माझ्या कवितेचा चेहरा स्त्रीचाच आहे. पण ती ठरवून घडलेली गोष्ट नाही. रूढ अर्थानं मी स्त्रीवादी कवी नाही. चेहरा नसलेल्या आणि स्वत:च्या अस्तित्वाची काही एक दखल स्वत:ला आणि इतरांनाही असण्याची जाणही नसलेल्या बाया माझ्या कवितेत सावलीसारख्या धूसरपणानं वावरत असतात. मी त्यांच्यातूनच आलेय, त्यांच्यातलीच एक आहे या गोष्टीचं भान माझ्या मनाच्या तळाशी कायम असतं; माझ्या मुळांशी ते मला बांधून ठेवतं.
गेल्या महिन्यात साहित्य अकादमीने मुंबईत ईशान्य आणि पश्चिम भारतीय लेखिका संमेलन घेतलं. दोन दिवसांच्या या संमेलनाचं उद्घाटन कवयित्री अनुराधा पाटील यांनी केलं. यावेळी त्यांनी केलेलं संपूर्ण भाषण साप्ताहिक साधनामधे छापून आलंय. त्या भाषणाचा हा संपादित अंश.
सगळ्या गोष्टी शहरी, मध्यमवर्गीय किंवा उच्चवर्णीय धारणेतून होताना दिसतात. ग्रामीण आणि कनिष्ठ वर्गातल्या स्त्रीचं जगणं आजही विविध संघर्षांनी व्यापलेलं आणि कवडीमोलाचंच आहे. इथली स्त्री वाङ्मयात आणि त्या बाहेरही उपेक्षित आणि संवेदनहीनतेचे चटके सोसणारी आहे. नागरी जगात स्त्री आज आत्मविश्वासानं उभी राहिलेली आपण पाहतो. स्त्रीमुक्तीचं लेबल लावलेल्या अनेक चळवळी निर्माण होत गेलेल्या दिसतात.
या चळवळींचं रूप खूपदा संभ्रमात टाकणारं, आपल्याला काय हवंय याची पुरेशी खात्री नसणारं किंवा खूपदा टोकाची मतं व्यक्त करताना हास्यास्पद होत जाणारं असं दिसतं. या सगळ्या गोष्टींचं समर्थन एका मर्यादेपर्यंत करता येतं. कारण हा विद्रोह स्वागतशील आहे. पण अनुभवातून विचाराकडे जाताना त्यातला गंभीरपणा हरवून गेलेला दिसतो आणि त्याला कृतक फॅशनेबल रूप आलेलं पाहताना वाईट वाटतं.
आज स्त्रियांच्या सर्वच क्षेत्रातल्या सहभागाची सतत चर्चा होते. त्यांच्यासाठी अगदी राजकारणातही राखीव जागा ठेवल्या जातात. सगळीच माध्यमं स्त्रियांचे प्रश्न कसं महत्त्वाचे आहेत यावर चर्चा करतात. पण सर्वसामान्य स्त्रिया आणि वाङ्मय किंवा इतर कला क्षेत्रात वावरणार्या स्त्रिया यांचं प्रमाण राजकारण किंवा समाजकारण यात किती आहे? वैचारिक आणि बौद्धिक जाण असलेल्या आणि इतरही स्त्रिया ही क्षेत्रं टाळतानाच दिसतात.
त्याची कारणं पुन्हा तिथल्या कार्यपद्धतीत दडलेली आहेत हे खरंच आहे. पण गंभीर गोष्ट अशी आहे की, तिथं वावरणार्या मोजक्या स्त्रियाही यशस्वी झाल्यावर त्यात काम करणार्या पुरुषांसारख्याच मानसिकतेत वावरतात. स्त्रियांच्या कुठल्याच प्रश्नांचं भान बाळगताना त्या सहसा दिसत नाहीत. सभा, मोर्चे, धरणं आंदोलनं, किंवा विजयी मिरवणुका यात सामील होणार्या किती स्त्रियांना या परिस्थितीचं भान असतं? याचं उत्तर नकारार्थीच आहे. इथंही स्त्रियांचा सहभाग एवढ्याच गोंडस नावानं त्यांचा वापर करून घेतला जातो.
दुसरीकडे आजच्या गतिमान, आधुनिक जगण्याचा भाग होत असताना आपण सगळेच सकाळपासून रात्रीपर्यंत जाहिरातींनी निर्माण केलेल्या दुष्टचक्राचा भाग होत आहोत. आपल्या केसांपासून त्वचेपर्यंत, आतल्या कपड्यांपासून आपल्या लैंगिक संबंधांपर्यंत आपण काय करावं, कसं दिसावं, काय खावं-प्यावं यावर आपल्याशी काडीचाही संबंध नसणार्या बाजारकेंद्री लोकांचं नियंत्रण निर्माण झालंय.
आपल्या जगण्याची नैसर्गिक लय आणि रूप नाहीसं होऊन आपण या खोट्या कृत्रिम आणि एकाच छापाची यंत्रं बनवणार्या जगाची चालती-बोलती जाहिरात होत आहोत. काहीही विकलं जाणार्या या जगात बाईला फार मोठी जागा सहज उपलब्ध करून दिली जातेय. यात नवल नाही. यातला मोठ्या अर्थकारणाचा भाग सोडला तरी या मागेही पुन्हा पुरुषाच्या सोयीचा, स्वार्थाचा भाग अधिक असतो. पण उत्तेजन देण्याचे प्रकार वरवर तरी पुरोगामीपणाचे पण दांभिक आणि धूर्त असतात.
स्त्री मात्र या प्रकारात स्वत:च्याच प्रतिमेत खोल अडकत जाते. पुरुषासारखीच वागू पाहते. तिच्या बाईपणाच्या नैसर्गिक कक्षेतल्या गोष्टी बदलून जातात. याचं सगळयात मोठं उदाहरण म्हणजे आज सगळीकडे दिसणारं स्त्रियांचं भाषिक क्षेत्र. स्त्रिया आज शिव्या देण्यापासून सरसकट पुरुषी पद्धतीने वागत बोलत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे वैचारिक गोंधळ, तीव्र स्पर्धा, अस्तित्वाचेच प्रश्न निर्माण होणं अशा अनेक कारणांनी तिच्या मूळच्या गोंधळात भरच पडत जाते आणि आजच्या बुद्धिभेद करणार्या दिखाऊ वास्तवाची ती बळी ठरते.
दुसरीकडे समाजात घरीदारी पुरुषाची अरेरावी, त्याचा आक्रमकपणा, त्याचा संताप या सर्व गोष्टींकडे त्याच्या सत्तेचं, सामर्थ्याचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. स्त्रीला मात्र स्वत:चा राग, संताप, अपयशातली हताश तगमग, अन्याय हे सारं व्यक्त करण्यासाठी खूपदा स्वत:ची अशी जागाच नसते. तिला नेहमीच सबुरीचा, समजदारीचा, सोडून देण्याचा सल्ला दिला जातो. आणि त्यामुळे एकीकडे पुरुषद्वेष आणि दुसरीकडे त्याच्या भोवती भिरभिरणं अशी तिची अवघड अवस्था होताना आपण पाहतो.
या बदलत्या वास्तवाचं आणि त्याच्या परिणामांचं चित्र त्यांच्या साहित्यात येतंय का? कारण मी केलेलं विवेचन हा आपला नुसता भूतकाळ नाहीय तर तो वर्तमानही आहे; जो आपण जगतोय. आतापर्यंत स्त्रियांच्या लिखाणाबद्दल बरंच काही लिहिलं गेलंय. स्त्रीवादावरही बरंच बोललं गेलंय. पण ते पुरेसं आहे का? आणि नुसतीच स्त्रीवादी असण्याची लेबलं लावूनही आधी बोललेल्या अनेक गोष्टी कवेत घेत लेखन झालं का, होतंय का? असेही प्रश्न आहेत. त्यांचं उत्तर निश्चितच समाधानकारक नाहीय.
माणूस म्हणून वाढण्याचे अनेक स्तर असतात आणि काळाचं भान ठेवणार्या साहित्यात या प्रगल्भ जाणिवांचं चित्रण उमटणं अनिवार्य ठरावं एवढं गरजेचं असतं. पण अपवाद वगळता असं सहसा घडताना दिसत नाही. आपापल्या भाषेतली उदाहरणं माझ्यासारखी तुम्हालाही सापडतीलच.
मला माहीत आहे की, चांगलं साहित्य आणि सफाईदार पण निकृष्ट साहित्य याच्या सीमारेषा पुसटच असतात. स्त्रीवादी भूमिकेतून लिहिणार्यांचीही संख्या खूप मोठी आहे. काळाने दिलेलं भान त्यामागे आहे हे खरंय पण तेवढंच पुरेसं नाहीय. दिलासा देणार्या गोष्टी म्हणजे आत्मसन्मान, घरचे, कामाच्या ठिकाणाचे ताण आणि संघर्ष आणि एकूणच आलेलं भान आजच्या कवितेत आणि गद्यातही दिसून येतं.
अनुभूतीची विस्तारलेली कक्षा अनेकींच्या लिखाणात प्रकर्षाने जाणवते. पण बेचैन करणारी गोष्ट म्हणजे या सर्वजणी सतत एकाच सुरात बोलतात असं सारखं वाटावं इतकं त्यांचं लिखाण एका छापाचं असतं आणि नुसतीच वस्तुस्थिती नोंदवतं. त्यामुळे विचार, कृती, लेखन हे कृतक विद्रोहाच्या पातळीवर राहतं आणि लिंगभेदाच्या अनुषंगानेच स्त्री-पुरुष संबंधातली विषमता अधोरेखित करण्याने स्त्रीवादाची भूमिकाही उपरीच ठरते.
दुसरी गोष्ट म्हणजे स्पष्ट, धीट असण्याच्या आणि आधुनिकतेच्या नावाखाली लैंगिक जाणिवा व्यक्त करताना त्यातली निकोपता हरवते. खरं तर आपल्या पिढीची लैंगिकता आणि त्यावरचं भाष्य हे विचार, बुद्धी आणि भावना यांना अस्वस्थ करणारं हवं. अर्थात मी मांडत असलेली निरीक्षणं सगळ्याच भाषांमधल्या सगळ्याच साहित्याला लावता येणार नाहीत. याच्या पलीकडे जाणारं साहित्य तुमच्या सर्वांच्या भाषांमधे जरूर असणार. भाषिक अज्ञानामुळे ते मला माहीत नाही. माझी विधानं ही सर्वसाधारण आहेत.
आज सगळ्याच अर्थानं आयुष्य सोपं, सरधोपट करण्याची प्रचंड धडपड चालू असते. पण त्यामुळे जगणं सोपं झालं तरी समृद्ध होत नाही. हाच सवंग सोपेपणा साहित्यातही वेगवेगळ्या गोंडस नावांनी समोर येतो. त्यात जग वेगानं बदलतंय. माणसांमधली आणि नात्यांमधली आत्मीयता, ओल कमी कमी होत चाललीय. माणसं टोकाची व्यक्तिवादी, आत्मकेंद्रित होत आहेत. भविष्यात समाज आणि सृजनातली अंगभूत विविधता कुठल्या रूपानं समोर येईल हे सांगणं अवघड झालंय.
पण कवी हा जगभर द्रष्टा मानला जातो. तो भविष्याकडे बघू शकतो असं मानलं जातं. नव्या जगाचा पाया सृजनाच्या माध्यमातून त्याला घालता येऊ शकतो. निदान तसं स्वप्नं जरूर पाहिलं जातं. त्यातही विवेक असलेल्या समतोल विश्वाची निर्मिती पुरुषापेक्षा स्त्री ही अधिक जागरूकतेनं करू शकते. निर्माण करणं आणि टिकवणं हे स्त्रिया प्राचीन काळापासून करत आल्या आहेत. स्त्री-पुरुष हा भेद नैसर्गिक असला तरी त्यांची अनुभव घेण्याची पद्धत आणि त्याचे स्तरही वेगळे असतात.
स्त्रियाचं अंतरविश्वही स्वाभाविकच वेगळं असतं. एकाच घटनेकडे पाहण्याचा स्त्री-पुरुषांचा दृष्टिकोनही वेगवेगळा असतो. मानवी संबंधातले ताण, जगण्याबद्दलचे चिंतन, जन्म, मृत्यू यासारख्या मूलभूत घटनांबद्दलची त्यांची समज आणि समजूत अशा अनेक गोष्टींमधून हा फरक स्पष्ट होत राहतो. वर उल्लेख केलेल्या समतोल जगाचं भान स्त्री अधिक नीट पेलू शकते. म्हणून हे काम कवयित्रींनी केलं पाहिजे असं इथे मला सांगावसं वाटतं.
स्त्रियांनी स्त्रियांसाठी केलेल्या लेखनाच्या उल्लेखाबरोबरच पुरुष लेखकांनी बायांबद्दल केलेल्या लिखाणाचा उल्लेख करावा लागेल. प्रत्येक काळात आणि पिढीतही असं लेखन झालेलंय. बाईकडे पाहण्याचा, तिला समजून घेण्याचा अनेकांचा प्रयत्न निश्चितच दखल घ्यावी असाच आहे. पण अपवाद वगळता त्यांनी स्त्रीची प्रतिमा पुरुषाला आणि समाजाला हवी तशीच रंगवलीय हे पुन्हा पुन्हा लक्षात येतं.
एक तर कोणताही समाज समूहानं जगणारा असल्यानं आचरणातली आणि विचारातली विविधता बाजूला ठेवून एकसाची नियम आणि त्यांच्या परंपरा निर्माण होतात. त्यात कमीत कमी धोके आणि परंपरा न मोडण्यात सुरक्षितता पण दडलेली असते. म्हणून परंपरांच्या चौकटीबाहेर पडणं हाच मोठा गुन्हा होऊन बसतो. हळूहळू अशी दुहेरी भूमिका आणि ढोंगीपणा वाढत जाऊन ढोंगी असणं हेच एक जगण्याचं मूल्य होऊन बसतं. मग अशा समाजात बाईबद्दल जे काही लिहिलं जाईल ते कसं असेल याची कल्पना आपण करू शकतो.
बंधनांमुळे सर्जनशक्तीवर, त्यातही बाईच्या सृजनशक्तीवर खूप मर्यादा पडतात. सर्जनातल्या असंख्य गुंत्यांसाठी आणि ते धीटपणानं मांडण्यासाठी मनाचं, अनुभवाचं, आकलनाचं जे बौद्धिक स्वातंत्र्य हवं, विचार हवा तोच धूसर बनतो. आणि नुसताच शब्दच्छल आणि वाया गेलेल्या अनुभवांचे तुकडे लिखाणात इकडे-तिकडे मांडण्यातच लेखकाचा मोलाचा वेळ आणि जगण्यानं दिलेले अनुभव वाया जातात.
खरं तर जगण्याचं आणि सर्जनाचं परस्पर नातं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जगण्याची अपूर्णता ही सर्जनात पूर्ण करता येते. पण सृजन हे नुसतं हवेत किंवा कल्पनेत होत नाही. त्याचा गाभा जगण्यातून घ्यावा लागतो. जगणं ही अत्यंत गुतांगुतीची गोष्ट असते आणि माणसाच्या जगण्याचा त्याच्या निर्मितीशी एक दृढ आणि अटळ संबंध असतो. त्याचा परिसर, त्याचे संस्कार, त्याचं पर्यावरण यांचे त्याच्या निर्मितीशी बंध असतातच. त्यामुळेच प्रत्येक लेखक-कवींची सृजनाची व्याप्ती आणि अनुभव वेगवेगळे असतात.
जगण्याच्या सामान्य क्रियेतूनच अनेक गोष्टींची कलात्मक पुनर्निर्मिती करता येते. अशा जगण्याचा एखादा तुकडा, एखादा अनुभव सर्जनाच्या पातळीवर नेता येणं म्हणजे कविता असं मला वाटतं. अर्थात कविता लिहिणं ही गोष्ट मला सोपी अजिबात वाटत नाही. ती एक थकवणारी दीर्घ क्रिया असते. आणि एकाच वेळी बांधलं जाण्याचा आणि त्यातून सुटण्याचा विलक्षण अनुभव कवितेच्या सर्जनातूनच येऊ शकतो असं कवी म्हणून मला वाटतं.
स्वत:बद्दल बोलायचं तर माझ्या कवितेचा चेहरा हा सहजपणानं स्त्रिचाच आहे. पण ती ठरवून घडलेली गोष्ट नाही. रूढ अर्थानं मी स्त्रीवादी कवी नाही. चेहरा नसलेल्या आणि स्वत:च्या अस्तित्वाची काही एक दखल स्वत:ला आणि इतरांनाही असण्याची जाणही नसलेल्या बाया माझ्या कवितेत सावलीसारख्या धूसरपणानं वावरत असतात. मी त्यांच्यातूनच आलेय, त्यांच्यातलीच एक आहे या गोष्टीचं भान माझ्या मनाच्या तळाशी कायम असतं; माझ्या मुळांशी ते मला बांधून ठेवतं.
साधारणपणे १९७५ च्या आसपास आपल्याकडे स्त्रीवादाच्या संदर्भात भूमिका घेतली जाऊ लागली. जगभरात हा संघर्ष विसाव्या शतकाच्या सुरवातीपासून या ना त्या रूपात सुरू झालेला होता. किमान माणूस म्हणून जगण्यासाठी व्यवस्थेच्या विरोधात सर्व अंगानी उभं राहणं गरजेचं होतं.
इतर प्रदेशांतल्या आणि भाषांमधल्या परिवर्तनाबद्दल मला पुरेशी माहिती नाही. पण मराठीपुरतं बोलायचं तर महाराष्ट्रात या मुक्तीची सुरवात पुरुषांनीच केलीय. या जागृतीमागे महात्मा जोतिराव फुले, विठ्ठल रामजी शिंदे, महर्षि कर्वे, गोपाळ गणेश आगरकर या समाजसुधारकांचा सक्रीय सहभाग होता. या नव्या जगाचा मोठाच रस्ता त्यांनी प्रशस्त केला. या गोष्टींचं मोल खूप मोठं आहे. त्यामुळेच ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले, लक्ष्मीबाई टिळक यांच्यापासून सुरू झालेला साहित्याचा आणि समाजाची मानसिकता बदलण्याचा हा प्रवास पुढे अखंड चालत राहिलाय. आणि त्याने मराठी समाजाला, साहित्याला न संपणारी समृद्धी दिलीय.
दुर्गा भागवत, इरावती कर्वे, बहिणाबाई चौधरी, इंदिरा संत, शांता गोखले, गौरी देशपांडेंपासून आजच्या समकालीन साहित्यापर्यंत अनेक लेखिका-कवयित्रींची नावं आवर्जून घ्यावी लागतील, हे इथे नोंदवणं गरजेचं आहे. एकूणच स्त्रीला पूर्णपणे बौद्धिक आणि भावनिक जागा मिळणं आणि स्वत:ची ओळख स्वत:ला ज्ञानाच्या पातळीवरून होणं, असं घडलं तर त्यातून निर्माण होणारं साहित्य व्यापक आणि काळाचा वेध घेणारं असेल अशी खात्री वाटावी असं वातावरण अवतीभोवती आहे. आणि तेही काही कमी नाही.
शेवटी एक गोष्ट सांगणं मला आवश्यक वाटतं. आपण सार्याजणी लिहितो तेव्हा आपल्याला हे माहीत असतं की, सृजनाशी संबंधित कोणतीही गोष्ट किंवा कलाकृती भलेही कोणा एकाच्या नावावर असेल मात्र त्यामागे अगणित हात आणि असंख्य अपरिचित चेहरे असतात. त्यांना आपण ओळखतही नसतो. ज्यांना पाहता येत नाही, ओळखता येत नाही पण ज्यांच्याबद्दलची जाणीव आपल्याला आतूनच असते किंबहुना ती असणं अनिवार्यच असतं.
पण वर्तमान परिस्थितीत आपण आणि असे असंख्य चेहरे, जे कोणाच्याच खिसगणतीत नसतात, ते आणि आपण सर्वच कोणीही या परिस्थितीतून सुटलेले नाही. आपण सगळे अशा काळ्या सावल्यांनी घेरले जात आहोत; ज्यांचे ऑक्टोपससारखे अनेक हात आहेत. आमचे विचार, आमची संवेदनशीलता एवढंच नाही तर आमच्या अस्तित्वावरही त्यांचा रोख आहे.
लिहिणं ही जर एक सामाजिक कृती असेल तर हेही तितकंच खरं आहे की, आमचं उत्तरदायित्वही सामाजिक आणि समाजाशी जोडलेलंच असायला हवं आणि ते अनिवार्य समजलं जावं एवढच मला सांगायचं आहे.