‘अरुणा ढेरेंचं मराठी साहित्यातलं योगदान मानदंडासारखं’

०२ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


यवतमाळला होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री, समीक्षक डॉ. अरुणा ढेरे यांची एकमतानं निवड करण्यात आलीय. यानिमित्तानं १८ वर्षांनी अध्यक्षपदाचा मान महिलेला मिळालाय. ही निवड अनेकार्थांनी महत्वाची आहे. साहित्य संमेलनाध्यक्ष निवडीची प्रक्रिया आणि अरुणा ढेरेंच्या साहित्यविषयक कामगिरीचा लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी घेतलेला हा वेध.

डॉ. अरुणा ढेरे यांची ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. साहित्य संमेलनाच्या दृष्टीनं हे एक निवडीच्या परिवर्तनाचं पहिलं पाऊल आहे, असं मला वाटतं. कारण आजपर्यंतच्या साहित्य संमेलनाध्यक्षांची निवड ही निवडणूक प्रक्रियेतून झाली आहे. या प्रक्रियेत महिलांची संख्या फार कमी आहे.

आजवर कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके आणि विजया राजाध्यक्ष या चार महिला अध्यक्ष होऊ शकल्या आहेत. या सर्वच महिला निवडणूक प्रक्रियेतून अध्यक्ष झालेल्या आहेत. त्यामुळंच निवडणूक प्रक्रिया न होता, निवडीच्या माध्यमातून अरुणा ढेरे यांची अध्यक्षपदी निवड होणं, ही घटना महत्त्वाची आहे. आजवर फार कमी महिला निवडणूक प्रक्रियेत उतरल्या आहेत. ही प्रक्रिया बंद झाली नसती तर अरुणा ढेरेही यात कधी उतरल्या नसत्या. कारण निवडणूक लढवणं ही त्यांची प्रवृत्ती नाही.

तिघीतली चर्चा खरी ठरली

निवडणूक आणि त्यातलं राजकारण यासंदर्भात आमची अनेकदा चर्चा झाली आहे. त्यातल्या चर्चेचा भाग असा असायचा की मालतीताई किर्लोस्कर आमच्या सगळ्यांमध्ये ज्येष्ठ. मी मधली आणि अरुणा तिसरी. मालतीताईंशी माझा आणि अरुणाचाही स्नेहबंध होता. त्या म्हणायच्या, ‘ताराबाई तुम्ही साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झालेल्या मला पाहायचंय.’ मी हा विषय हसून सोडून द्यायचे.

अरुणाही म्हणायची, बघ मालतीताई वाट पाहतायंत. जरा मनावर घ्या. पण मी म्हणायचे, ही निवडणुकीची प्रक्रिया आहे, तोपर्यंत हे शक्य नाही. त्यामुळं माझ्या आयुष्यात ही घटना घडणार नाही. पण तुझ्या आयुष्यात मात्र नक्की घडू शकेल, असं मी अरुणाला म्हटल्याचं मला चांगलं आठवतंय.

आज ते प्रत्यक्षात घडतं आहे, याचा आनंद आहे.

महिलांकडे दोन गोष्टींची वानवा

मला असं वाटतं कोणतंही लाभाचं पद हे अशा पद्धतीनंच सन्मानानं दिलं गेलं पाहिजे. साहित्य आणि कलेचं क्षेत्र हे स्वायत्त आणि स्वतंत्र आहे. कुणीतरी आपल्यावर अंकुश ठेवणं, हे कोणत्याही स्वतंत्र वृत्तीच्या कलावंताला मान्य नसतं. निवडणूक प्रक्रियेत बऱ्याच अनाठायी तडजोडी करायला लागतात. शिवाय त्यासाठी द्यावा लागणारा पुरेसा वेळ महिलांजवळ फार कमी असतो. महिलांना एकाच वेळी अनेक आघाड्यांवर कामं करायची असतात.

तडजोडी करण्यासाठीची वृत्ती आणि पुरेसा वेळ या दोन्ही गोष्टींची बायकांकडे वानवा असते. त्यामुळं आमच्याकडे जो काही वेळ असतो, तो आम्ही निर्मितीच्या कामात घालवू, त्यातूनच समाधान मिळवू अशी एक भूमिका तयार होते. कारण निर्मितीचा आनंद हा सर्वोच्च आनंद असतो. आमचे वाचक असतील, त्यांनाही तो आनंद देता येतो. जोडण्यातला आनंद नेमका हाच असतो. निवडणुकीत बऱ्याच वेळेला जोडण्याऐवजी तोडण्याची प्रक्रिया होते.

अरुणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर तिला हे पद अशा पद्धतीच्या जोडण्याच्या प्रक्रियेतून म्हणजेच तिच्या निर्मिती सातत्यामुळे मिळालं आहे, हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. तडजोडी स्वीकारण्याऐवजी तुमच्या निर्मितीमुळे हे पद मिळणं, याला म्हणूनच महत्त्व जास्त आहे.

विविधांगी आणि विचारप्रधान साहित्य

अरुणाचं साहित्य हे विविधांगी आणि विचारप्रधान आहे. त्याला संशोधनाचाही स्पर्श आहे. प्रतिभेच्या बाबतीत ती गर्भश्रीमंत आहे. भौतिकदृष्ट्या पैसा-अडका असणाऱ्यांना गर्भश्रीमंत म्हटलं जातं. या अर्थानं हा शब्द मी वापरत नाहीये, तर तिची आई आणि वडील डॉ. रा. चिं. ढेरे (आण्णा) हे दोघंही प्रज्ञावंत आणि प्रतिभावंत होते, त्या अर्थानं ती गर्भश्रीमंत आहे. मला गुरुस्थानी असलेले ढेरे सर हे किती मोठे संशोधक होते, हे वेगळं सांगायला नकोच. अरुणाची आईही तेवढीच बुद्धिमान होती, पण काळाच्या मर्यादेमुळं आणि परिस्थितीमुळं प्रपंचाच्या चौकटीच्या बाहेर त्यांना जाता आलं नाही. 

या सगळ्या पार्श्वभूमीचं अरुणानं सोनं केलं. ती लहानपणापासूनच कविता करणारी आहे. तिच्या घरात कवितेचं, पुस्तकांचं वातावरण होतं. अत्यंत समृद्ध ग्रंथालय तिच्या हाताशी असल्यामुळं आणि घरातच डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या मार्गदर्शनामुळं संशोधनात्मक कार्यही अतिशय चांगल्या पद्धतीनं ती करत आलीय. काव्यात्म दृष्टी तिच्याकडे असल्यामुळं तिच्या गद्यालाही लालित्याची जोड आहे.

तिचं गद्य आण्णांच्या गद्यासारखं संशोधनपरही आहे. पण त्यालाही कवितेचा स्पर्श आहे, तर तिच्या कवितांना विचारांचा स्पर्श आहे. हे असं आदान-प्रदान तिच्या सर्वच लिखाणात दिसतं. आण्णांचं सगळं साहित्य मध्ययुगाशी संबंधित आहे. त्याचा पुढचा विचार म्हणजे १९ व्या शतकाचा, हे शतक परिवर्तनाच्या दृष्टीनं महत्त्वाचं शतक मानलं जातं.

समाजऋण आणि पितृऋण

अरुणाचं बरचसं लेखन भारतीय परंपरेच्या अनुषंगानं या शतकाचा विचार करणारं त्यातल्या त्यात स्त्रियांच्या अनुषंगानं आहे. एकोणिसाव्या शतकातील परिवर्तनातून पुढं आलेल्या राजघराण्यातील स्त्रिया, प्रापंचिक स्त्रिया, चळवळीतल्या स्त्रिया हे तिच्या संशोधनाचे आणि अभ्यासाचे विषय आहेत. एकोणिसाव्या शतकातली ही सगळी खळबळ, परिवर्तनाचा काळ संशोधनाच्या कक्षेत आणण्याचं काम आण्णांना करायचं होतं, त्यांचं तेच अपुरं राहिलेलं काम ती वेगळ्या पद्धतीनं करते आहे, असं मला प्रकर्षानं वाटतं. तिच्या कामातून ती एका अर्थानं ती समाजऋण आणि पितृऋण फेडते आहे.

अरुणाच्या अनेक पुस्तकांपैकी १९ व्या शतकाचा वेध घेणारी स्त्रीविषयक पुस्तकं मला जास्त आवडतात. त्यामध्ये ‘विस्मृतीचित्रे’, ‘प्रेमापासून प्रेमाकडे, आणि ‘प्रतिष्ठेचा प्रश्न’ ही अनुवादित कथांची पुस्तकं महत्त्वाची आहेत. तिची सुरवातीची ‘नागमंडल’, ‘लोक आणि अभिजात’ ही पुस्तकं मला विशेष भावली. १९ व्या शतकाच्या सुधारणापर्वात सर्वसामान्य वाटणाऱ्या महिलांनी खूप मोठा संघर्ष करून आपली नाममुद्रा उमटवली, याचं चित्रण ‘विस्मृतीचित्रे’मध्ये आलंय. हे स्त्री विकासाच्या इतिहासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचंय.

‘नागमंडल’मध्ये तिच्या शोधप्रबंधाच्या अनुषंगाने नागविषयक काही मराठी कथांचा तिने आदिबंधात्मक विश्लेषणात्मक अभ्यास मांडलाय. ‘प्रतिष्ठेचा प्रश्न’मध्ये भारतातील वेगवेगळ्या भाषिक कथा लेखिकांच्या महिलाविषयक कथांचा अनुवाद आहे. त्यामुळे स्त्री प्रतिष्ठेचा झगडा स्त्रिया किती विविध पातळीवर देत आल्या आहेत, याचा एक विस्तृत सामाजिक पट अरुणाने मांडलेलाय. स्त्रीवादी अभ्यासाच्या दृष्टीनेही या पुस्तकांचे महत्त्व कालातीत आहे, असं मला वाटतं.

खोलात जाण्याची प्रवृत्ती

अरुणानं कविता, कविता, कादंबरी, ललित असे लिखाणाचे बहुतेक फॉर्म हाताळले. संशोधनात्मक लिखाणही केलं. मुळापर्यंत जाण्याची तिची प्रवृत्ती तिच्या सर्वच लेखनातून दिसून येते. तिचा हाच दृष्टिकोन हळूहळू विकसित होत गेला आहे. या टप्प्यावर तर या दृष्टिकोनानं एक विशिष्ट उंची गाठली आहे, एक रसिक म्हणून आणि साहित्यिक म्हणून तिचं मराठी साहित्यातलं योगदान हे मला मानदंडाप्रमाणं वाटतं.

‘राजतरंगिणी’सारख्या ग्रंथाचा तिनं अनुवाद नुकताच पूर्ण केला आहे. काश्मीरचा इतिहास कोणाला फारसा ज्ञात नव्हता. १२ व्या शतकातल्या या ग्रंथाचा अनुवाद करणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखंच होतं. या अनुवादामुळं तिच्या लेखनसमृद्धीत आणखीनच भर पडलीय. अत्यंत योग्य वेळेला तिची संमेलनाच्या अध्यक्षपदावर निवड झाली आहे. साहित्याच्या अनुषंगानं तिच्या मनात असलेल्या काही योजनांना या पदामुळं प्रोत्साहन मिळेल, समाजाकडूनही व्यापक प्रतिसाद मिळेल, अशी आशा वाटते.

माझा ढेरे कुटुंबाशी खूप जवळून आणि दीर्घ संबंध आला आहे. डॉ. रा. चिं. ढेरे हे कवी म्हणून कोणाला फारसे माहीत नाहीत. त्यांनी कविताही लिहिल्या आहेत. अरुणा जन्माला आली, त्यावेळी त्यांना खूप आनंद झाला होता. ते लिहितात :

माझ्या जीवनवेलीला । आज आली एक कळी

रोमरोमी शहारली सुखाची नवाळी

घरात मुलगी जन्माला आल्यानंतर एखाद्या पित्याला किती आनंद होतो, ते यातून व्यक्त झालं आहे. अरुणाच्या बाबतीतला आण्णांनी लिहिलेल्या कवितांचा संदर्भ फारसा कुणाला ज्ञात नाही. 

आपल्याला मिळणारे सन्मान, पुरस्कार हे आपण केलेल्या कामाचे परिणाम असतात, असं आण्णा म्हणायचे. अरुणानं आजवर केलेल्या कामाचा परिणाम म्हणून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अरुणा अध्यक्ष झाल्याची बातमी आपल्याला ऐकायला मिळाली. हा आनंद आण्णांच्याच शब्दांत व्यक्त करावा असाच आहे, आण्णांनी त्यांच्या एका कवितेत म्हटलंय,

फुलवा दीप पुन्हा

उदयगिरीवर आज उजळली शुभमंगल अरुणा...

(शब्दांकन : अभिजित सोनावणे)