ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कुठे?

२० जुलै २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


आज आषाढी एकादशी. कुणी वारीची आठवण काढली की आपोआप आवंढा गिळला जातोय. शरीर घरात आहे, मन पंढरीच्या वाटेवर भिरभिरतंय. याला देवाने घेतलेली परीक्षा मानायचं आणि त्यालाही या परीक्षेत पास होऊन दाखवायचं. विरहाच्या आगीत भक्तीला झळाळून घ्यायचं. आता मार्ग एकच, `ठायीच बैठोनि करा एकचित्त, आवडी अनंती आळवावा.` हीच आता वारी आहे. हेच आता पंढरपूर आहे.

आषाढी एकादशी हीच वारकऱ्यांची दसरा दिवाळी आणि नाताळ ईदही. खरं तर विटेवर उभ्या असणाऱ्या परब्रह्माला डोळे भरून पाहिलं आणि पायावर डोकं रगडलं की जगातले सगळे उत्सव साजरे होतात. गेले सतरा महिने हे सुख वारकऱ्यांपासून दूर आहे. त्यामुळे त्याची परिस्थिती काय आहे, हे माहेराकडे डोळे लावून बसलेल्या सासुरवाशिणीशिवाय दुसऱ्या कुणाला कळणार नाही.

सासुरवाशीणही आजच्या वीडियो कॉलच्या जमान्यातली नाही, तर सातशे वर्षांपूर्वी नामदेवराय आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या काळातली. नामदेवराय म्हणतात, `नेत्र माझे रोडले, आठवे माहेर। कैं भेटेन निरंतर बाईयांनो।।` माऊली म्हणतात ते तर प्रसिद्धच आहे, `जाईन गे मायेत तया पंढरपुरा। भेटेन माहेरा आपुलियां।।`

मुलगी सासरी गेली की आईबापासाठी मेल्यासारखीच असायची, असा तो काळ होता. वर्षातून बापुडवाण्या बापाची बोटभर चिठ्ठी यायची. दोन चार वर्षातून एकदा आईचं तोंड दिसायचं. तेव्हा माहेरची खरी आस लागत असेल. आईला बघून सगळा सासुरवास एका क्षणात पळून जात असेल. तशीच परिस्थिती आज वारकऱ्याची आहे.

पंढरीची आस लागलीय. कुणी वारीची आठवण काढली की आपोआप आवंढा गिळला जातोय. शरीर घरात आहे, मन पंढरीच्या वाटेवर भिरभिरतंय. आपल्याच घरात चालताना ठेचा लागतायत. डोळे मिटले की फक्त पांडुरंगच दिसतोय. काही कारण नसताना डोळे भरून येताहेत. ही अवस्था सांगताच न येणारी आहे आणि सांगितली तरी न कळणारी आहे.

हेही वाचा: आषाढी वारीनिमित्त पसरलेल्या वायरल विठ्ठलाची गोष्ट

शब्दांसाठी प्रेमभांडारी नामदेवारायांचाच काय तो आसरा घेता येतो,
डोळुले शिणले पाहतां वाटुली।
अवस्था दाटली हृदयामाजी।।
तूं माझी जननी सरसी ये सांगातिणी।
विठ्ठले धांवोनि देई क्षेम।।

विटेवर उभ्या असलेली या काळ्या जादूचा उतारा कोणत्याही मांत्रिकाकडे नाही. ते सावळं भूत लागलं की कुणी उतरवू शकत नाही. त्यामुळे आता फक्त त्याचा विरह भोगत राहायचा.

आजच्या जमान्यात महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असलो तरी वाटलं की उठून विठुरायाला भेटायला जाता येतं. एसटी असतात, टॅवल्स असतात, गाड्याही असतात. पण आता सगळ्या सोयी असूनही काही कामाच्या उरलेल्या नाहीत. त्यामुळे हा विरह जास्तच अंगावर येतोय.

कोरोनामुळे होत्याचं नव्हतं झालंय. काळ कठीण आलाय. सांभाळायला तर हवंच. आक्रस्ताळेपणा हा विठ्ठलभक्ताचा स्वभाव नाही. याला देवाने घेतलेली परीक्षा मानायचं आणि त्यालाही या परीक्षेत पास होऊन दाखवायचं. विरहाच्या आगीत भक्तीला झळाळून घ्यायचं. आता मार्ग एकच, `ठायीच बैठोनि करा एकचित्त, आवडी अनंती आळवावा.` हीच आता वारी आहे. हेच आता पंढरपूर आहे.

लिहून घ्या, तिकडे आमच्या विठू माऊलीचीही परिस्थिती भक्तांपेक्षा फारशी वेगळी नसणार. विरहाने खंतावून कुठेतरी कोपऱ्यात पायांत डोकं घालून बसला असेल नक्की. भक्तांशिवाय तो सर्वशक्तिमान नाराज नाराज असेल. ज्याच्या इच्छेशिवाय झाडाचं पानही हलत नाही तो कुठे खुट झालं तरी भक्त आले वाटून धावत येत असणार.

भक्तांशिवाय त्याला अर्थ नाही. त्याच्याशिवाय भक्तांना. तो आहेच जगावेगळा. मुलखावेगळा. तो कुठे वेदांत सापडत नाही. पुराणांत सापडत नाही. कुठे धर्माला ग्लानी आलीय, राक्षसाने पृथ्वी त्राहिमाम केलीय, कुठला भक्त संकटात अडकलाय, असं काहीही झालेलं नसताना तो आलाय. फक्त आपल्या भक्ताला भेटायला. अगदी विनाकारण. कर्टसी विझिट केवळ.

हेही वाचा: वारकरी संप्रदायाची सहिष्णुता आजच्या काळात महत्त्वाची

तो भक्तही माजोरडा. `का रे पुंड्या मातलासि, उभा केले विठ्ठलासि.` मायबापाची सेवा करण्यात बिझी आहे म्हणून पुंडलिकाने त्याला थांबायला सांगितलं. आलाय म्हणून आगतस्वागत नाही. विचारपूस नाही. बसायला सांगणंही नाही. एक वीट फेकली आणि सांगितलं त्यावर उभा राहा. आणि तोही भक्ताचा आज्ञाधारकच. अठ्ठावीस की काय ती युगं उभाच आहे. मित्राने स्टॅच्यू म्हणून उभं केल्यासारखा.

कुणाला घरी भेटायला जाताना हत्यारं घेऊन जात नाहीत. त्यामुळे त्याच्या हातात ना गदा आहे ना तलवार ना त्रिशुळ. त्याला धर्मस्थापना करायची घाई नाहीय, त्यामुळे त्याला ना दोन एक्स्ट्रा हात आहेत, ना दोन डोकी. साधं धोतर, टोपी घालून घरच्यासारखा आलाय. राहतोही घरच्यासारखा. संतांसोबत गातो काय, नाचतो काय. नामदेवराय कीर्तन करतात तेव्हा इतका नाचतो की त्याचं धोतरच सुटतं. देवाने करायच्या गोष्टी सोडून भलत्याच गोष्टी करत राहतो.

गोरा कुंभारांची मडकी शेकतो. सावता माळींचा मळा राखतो. जनाबाईंच्या शेणी थापतो. नरहरी सोनारांचे दागिने घडवतो. कबिरांचे शेले विणतो. एकनाथबाबांच्या घरचा तर घरगडीच बनतो. सेना न्हावींसाठी हजामतही करतो. इतकंच नाही तर चोखा मेळ्यांसाठी मेलेली जनावरंही ओढतो.

आता इथे थांबेल तो विठुराया कसला? ज्याची गोष्टही कुणी लिहिली नाही, लिहिली असेल तर जाणीवपूर्वक पुसून टाकलीय, त्या संत सजन कसाईंसाठी मांसही विकू लागतो. आता हे तुकोबारायांनी सांगितलंय म्हणून खरं मानायचं. नाहीतर आपण विश्वास तरी ठेवला असता का?

चर्म रंगू लागे रोहिदासा संगे ।कबिराचे मागे विणी शेले ।।

सजन कसाया विकु लागे मांस ।माळ्या सावत्यास खुरपू लागे ।।

नरहरी सोनारा घडू फुंकू लागे चोखामेळ्यासंगे ढोरे ओढी ।।

नामयाची जनीं सवे वेची शेणी ।धर्मा घरी पाणी वाहे झाडी ।।

आपण हा प्रसंग डोळ्यासमोर आणून बघू. रविवारचा दिवस आहे. धंद्यावर बसलेले सजन कसाई नेहमीसारखे शांत आहेत. समोर सगळी तयारी करून ठेवलीय. अख्खा बकरा ताजा ताजा कापून हुकाला लटकवलाय. हे करताना नामस्मरण सुरूच आहे. बघता बघता ते दंग झालेत. त्यांची ब्रह्मानंदी टाळी लागलीय. समोर गिऱ्हाइक आलंय तरी त्यांना खबरच नाही. गिऱ्हायकं दंगा करू लागलीत. अचानक कुठून तरी विठ्ठल येतो. धोतर वर खेचतो. सुरा उचलतो. बारीक बारीक खिमा करायला लागतो.

हेही वाचा: आपापल्या प्रबोधनाची एकादशी

आज कितीही विचार केला, तरी आपल्यावरचे संस्कार आपल्याला हे दृष्य मान्य करायला देतच नाहीत. पण ते आमच्या देवाने केलंय ना! उद्या कुणी संत सजन कसाई मटन सेंटर काढलं आणि त्यावर मांस विकणाऱ्या विठ्ठलाचा फोटो लावला, तरी आपल्याला ते सहन होणार नाही. पण हे सगळं विठ्ठल करून झालाय कधीचाच. साक्ष तुकोक्तीची आहे. तिच्याइतकं खरं आमच्यासाठी काही नाही. श्रुतीस्मृतीपुराणं सगळं तिच्यासमोर पाणीकम आहे.

म्हणून तर इथे सोवळं नाही, ओवळं नाही. सोपानदेवांसारखा संत तर सोवळ्याओवळ्याची सालटीच काढतो. स्वतःला चोखियाची महारी म्हणवून घेणाऱ्या सोयराबाई अख्ख्या विश्वात कोण सोवळं आहे, असा निरुत्तर करणारा प्रश्नच टाकतात. इथे आज कोणताही भक्त पांडुरंगाच्या देव्हाऱ्यात जाऊन त्याच्या समचरणावर डोकं ठेवू शकतात. हे असं होतं का कुठे? त्याच्यासाठी आंदोलनं करावी लागतात.

प्रख्यात अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे सांगतात, १८७३ पर्यंत तर भक्त दर्शन घेताना देवाला उराउरी भेटू शकत होते. चिंटुक पिंटुक देवळातही फुलं वाहायला मधे पुजारी बसलेला असतो. इथे थेट कॉण्टॅक्ट. प्यार की झप्पीच. अशी भक्ताची झप्पी घेता यावी म्हणून तो तिष्ठत उभा आहे. `उचनीच काही नेणो भगवंत। तिष्ठे भावभक्त देखोनिया।`

आमच्या विठ्ठलाला जात नसली, तरी बडव्यांना होतीच. १९४७ पर्यंत विठ्ठलाच्या देवळात अस्पृश्यांना अडवलं जात होतं. त्यासाठी साने गुरुजींनी उपोषण केलं आणि देवाला जातीभेदातून कायमचं मुक्त केलं. त्याला यावर्षी ७५ वर्षं पूर्ण होत आहेत. हे जेव्हा झालं तेव्हा सनातनी हादरले. त्यांनी काय केलं, तर महापूजा करतोय असं खोटच सांगून देवाचं देवपण एका घागरीतल्या पाण्यात उतरवून घेतलं. घोषणा केली की आता अस्पृश्यांच्या स्पर्शाने देव बाटलाय. मूर्तीत देवत्व उरलेलंच नाही. त्यामुळे आता देवळावर बहिष्कार घालायचा. फतवा निघाला.

साध्या भाविकांनी त्याची दखलही घेतली नाही, उलट डबल गर्दी झाली. पण सनातनी पक्के होते. त्यांच्या नादाला लागून मोठमोठे वारकरी महाराजलोकही बळी पडले. अनेकांनी बहिष्कार घातला. पण त्या विठ्ठलाची जादूच अशी की एकेक महाराज आपोआप देवळाकडे ओढले गेले.

घागरीत देवत्व उतरवण्याआधी मंत्र म्हणणारे गोपाळशास्त्री गोरेही शेवटी दर्शनासाठी आलेच. देवासमोर उभं राहून कितीतरी तास रडत राहिले. ही गोष्ट २९ ऑक्टोबर २००१ ची. म्हणजे एकविसाव्या शतकातली. माहेराची आस कुणालाही लावणारा हा विठोबा आहेच असा. `ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कुठे?` सांगा आहे असा दुसरा देव कुठला?

हेही वाचा: 

पंढरीची वारीः माऊलींच्या दिंडीतला एक दिवस

गाडगेबाबांच्या शेवटच्या कीर्तनाचा सामाजिक आशय

वारकरी संप्रदायाची सहिष्णुता आजच्या काळात महत्त्वाची

साडेसातशे वर्षांपूर्वीचे संत गोरा कुंभार आजही थोर का आहेत?