कित्येक वर्षांपासून नियमित सुरू असणारी वारी कोविड -१९ या महामारीमुळे यंदा नाही. वारी ही महाराष्ट्राच्या सामुदायिक एकात्मतेचे प्रतीक आहे. महाराष्ट्राच्या मनावर वारीचा अमीट संस्कार आहे. वारीची सांस्कृतिक वैशिष्ट्ये विशद करणारा डॉ. अजय देशपांडे यांचा लेख.
वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला नीतिमत्तेचा संस्कार दिला. माणुसकीच्या अभंग मूल्यावर प्राणपणाने निष्ठा ठेवणारा विचार दिला. समूहाच्या एकात्म जगण्याचा आणि स्वतःचा आत्मसन्मान जपत दुसऱ्याचाही सन्मान करण्याचा सदाचार दिला.
वारी म्हणजे वारकरी संप्रदायाच्या नैतिक मूल्यांच्या उजळणीचा, अंगीकाराचा आणि प्रचार- प्रसाराचा सोहळा. तो धार्मिक, भक्तिमय असेलही पण समाजाला नैतिकतेची, सामुदायिक सदाचाराची शिकवण देणाऱ्या या वारीचे सांस्कृतिक एकात्मतेच्या दृष्टीने महत्त्व अनन्यसाधारण आहे.
नीतिमत्ता आणि कृतिप्रवणतेचा समन्वय साधणारी जीवनप्रणाली वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला दिली. दया, क्षमा, शांती, करुणा, मानवता, बंधुता, नीतिमत्ता, समता या प्रकाशमूल्यांनी समूहातील एक बनून जगण्याचं धोरण वारीनं महाराष्ट्राला दिलं. आजच्या काळात सामुदायिक नीतिमत्ता टिकवण्यासाठी, वाढविण्यासाठी वारीचं कार्य अत्यंत महत्त्वाचंय. अवघाची संसार सुखाचा करण्याची मनीषा बाळगणार्याी संतांनी सामुदायिक सदाचाराची शिकवण प्राणपणाने दिली. वारी ही सामुदायिक सदाचाराची कार्यशाळा आहे. पंढरपूरला अनेक संत माहेर म्हणतात.
'जाईन गे माये पंढरपुरा| भेटेन माहेरा आपुलिया|’ - ज्ञानदेव
'माझे माहेर पंढरी | आहे भीवरेच्या तिरी|' - एकनाथ
‘दिवाळीच्या मुळा लेकी आसावली | पाहतसे वाटुली पंढरीची|' - तुकाराम
असं अनेक संतांनी सांगितलंय.
पंढरपूरला माहेर म्हणण्यात भक्ती आहे पण त्यापेक्षाही एक महत्वाचा मुद्दा असा की पंढरपूरला जाताना आणि तिथे गेल्यावर मृदू स्वबाह्य नवनीत तैसे चित्त असणारे संत सज्जन भेटतात. या संतांच्या सहवासातून समाजात माणुसकीचा विचार रुजवण्यासाठी प्रयत्न करायचेत. या समाजकार्याचा विचार आणि संस्कार स्वीकारण्यासाठी वारी!
हेही वाचा : वारीचं सामर्थ्य समता संगराला लाभावं
'तुका म्हणे तोचि संत, सोशी जगाचे आघात'
पंढरपूर आणि वारी अशा संतांचं माहेर आहे जे जगाने केलेले आघात सोसूनही जगाच्या कल्याणाचाच विचार करणारे आहेत. हे संत कसे आहेत तर-
लेकराचे हित | वाहे माऊलीचे चित्त |
ऐसी कळवळ्याची जाती | करी लाभेवीण प्रीती ||
पोटी भार वाहे |त्याचे सर्वस्वही साहे |
तुका म्हणे माझे | तैसे तुम्हा संता ओझे ||
ज्याप्रमाणे आई सदासर्वदा आपल्या मुलाच्या हितासाठी प्रयत्न करते. त्याची सर्वोतोपरी काळजी घेते. त्याप्रमाणे संत मातृभावनेने समाजाची काळजी घेतात. रंजल्या-गांजल्या मनाला आई होऊन भेटलेले संत हे व्यक्ती आणि समाज दोघांसाठीही ही दया, करुणा, नीती आणि मानवतेचे माहेर असतात. पंढरपुरात मातृहृदयाचे समाजसेवी संत भेटतात म्हणून ते माहेर! पंढरपुरात मातृहृदयाने समाजसेवा करण्याचा संस्कार आणि विचार दिेल्या घेतल्या जातो म्हणून ते माहेर!
‘साधुसंत मायबाप तिहीं केले कृपादान | पंढरीये यात्रे नेले घडले चंद्रभागे स्नान||’
अशा शब्दांत ज्ञानदेवांनी वारीमधे घडणाऱ्या वैचारिक आदानप्रदानाची महती कथन केली आहे.
वारी म्हणजे नैतिकदृष्ट्या उचित असा जीवन व्यवहार होय. सामुदायिक सदाचाराचे मूल्य वाणीच्या माध्यमातून लोकमनात रुजवण्यासाठीची सामाजिक कृती म्हणजे वारी होय. समाजाची नीतिमूल्ये, स्वभाव, विचारप्रणाली घडविण्यासाठी वारकरी संतांनी प्राणपणाने प्रयत्न केले. सार्वजनिक प्रबोधनासाठी, सामुदायिक सदाचारासाठी संतांनी वाणीच्या माध्यमातून जे मार्ग अवलंबले त्यात वारीचा वाटा फार मोठा आहे.
संतांनी वारी आणि वाणी या दोहोंच्या माध्यमातून लोकप्रबोधनाचा प्रयत्न केला. वारीने समाजाचे नैतिकदृष्ट्या भरण-पोषण तर केलेच पण त्यासोबतच मराठी भाषेचेही भरणपोषण केले. भाषेचे भाषापण आणि माणसाचे माणूसपण जोपासण्याचा प्रयत्न संतांनी वारी आणि वाणीच्या माध्यमातून केला.
मराठी संतसाहित्याचे आणि वारीतील ओवी, अभंग भजन-कीर्तन, नृत्य, वाद्य यांचे अनुबंध लोकसाहित्याशी जुळलेत. लोकसाहित्य आणि लोकपरंपरा यातल्या प्रतिभा आविष्कारांचा प्रभाव संतसाहित्याने सहज स्वीकारला. लोकप्रिय आणि प्रचलित माध्यमांचा अंगीकार केला. संतांनी या माध्यमांमधे आणि लोकसंस्थांमधे लोकानुवर्ती परिवर्तन घडवून आणलं आणि थेट लोकजिव्हेचा, लोकमनाचा ताबा घेतला. संतांचं हे समन्वयाचं धोरण महाराष्ट्राच्या नैतिक जडणघडणीसाठी महत्त्वाचं ठरलं.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?
कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?
हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?
साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं
आपल्याला घरात थांबायचं इतकं टेन्शन का आलंय?
कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
लौकिक छंद, लोकसंस्थांची परिभाषा आत्मसात करून त्यात या दृक-श्राव्यात्मक, नृत्य -नाट्यात्मक काव्यप्रकाराचं उपयोजन वारीच्या प्रवासात ठिकठिकाणी केलं गेलं. त्यामुळे वारीच्या माध्यमातून सामुदायिक सदाचाराचा शिकवणीचा मार्ग सोपा आणि यशस्वीही झाला. अध्यात्मिकता आणि भक्ती या बाबी वारीच्या केंद्रस्थानी होत्या आणि आहेतच. तेराव्या शतकापासून आजतागायत भक्तीसाठी वारी असा समज असेलही, नव्हे आहेच.
पण वारीच्या स्वरूप आणि परंपरेत लोकप्रबोधनाची ,सामुदायिक सदाचाराची बीजे दडली आहेत. मन आणि आरोग्य सुदृढ राखण्याचा मूलमंत्रही वारीतच दडला आहे; हे नाकारता येत नाही. वारीने लोककला जोपासल्या आणि त्यांचा प्रचार-प्रसारही केला. लोककला आणि लोककलावंतांना प्रतिष्ठा दिली. वारीने माणसांना श्रमसंस्कार दिला आणि सामुदायिक श्रमाला प्रतिष्ठाही दिली.
भाषेच्या संवर्धनासाठी आणि अलक्षित लोकसाहित्याच्या आणि लोकमाध्यमाच्या संरक्षणासाठी तसेच सामुदायिक सदाचारासाठी संतांनी वारीच्या माध्यमातून दिलेल्या वाणीच्या धनाची उपयुक्तता फार मोठी आहे, महत्त्वाचीही आहे. हे विचारधन न संपणारं आहे. समाजाची नैतिक आणि वैचारिक उन्नती करण्यासाठी, संघटनेतून ऐक्याचा संस्कार देण्यासाठी वारीचं उपयोजन फार महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच ही वारी सामुदायिक सदाचाराची कार्यशाळा ठरते.
संत कुशल असे व्यवस्थापक होते, परंपरेने चालत आलेलं वारीचं व्यवस्थापन पाहिलं की संतांच्या व्यवस्थापन कौशल्याचा प्रत्यय येतो. वारीचं नियोजन, वारीची शिस्त, वारीतला सेवाभाव, वारीतला महानुभाव, वारीतलं परस्पर सहकार्य, जाणीव यांतून वारीचा संस्कार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहजपणे जातो. वारी हे चालते बोलते लोकविद्यापीठ आहे.
सदाचाराएवढी सुंदरता, नैतिकतेएवढे वैभव आणि व्यक्ती म्हणून प्रत्येकाला सन्मान देण्याच्या कृतिशील विचारांची श्रीमंती वारीने दिली आहे. वारी हे महाराष्ट्राचे वैभव आहे. सामुदायिक सदाचाराचा अमीट संस्कार देणारी वारी अनेक शतकांपासून सकारात्मक विचारांच्या प्रकाशाची गाणी गाणारी जीवनदायिनी आहे.
हेही वाचा :
बुवाबाबा, साधू, महाराजांनाही संत म्हणावं का?
वारी म्हणजे मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन
माझे जिवीची आवडी, पंढरपुरा आकाशमार्गे नेईन गुढी
वारी परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली पाहिजे
कोरोनाकाळात सोशल डिस्टन्सिंग पाळून वारकऱ्यांनी आदर्शच घातलाय
विठुराय भक्तांना म्हणतात आषाढी, कार्तिकीला माझ्याकडे यायला विसरू नका
(लेखक समीक्षक असून सर्वधारा या नियतकालिकाचे कार्यकारी संपादक आहेत.)