ज्ञानेश्वर दमाहे: मिश्कील शब्दात वाचकांचं मनोरंजन करणारे व्यक्ती, वल्ली

०७ ऑक्टोबर २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


लेखक ज्ञानेश्वर दमाहे यांचं नुकतच निधन झालं. गेल्या ३० वर्षापासून पुणे-मुंबई सोबतच राज्यभरातल्या वाचकांना आपल्या वऱ्हाडी लिखाणानं त्यांनी खिळवून ठेवलं. असंख्य किलोमीटरचा फेरफटका मारला. इतिहासाच्या पाऊलखुणा लेखनबद्ध केल्या. सर्वसामान्य वाचकांना ऐतिहासिक नजराणाही पेश केला. सहज फेरफटका मारताना एखाद्या व्यक्तीचं ते खुमासदार वर्णन आणि तितकंच हटके सादरीकरणही करायचे.

डोक्यावर काळे पांढरे केस, साधा शर्ट-पँट,अस्सल वऱ्हाडी भाषा आणि पायात टायरी चप्पल असं वर्णन अमरावतीकरांना कुणी सांगितलं तर बहुतेक लोकं ज्ञानेश्वर दमाहे यांचं नाव हमखास घेतात. एकविसाव्या शतकात शहरी नागरिकत्व, नोकरपेशा, स्मार्ट मोबाईलवाली व्यक्ती असूनही दमाहे काका टायरी चप्पल ब्रँन्ड एम्बेसेडर प्रमाणं वापरायचे. त्यावरच सगळीकडे फिरायचे.

३० वर्षापासून पुणे-मुंबई आणि राज्यातल्या वाचकांना आपल्या वऱ्हाडी लिखाणानं त्यांनी खिळवून ठेवलं. त्यांनी असंख्य किलोमीटरचा फेरफटका मारला. इतिहासाच्या पाऊलखुणा लेखनबद्ध केल्या. सर्वसामान्य वाचकांना ऐतिहासिक नजराणाही पेश केला.

आपल्या विनोदी शैलीनं लोकमताचा आदर ठेवत  ‘टोकरभर’ डोज दिला. महाराष्ट्रातल्या पुण्यनगरीच्या वाचकांसाठी ‘मन का मनका फेर’ धरला. एवढंच नाही तर आपला इतिहासाचा छंद जोपासताना ‘अश्मयुगीन चित्रकलेची गुहा’ शोधून इतिहासकार मित्रांसोबत ऐतिहासिक नोंद केली. सहज फेरफटका मारताना दिसलेल्या एखाद्या व्यक्तीचं खुमासदार वर्णन आणि त्याचं हटके सादरीकरण करणारे व्यक्ती आणि वल्ली म्हणजे ज्ञानेश्वर दमाहे.

दमाहे काकांसोबतची मैत्री

जुलै २००२ मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिवर्सिटीच्या श्री. शिवाजी कला आणि वाणिज्य कॉलेज अमरावती, या अभ्यासकेंद्रावर आमची पहिली भेट झाली. मी बीएससीच्या शेवटच्या वर्षाला फर्स्ट क्लासनं नापास झालो होतो. वर्ष वाया जावू नये शिवाय पत्रकारितेचं आकर्षण असल्यामुळे पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला.

या अभ्यासक्रमाला एकूण १८ विद्यार्थी त्यातला सगळ्यात लहान मी आणि माझे सिनियर वर्गमित्र म्हणजे ज्ञानेश्वर दमाहे. आमच्या वर्गात इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. डी. टी. इंगोले, प्राथमिक शिक्षक संतोष तामस्कर यांच्यासोबत इतर मित्रपरिवार होता. पण आपल्या नोकरीचा किंवा पदाचा त्यांना कोणताही अभिनिवेश नव्हता. माझ्या आयुष्यातल्या सध्या डझनभर पदव्या आणि त्याला मेरीटचं लागलेलं कोंदण याची उर्जा जर कुठे मिळाली असेल तर ती इथूनच.

आपले नातेवाईक, नोकरी आणि इतर उद्योग सांभाळून हे सगळे मित्र घरी आराम करायचं सोडून या वयात शिक्षण घेत होते आणि मी मात्र एका गुणाच्या फरकामुळे माझ्या फेल होण्याचं दु:खं कुरवाळत बसलो. दमाहे काकांनी त्यांच्यातलं वय बाजूला सारून मला आपलंसं केलं आणि माझ्यामधे सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करत खऱ्या अर्थानं आयुष्य जगण्याचा मूलमंत्र दिला. कदाचित त्याचं उर्जेतून मला पुढे विद्यापीठीय शिक्षणात यशोशिखर गाठता आलं. पुढेही या मैत्रीची वीण आणखी घट्ट गुंफली गेली.

हेही वाचा: पत्रकारितेच्या पलीकडचे पत्रकार बाळशास्त्री जांभेकर

अंगावर काटे आणणारा अनुभव

शिक्षण घेत असताना आणि त्यानंतर प्रत्यक्ष पत्रकारिता करताना काकांची अनेकदा भेट व्हायची.  भेटीदरम्यान त्यांची सिगारेट सोबत असायची मग आपल्या खास वऱ्हाडी शब्दशैलीत ते बैठकित रंग भरायचे. दहावी आणि आयटीआयच्या कागदपत्रांच्या भरवश्यावर मुंबईमधे नोकरी शोधायला गेलेल्या व्यक्तीला अक्षरशः भिक्षेकरांचं आयुष्य जगावं लागेल, याची कल्पना खुद्द त्यांनाही नव्हती.

ज्या मित्राच्या भरवश्यावर मुंबई गाठली. त्याचा पत्ता न सापडल्यानं मुंबईत त्यांनी कित्येक दिवस भिक्षेकरी प्रमाणं रेल्वे स्टेशनवर टीनाच्या शेडच्या निवाऱ्यात दिवस घालवले. भिक्षेकरांचं आयुष्य काय असतं हे केवळ लेखनातून नाही तर प्रत्यक्ष जीवन जगणारं व्यक्तीमत्व म्हणजे दमाहे काका. त्याच मुंबईत वीटी स्टेशनवरचे रोचक अनुभव कथेच्या स्वरुपात त्यांच्या तोंडून ऐकताना कळत नकळत अंगावर काटा उभा येतो.

पुढे नोकरी आणि लिखाणामुळे या मुंबईनं त्यांना अनेक जिवलग मित्र दिले. ज्यात सुप्रसिद्ध विनोदी कवी अशोक नायगावकर, चंद्रशेखर कुळकर्णी, श्रीकांत बोजेवार आहेत. आपल्या गावखेड्यातलं व्यक्तिमत्व रेखाटताना जे जिवंत पात्र ऐकणाऱ्याच्या डोळ्यासमोर उभं रहायचं त्याची सर कुठल्याही सिनेमाला येणारी नव्हती.

इतिहास अभ्यासकाच्या भूमिकेत

नोकरी सोबतच भटकंतीच्या आवडीमुळे मित्र एकत्र आले. ज्यात प्राचार्य मा. डॉ. वी. टी. इंगोले, पद्माकर लाड, शिरीषकुमार पाटील, डॉ. मनोहर खोडे, माहिती आणि जनसंपर्क कार्यालयाचे उपसंचालक प्र. सु. हिरुरकर आणि इतर निसर्गप्रेमी मित्रांचा गोतावळा होता.

मेळघाटातल्या किल्ले, विश्रामगृह, जंगल भ्रमंती हा सर्वांचा आवडीचा विषय. त्यांना भटकंती एवढी आवडायची की कधीकधी गाडीची टाकी फुल्ल करून राज्याची सीमारेषा पार करून मन घेऊन जाईल त्या दिशेला फेरफटका मारायचे. यामधून मित्रपरिवारसह सातपुडा पर्वत रांगेत मोर्शीच्या पुढे धारूर, अंबादेवी भागात २००७ला अश्मयुगीन केव पेंटिंगचा पुनर्शोध लावला. पुढे याची दखल पुरातत्व विभागानं घेतली.

मेळघाटातलं कोणतं विश्रामगृह कुठल्या इंग्रज अधिकाऱ्यानं बांधलं आणि त्या अधिकाऱ्याची सर्व जंत्री त्यांना तोंडपाठ होती. ऐतिहासिक गडकिल्ले, वास्तू यावर त्यांनी विपुल लेखन केलंय. पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीच्या मॅनेजमेंटचा अभ्यास करण्यासाठी ते प्रसंगी वारकऱ्याच्या भूमिकेत असायचे. रिटायरमेंट नंतर 'अमरावतीचा इतिहास' या विषयावर त्यांनी पुस्तक काढण्याची इच्छा व्यक्त केली होती.

हेही वाचा: मार्वलच्या सुपरहिरोंना मार्टिन स्कॉर्सेसी सिनेमा का मानत नाही?

मिश्कील शब्दात वाचकांचं मनोरंजन

पेपरमधली बातमी आणि दीर्घ लेखांव्यतिरिक्त वाचक वर्गाना खिळवून ठेवण्याचं काम कुणी करत असेल ते व्यंगचित्रकार, हास्य कवी, विनोदी लेखक किंवा वात्रटिकाकार. आपल्या अनोख्या विडंबन शैलीमुळे दमाहे काकांची प्रिंट मीडियातही प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून ओळख होती. विदर्भासोबत आणि पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा चाहता वाचकवर्ग मोठ्या प्रमाणात होता.

पूर्वी मोबाईल नसल्यानं घरी येणाऱ्या पत्रांवरून हे सहज कळायचं. राज्यस्तरावरच्या प्रसिद्ध पेपरमधे त्यांचं सदर असायचं. ’बारा गावचं पाणी’ हा लोकसत्ता हास्यरंग पुरवणीमधला पहिला वहिला वऱ्हाडी लेख. त्यानंतर हेराफेरी, खुमखुमी ही सदरं प्रकाशित झाली लोकमतमधे 'टोकरभर', पुण्यनगरीमधे 'मन का मनका फेर', लोकप्रभा, सकाळ, देशोन्नतीमधे त्यांचे नियमित लेख असल्यानं त्यांचा वाचकवर्ग मोठ्या प्रमाणावर होता.

स्वतःची वैदर्भीय शब्द्शैली, विडंबनशैलीमुळे अनेक मोठमोठे लोकं त्यांची सदरं आवर्जून वाचून त्यावर प्रतिक्रिया देत. याच विडंबन लेखनावर आधारित २०११ला मनोविकास प्रकाशननं ‘टोकरभर’ हा विनोदी कथा संग्रह प्रकाशित केला. यासोबत 'अमृतवल्ली' हे पुस्तकही प्रकाशित झालं. हागणदारी मुक्तीच्या पुरस्कारात, झाकटीतल्या डब्ब्याच नाही खरं, तू अक्कल हुशारी नोको शिकवू, ह्या लोकशाहीत विश्वची माझे घर, अश्या साध्या सोप्या शब्दांनी सरकारी कामांची हजामत करून ते मिश्कीलपणे वाचकांचं मनोरंजन करायचे.

पर्यावरणपूरक इच्छा अपुरीच

इतिहास लेखनातून त्यांना निसर्गाची आवड निर्माण झाली. यातून पुढे ‘सातपुडा बचाओ अभियान’ पासून निसर्ग संरक्षणाच्या कामात सहभाग झाले. निसर्ग संरक्षणासाठी सुद्धा त्यांनी बरीच पायपीट केली. डॉ. वी. टी. इंगोले यांच्यासोबत पुरातत्वीय स्थळं आणि लेण्यांच्या दस्तऐवजीकरणात त्यांचं मोलाचं सहकार्य आहे.

ज्ञानेश्वर दमाहे यांनी मृत्यूपश्चात आपला अंतिम विधी पर्यावरणाचा ऱ्हास करणारा नसावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. अंतिम दर्शनाच्या वेळी त्यांचे तीन दशकापासूनचे मित्र असलेले प्रदीप हिरुरकर यांनी त्यांच्या लाकडावरच्या चिताग्नीबद्दल दुःख व्यक्त केलं. स्वतः निसर्ग प्रेमी असलेल्या ज्ञानेश्वर दमाहे यांच्या नशिबी गॅस शव वाहिनी उपलब्ध असताना असंख्य लाकडाची हानी करून निसर्गप्रेमीची अंतिम इच्छा आपण पूर्ण करू शकत नसल्याबद्दल खेद व्यक्त केला.

रिटायर आयटीआय डायरेक्टर, एक विनोदी कवी, इतिहास अभ्यासक, वय विसरून मैत्री निभावणारा वर्गमित्र, एक गुरु, मार्गदर्शक, निसर्गावर प्रेम करणारा सच्चा निसर्गप्रेमी, असं हरहुन्नरी व्यक्ती असलेल्या ज्ञानेश्वर दमाहे काकांनी अचानक केलेली एक्झिट मनाला चटका लावणारी आहे.

हेही वाचा: 

केशवानंद भारतीः संविधान रक्षणाला कारण ठरलेले धर्मगुरू

आपल्याला अग्निवेश यांच्यासारखे 'स्वामी' का नको असतात?

कोणत्याही देशात असू नये 'भारताच्या' रॉबर्ट क्लाइवचा पुतळा!

या बाळंतपणाने सरकारी आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास जन्माला घातलाय