अशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं

१८ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ७ मिनिटं


आज अशोक गेहलोत तिसऱ्यांदा राजस्थानचे मुख्यमंत्री बनले. एका जादूगाराचा मुलगा ते देशातला एक आघाडीचा राजकीय मुत्सद्दी, हा त्यांचा प्रवास जबरदस्त आहे. ते मुख्यमंत्री असताना लढवलेल्या दोन्ही निवडणुकीत काँग्रेस हरली. तरीही आता ते पुन्हा मुख्यमंत्री झालेत. ही जादू एका बाजीगरचीच आहे.

चंद्रास्वामी बोले आणि नरसिंह राव हाले, अशी तेव्हा ख्याती होती. राजकारणातून रिटायर्ड झालेले नरसिंह राव पंतप्रधान होतील, अशी म्हणे चंद्रास्वामींनी भविष्यवाणी केली होती. ती खरी ठरली. मग प्रकांड पंडित वगैरे असणारे नरसिंह राव पंतप्रधान बनल्यावर त्याच्यासमोर लीन झाले. पाठोपाठ इतरही मोठमोठे नेते आणि मंत्रीही चंद्रास्वामींच्या पाया पडू लागले.

चंद्रास्वामींना शरण नाहीच

एकदा दिल्लीहून जयपूरला जाणाऱ्या विमानातही चंद्रास्वामींसमोर सत्तेवरचे प्यादे नतमस्तक होत होते. एक मंत्री मात्र त्यांच्यापासून मान फिरवून लांब जावून बसले होते. चंद्रास्वामींच्या हे लक्षात आलं. त्या मंत्र्याच्या कुंडलीत चंद्रास्वामी नावाचा ग्रह वक्री झाला तो तेव्हापासूनच.

आता हे खरं की नाही माहीत नाही. पण नंतर ही आख्यायिका खरी असावी, असं वाटायला लावणारी घटना घडली. पाली नावाच्या जिल्हयात काँग्रेसचा कार्यक्रम होता. तरुण मंत्र्यांनी आधी होकार कळवला होता. पण चंद्रास्वामी येणार आहेत म्हटल्यावर  त्यांनी आपला नकार कळवला.

हे करताना त्यांना त्याचे दुष्परिणाम माहीत होतेच. तसे ते झालेही. राव मंत्रिमंडळात वस्रोद्योग खात्याचा स्वतंत्र प्रभार मिळाल्यानंतर या मंत्र्यांचं काम उत्तम सुरू होतं. पण दोन वर्षं पूर्ण होण्याआधीच त्यांना डच्चू मिळाला. ते मंत्री आपली गाडी घेऊन रस्त्याच्या मार्गे जोधपूरला घरी पोचले. त्यांच्या वस्त्रोद्योग खात्यातल्या कामाचं आजही कौतुक होतं. पण त्याहीपेक्षा चंद्रास्वामीला शरण न जाणं जास्त कौतुकास्पद होतं. तो दिवस होता, १८ जानेवारी १९९३ आणि मंत्री होते अशोक गेहलोत.

पुढे मुख्यमंत्री बनल्यावर २००३ला प्रवीण तोगडियांना अटक करणं असो किंवा आसारामला गजाआड टाकणं असो, गेहलोतांची हीच लाईन पुढेही दिसून आली. पण ते देवभोळे म्हणावेत इतके धार्मिक मानले जातात. कायम देवळांना भेटी देतात. हे कसं काय, ते विचारू नका. तीच गेहलोतांची जादू आहे. 

गेम करणारा गेमचेंजर 

अशोक गेहलोत यांचा चंद्रास्वामींनी केलेला गेम पहिलाच होता. पण तो एकमेव नव्हता. पुढची काही वर्षं राजस्थानचं राजकारण मुळापासून बदलत होतं. त्या चढउतारांच्या काळात गेहलोत यांचे कितीदा गेम झाले आणि त्यांनी कुणाकुणाचे गेम केले, हे भल्याभल्यांना कळलेलं नाही. ते सारं राजकारण कोळून गेहलोत देशातले एक आघाडीचे राजकीय मुत्सद्दी बनून तिसऱ्यांदा राजस्थानचे मुख्यमंत्री बनले.

लोक म्हणतात मुख्यमंत्री बनण्यासाठी गेहलोतनी सचिन पायलट यांचाही गेम केलाय. साडेचार वर्षं खपून सचिन पायलट यांनी काँग्रेसच्या विजयाची जमीन नांगरली होती. वसुंधरा राजे सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष उफाळून आला होता. काँग्रेसला सव्वाशे तरी सिटा मिळणार आणि तरुण तडफदार सचिन पायलट मुख्यमंत्री बनणार, हे नक्की मानलं जात होतं.

एक्झिट पोलमधे दिसणारा काँग्रेसचा दणदणीत विजय प्रत्यक्षात उतरेपर्यंत अगदी कट टू कट झाला. हे सारं गेहलोत यांचं राजकारण असू शकतं. द टेलिग्राफच्या जे. पी. यादव यांनी जोधपूर आणि बिकानेरमधे फिरून केलेल्या रिपोर्टमधे हे अगदी बारकाव्यांनिशी सूचित केलंय. तिकीट वाटपाची समीकरणं फिरवून आणि बंडखोरांना खतपाणी घालून गेहलोत यांनी हे करून दाखवलंय म्हणे. यापूर्वी २००८ला असेच प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या सीपी जोशींनी मेहनत करून निवडणूक जिंकून दिली होती. पण ते स्वतः त्यांच्या मतदारसंघात पडले. ते आपोआप पडले की गेहलोतांनी सोंगट्या फिरवून पाडलं, हे कुणालाच कळलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपद गेहलोतांकडे चालत आलं. त्यामुळे सीपी जोशींचा गेम झाला, त्याची पुनरावृत्ती गेहलोत पुन्हा करणारच नाहीत, अशी खात्री कुणी देऊ शकत नाही.

बीबीसी हिंदीने ज्येष्ठ संपादक विजय त्रिवेदी यांचा हवाला देऊन लिहिलंय, `सचिन पायलट मुख्यमंत्री पदासाठी अडून होते. त्यांच्या समर्थकांनी निदर्शनंही केली. ते त्यांच्या विरोधात गेलं. दुसरीकडे गेहलोत खूपच प्रगल्भ आहेत. स्वतःहून काहीच मागत नाहीत. त्यांचे समर्थकही शांत राहतात. या सगळ्याचा प्रभाव तर पडतोच.` गेहलोत यांनी काही मागितलं नाही. पण परिस्थितीच अशी निर्माण केली की मुख्यमंत्रीपद त्यांच्या झोळीत येऊन पडलं.

निवडणुकीसाठी बाईक विकली 

याचा अर्थ गेहलोतनी दिल्लीवाल्यांकडे कधीच काही मागितलं नाही असं नाही. १९७७ मधे संजय गांधींकडे त्यांनी पहिलं विधानसभेचं तिकीट मागितलं होतं. पण तेव्हा काँग्रेसकडे उमेदवारच नव्हते. आणीबाणीनंतर केंद्रात काँग्रेसचा पराभव झालेला होता. जुनेजाणते काँग्रेस नेते पक्ष सोडून गेले होते. अशा संकटकाळात काँग्रेसच्या तिकीटावर जोधपूरच्या सरदारपुरा मतदारसंघात त्यांनी चांगली फाईट केली.

स्वतःकडची एक बाईक होती. तीदेखील विकली. त्याचे चार हजार रुपये मिळाले. त्यावर निवडणूक लढवली. स्वतःचे पोस्टर स्वतः चिटकवले. फक्त साडेचार हजार मतांनी पराभव झाला. निराश होणं त्यांच्या स्वभावात नव्हतं. दुसऱ्या दिवशी मतदारांचे आभार मानायला जोधपूरच्या गल्ल्यांमधे फिरत होते. जोधपूरकरांसाठी ही नवलाईच होती.

हारकर जितनेवाले को बाजीगर कहते हैं. हा डायलॉग गेहलोतांच्याबाबतीत खरा ठरला.  त्यानंतर त्यांना गांधी घराण्याकडे काही मागावं लागलं नाही. १९८०च्या लोकसभा निवडणुकीत जोधपूरची उमेदवारी त्यांच्याकडे चालत आली. आताही पैसे नव्हते. मित्राच्या सलूनमधेच प्रचाराचं ऑफिस थाटलं. त्याचीच बाईक घेऊन प्रचार केला. तब्बल ५२ हजार मतांनी ते निवडून आले.

गांधी नावाच्या जादुगाराचं गारुड

इंदिरा गांधी गेहलोतांवर खूश होत्याच. त्यांच्याच सांगण्यावरून ते राजकारणात आले होते. नाहीतर पोट भरण्यासाठी जादूचे खेळ आणि फावल्या वेळात समाजसेवा असा त्यांचा प्लान होता. त्यांचे वडील लक्ष्मणसिंग जादूगार होते. देशभर फिरून जादूचे खेळ करायचे. अशोक गेहलोतांनीही वडिलांच्या निधनानंतर काही वर्ष जादूचे प्रयोग केले. पण त्यांच्यावर जादू केली होती एका महान जादूगाराने. त्यांचं नाव होतं महात्मा गांधी.

बारावीत असताना गेहलोतना गांधी शांती प्रतिष्ठानच्या लायब्ररीत गांधीजी भेटले. त्यामुळे ते विनोबांच्या तरुण शांती सेनेत सक्रीय झाले. वर्ध्यात जाऊन सेवाग्राम आश्रमात राहिले. परतले ते खादीधारी गांधीवादी बनून. तेवढ्यात १९७१ चं बांगलादेश युद्ध झालं. भारतात आलेल्या शरणार्थींच्या शिबिरांमधे स्वयंसेवक म्हणून थेट बॉर्डरवर पोचले. अशाच एका शिबिरात पंतप्रधान इंदिरा गांधी आल्या होत्या. या चूपचाप आपलं काम करणाऱ्या तरुणाला त्यांनी आदेश दिले, काँग्रेस जॉईन कर.

राजस्थानात परतून गेहलोतांनी एमए इकॉनॉमिक्समधे अॅडमिशन घेतलं. राजकारण माहीत नव्हतं. युनिवर्सिटीच्या निवडणुकीत दणकून पडले. पण गांधी घराण्याचा हात डोक्यावर होता. एकदा एक कार्यकर्ता दिल्लीहून बाईक घेऊन जोधपूरला पोचला. त्याच्याकडे संजय गांधींचा आदेश होता. आणि एका झटक्यात अशोक गेहलोत एनएसयूआय या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे राज्यप्रमुख बनले.

आणीबाणीच्या काळात त्यांनी संजय गांधींच्या आदेशावरून राज्यभर वीसकलमी कार्यक्रमाचा प्रचार केला. संजय गांधी खुश झाले. गेहलोत त्यांच्या जवळच्या वर्तुळात पोचले होते. त्यांची जादूही त्या दरबारी राजकारणात जादू करत होती. संजय गांधी मित्रांच्या बैठकांत असायचे तेव्हा गेहलोत जादू करून दाखवत. त्यामुळे ते संजय गांधींचे लाडके `गिलीबिली` बनले. त्याच नावाने दिल्लीत त्यांची ओळख बनली. पण पुढे ते संजय गांधींहीपेक्षा राजीव गांधींच्या जवळ गेले.

मंत्रीपदाची शपथ घ्यायला ऑटोरिक्षाने पोचले 

संजय गांधींच्या निधनानंतर राजीव गांधी इंदिरांच्या मदतीसाठी राजकारणात उतरले होते. नव्या नेत्यांची मोट बांधत होते. आपल्यासारख्याच शांत आणि नम्र गेहलोतांवर त्यांची मर्जी बसली. म्हणूनच गेहलोत खासदार बनल्यावर पहिल्यांदा मंत्रिमंडळ विस्तार झाला. तेव्हा १९८२ साली ते वयाच्या अवघ्या एकतिसाव्या वर्षी इंदिरा गांधींच्या कॅबिनेटमधे मंत्री बनले. मंत्रिपदाची शपथ घ्यायला ते ऑटोरिक्षातून राष्ट्रपती भवनात पोचले. चौकीदार त्यांना गेटमधून आत जाऊ देत नव्हता, असा किस्सा राजस्थानातले ज्येष्ठ पत्रकार नारायण बारेठ यांनी लिहलाय.

पेशाने पायलट असणाऱ्या राजीव गांधींना आपल्या आयडिया प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपला माणूस हवाई वाहतूक खात्यात हवा होता. त्यासाठी गेहलोत त्या खात्याचे उपमंत्री बनले. पंतप्रधान बनल्यावर राजीवना राजस्थानात जुन्या ढुढ्ढाचार्यांना हटवून नवी मांडामांड करायची होती. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी गेहलोतना दिल्लीहून जयपूरला त्या कामगिरीवर पाठवण्यात आलं. ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनले. या काळात त्यांनी मुख्यमंत्री हरिदेव जोशी यांचा गेम कसा केला, याची कहाणी लल्लनटॉप डॉट कॉमचे संपादक सौरभ द्विवेदी यांनी एका विडियोत सांगितलीय.

हवालदाराच्या इशाऱ्याने मुख्यमंत्र्यांचा गेम

राजीव गांधींनी १९८८ला राजस्थानच्या सरिस्का पार्कमधे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक ठेवली होती. राजस्थानात दुष्काळ होता. त्यामुळे त्यावर टीका झाली. राजीवनी बैठक रद्द करण्याऐवजी ती साधेपणाने आयोजित करण्याचे आदेश दिले. सरकारी लवाजमा सोबत न आणता खासगी गाडीने बैठकीसाठी यायला सांगण्यात आलं. राजीव स्वतःची गाडी स्वतः चालवत सरिस्काला निघाले.

आदल्याच चौकावर ट्राफिक हवालदार उभा होता. सरिस्का समोर होतं, पण त्याने हातानेच राजीव गांधींच्या गाडीला डावीकडे वळण्याचा इशारा दिला. गाडी एका मैदानात पोचली. तिथे सरकारी गाड्यांची ही गर्दी होती. राजीव काय समजायचं, ते समजले. मुख्यमंत्री हरिदेव जोशी पंतप्रधानांना फसवून चूपचाप आदेश धुडकावत होते. हवालदाराने राजीव गांधींना चुकीची दिशा दाखवली, ही अशोक गेहलोतांची जादू असल्याचं गुपित उघड होतं. त्याआधीच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री बुटासिंग यांच्या मदतीने गेहलोतांनी जोशींच्या राजकीय विसर्जनाची तयारी केलेली होती. हवालदाराच्या इशाऱ्यामुळे महिनाभरात मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला.

अशोक गेहलोतांनी शिवचरण माथुरांना मुख्यमंत्री बनवलं. पण आता गेहलोतांचा गेम व्हायचा होता. हरिदेव जोशी पुन्हा मुख्यमंत्री बनले आणि गेहलोत दिल्लीत मंत्री. राजीव गांधींची हत्या झाली, तेव्हा गेहलोत लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात होते. त्यांना रडूच कोसळलं. त्यांच्या जवळची माणसं म्हणतात गेहलोतना एकदाच रडताना पाहिलं. त्यांच्यासाठी तो मोठाच धक्का होता. नरसिंह रावांनी त्यांच्या सरकारमधे गेहलोतना फारशी संधी दिली नाही. पण गेहलोतनी त्यातही काम करून दाखवलं. त्यानंतर शांतपणे नव्या संधीची वाट बघत राहिले.

ये मारवाड का गांधी हैं

गुजरात निवडणुकीत गेहलोत यांच्यासोबत काम केलेले महाराष्ट्रातले एक नेते सांगतात,

`अशोक गेहलोतांना भेटल्यावर ते एकदम साधे वाटतात. केस विचित्र पद्धतीने उडत असतात. कपड्यांना इस्त्री नसते. कुणीही त्यांना भेटू शकतं. कधीही ते उद्धटपणा करताना दिसणार नाहीत. काहीही झालं तरी ते काँग्रेस सोडून जाणार नाहीत आणि पक्षाचं काही लुबाडून घेऊन जाणार नाही, असा  दिल्लीतल्या  नेत्यांना विश्वास आहे. कोणत्याही उद्योगसमूहाशी त्यांची घसट नाही. एकदा जम्मू काश्मीरमधे प्रभारी असताना त्यांना पक्षाने निवडणूक खर्चासाठी बराच मोठा निधी दिला होता. त्यांनी त्यातल्या पै आणि पैचा हिशेब दिलाच. शिवाय उरलेले पैसे परत पार्टी फंडात जमा केले. याचमुळे मुख्यमंत्रीपद गेल्यानंतरही ते पक्षाचे सरचिटणीस बनले. राहुल गांधींचे सल्लागार बनून पक्षात नंबर दोनवर पोचले.`

हे सारं खरंच आहे. पण मंत्री असतानाही प्रियांका आणि राहुलला जादू दाखवत खेळवायचे, हाही त्यांचा मोठा प्लस पॉइंट ठरलाच. गेहलोत १९९४ मधे पुन्हा राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष झाले. जवळपास पाच वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी राजस्थान ढवळून काढला. भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री भैरोसिंह शेखावत यांच्यावर तुफान हल्ला चढवला.

`अशोक नही ये आंधी हैं, ये मारवाड का गांधी हैं`, ही घोषणा तेव्हाच गाजली. खऱ्या अर्थाने त्यांना आपल्या राजकारणाची नस सापडली ती इथेच. आधीच्या कार्यकाळात कोत्या दरबारी राजकारणाच्या कारस्थानांत अडकले होते. आता ते लोकांशी कायमचे जोडले गेले. यंदाच्या निवडणुकीत राजस्थानात काँग्रेसला जिंकून देणारी संघटना गेहलोतनी याच काळात उभारलेली आहे. तिच्या जोरावरच ते आता मुख्यमंत्री बनलेत.

ते जमिनीशी जोडलेले आहेत. आजही कधी कंटाळा आला की जोधपूरला जातात. पहिली निवडणूक लढवताना त्यांनी जिथे प्रचार कार्यालय उभारलं होतं, त्या सलूनमधे जाऊन गप्पा मारतात. असं म्हणतात की त्यांच्या गाडीत नेहमी पार्ले जीचे पुडे असतात. प्रवासात कुठे चहाचा ठेला दिसला की गाडी थांबवतात. बिस्कीटचे पुडे घेऊन चहा पितात. लोकांशी गप्पा मारतात. असा मोठ्या पदांवर असूनही जमिनीशी जोडलेला नेता महाराष्ट्रात काँग्रेस सोडाच, इतर कोणत्या पक्षातही दिसत नाही.

दोनदा निवडणूक हरले 

गेहलोत १९९८ ते २००३ आणि २००८ ते २०१३ असे दोनदा मुख्यमंत्री होते. या दोन्ही काळात त्यांच्या अनेक योजना गाजल्या. पहिल्या टर्ममधे त्यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी केलेल्या योजना नंतर देशपातळीवर राबवण्यात आल्या. त्यांची दुसरी टर्म मात्र तितकी लोकप्रिय नव्हती. इतर नेत्यांना स्पेस न ठेवण्याचा आरोप त्यांच्यावर झाला. त्यांच्या योजना लोकप्रिय होत्या. पण २०१३ च्या विधानसभा निवडणुकीतल्या मोदी लाटेत आपल्या पायाखालची जमीन सरकतेय याचा अंदाजच त्यांना आला नाही.

राजस्थानमधे काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अरुणा रॉय यांनी एकदा म्हटलं होतं, अशोक गेहलोत सरकार चांगलं चालवतात. पण त्यांना निवडणूक काही जिंकता येत नाही. हे बऱ्याच अंशी खरं आहे. मुख्यमंत्रीपदावर असताना त्यांनी दोनदा राजस्थान विधानसभेची निवडणूक लढवली. दोन्हीवेळेस ते निवडणूक हरले. गुजरातमधे प्रभारी असताना त्यांनी विधानसभा निवडणुकीत मोदी आणि शहांना रडकुंडीला आणलं. पण तिथेही निवडणूक जिंकू शकले नाहीत. कर्नाटकात मात्र त्यांनी कुमारस्वामींशी मेतकूट जमवून पराभवानंतरही सत्तेचं गणित जुळवलं.

कदाचित त्यांना ग्लॅमर नाही, हे त्यांच्या निवडणुकीतल्या पराभवांचं कारण होतं. म्हणूनच यंदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने सचिन पायलट या तरुण चेहऱ्याकडे राजस्थानची धुरा दिली. त्यामुळे पक्षाला यशही मिळालं. पण शेवटी राजकारणाच्या जादूगाराने बाजीगरी दाखवलीच. गेहलोत यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. शपथविधीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 

`मी जादूगार तर आहेच. जादू करत करतच मी इथपर्यंत पोचलोय. माळी समाजाचा मी माणूस. दोनशे आमदारांमधे मी एकटा या जातीचा. तरीही मला मुख्यमंत्री बनवलं जातं वारंवार. ही जादू नाहीय का? तीनदा केंद्रीय मंत्री बनलोय. तीनदा प्रदेशाध्यक्ष बनलोय. ही जादूच तर आहे.` 

कधीकाळी पोटाची खळगी भरण्यासाठी जादू करणाऱ्या एका जादूगाराने राजकारणात केलेली ही जादू भल्याभल्यांना तोंडात बोटं घालायला लावणारी आहे.