अँथनी अल्बानीज: मोदींच्या मित्राला हरवणारा ऑस्ट्रेलियाचा नवा पंतप्रधान

२४ मे २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


ऑस्ट्रेलियन संसदेच्या निवडणुकीत मागच्या दशकभरापासून सत्तेत राहिलेल्या आणि 'फॅमिली मॅन' अशी ओळख बनवलेल्या स्कॉट मॉरिसन यांचा पराभव झालाय. विरोधी पक्षनेते असलेले मजूर पक्षाचे अँथनी अल्बानीज ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान बनलेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान 'क्रांती नको, बदल हवाय' अशी घोषणा अल्बानीज यांनी दिली होती. त्या घोषणेला ऑस्ट्रेलियन जनतेनं प्रतिसाद देत त्यांना सत्तेत बसवलंय.

३ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असलेल्या ऑस्ट्रेलियात २१मेला सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीत तब्बल दशकभर सत्तेत असलेल्या लिबरल पक्षाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचा पराभव झाला. 'फॅमिली मॅन' अशी मॉरिसन यांनी स्वतःची ओळख बनवली होती. पण ही ओळख त्यांच्या दुसऱ्या टर्ममधे फसवी ठरली. 'क्रांती नको, बदल हवाय' अशी घोषणा देणाऱ्या मजूर पक्षाच्या अँथनी अल्बानीज यांना लोकांनी सत्तेत आणलं.

हेही वाचा: स्वर्गातल्या वडलांना येस पप्पा म्हणणाऱ्या जॉनी बिअरस्टोची गोष्ट

एकल आईने सांभाळलं

अँथनी अल्बानीज यांचा जन्म २ मार्च १९६३ला सिडनीत झाला. त्यांचे वडील कार्लो अल्बानीज इटालियन तर आई मॅरिन ऍलेरी या ऑस्ट्रेलियन होत्या. अँथनी यांच्या जन्मानंतर त्यांचे आईवडील वेगळे झाले. अँथनी आपल्या वडलांना कधीच भेटले नाहीत. त्यांच्या आईने एकट्यानेच त्यांचा सांभाळ केला.

अँथनी यांच्या आजोबांचा एक छोटा व्यवसाय होता. त्यामुळे आजी-आजोबांकडेच त्यांचं सुरवातीचं बालपण गेलं. १९७०मधे आजोबांचं निधन झालं. परिस्थिती बेताची बनली. दुसरीकडे अँथनी यांच्या आईने दुसरं लग्न केलं होतं. पण तेही फार काळ टिकलं नाही. पैशाची चणचण भासू लागली. त्यामुळे अँथनी यांची आई मॅरिन यांना सफाई कामगार म्हणून काम करावं लागलं.

संधिवातामुळे मॅरिन यांच्या पायांना अपंगत्व आलं. अँथनी यांची आजी वयोवृद्ध असल्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलियन सरकारकडून पेंशन मिळायची. मॅरिन यांनाही अपंगत्वामुळे सरकारी पेंशन चालू झाली. सरकारकडून त्यांना घरही मिळालं. त्या पेंशनमधे मॅरिन कसंबसं घर चालवायच्या. अशा सगळ्या परिस्थितीत अँथनी यांचं शिक्षण चालू होतं.

विद्यार्थी राजकारणातून डाव्या विचारधारेकडे

अँथनी यांचं सुरवातीचं शिक्षण ऑस्ट्रेलियातल्या 'सेंट जोसेफ प्रायमरी स्कुल' तर कॉलेज 'सेंट मेरी कॅथेड्रल'मधून झालं. पुढे अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी सिडनी विद्यापीठात प्रवेश घेतला. त्याआधी दोन वर्ष एका बँकेत नोकरीही केली. सिडनी विद्यापीठात त्यांचा डाव्या विद्यार्थी चळवळीशी संबंध आला.

विद्यापीठात असताना अँथनी यांनी अनेक विद्यार्थी आंदोलनांमधे उडी घेतली. डाव्या विचारधारेच्या मजूर पक्षासोबत ते जोडले गेले. या पक्षाच्या विद्यापीठातल्या युवा शाखेचं नेतृत्व त्यांच्याकडे आलं. पुढे विद्यापीठातल्या विद्यार्थी प्रतिनिधी परिषदेवर त्यांची निवड झाली. ही निवड डाव्या विचारधारेशी असलेली नाळ अधिक घट्ट करणारी ठरली. अशाप्रकारे त्यांची विद्यार्थी राजकारणात एण्ट्री झाली.

हेही वाचा: भल्याभल्यांना घाम फोडतेय चीनची डिजिटल हेरगिरी

संसदीय राजकारणात एण्ट्री

अर्थशास्त्रात पदवी घेतल्यानंतर अँथनी यांनी ऑस्ट्रेलियाच्या तत्कालीन स्थानिक सरकार आणि प्रशासकीय सेवा खात्याचे मंत्री टॉम उरेन यांच्याकडे संशोधन अधिकारी म्हणून काम केलं. त्याचवेळी मजूर पक्षाच्या वेगवेगळ्या पदांवरही ते काम करत होते. १९९६मधे त्यांची ऑस्ट्रेलियाच्या संसदीय राजकारणात एण्ट्री झाली. ऑस्ट्रेलियाच्या संसदेवर अँथनी पहिल्यांदा निवडून गेले. तेव्हा ते ३३ वर्षांचे होते.

निवडून आल्यावर ऑस्ट्रेलियाचं कनिष्ठ सभागृह असलेल्या प्रतिनिधीसभेसमोर त्यांनी जोरदार भाषण केलं. आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी बहुसांस्कृतिकता, बालसंगोपन, पायाभूत सुविधांसारख्या मुद्यांवर भर दिला. भिन्नलिंगी जोडप्यांप्रमाणेच समलिंगी जोडप्यांना त्यांचे रिटायरमेंटनंतरचे अधिकार मिळावेत म्हणून त्यांनी प्रयत्न केले. त्यासाठी १९९८ला त्यांनी संसदेत खासगी बिल आणलं. तब्बल ९ वर्षांच्या लढ्यानंतर हे बिल २००७ला संसदेत पास झालं. त्यानंतर समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

१९९८ला अँथनी यांच्याकडे संसदेच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली. मंत्र्यांना मदत करणं हे या पदाचं प्रामुख्याने काम होतं. एकप्रकारे हे मंत्रीपदच होतं. २००१ला विरोधी पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांचं एक शॅडो कॅबिनेट बनवण्यात आलं होतं. तेव्हा अँथनी यांच्याकडे रोजगार सेवा आणि २००४ला पर्यावरण खात्याचं कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं होतं.

मंत्री म्हणून प्रभावशाली काम

दरम्यानच्या काळात ऑस्ट्रेलियाच्या लिबरल पक्षाचे तत्कालीन पंतप्रधान जॉन हॉवर्ड आणि विज्ञान खात्याचे मंत्री ब्रेंडन नेल्सन यांनी अणुऊर्जेचा मुद्दा पुढं आणला. त्याला अँथनी यांनी टोकाचा विरोध केला आणि त्यामागची आपली भूमिकाही मांडली.

आपल्या थेट भूमिकांमुळे अँथनी यांना संसदेच्या सभागृहात मानाचं स्थान मिळत गेलं. २००५ला सभागृहातल्या विरोधी पक्षाच्या कामकाजाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. डिसेंबर २००६ला केविन रुड यांच्याकडे मजूर पक्षाचं नेतेपद आलं. त्याचवेळी अँथनी यांच्याकडे सभागृहातलं मजूर पक्षाचं कामकाज सांभाळण्याची जबाबदारी आली.

२००७ला मजूर पक्ष सत्तेत आला. केविन रुड पंतप्रधान झाले. तर पायाभूत सुविधा आणि वाहतूक खात्याचे मंत्री म्हणून अँथनी यांनी शपथ घेतली. मंत्री म्हणून अनेक नवे प्रोजेक्ट त्यांच्या काळात पूर्ण झाले. ऑस्ट्रेलियातल्या रस्त्याचं बजेट दुप्पट करणं असो किंवा मग रेल्वे गुंतवणुकीत दहा पटीने वाढ अशा महत्वाच्या गोष्टी अँथनी यांनी करून दाखवल्या.

वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे लोकांमधे नाराजी होती. अशातच २०१२ला पक्षांतर्गत कुरघोडींमुळे रुड यांनी राजीनामा दिला. मजूर पक्षाचे ज्युलिया गिलार्ड ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान झाले. अँथनी यांच्याकडे उपपंतप्रधानपद आलं. पण ते फार काळ या पदावर राहू शकले नाहीत. कारण डिसेंबर २०१३ला ऑस्ट्रेलियात झालेल्या निवडणुकीत मजूर पक्षाचा पराभव करून लिबरल पक्ष सत्तेत आला होता.

हेही वाचा: महिलांना उमेदवारी देतानाही घराणेशाहीचंच कार्ड

फॅमिली मॅनशी अँथनींची लढत

२०१३च्या निवडणुकीतल्या पराभवानंतर मजूर पक्षाच्या नेतेपदासाठी अँथनी यांनी जोरदार बॅटिंग केली. पण बिल शॉर्टेन हा नेता पक्षाचं नेतेपद पटकवण्यात यशस्वी झाला. प्रतिस्पर्धी असूनही शॉर्टेन यांनी अँथनी यांच्याकडे पायाभूत सुविधा, वाहतूक आणि पर्यटन खात्याचं शॅडो कॅबिनेट मंत्री बनवलं. २०१९च्या निवडणुकीत मजूर पक्षाचा पुन्हा पराभव झाला. त्यामुळे शॉर्टेन यांनी नेतेपदाचा राजीनामा दिला.

२०१९ला अँथनी यांच्याकडे पक्षाच्या नेतेपदाची जबाबदारी आली. प्रतिस्पर्धी असलेल्या ख्रिस बोवेन यांनी माघार घेतल्यामुळे अँथनी यांची बिनविरोध निवड झाली. त्याचवेळी ऑस्ट्रेलियातला उजव्या विचारांचा लिबरल पक्ष स्कॉट मॉरिसन यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा सत्तेत आला. तोपर्यंत मॉरिसन यांनी 'फॅमिली मॅन' अशी आपली ओळख बनवली होती. २०१९ला सत्तांतर होईल असं सांगणाऱ्या सगळ्या एक्झिट पोल आणि राजकीय पंडितांना मॉरिसन यांनी चकवा देत पुन्हा सत्ता मिळवली होती.

२०२१ची ऑस्ट्रेलियातली निवडणूक मात्र मॉरिसन यांच्यासाठी जड होती. कोरोना काळातल्या अपयशावरून त्यांना लक्ष्य केलं गेलं. मॉरिसन हे त्यांच्या लिबरल पक्षावरचं ओझं असल्याचं म्हटलं जायचं. त्यांच्या सरकारमधले उपपंतप्रधान जॉयस यांनी तर त्यांचा उल्लेख 'हेकेखोर आणि खोटारडा' असा केला होता. त्यामुळे २०२१ची निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नव्हती. पण संसदेत १५१ जागांपैकी ७६चं बहुमत असल्यामुळे निवडणूक चुरशीची होईल असं म्हटलं जात होतं.

क्रांती नको, बदल हवाय

अँथनी यांच्याकडे २६ वर्षांचा संसदीय राजकारणाचा अनुभव होता. त्यांनी अनेक सामाजिक मुद्यांवर वेळोवेळी थेट भूमिका घेतली होती. इच्छामरणाला कायदेशीर मान्यता असो, एलजीबीटीक्यू समूहाच्या मागे ठाम उभं राहणं असो की मोफत आरोग्य सेवांसाठी पुढाकार. त्यामुळे लोकांमधे त्यांच्याविषयी चांगली प्रतिमा तयार झाली होती.

२१ मेला ऑस्ट्रेलियात सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीच्या प्रचारावेळी ऑस्ट्रेलिया आणि चीनचे बिघडलेले संबंध, राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा, वाढती महागाई, आर्थिक विषमता, हवामान बदल असे अनेक मुद्दे चर्चेत राहिले. या मुद्यांवरून अँथनी यांनी मॉरिसन यांना घेरायचा प्रयत्न केला होता.

मजूर पक्षाकडे बहुमत नसलं तरी अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या मदतीने अँथनी यांनी ऑस्ट्रेलियाचे पहिले इटालियन-ऑस्ट्रेलियन पंतप्रधान म्हणून शपथ घेतलीय. निवडणुकीच्या प्रचारात 'क्रांती नको, बदल हवाय' ही त्यांची घोषणा ऑस्ट्रेलियन जनतेनं मनावर घेतली. त्यामुळे समलिंगी विवाह, इच्छामरण, हवामान बदलांच्या धोरणाला सातत्याने विरोध करणाऱ्या मॉरिसन यांची दशकभरची कारकीर्द संपुष्टात आली.

हेही वाचा: 

फेक न्यूजची बाधा न हो कोणे काळी!

मोदींच्या गुगलीवर फसले आहेत ‘आंदोलनजीवी’

आपलं सोशल मीडिया अकाऊंट हॅक होऊ नये म्हणून

आरसीबीचा विराट म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार!

कमीत कमी सोयीसुविधा, तरीही अपंगाच्या भारतीय क्रिकेट टीमचं मोठं यश