अभिनेते अरुण सरनाईक यांचा आज स्मृतीदिवस. सरनाईकांना जावून आता ३५ वर्ष झाली. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले यांच्या पिढीतल्या सरनाईकांनी अनेक महत्त्वाच्या सिनेमा, नाटकांमधे एक्टिंग केली. पैशासाठी तमाशामधेही काम केलं. पण आज सरनाईक लोकांना, सरकारला, सिनेसृष्टीला एखाद्या निमित्तापुरते आठवतात.
वेगवेगळ्या काळात कोल्हापूरच्या मातीत जन्मून मोठा नावलौकिक मिळवणारे तीन अभिनेते आहेत. एक संगीतसूर्य केशवराव भोसले, दोन इंडियन डग्लस मास्टर विठ्ठल आणि तिसरे अरूण सरनाईक. केशवराव आणि अरूण सरनाईक हे गायक आणि अभिनेते होते.
बाबुराव पेंढारकर, मास्टर विनायक या आधीच्या पिढीतील मराठी कलाकारांपेक्षा सरनाईक यांचा अभिनय अधिक नैसर्गिक होता. त्यांच्या अभिनयाची जातकुळी हिंदीमधल्या बलराज सहानी किंवा नसिरुद्दीन शाह यांच्यासारखी होती. राजकपूर, देवानंद, दिलीपकुमार किंवा राजेश खन्ना हे स्वतःच्या प्रतिमेत अडकून पठडीबाज अभिनेते झाले.
अरुण सरनाईकांचं तसं झालं नाही हे खरं. पण त्यांच्या वाट्याला आव्हानात्मक भूमिका अपवादानेच आल्या. त्यांच्या ऐन उमेदीच्या काळात मराठीत तमाशापटांची चलती होती. त्यातून वेगळ्या भूमिकांना फारसा वावच नव्हता.
हेही वाचाः योग दिवस २१ जूनला साजरा करण्यामागची दोन कारणं
श्रीराम लागू, निळू फुले हे अरुण सरनाईकांच्या समकालीन अभिनेते. लागू उच्चशिक्षित डॉक्टर. पूर्णवेळ नाटक आणि सिनेमाचा व्यवसाय त्यांनी स्विकारला. निळू फुले अत्यंत सामान्य कुटुंबातले. पुण्यातल्या वैद्यकीय महाविद्यालयात माळीकाम करायचे. राष्ट्र सेवादलाच्या माध्यमातून ते लोकनाट्य आणि नाटकं करू लागले. अरूण सरनाईक यांची प्रमुख भूमिका असलेला एक गाव बारा भानगडी सिनेमातली झेलेअण्णा ही निळूभाऊंची गाजलेली भूमिका. क्षमता असूनही निळूभाऊंच्या वाट्याला सरपंच, गावचा पुढारी अशाच भूमिका आल्या.
डॉ. लागू मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीतही सराईतपणे वावरले. वेगवेगळ्या प्रकारची प्रयोगशील नाटकं केली. प्रसंगी सेन्सॉरलाही अंगावर घेतलं. डॉ. लागू आणि निळू फुले हे किती उच्च दर्जाचे अभिनेते होते याची झलक सामना सिनेमात दिसते. या दोघांना कुटुंबातून कोणत्याही प्रकारचा अभिनयाचा वारसा नव्हता.
अरुण सरनाईकांचं तसं नव्हतं. वडील महाराष्ट्र कोकिळ शंकरराव सरनाईक. बलवंत संगीत नाटकमंडळीमुळे महाराष्ट्रभरात त्यांचं नाव झालं होतं. चुलते निवृत्तीबुवा सरनाईक शास्त्रीय गायक होते. भजनसम्राट म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यामुळे अभिनयाबरोबरच अरुण सरनाईकांना घरातूनच गायनाचा वारसा मिळाला होता. ते उत्तम तबलावादक होते. खर्जातल्या आवाजाची उपजत देणगी त्यांना मिळाली होती.
मात्र गायनकला आणि अभिनय याचा पूर्ण क्षमतेनं उपयोग झाला नाही. अपवाद जब्बार पटेल यांचा सिंहासन. १९७०-८० च्या दशकात नव्या सिने प्रवाहातले गोविंद निहलानी किंवा शाम बेनेगल यांच्यासारखे दिग्दर्शक किंवा मंथन, अंकूर, निशान्त सारखे वेगळ्या धाटणीचे सिनेमे मिळाले असते तर आपल्या वेगळ्या धाटणीचे अरुण सरनाईक दिसले असते. तशी संधी येण्याची शक्यता असतानाच वयाच्या अवघ्या ४९ वर्षी त्यांचा अपघाती मृत्यू झाला.
कोल्हापूरहून पुण्याला जात असताना पुणे- बंगळूर महामार्गावर कार अपघातात ते, त्यांची बायको अनिता, इंजिनियर झालेला मुलगा संजय ठार झाले. तेव्हा त्यांची मुलगी मिरज मेडिकल कॉलेजमधे शिकत होती. तारीख होती २१ जून १९८४. त्यापूर्वी एक महिना अगोदर त्यांना भेटण्याची, बोलण्याची संधी मला मिळाली होती. त्यामुळे त्यांचं अपघाती जाणं आणि बोलणं लक्षात राहून गेलं.
हेही वाचाः कोल्हापूर ते ऑस्करः भानू अथैय्या यांचा आज ९० वा वाढदिवस
अभिनेते म्हणून अरुण सरनाईक या नावाचा प्रचंड दबदबा होता. घरातच संगीत आणि नाटकाची परंपरा असल्यानं ते शालेय आणि कॉलेज जीवनातच कलेकडे वळले. १९६० च्या दरम्यान गोविंदराव टेंबे यांच्या जयदेव नाटकात त्यांना गायक नट म्हणून पहिल्यांदा संधी मिळाली. मो. ग. रांगणेकर यांच्या 'भटाला दिली ओसरी' हे त्यांचं पहिलं लोकप्रिय नाटक. सरनाईकांसाठी अनंत माने यांच्यामुळे दरवाजे खुले झाले.
त्यांनी दिग्दर्शित केलेल्या शाहीर परशुराम हा सरनाईक यांचा पहिला सिनेमा. यात त्यांनी परशुरामाच्या मुलाची भूमिका केली. अनंत मानेंच्या सुमारे १५ सिनेमांमधे त्यांनी भूमिका केल्या. केला इशारा जाता जाता, अशीच एक रात्र होती, सवाल माझा ऐका, सांगू कशी मी, गळगौळण, डोंगरची मैना, पाहुणी, एक गाव बारा भानगडी, पाच रंगाची पाच पाखरं, तोतया आमदार ही त्यातल्या काही सिनेमांची नावं. २५ वर्षांच्या कालावधीत त्यांनी सुमारे पाऊणशे सिनेमे आणि २५ नाटकांमधे भूमिका केल्या.
जयश्री गडकर आणि अरुण सरनाईक हे कधीकाळी मराठी निर्माते, दिग्दर्शकांसाठी चलनी नाणं होतं. व्यावसायिक रंगभूमीवर नानावटी खटल्यावर आधारित अपराध मीच केला हे मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेलं नाटक खूप गाजलं. त्यात सरनाईक यांची प्रमुख भूमिका होती. चंद्रलेखा निर्मित गुड बाय डॉक्टर, झुंज, तसंच चिं.त्र्य. खानोलकर यांचं रखेली ही त्यांची काही गाजलेली नाटकं. सोळावं वरीस धोक्याचं, भानगडीशिवाय घर नाही, अशा नाटकातूनही त्यांनी भूमिका केल्या.
व्यावसायिक कलावंत म्हणून ते अत्यंत निष्ठेनं काम करत होते. वी. शांताराम यांच्या चंदनाची चोळी, अंग अंग जाळी, तसंच घरकुल सिनेमातून त्यांची गायन क्षमता दिसून येते. चंद्रकांत आणि सूर्यकांत हे सरनाईकांच्या काळातले कलावंत. आपल्यापेक्षा सरनाईक यांची अभिनयक्षमता मोठी होती, हे ते मान्य करायचे. सरनाईक यांना हिंदी सिनेमांचे दरवाजे खुले झाले होते.
नसिरुद्दीन शाह आणि स्मिता पाटील यांच्याबरोबर सितम सिनेमात त्यांना भूमिका मिळाली होती. आणखी दोन हिंदी सिनेमांचं चित्रिकरण सुरू होणार होतं. हिंदीतल्या तीन सिनेमांच्या ऑफर्स त्यांना आलेल्या होत्या. मात्र त्यांच्या मृत्यूनं पुढचा सगळा अभिनयाचा प्रवासच थांबवला.
गिरीश कर्नाड यांच्या तुघलक नाटकात अरुण सरनाईक यांची मुख्य भूमिका होती. १९७२ च्या दरम्यान त्याचे मुंबईत सलग प्रयोग झाले. अविष्कार निर्मित या प्रयोगाची नाट्यवर्तुळात चर्चा झाली. तापस सेन यांची प्रकाशयोजना, दामू केंकरे यांचं नेपथ्य आणि अरविंद देशपांडे यांचं दिग्दर्शन प्रयोगाला लाभलं होतं. त्यातली सरनाईकांच्या तुलघकच्या भूमिकेने स्वतः कर्नाडही प्रभावित झाले.
मी पाहिलेल्या आतापर्यंतच्या 'तुघलक'मधे सरनाईकांचा तुघलक सर्वात प्रभावी होता, असं कर्नाड म्हटलं होतं. कर्नाड यांचं नुकतंच निधन झालंय. त्यांचं विधान म्हणजे अरुण सरनाईक यांच्या अभिनयक्षमतेला मिळालेलं प्रशस्तिपत्र म्हणता येईल.
हेही वाचाः हेमा मालिनीच्या आईला गिरीश कर्नाडांना जावई करायचं होतं
कलावंत म्हणून सरनाईक अत्यंत अशांत होते. आपण काय दर्जाचे सिनेमे केले याची त्यांना जाणीव असावी. मृत्यूच्या एक महिनाआधी सरनाईकांनी शिवाजी विद्यापीठातल्या अभिनय कार्यशाळेत तरुण पोरांशी संवाद साधला. अखंडपणे सिगारेट ओढत ते तासभर बोलत होते. त्यातलं सगळंच काही लक्षात राहिलं नाही. मात्र काही स्मृतीकण आजही अर्थपूर्ण वाटतात. तेव्हा त्यांची विधानं धक्कादायक, मेंदूला झिणझिण्या आणणारी वाटली. पण आता त्यामागची वेदना लक्षात येतेय.
संध्याकाळची वेळ होती. बोलता बोलता सरनाईकांनी विचारलं. कुणाकुणाला नट व्हायचंय. हात वर करा. सतरा, अठरा मुलं होती. एकानं दबकत हात वर केला. पहिल्यांदा हक्काची पानपट्टीची का असेना गाडी टाक. मग अभिनयाच्या क्षेत्रात ये. ते असं का म्हणताहेत हे कुणालाच कळत नव्हतं. ते पुढं म्हणाले, 'तुम्ही गरजू आहात, असं कळलं की लोक तुम्हाला हवं तसं वापरून घेतात. केलेल्या कामाचे पैसेसुद्धा नीट देत नाहीत.'
सरनाईक यांच्या विधानामागे अनुभवांचा कडवटपणा होता. अभिनय हा त्यांचा पूर्णवेळचा व्यवसाय होता. सिनेमा आणि नाटकाच्या प्रयोगातून पुरेसे पैसे मिळत नव्हते. आज टीवी मालिकांमुळे कलावतांची गुणवत्ता घसरली असली तरी आर्थिक प्रश्न कमी झालेत. पण तडजोडी आहेतच. सरनाईक यांना त्या अधिक प्रमाणात कराव्या लागल्या असाव्यात. पैशासाठी म्हणून सरनाईक यांनी कधीच कुणा दिग्दर्शक, निर्मात्याची अडवणूक केली नाही. ते किती पैसे मिळणार हे कधीच विचारायचे नाहीत, असं अनंत माने सांगायचे.
मात्र त्यांच्या स्वभावाचा अवाजवी फायदा घेतला गेला. स्वतःच्या मूलभूत गरजा भागतील असा एखादा व्यवसाय असायला हवं. मग ती पानपट्टी का असेना, तर आपण आपल्या बोलीवर जगू शकतो. हव्या त्या भूमिका करू शकतो. किंवा नाकारू शकतो, असं त्यांना सुचवायचं असावं. त्याचा खुलासा त्यांनी पुढच्या एका प्रश्नाचं उत्तर देताना केला.
तुम्ही तमाशापटातून भूमिका का केल्या. असा तो प्रश्न होता. 'काय करणार. पैसा लागतो ना. तो कुठून मिळवणार. मुलगा इंजिनियर, मुलगी मेडिकलला. त्यांचं शिक्षण करायचंय, तर ते करणं भाग होतं.' त्यांच्या या विधानात अभिनेता मागे पडून कुटुंबवत्सल बाप दिसत होता.
हेही वाचाः १५० वर्षांपूर्वी २०० शोध लावणारे, भारताचे एडिसन शंकर आबाजी भिसे
सामना आणि सिंहासन या दोन सिनेमांमुळे जब्बार पटेल हे मोठे दिग्दर्शक आहेत, असा आमचा समज होता. त्यालाही बोलता बोलता अरूण सरनाईक यांनी सुरुंग लावला. त्याला काय कळतंय सिनेमातलं. सामनातला तो बसचा शॉट केवढा लांबडा घेऊन ठेवला होता. कापायला लावला त्याला. सरनाईक यांना हे बोलण्याचा अधिकार होता. आपण समजतो तसं सगळंच ग्रेट नसतं. मोठ्यांच्या मर्यादा सांगायला तेवढाच मोठा माणूस लागतो हे ज्ञान आमच्या दृष्टीनं मोठं होतं.
तिसरं एक ज्ञान त्यांनी दिलं ते अभिनयाबाबत. सिंहासन सिनेमातला तुमचा मुख्यमंत्री इतरांपेक्षा वेगळा का वाटतो. या प्रश्नावर ते म्हणाले, 'सगळे अभिनय करत होते. मी अभिनय करत नव्हतो.' किती सहज पण महत्वाचं विधान होतं हे. अभिनय ही मुद्दाम करावी अशी गोष्ट नसते. आपण ज्या नैसर्गिकपणाने जगतो. वावरतो तेवढ्या सहजपणानं ती घडली पाहिजे हेच ते सांगत होते. अभिनयाच्या पाठशाळेतला मूलभूत धडाच ते सांगून गेले.
सरनाईक यांच्या निधनाला आज ३५ वर्षे झालीत. त्यांचे सिनेमे, नाटकं पाहून भारावलेली पिढी कालबाह्य होतेय. त्यांचं नाव क्वचितच कुणाला प्रसंगानं आठवत असेल. सिंहासनमधले मुख्यमंत्री पत्रकार दिगूला म्हणजे निळू फुलेंना एका प्रसंगी म्हणतात, 'अरे, मला जायचं होतं देवाच्या आळंदीला, पण येऊन बसलो चोराच्या आळंदीत.' हे विधान सरनाईकांच्या अभिनय प्रवासालाही लागू होत नाही का.
मनासारखे सिनेमे, मनासारख्या भूमिका मिळाल्या नाहीत. जे केलं ते तडजोड म्हणून, पण प्रामाणिकपणे केलं. नव्या आव्हानात्मक मिळण्याच्या शक्यता वाटत असतानाच अपघातानं स्वप्नांचा चक्काचूर केला. त्याबरोबरच संपली त्यांच्या मनातली अशांत तगमग. या शोकांत नायकाचं स्मरण ना सरकारला आहे ना सिनेसृष्टीला. केशवराव भोसले नाट्यगृहाजवळचा पुतळा सोडला तर कोल्हापुरात नाव घेण्याजोगं कसलंही स्मारक नाही. किमान एखादं एक्टिंग स्कूल तरी त्यांच्या नावानं व्हायला काय हरकत आहे?
हेही वाचाः
शाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला
वर्ल्डकप सेमीफायनलमधे 'या' चार टीमला एंट्री मिळणार
विश्वसुंदरी ठरलेल्या महाराणी गायत्री देवींनी संसदही गाजवली
अमिताभलाही न कळालेला अॅवेंजर समजून घेण्यासाठीचा क्रॅश कोर्स
लुका छुपीचा डायरेक्टर लक्ष्मण उतेकरः पोलादपूरच्या शेतातून बॉलीवूडपर्यंत