हॉलीवूडवरच्या भारतीय प्रेमाचा 'अवतार'

२३ डिसेंबर २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


२००९ला आलेल्या जेम्स कॅमरून दिग्दर्शित ‘अवतार’ला भारतीयांनी तुफान प्रतिसाद दिला होता. नुकत्याच रिलीज झालेला ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा सिनेमाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. इंग्लिशसोबतच हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत डब झालेल्या या सिनेमाची भारतातली कमाई २०० कोटींच्या उंबरठ्यावर आलीय. भारतीयांच्या हॉलीवूड प्रेमाचा हा एक कळसच म्हणावा लागेल.

हैदराबादमधल्या स्कुटीवरून रस्त्यावर फिरणाऱ्या दोन युवकांचा एक वीडियो सोशल मीडियावर वायरल होतोय. वरवर ही फिरस्ती अगदीच साधारण वाटू शकते, पण त्यांची ही फिरस्ती वायरल होण्यामागचं कारण त्यांच्या वेशभूषेमधे दडलंय. त्या युवकांनी नुकत्याच रिलीज झालेल्या ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’मधल्या प्रमुख पात्रांप्रमाणे वेशभूषा केली असल्याने त्यांची ही फिरस्ती सोशल मीडियावर आकर्षणाचा विषय ठरलीय.

२००९च्या ‘अवतार’ या जेम्स कॅमरून दिग्दर्शित सिनेमाने १०० कोटींहून अधिक कमाई करत भारतात विदेशी सिनेमांनी तोवर केलेल्या कमाईचे सगळे विक्रम मोडीत काढले. नुकताच रिलीज झालेला ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा ‘अवतार’चा सिक्वेल आठवड्याभरातच २०० कोटींच्या घरात जाऊन पोचलाय. ‘अवतार’नंतर ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’लाही भारतीय तसाच भरभरून प्रतिसाद देत असल्याचं एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून या वीडियोकडे आणि कमाईच्या आकड्यांकडे बघता येईल.

एलियनचं विशेष आकर्षण

१९९३च्या ‘ज्युरॅसिक पार्क’ आणि १९९७च्या ‘टायटॅनिक’नंतर भारतीयांच्या हॉलीवूड प्रेमाला उधाण आलं. ‘टायटॅनिक’ हाही जेम्स कॅमरूननेच दिग्दर्शित केला होता. या सिनेमाने भारतात केलेल्या कमाईचा आकडा २००७चा ‘स्पायडर मॅन ३’ येईपर्यंत अबाधित होता. पण ‘अवतार’च्या लोकप्रियतेचं खरं कारण फक्त ‘टायटॅनिक’ किंवा जेम्स कॅमरून हे नव्हतं.

‘अवतार’ हा तांत्रिकदृष्ट्या अतिशय प्रगत असल्याचा प्रचार केला गेला होता. त्याचबरोबर, परग्रहवासीय म्हणजेच एलियनवर आधारित कथा हे त्यातलं एक मुख्य आकर्षण होतं. भारतीयांना एलियनबद्दल असलेलं आकर्षण हे सहा वर्षांपूर्वीच अधोरेखित झालं होतं. त्याचं कारण होतं ‘कोई… मिल गया’ हा २००३चा सर्वाधिक कमाई केलेला हिंदी सिनेमा. या सिनेमाने भारतीयांना एलियनसोबत एक ‘जादू’ई कनेक्शन मिळवून दिलं.

‘कोई… मिल गया’च्या यशानंतर अवकाश, एलियन अशा विषयांवर आधारित अनेक परदेशी सिनेमे डब होऊन भारतात आले. खुद्द ‘कोई… मिल गया’ हा ‘क्रिश’ या भारताच्या पहिल्यावहिल्या सुपरहिरो सिनेमालिकेची पायाभरणी करणारा सिनेमा ठरला. ‘कोई… मिल गया’मधला निळ्या रंगाचा ‘जादू’ हा एलियन प्रेक्षकांना विशेष आवडला.

त्यामुळे ‘अवतार’च्या एलियनवर आधारित कथेसाठी भारतीयांच्या मनात उत्सुकता निर्माण करण्याचा मान ‘कोई… मिल गया’ आणि जादूलाच देणं योग्य ठरेल. ‘कोई… मिल गया’च्या निमित्ताने एलियन पृथ्वीवर आला तर तो काय करू शकतो, याची पुसटशी कल्पना भारतीयांना आलीच होती. पण स्वतः एलियन त्यांच्या ग्रहावर कसे जगतात, या त्याहून मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची जबाबदारी ‘अवतार’ने शमवली, हेही खरं.

हेही वाचा: इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

कथा जुनी, सादरीकरण नवं

या कथेचा कालखंड बाविसाव्या शतकातला. पृथ्वीवर नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास झाल्याने मानवाची नजर आता विषारी वायूने भरलेल्या ‘पँडोरा’ या नव्या उपग्रहावर पडलीय. तिथं असलेलं ‘अनऑब्टेनियम’ हे खनिज मानवाला हवं आहे. त्यासाठी त्या ग्रहावर खाणकाम करणाऱ्यांची एक वसाहतच उभी करण्याचा घाट मानवाने घातलाय. पण ‘पँडोरा’वरच्या या मानवी अतिक्रमणाला तिथल्या ‘नावी’ या स्थानिक एलियन जमातीचा विरोध आहे.

त्यांच्या मते, हे मानवी अतिक्रमण त्यांच्या अस्तित्वासाठी धोकादायक आहे. त्यामुळे नावींना समजेल अशा भाषेत आपला उद्देश समजावण्याची जबाबदारी संशोधकांवर येऊन पडलीय. पण त्यासाठी नावी संस्कृती अगदी बारकाईने समजून घेणं गरजेचं असतं. हे अवघड काम सोपं व्हावं, या हेतूने काही मानवांना नावींकडे पाठवण्याची योजना बनते. या योजनेसाठी निवडल्या गेलेल्या मानवाला नावींसारखाच ‘अवतार’ धारण करणं आवश्यक असतं.

जॅक सुली हा असाच एक अवतार धारण करून नावींकडे जातो. तिथं गेल्यावर त्याला मानवी भूक आणि नावी संस्कृतीमधल्या संघर्षाचं वास्तव कळतं. तिथे तो नेतिरी या नावी वंशप्रमुखाच्या मुलीच्या प्रेमातही पडतो. त्यामुळेच मानव की नावी असा यक्षप्रश्न त्याच्यासमोर उभा राहतो, ज्यातून तो नावींची निवड करून मानवी अतिक्रमणाविरुद्ध हत्यार उचलतो. प्रदीर्घ संघर्षानंतर त्यांच्या या लढ्याला यश मिळतं आणि ‘पँडोरा’वरून मानवांची हकालपट्टी होते.

मानव विरुद्ध निसर्ग या विषयावर आधारित परग्रहावर घडणारं एक कथानक म्हणून ‘अवतार’कडे पाहता येईल. तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेल्या माणसाची निसर्गावर पकड मिळवण्याची अवास्तव भूक यातून अधोरेखित होते. हाच ‘पँडोरा’ आपल्या आजूबाजूलाही आदिवासी तांड्यांच्या स्वरुपात जिवंत आहे. हे आदिवासी तांडे भांडवलशाही आणि शहरीकरणाच्या राक्षसी अतिक्रमणाचे सावज आहेत. परग्रहावरच्या कथेचं पृथ्वीवरच्या सामाजिक परिस्थितीशी असलेलं हे कनेक्शन ‘अवतार’ला अधिकच महत्त्वपूर्ण बनवतं.

डोळ्यांचं पारणं फेडणारा सिनेमा

पौराणिक कथांनुसार अवतार या शब्दाचा अर्थ देवतांचा इतर रूपातला जन्म असा होतो. ‘टाईम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीतही याच कथांवरून सिनेमाचं नाव सुचल्याचं कॅमरूनने सांगितलं होतं. सिनेमात दाखवल्याप्रमाणे निळ्या रंगाचे नावी, त्यांच्या कपाळावर असलेल्या गंधसदृश्य खुणा, पुनर्जन्मासारख्या संकल्पना या हिंदू पुराणकथांवरून आधारित असल्याचं बोललं जातं. खुद्द कॅमरूनने नावींचा रंग हा आपला आवडता आणि हिंदू देवतांशी संबंधित असल्याचं सांगितलं होतं.

त्याचबरोबर, ‘अवतार’ हा काही भारतात रिलीज होणारा पहिलाच थ्रीडी सिनेमा नव्हता. पण तांत्रिकदृष्ट्या तो आधीच्या सर्व थ्रीडी सिनेमांपेक्षा बराच वरचढ होता. परग्रहावरचं एक काल्पनिक जगच कॅमरूनने रुपेरी पडद्यावर साकारलं होतं. सक्षम कथावस्तू, गोळीबंद पटकथा, एलियनसाठी नव्याने बनवलेली बोलीभाषा अशा मुलभूत गोष्टींसोबतच रंगभूषा, वेशभूषा, कला निर्मिती, कम्युटर ग्राफिक्स अशा तांत्रिक बाजूंवर कॅमरूनने घेतलेली मेहनत स्पष्टपणे जाणवत होती.

भारतीयांसाठी ‘अवतार’ आणि ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा फक्त थियेटरमधे जाऊन बघण्यापुरता एक सिनेमा राहिलेला नाही. मन, कान आणि डोळे तृप्त करणारा हा एक परिपूर्ण सिनेअनुभव आहे. त्याच्या कथानकातून अभिप्रेत असलेला सामाजिक संदेश भारतीयांसाठी महत्त्वाचा आहेच. पण त्याहीपलीकडे जाऊन, ‘आदिपुरुष’च्या सुमार वीएफएक्ससाठी ५०० कोटींचा चुराडा करणारी भारतीय सिनेसृष्टी तांत्रिकदृष्ट्या किती मागास आहे, याचीही बोचरी जाणीव ‘अवतार’ करून देतोय.

हेही वाचा: 

ओटीटी प्लॅटफॉर्मना सेन्सॉर असायला हवा?

सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?

आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा