वारसा सचोटीचा आणि निडरपणाचा : अशोक शिंदे यांच्या आठवणी

०४ मे २०२१

वाचन वेळ : ७ मिनिटं


महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे ते नातू अशोक शिंदे याचं ३० एप्रिलला निधन झालं. होते. ते एअर फोर्समधील वीरचक्र विजेते मोठे अधिकारी होते. शिवाजी विद्यापीठातील महर्षी शिंदे अध्यासनाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांच्या आग्रहाखातर त्यांनी काही आठवणी लिहिल्या होत्या. मूळ इंग्रजीत लिहिलेल्या आठवणींचा डॉ. संतोष कोटी यांनी केलेला अनुवाद पहिल्यांदाच वाचकांसमोर येत आहे.

माझा जन्म ३ डिसेंबर १९३६ चा. म्हणजे माझे आजोबा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे त्यांच्या वडिलांच्या आठवणीत बांधलेल्या रामविहार या नवीन घरात रहायला गेल्यानंतर अगदी दोनच महिन्यात झालेला. उर्मिला, दमयंती आणि सुजाता या तीन मोठ्या बहिणीनंतर जन्मलेला मी पहिला मुलगा. आजोबांच्या मांडीवर ठेवल्यानंतर ते आनंदाने म्हणाले, ‘काय रे पोरा, जन्म घेण्यापूर्वी तू स्वतःच्या मालकीच्या घराची वाट बघत होतास का?’  त्यांनीच माझं नाव अशोक असं ठेवलं. 

१९३८ च्या सुरवातीला केव्हातरी महात्मा गांधी माझ्या आजोबांना भेटायला आले होते. आमच्या प्रथेप्रमाणे आजोबांनी मला त्यांच्या मांडीवर आशीर्वादासाठी ठेवलं. गांधीजींनी माझं नाव विचारलं तेव्हा आईनं ‘अशोक’ असं सांगितलं. माझ्या कपाळावर हात ठेवून गांधीजींनी आशीर्वाद दिला ‘मोठा झाल्यावर सम्राट अशोकाइतकाच शूरवीर होशील असा मी तुला आशीर्वाद देतो.’ माझ्या एअर फोर्सच्या कारकिर्दीत १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान फायटर पायलट म्हणून केलेल्या शौर्याबद्दल मला वीरचक्र बहाल करण्यात आलं तेव्हा गांधीजींच्या या आशीर्वादाची आठवण झाली.

भूतांपेक्षा माणसं धोकादायक

माझं प्राथमिक शिक्षण आमच्या घराजवळच्या शिवाजी नगर इथल्या महानगरपालिकेच्या शाळेत झालं. माध्यामिक शिक्षणासाठी शनिवार पेठेतल्या नानावाड्यातल्या न्यू इंग्लिश स्कूलला प्राधान्य दिलं. उच्च शिक्षणासाठी यूकेला जाण्यापूर्वी माझे आजोबा नाना वाड्यात शिकवत होते.

माझे चुलते रवींद्रकाका यांनी बडोदा लाईट इन्फंट्रीमधे सेवा बजावली होती आणि निवृत्तीपूर्वी बर्माच्या युद्धात लढले होते. ते मला ओंकारेश्वर घाटावर रात्री फिरायला घेऊन जायचे. यामागे त्यांना फक्त हेच सिद्ध करायचं असायचं की या जगात आपल्या कल्पनेतली भुतं अस्तित्वात नाहीत. ते म्हणायचे की भुतं हे आपल्या मनातल्या भीतीमुळे निर्माण होतात. आपण कल्पना करतो त्या भुतांपेक्षा माणसंच जास्त धोकादायक असतात.

माझ्या बालपणातल्या माझ्या मनातली काल्पनिक भीती दूर करण्यात रवींद्रकाकांनी मला निश्चितच मदत केली. त्यांच्या या शिकवणुकीमुळे मी भविष्यकाळात इंडियन एअर फोर्सचा एक निडर असा फायटर पायलट होऊ शकलो.

हेही वाचा : वाचा मटका किंग रतन खत्रीची सगळी कुंडली

मदतीचा धडा

आमच्या शिवाजीनगर मधल्या रामविहार या घरापासून नानावाड्यातल्या न्यू इंग्लिश स्कूलला जाताना मला मुळा मुठा नदी जवळ बांधलेला रस्ता ओलांडून जावं लागायचं. या रस्त्याची उंची उन्हाळ्यात नदीवर दोन फूट असायची. पावसाळ्यात मात्र जास्त पाऊस झाला तर रस्त्यावर एक दोन फूट वर पाणी यायचं. शाळेला जाण्यासाठी महानगर पालिकेजवळ बांधलेल्या नव्या पुलावरून शनिवारवाड्यामार्गे अजून एक रस्ता होता. पण मी तो फार क्वचितच वापरे. 

एके दिवशी संध्याकाळी ४ नंतर मी घरी परतत असताना शनिवारपेठेजवळ हा रस्ता ओलांडत होतो. मध्यावर आल्यावर मला नदीत एक माणूस तरंगताना दिसला. त्याने आपल्या हातांनी रस्त्याचा कठडा घट्ट धरून ठेवला होता आणि मदतीसाठी ओरडत होता. तरीसुद्धा पाण्यात घसरून पडण्याच्या भीतीने कुणीही जाणारा-येणारा मदत करायला तयार नव्हता.

मी एका दगडावर माझा पाय घट्ट रोवून त्याला माझा हात पुढे केला. त्याने माझा हात घट्ट पकडला आणि खूप ताकतीने वर ओढल्यानंतर तो वर आला. पण मी घसरून पाण्यात पडलो. कसातरी रस्त्याचा काठ पकडला. मी माझ्या डाव्या हाताने रस्त्याचा काठ पकडून ठेवला होता. उजव्या हातात असलेली शाळेची पिशवी मी भिजू नये म्हणून हात पाण्याच्या पातळीच्या वर धरली होती. हा बदमाश माणूस म्हणाला, ‘मोठे उपकार केलेस माझ्यावर. पण मी तुला मदत करू शकत नाही.’

या अवस्थेत उजव्या हातात शाळेची पिशवी पाण्याच्या पातळीवर धरून मी फक्त मदतीसाठी ओरडत होतो. पण कुणीही आपला जीव धोक्यात घालून मला मदत करायला तयार नव्हतं. आता माझ्यासाठी एकच मार्ग उरला होता, तो म्हणजे शाळेची पिशवी धरलेला उजवा हात पाण्याखाली घेऊन स्वतःला जोर देवून रस्त्यावर ढकलणं. मी तसं केलं आणि वर रस्त्यावर आलो. पण माझी शाळेची पिशवी पूर्णपणे भिजली होती.

मी घरी पोचलो तेव्हा आई मला भरपूर ओरडली. पण तिला ही सगळी घटना सांगितली तेव्हा तिने भरल्या डोळ्यांनी मला जवळ घेतलं आणि म्हणाली. ‘माझा शूर बाळ, मी तुझ्या धाडसाचं कौतुक करते. तू त्या बुडणाऱ्या माणसाची मदत केलीस, तो माणूस खूपच निर्लज्ज होता. जेव्हा तुला गरज होती त्याने तुला मदत केली नाही. पण भविष्यात धडा घे. अशा बदमाश लोकांना मदत करायची नाही. पण हेही लक्षात ठेव की जेव्हा आपण इतरांची मदत करतो. तेव्हा त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा करू नये.’ मी जीवनात शिकलेला हा सर्वात मोठा धडा होता.  

आजोबांचं निधन

२ जानेवारी १९४४ च्या पहाटे माझे आजोबा महर्षी शिंदे यांचं निधन झालं. मी तेव्हा सात वर्षांचा होतो. मी माझ्या आई-वडलांच्या आणि काका, काकूंच्या रडण्याच्या आवाजामुळे जागा झालो. मी पळत माझ्या आजोबांच्या खोलीकडे आलो. पाहिले की माझे आजोबा त्यांच्या अंथरुणावर शांतपणे झोपले होते आणि त्यांच्या भवताली बसलेले सगळेजण आपली छाती बडवत जोरात रडत होते. हे पाहून मी स्वतःला सांभाळू शकलो नाही आणि जोरात ओरडलो, ‘तुमच्या मोठ्या आवाजामुळे आजोबा उठतील. त्यांना झोपू द्या. ओरडू नका.’

हे ऐकल्यानंतर सगळ्यांचं रडणं आणखी जोरात वाढलं आणि माझी आजी रुक्मिणीबाईनं मला जोरात छातीला कवटाळले आणि म्हणाली, ‘हो रे बाबा. तुझे आजोबा आता ईश्वराला भेटण्यासाठी स्वर्गात पोचले आहेत रे बाळा.’ हे आजीचे शब्द ऐकून सर्वांच्या रडण्याची लय आणखीनच वाढली. नंतर माझ्या आजोबांची बहीण जनाक्का हिने मला या पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या मानव आणि इतर प्राणिमात्रांच्या जीवन  मरणाबद्दलच्या गोष्टी  समजावून सांगितल्या.

हेही वाचा : महर्षी शिंदेंच्या डायऱ्या सांगतात, ११० वर्षांपूर्वीच्या प्लेगचा कहर

वडिलांचा प्रामाणिकपणा

कॅम्प भागातल्या पुणे पाणीपुरवठा कार्यालयात आपल्या सायकलीवरून रोज कामाला जाणारे माझे वडील मला आजही आठवतात. माझे वडील प्रतापराव यांना नोकरी नव्हती तेव्हा आजोबांच्या वतीने कलेक्टर कचेरीजवळच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी ते जात. एके दिवशी ते बँकेत रांगेत उभे होते. पैसे काढून परत फिरताना त्यांनी पाहिलं की आधी पैसे काढून गेलेल्या व्यक्तीची पैशाने भरलेली पिशवी तिथंच राहिली होती. 

माझ्या वडिलांनी लगेच कॅशिअरला त्या व्यक्तीचं नाव आणि पत्ता विचारला. कॅशिअरने त्या व्यक्तीचं नाव जी.एम. कोलेट असून ते कण्टोनमेंटमधल्या पुणे वॉटर वर्क्स ऑफिसचे प्रमुख असल्याचं सांगितलं. ते ब्रिटिश अधिकारी होते. माझ्या वडिलांनी ती पिशवी घेतली आणि सायकल चालवत, चौकशी करत करत तिथं पोचले. ते थेट कोलेट यांच्या कार्यालयात गेले. त्यांच्या टेबलावर ती पिशवी ठेवून त्यांना सांगितलं की ही पिशवी ते बँकेत विसरून आलेत. 

कॅशिअरच्या खिडकीजवळ घाईत तसेच बॅग सोडून आले होते. कोलेट यांना ती पिशवी पाहून खूप आनंद झाला. त्यांनी माझ्या वडिलांचे मनापासून आभार मानले. माझ्या वडिलांच्या प्रामाणिकपणावर ते फार प्रभावित झाले. वडील बेरोजगार आहेत हे कळताच कोलेट म्हणाले, ‘मी तुला पुणे वॉटर वर्क्सचा मुख्य रोखपाल म्हणून नियुक्त करतोय. उद्यापासून तू कामाला येऊ शकतोस.’

माझ्या वडलांना खूप आनंद झाला. आपल्याला खूप निकड असताना मिळालेल्या या नोकरीबद्दल त्यांनी कोलेट यांचे आभार मानले. प्रामाणिकपणा हा आपल्या अस्तित्वाचं सर्वांत उत्तम गुणवैशिष्ट्य आहे. मला आठवतं मी या गुणांचं शाळेत, कॉलेज आणि नोकरी काळात कायम काटेकोरपणे पालन केलं.

झाशीच्या राणीचाही वारसा

माझी आई बडोद्याचे महाराज कृष्णराव गायकवाड यांची नात होती. महाराजांना मुलगा नसल्याने त्यांनी इंदोर राजघराण्यातून झाशीच्या राणीचे वंशज असलेल्या सयाजीरावांना दत्तक घेतलं. सयाजीराव महाराजांनी महर्षी शिंदेंना इंग्लंडमधे शिक्षण पूर्ण करायला मदत केली. वास्तविक महर्षींनी कायद्याचा अभ्यास करावा अशी महाराजांची इच्छा होती. पण महर्षींनी धर्मशास्त्राचा अभ्यास केला. हा इतिहास महर्षींच्या ‘माझ्या आठवणी व अनुभव’ या चरित्रग्रंथात विस्तृतपणे आलाय.

जनाक्का, माझ्या आजोबांची बहीण, ही आमच्या बालपणातली आमची सर्वात जवळची मैत्रीणच होती. मला आजही आठवतं तिच्या कुशीत झोपलो असताना ती आम्हाला आजोबांसोबतच्या जमखंडीमधल्या त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगायची. तिच्या या आठवणींमुळे माझ्यात निर्भीड, शूरपणा या गुणांची जोपासना झाली. 

जनाक्काच्या नात्यातले अण्णाप्पा काळे हे पुण्यात शेतकी कॉलेजजवळ राहत होते. मी एअरफोर्समधे फायटर पायलट म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांना भेटायला गेलो असता त्यांच्या आईला खूप आनंद झाला. मी आकाशात एखाद्या पक्ष्याप्रमाणे विमान उडवतो ही गोष्ट तिला खूपच रोमांचक वाटली. तिने मला सल्ला दिला, ‘अशोक नेहमी तुझे विमान सावकाश आणि कमी उंचीवरून नेत जा. विमान कोसळले तर तुला फारशी इजा होणार नाही.’ साहजिकच अशा रीतीने जेट फायटर उडवणं फारच धोकादायक ठरू शकतं हे त्या माऊलीला माहीत नव्हतं.

हेही वाचा : वि. रा. शिंदेः ते रोज एकदा अस्पृश्यांबरोबर जेवत

पहिलं विमान उड्डाण

हिंदुस्थान ट्रेनरच्या भारतीय बनावटीच्या एचटी-२ या प्रोपेलर पद्धतीच्या एअरक्राफ्टच्या प्रशिक्षणासाठी मला जोधपूर एअरफोर्स स्टेशनस्थित एअरफोर्स फ्लाईंग कॉलेज इथं रुजू व्हायाचं होतं. मला आजही माझं पहिलं उड्डाण आठवतं. माझे प्रशिक्षक विमान वर उडवायला मदत करत हवेत उंच घेऊन गेले होते. पक्ष्याप्रमाणे हवेत वर जाताना मला फार छान वाटत होतं. त्यांनी मला त्यातल्या अनेक युक्त्या शिकवल्या. वर जाणं, दोन्ही बाजूला वळणं, खाली येणं आणि शेवटी हवाई वाहतूक करणं. उदा. रोल्स, वर्टिकल लुप्स इ.

तो अनुभव खूपच रोमहर्षक होता. आकाशातल्या मुक्त पक्ष्याप्रमाणे मला अनुभूती येत होती. सरतेशेवटी त्यांनी मला एअरफिल्ड भोवती सर्किट कसं करावं आणि धावपट्टीवर फेरी मारून विमान कसं उतरवावं हे शिकवलं. नंतरच्या आठवड्यात सहा खेपा केल्यानंतर त्यांनी मला सगळ्या गोष्टी पुन्हा व्यवस्थित समजावून सांगून एकट्याने स्वतंत्र उड्डाण करायला परवानगी दिली. 

त्या दिवशी सकाळी मी एअरक्राफ्ट सुरू केलं आणि टारमॅकपासून धावपट्टीपर्यंत उड्डाणासाठी गेलो. मी माझ्या आईवडलांचं आणि माझे स्वर्गीय आजोबा महर्षी शिंदे यांचं स्मरण केलं आणि आशीर्वाद मागितला. मी उड्डाण केलं तेव्हा मला खरोखरच एखाद्या मुक्त पक्ष्याप्रमाणे वाटलं. प्रशिक्षणात शिकवलेली सगळी कौशल्‍यं वापरून माझं उड्डाण पूर्ण केलं. शेवटी मी माझ्या एअरफिल्डवर व्यवस्थित परतलो आणि विमान धावपट्टीवर उतरवलं.

इंजिन बंद करून मी विमानावरचं छत उघडून खाली आलो. माझे प्रशिक्षक माझी वाट पाहत खाली उभे होते. हस्तांदोलन करून त्यांनी माझं माझ्या पहिल्या यशस्वी उड्डाणाबद्दल अभिनंदन केलं. माझ्यासाठी हे खूप मोठं स्वागत होतं. हे प्रशिक्षण सहा महिने चाललं. यानंतर मला पोपेलर पद्धतीच्या टी६ जी एअरक्राफ्टवरचं प्रगत प्रशिक्षण घ्यावं लागणार होतं.

‘नभ’ पुरस्काराचा गौरव

टी६ जीच्या सहा महिने चालणाऱ्या उड्डाण प्रशिक्षणाला इंटरमेडियट प्रशिक्षण म्हटलं जायचं. या प्रशिक्षणासाठी माझे प्रशिक्षक होते अॅडमिरल ताहिलियानी. तेव्हा त्यांची कनिष्ठ श्रेणी होती. इचटी- २ वर त्यांनी मला प्रशिक्षण दिलं. मी त्यांचा पहिलाच विद्यार्थी होतो. माझ्या प्रशिक्षणानंतर जाहीर करण्यात आले की मी माझ्या फ्लाईंगच्या अभ्यासक्रमामधे पहिला आलो आहे. मला ‘नभ’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. 

मला फायटर फ्लाईंग हे क्षेत्र निवडण्याचा पर्याय देण्यात आला. फायटर फ्लाईंगसाठी हैदराबाद इथल्या हकीमपेठ एअरफिल्डला जाण्यासाठी माझी निवड करण्यात आली. हकीमपेठला रुजू होण्यापूर्वी आम्हाला एक महिना सुट्टी देण्यात आली. पुण्यात घरी सर्वजण माझी वाट पाहत होते. घरी गेल्यावर पहिल्यांदा मी आईच्या पायाला स्पर्श केलं आणि ‘नभ’ पुरस्कार आईच्या पायाशी ठेवला. माझे बहुतांश मित्र मला भेटण्यासाठी आणि माझ्याकडून रोमहर्षक उड्डाणाच्या कथा ऐकण्यासाठी आले होते. एक महिन्यानंतर वॅम्पायर जेट एअरक्राफ्ट उडवण्यासाठी मी हकीमपेठला रवाना झालो.

हेही वाचा : 

तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?

शाहू महाराजांच्या एन्फ्ल्युएन्झा मंडळानं स्पॅनिश फ्लूला रोखून दाखवलं!

पंतप्रधान म्हणाले ते Y2K संकट, ही तर २१ व्या शतकातली पहिली ग्लोबल फेक न्यूज

मराठ्यांना रोखण्याचा प्रस्ताव मांडणाऱ्या गोळवलकरांना बाबासाहेबांनी काय उत्तर दिलं?