्या वाटेवरचे प्रवासी म्हणून सभोवतीचं ते पर्यावरण विचारात घेणं, समकालाचं भान असणं हेही खूप आवश्यक आहे. 

साहित्यासाठी दोन प्रकारची दृष्टी लागते

गोवा, कर्नाटक अशा प्रांतांमधे असणार्‍या भाषिक वादामुळे दोन्ही भाषांच्या सृजनशील प्रक्रियेचंच फार मोठं नुकसान झालं आहे. मात्र सत्तरीपुरतं बोलायचं तर इथे उगम पावलेल्या  महादईच्या गोड्या पाण्याने कोणत्याही वादाची प्रखरता इथं सौम्य केली. व्यापक विचार केला तर विविध आक्रमणांना,  दबावांना,  गळचेपीला,  अन्यायांना मराठीलाच सामोरं जावंच लागतं,  ही वस्तुस्थिती आहे.

संघर्षाच्या या पार्श्‍वभूमीवर आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागतं. टक्केटोणपे खात,  परिपक्व होत वैयक्तिक संघर्ष करावा लागतो. नंतर इथल्या प्रादेशिक मराठी साहित्यक्षेत्रात उभं राहावं लागतं. आणि त्यानंतर मुख्य मराठी क्षेत्राची दारं प्रयत्नाने ठोठावावी लागतात. आपल्यासाठी उघडी करून घ्यावी लागतात. आपल्याला या अशा दुहेरी-तिहेरी संघर्षाला तोंड द्यावं लागतं. आपलं नाणं आधी खणखणीत घडवणं आणि मग ते खणखणीत आहे हे वाजवून दाखवणं या दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या ठरतात,  हे आपल्याला माहित आहेच. 

अशा परिस्थितीत आपण लिहितोय ते निव्वळ हौसेपायी की गंभीर विचार करून लिहितोय, आपल्या लेखनजाणिवा कोणत्या, लेखनातल्या उणिवा कोणत्या, आपली लेखनक्षमता किती, त्यात पुढे जाण्याच्या शक्यता किती याची चाचपणी सतत कठोरपणे करत राहायला हवी. यासाठी असलेली दृष्टी दोन प्रकारची असते, असं मला वाटतं.

भोवतीचा निसर्ग, पर्यावरण, विविध नैसर्गिक प्रक्रिया, प्रदूषणं, समाज, माणसं, प्रश्‍न,  समस्या हे सगळं आपण दोन डोळ्यांच्या ‘बहिर्मुख दृष्टीने’ बघत असतो. पण सृजनाच्या विकासासाठी आवश्यक असते ती ‘अंतर्मुख दृष्टी!’ बहिर्मुख दृष्टीने बघितलेलं चित्र,  घटना,  अनुभव यांचा ठसा मनावर कसा उमटतोय,  तो पुन्हा कागदावर कसा उतरतोय हे बारकाईने बघणार्‍या मनःचक्षूंची ‘अंतर्मुख दृष्टी’ खूप महत्त्वाची. हीच अंतर्मुख दृष्टी साहित्य संमेलनं देत असतात.

हेही वाचा : वसईचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, कारण

वाङ्‌मयीन दुष्काळाचे दिवस आलेत

समकालीन गोमंतकीय मराठी साहित्य क्षेत्राबद्दल काही गोष्टी गंभीरपणे मी बोलणार आहे. एका लेखानं हा विचार करायला मला प्रवृत्त केलंय. २००९-२०१० डिसेंबरमधे सरत्या वर्षाचा साहित्यिक आढावा घेणारा,  गोमंतकीय ज्येष्ठ साहित्यिक मा. पुष्पाग्रज यांचा एक लेख माझ्या वाचनात आला. ‘वाङ्‌मयीन दुष्काळाचे दिवस’ असं बहुधा त्या लेखाचं नाव होतं.

नीट निरीक्षण केल्यानंतर आज १०-१२ वर्षानंतरही वाङ्‌मयीन दुष्काळी स्थिती फारशी बदललेली नसल्याचं दिसून येतं.  मी गेली अनेक वर्षे साहित्यिक कार्यक्रमांना जाते. मोजके अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी आयोजक आणि साहित्यिक दोघांमधेही लेखनविषयक पुरेसे गांभीर्य दिसून येत नाही. गोव्याबाहेरही गोमंतकीय लेखनाबद्दल नाराजीचा सूर ऐकू येतो. एकूणच गोव्याच्या लोकजीवनातला ‘सुशेगादपणा’ साहित्यक्षेत्रातही आहे,  असं गमतीनं म्हटलंही जातं. या वस्तुस्थितीची कारणं शोधत पार मुळापर्यंत जावं लागतं. 

साधारण एका जिल्ह्याएवढं गोवा राज्य. अर्थातच एका जिल्ह्याएवढ्या क्षेत्राला एका राज्याच्या सुविधांची उपलब्धी! त्यात पर्यटनामुळे जगभरात मिळालेली उंची - अशी सगळी पायाभूत अनुकूलता, संपन्नता आपल्याला इथं मिळते. एक छोटंसं उदाहरण पहा. आपले साधे साधे घरगुती सोहळे,  समारंभ, पुस्तक प्रकाशने, मेळावे, वर्धापन दिन इथपासून ते मोठ्या संमेलनांपर्यंत कशालाही पंचसदस्यापासून ते मुख्यमंत्री राज्यपालांपर्यंत कुणीही पाहुणा म्हणून इथे सहज उपलब्ध होऊ शकतो. इतके एकटोकाच्या सहकार्याचं, जल्लोष आणि उत्साहाचं वातावरण आपण इथं अनुभवतो. 

विविध सरकारी योजना, आर्थिक सहाय्य,  भरघोस अनुदानं, देणग्या असं सगळं अगदी पुस्तक प्रकाशनापासून नुकसान भरपाईपर्यंत सगळ्यासाठी भरपूर मिळतं. फार मोठा संघर्ष न करता,  फार परिश्रम न घेता राज्यस्तरीय,  केंद्रस्तरीय यश पदरात पडतं. फार स्पर्धा न होता पुरस्कार, सन्मान मिळतात. भरपूर व्यासपीठं असतात. साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. भरपूर पुस्तके छापली जातात. वृत्तपत्रांमधे पटकन प्रसिद्धी,  स्पर्धांमधे भरघोस बक्षिसं मिळतात. हे सगळं तुलनेने कमी कष्टांमधे इथे मिळतं. 

इतर राज्यांच्या तुलनेने कमी बेकारी, कमी संघर्ष,  कमी धकाधकी- धावपळ आणि भरपूर साधनसुविधा मिळाल्याचा ओल्या दुष्काळासारखा परिणाम म्हणून कोणत्याही गोष्टीचा संख्यात्मक विकास जोमाने होतो आणि गुणवत्तेकडे दुर्लक्ष होतं, ही वस्तुस्थिती आहे. साहित्यक्षेत्रात ही अनुकूलता सकस साहित्यनिर्मितीच्या मार्गातला पहिला मोठा अडसर ठरते. अशी कमालीची अनुकूलता प्रयत्न थांबवते. कठोर व्यासंग आणि परिश्रमांची कास सोडायला लावते. नव्या लिहित्या मंडळींनी हा धोका ओळखायला हवा. 

राजकारणासारखी भयानक 'साहित्यकारणं' दिसतात

अर्थात हे झालं एका बाजूचं चित्र. नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की, या सर्वातूनही स्वत:ला प्रयत्नपूर्वक निर्लेप राखत काही होतकरु मंडळी चांगलं लिहीताहेत. समकालाचं यथायोग्य भान बाळगून आहेत. आयोजकांच्या पातळीवर विचार केला तर, गोवा मराठी अकादमी, कला अकादमी, गोमन्तविद्यानिकेतन, शारदा ग्रंथप्रसारक संस्था, कोकण मराठी परिषद इ. सारख्या विविध संस्था दर्जेदार कार्यक्रमांचं आयोजन करताहेत.

पण गोव्यात जिद्दीने फुलत असलेल्या या मराठी प्रतिभेला नि कार्याला मराठीच्या मुख्य प्रवाहात कितपत सामावून घेतलं जातं? साहित्यासकट वेगवेगळ्या क्षेत्रांत इथं येणारे मान्यवर इथल्या प्रतिभावंतांना बाहेर जोडून देण्याचा कितपत प्रयत्न करतात? मराठीच्या अस्तित्व आणि संवर्धनाच्या भरीव कार्यासाठी मुख्य मराठी धारा कितपत स्वागतशील आणि सहकार्यशील आहे? ही सारी प्रश्नचिन्हेच आहेत. गोव्यासकट बाकीच्या बृहन्महाराष्ट्रीय प्रदेशांचीही हीच तक्रार मुख्य मराठी साहित्यक्षेत्राबद्दल नेहमी ऐकू येते.

मुख्य मराठी प्रवाहात तर अनेक वृत्ती, प्रवृत्ती, दुष्प्रवृत्ती आहेत. गटातटाची आणि कळपकंपूंची राजकारणासारखी भयानक 'साहित्यकारणं' आहेत. प्रचंड संघर्ष, स्पर्धा आहे. अर्थात पुन्हा त्यातही सन्माननीय अपवाद आहेत. फक्त दर्जेदारच लिहिणारे पाठराखते आश्‍वासक हात तिथंही आहेत. याचा मी स्वतः अनुभव घेतलाय. एक सुजाण लेखक, वाचक म्हणून स्वतःच्या कोशात गुंतून न पडता हातातल्या परिस्थितीचा गोल असा उलट-सुलट फिरवून तपासून पाहत राहायला हवा!

हेही वाचा : संमेलनाला जाताय, मग वि.भि. कोलतेंच्या बंडखोर वारशाविषयी हे वाचा

वाचनाचा पैस व्यापक केला पाहिजे

एक लेखक म्हणून मी माझ्या लेखनाचा विचार करते तेव्हा जुन्या-जाणत्या पिढीचं साहित्य वाचणं,  तो अभ्यास मला सर्वात आधी महत्वाचा वाटतो. नंतर माझे समकालीन काय आणि कसं लिहिताहेत, लेखनाबद्दल कसा विचार करताहेत, त्यांच्या लेखनजाणिवा काय हे जाणून घेणं मला खूप महत्त्वाचं वाटतं. एका साहित्यिकाची ही अशा प्रकारची गरज असू शकते, असावी!

या पार्श्‍वभूमीवर आयोजक आणि वैयक्तिक अशा दोन्ही पातळ्यांवर चांगले बदल घडायला हवेत. इथल्या आणि बाहेरच्या साहित्यिकांच्या गाठीभेटी, चर्चा, संवाद सातत्याने घडायला हवेत. कार्यक्रमांमधला तोच-तोचपणा जाऊन नवे बदल घडायला हवेत. वैयक्तिक विकासाकरता तर बरंच काही करता येण्यासारखं आहे. 

महाराष्ट्रातून आज विविध दर्जेदार नियतकालिकं निघतात. त्यांचे वर्गणीदार होऊन नियमित वाचन करणं खूप महत्त्वाचं आहे. समकालाचं भान देणा-या मराठी लघुनियतकालिकांच्या या महत्वाच्या चळवळीविषयी अनेक साहित्यिकांना पुरेशी माहिती नसल्याचं आणि ते महत्वाचं वाचन नसल्याचं निराशाजनक चित्र इथं दिसतं. वाचनालये सोडल्यास अनेक मराठी नियतकालिकांचे वर्गणीदार अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच इथं आहेत. वरवर साध्या दिसणा-या या गोष्टींचा आज गंभीरपणे विचार होण्याची गरज आहे. होतकरुंनी, नवीन लिहीणा-यांनी, महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांनी तसंच प्राध्यापकांनीही सजगतेनं या छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरवात करायला हवी.

एकेका लेखक-कवीच्या समग्र साहित्याचे वाचन, विविध प्रातिनिधिक संग्रह, विविध भाषांमधले अनुवादित साहित्य, विविध संपादित आणि समीक्षेचे ग्रंथ, पेपर आणि त्यांच्या रविवार आणि विशेष पुरवण्या, रोजचं डायरीलेखन असे विविध प्रयत्न वैयक्तिक विकास घडवत नेतात. गोव्यातल्या समृद्ध सेंट्रल लायब्ररी आणि ठिकठिकाणची वाचनालये यांचा यासाठी चांगला उपयोग करता येऊ शकतो.

हळूहळू हे पुस्तक वाचन अजून विस्तारत जायला पाहिजे. ज्येष्ठ कवयित्री आसावरी काकडे म्हणतात, आपण एखादं पुस्तक वाचतो तसं आपल्याला एखादं झाड वाचता आलं पाहिजे. आपल्या भोवतीचा निसर्ग, पर्यावरण, प्रदूषण, परिस्थिती, प्रश्‍न, माणसं,  त्यांची सुख-दुःखं आपल्याला वाचता यायला पाहिजेत. वाचनाचा पैस असा व्यापक होत गेला पाहिजे!

सहित नेतं ते साहित्य!

सुरवातीला अनेक जण याविषयी पुरेसे जागरूक नसतात. रोजच्या पेपरएवढंही वाचन अनेकांचं नसतं. हा साहित्याचा वगैरे प्रांत आपला नव्हेच यावरही ते ठाम असतात. पण अशा सामान्य अवस्थेत एखाद दिवशी आपण गाडीतून जाताना तिकिटावरून झालेली भांडाभांडी-मारामारी, अपघात, दुर्घटना, ओढवलेला प्रसंग बघतो आणि आतून हलतो. अस्वस्थ होतो. वेगळा विचार करू लागतो.

असं झालं तर तुमच्या मनामधे त्या घटनेची वेदना ‘संवेदना’ बनू लागलीय,  तुमचं मन संवेदनशील बनू लागलंय असं समजावं. एखाद्या लग्ना-वाढदिवसाला शुभेच्छा म्हणून चार ओळी लिहून द्याव्याशा वाटू लागल्यायत याचा अर्थ मनातल्या रंग रुप नसणाऱ्या संकल्पना साहित्य बनून आकार घेऊ पाहतायत. आपला साहित्यनिर्मितीकडे प्रवास चालू झालाय. ‘सहित’ नेतं ते साहित्य. मनातलं अमूर्त तुम्हाला त्याच्या ‘सहित’ घेऊन निघालं आहे, याची ती खूण आहे.

सुरवातीला हौसेनं केलेलं लेखन हळूहळू आणखी मागणी करत जाईल. भूक वाढत जाईल. जाणून घ्यायची तहान लागेल. अधिकाधिक अस्वस्थता येईल. प्रश्‍न पडतील, शंका निर्माण होतील, उत्तरं शोधावीशी वाटतील. या सार्‍या साहित्यनिर्मितीच्याच तर पुढच्या पुढच्या हाका आहेत. आतल्या आवाजाच्या हाका आहेत. हे करत करत आपण काही वेगळं सांगायचा प्रयत्न करतोय,  आपल्याला वेगळं व्यक्त व्हायचंय हे आतून जाणवू लागेल तेव्हा हौशी लेखनाने गांभीर्याची वाट धरली आहे असं अवश्य समजायला हरकत नाही.

हेही वाचा : नयनतारा सहगलः फुले, आंबेडकरांच्या रांगड्या वारशाचा अपमान

जीवनाच्या मुळाशी साहित्य असतं

वरवरचा विचार अनुभवाला पृष्ठभागावरच ठेवतो. गांभीर्याने केलेला विचार अनुभवाचं अनुभूतीत रूपांतर करतो. हे इतकं सोपं गणित. पण आज सोशल मीडियाने ते पार विस्कटून टाकलंय. एखाद्या घटनेचे फोटो आणि पोस्ट फेसबुकवर टाकली आणि शेपन्नास लाईक्स आल्या की लिहिणारा झाडाला वरच्यावर पाणी शिंपडल्यागत सुखावतो. कालचं आज जुनं होतं. मनातली अनेक चांगली बीजं सोशल मीडियाच्या भणाणत्या वार्‍यात फोलपटासारखी उडून जातात. अनेक यंत्र-तंत्रांसारखंच हे एक दुधार शस्त्र आहे. त्याचा माफक प्रमाणात वापर तर जरूर व्हायला हवा.

‘आरता ये, पण आपडू नको’ म्हणजेच जवळ ये, पण शिवू नको अशी एक म्हण गोव्यात आहे. ती सोशल मीडियाच्या बाबतीत वापरणं हिताचं ठरतं. असा सर्व बाजूंनी विचार करत आपण आपापल्या क्षेत्रातल्या सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा कोणत्याही, अगदी घरकाम, शेतीकाम असेल तरीही त्याबद्दलच्या लेखनाचा विचार करू लागलो किंवा प्रत्यक्ष न लिहिताही नव्या विचारानं आपलं आयुष्य समृद्ध करू लागलो तर त्या-त्या क्षेत्रातले आपण साहित्यिकच झालो असं एक सोपं आणि नवं समीकरण मला सुचतं आहे. 

साहित्य हा एक स्वतंत्र कलाप्रांत असला तरी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राच्या मुळाशी शब्द, साहित्य यांचा खोल झरा असतो. प्रत्येकजणच लेख,  कथा,  कविता,  पुस्तकं लिहून साहित्यिक बनण्याची गरज नाही. तसं होत नाहीच. तर ‘शब्द’ म्हणजे आपला आतला आवाज असतो,  आतली हाक असते. जीवन समृद्ध करण्यासाठी प्रत्येकाने या ‘आतल्या शब्दा’ची साधना करून साहित्यिक व्हावं असं मला वाटतं! 

साहित्यातून शिल्प शिकणारा राजा

शब्दांचं हे सामर्थ्य सांगताना एक छोटीशी गोष्ट मला आठवते. डॉ. अरुणा ढेरे यांनी गेल्यावर्षी यवतमाळच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात तिचा उल्लेख केला होता. एक राजा शिल्पकला शिकण्यासाठी गुरूकडे जातो. पण गुरू म्हणतात की शिल्प शिकण्यासाठी तुला नृत्य यावं लागेल. मग तो नृत्य शिकायची तयारी करतो आणि नृत्याच्या गुरूकडे जातो. तर ते म्हणतात,  असं कसं जमेल? नृत्य येण्यासाठी तुला एखादं वाद्य तर शिकावं लागेल ना?

राजा हिरमुसला होऊन वाद्य शिकायला जातो. वाद्याचा गुरू त्याला आधी गाणं शिकून ये म्हणून सांगतो. राजा ती आज्ञाही प्रमाण मानतो आणि गाणं आणि संगीत शिकायला जातो. तर तिथेही त्याची इच्छा पूर्ण होत नाही. संगीताचा गुरू त्याला म्हणतो,  नुसतं गाणं मी तुला कसं शिकवू? त्यासाठी आधी तुला शब्द काय नि कसे असतात ते अभ्यासावं लागेल. मग राजा शब्दांची साधना सुरू करतो.

शब्दांचा अभ्यास केल्यानंतर त्याला गीत कळतं, गीतातून वादन, वादनातून नृत्य, नृत्यातून शिल्प घडवता येऊ लागतं. राजाला आपल्या आयुष्याचं शिल्प घडवण्यासाठी, जगण्याचा ताल-सूर-लय सापडण्यासाठी शब्दांची, साहित्याची साधना करावी लागते. सगळी कलाक्षेत्रं, सगळी ज्ञानक्षेत्रं, सगळेच प्रांत मुळातून शब्दांशी असे जोडलेले असतात.

हेही वाचा : चला सगळे मिळून संभ्रमित होऊया!

गोव्याचा साहित्यीक वारसा फार प्राचीन आहे

‘माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे’ म्हणत गोमंतकाच्या निसर्गवैभवाला आपल्या नक्षत्रलख्ख प्रतिभेने उजळवणारे बाकीबाब बोरकर, शंकर रामाणी, दा. अ. कारे,  नरेंद्र बोडके,  सुदेश लोटलीकर, ‘पावसा रोंबाट इला रे’ म्हणणारा विष्णू सूर्या वाघ यांच्यापासून आपल्यापर्यंत वाहात आलेल्या शब्दप्रवाहाला इथल्या निसर्गाने हिरवंगार करून सोडलंय. पं. महादेवशास्त्री जोशी,  वि. ज. बोरकर,  ह. मो. मराठे यांच्या कथा-कादंबर्‍यांमधून हीच समृद्ध वनराई आहे. इथल्या निसर्गाने, झाडापेडांनी, महादईच्या पाण्याने, वनराईने आणि इथल्या माणसांनी हे हिरवं दान आपल्या पदरात घातलंय.

निसर्गाकडे बघण्याची आणि निसर्ग जिवापाड सांभाळण्याची ही कृतज्ञ दृष्टी हेच इथल्या लोकजीवनाचं वैशिष्ट्य आहे. आपल्या शब्दांचा पैस हे सगळं वैभव कवेत घेण्याएवढा व्यापक व्हायला हवा आहे. इथला साहित्यिक वारसा फार प्राचीन आहे. खास सत्तरीचे म्हणून असणारे धालो, फुगड्या, रोमटामेळ, रणमाले यांसारखे अनेक लोकगीतांचे आणि लोककलांचे एक सो एक प्रकार आणि ते रचणारे जुने जाणते अज्ञात भूमिपुत्र हे खरे इथले आद्य साहित्यिक आहेत. 

राम राम म्हणू नये 
बाई सीतेच्या तोलाचा
हिरकणी माझी सीता 
राम हलक्या दिलाचा

असं जात्यावरच्या ओव्यांमधे म्हणणारी,  नात्यांचे रेशमी बंध असोशीने जपत हा सतेज विद्रोह करणारी एखादी कष्टकरी मालन ही इथली आद्य कवयित्री आहे. त्या जाणत्यांनी दिलेलं हे संचित जपतच आपल्याला पुढे जायला हवं आहे.

गोमंतकाच्या, सत्तरीच्या निसर्गाने दिलेला हा ‘हिरवा वसा’ शब्दांच्या पसापायलीने आपल्याला भरभरून घेता यावा आणि आपलं निसर्गदत्त जगणं त्याच्यासारखंच हिरवंगार होऊन जावं, जगणं-लिहीणं एकरुप आणि समृद्ध होऊन जावं अशा खूप सा-या शुभेच्छा व्यक्त करुन मी याठिकाणी थांबते. धन्यवाद!

हेही वाचा : 

सुवार्ता दिब्रिटोंची अन् पत्थरांचा मारा सनातन

‘अरुणा ढेरेंचं मराठी साहित्यातलं योगदान मानदंडासारखं’

चैत्यभूमीवर येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना सोयीसुविधा कधी देणार?

शाळेच्या पुस्तकांमधे आपण कधी जग जिंकणारे ग्लोबल संत नामदेव वाचलेत?