कोण जिंकणार, निवडणूक अंदाज मांडणाऱ्या देशातल्या सगळ्यात विश्वासार्ह संस्थेच्या प्रमुखाचा अंदाज

१५ मे २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


येत्या रविवारी, १९ मेला लोकसभेसाठी शेवटच्या टप्प्यातलं मतदान होईल. पण त्याआधीच सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सरकार बनवण्याच्या तयारी लागलेत. निवडणुकीचे अंदाज बांधणाऱ्या वेगवेगळ्या संस्था, व्यक्ती आपली भाकितं मांडताहेत. या शक्यता ओळखून सगळे पक्ष शेवटच्या टप्प्यासाठी जीव तोडून प्रचार करताहेत.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातल्या मतदानाला आता चार दिवस उरलेत. आतापर्यंत ४८३ जागांवरच मतदान झालंय. सात राज्य आणि एका केंद्र शासित प्रदेशातल्या ५९ जागांवर मतदान बाकी आहे. इथल्या एकेका जागेसाठी सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधी पक्षही झपाटल्यासारखा प्रचार करताहेत. यावरून हा टप्पा किती महत्त्वाचा आहे हे ध्यानात येईल.

पण या मतदानाआधीच सरकार बनवण्यासाठी सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधी पक्षांकडून मोर्चेबांधणीला वेग आलाय. निवडणुकीच्या विश्लेषणाचा अनुभव, अभ्यास असलेल्या वेगवेगळ्या संस्था, व्यक्ती आतापर्यंतच्या मतदानाचं विश्लेषण करताहेत. त्यातच काल डेक्कन हेरॉल्ड या दक्षिणेकडच्या न्यूजपेपरमधे एक मुलाखत आलीय. सेमिन जॉय यांनी घेतलेल्या संजय कुमार यांच्या या मुलाखतीची सोशल मीडियावर खूप चर्चा होतेय. या मुलाखतीतले महत्त्वाचे पाच मुद्दे.

हेही वाचाः आपला आपला अंदाजः महाराष्ट्रातल्या ४८ जागांवर कोण जिंकणार, कोण हरणार?

१. कुणालाच स्पष्ट बहुमत मिळणार नाही

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप पुन्हा एकदा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर येईल. पण त्यांना सरकार बनवण्यासाठी एनडीएची मदत घ्यावी लागेल. पण या सगळ्यात काँग्रेसला १०० चा आकडाही पार करता येईल, असं मला वाटतं नाही. काँग्रेसला ७५ ते ८० जागा मिळतील. त्याहून जास्ती जागा मिळणार नाहीत, असं संजय कुमार सांगतात.

महत्त्वाचं म्हणजे गेल्यावेळी भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. तर काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या.

सीएसडीएस अर्थात सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेवलपिंग सोसायटीज ही निवडणुकीचे अंदाज व्यक्त करणारी देशातली सगळ्यात जुनी, मोठी आणि विश्वासार्ह संस्था म्हणून ओळखली जाते. सध्या संजय कुमार हे या संस्थेचे प्रमुख आहेत.

हेही वाचाः भोपाळमधे लागणार सॉफ्ट हिंदुत्व विरुद्ध हार्ड हिंदुत्वाचा निकाल

२. भाजपचं हिंदीपट्ट्यात नुकसान होणार

गेल्यावेळी भाजपच्या एकूण जागांमधे हिंदी पट्ट्याचा मोठा वाटा होता. पण यावेळी तो कमी होताना दिसतोय. त्यामुळेच भाजपने ओडिशा आणि पश्चिम बंगालमधे जोर लावलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी या दोन राज्यांतल्या जवळपास प्रत्येक मतदारसंघात प्रचारसभा घेतलीय. पश्चिम बंगालमधे लोकसभेच्या ४२ तर ओडिशामधे २१ जागा आहेत. यामधे ओडिशात एक, तर बंगालमधे दोन जागा भाजपकडे आहे.

याविषयी बोलताना संजयकुमार म्हणाले, ‘हिंदी भाषिक पट्ट्यामधे भाजपच्या जागा कमी होतील. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली या राज्यांतून भाजपला फटका बसेल. आणि त्याचवेळी दोन्ही राज्यांमधे यंदा भाजपच्या जागांमधे गेल्यावेळपेक्षा लक्षणीय वाढ होईल. त्यासोबतच त्रिपुरामधेही भाजपची कामगिरी खूप चांगली राहील.’

हेही वाचाः दिल्लीत जिंकण्यासाठीच नाही तर दुसऱ्या नंबरसाठीही लढाई

३. शेवटी मोदींनी जातीचं कार्डही काढलं

यंदाच्या इलेक्शनमधे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपच्या भात्यातलं सगळ्यात मोठं अस्त्र आहे. भाजपची सारी भिस्त मोदींवर आहे. कारण सगळ्या मीडियाचा झोत स्वतःकडे खेचणारे मोदी इलेक्शनचा मूड ठरवण्यात माहीर आहेत. गेल्या दोनेक टप्प्यातल्या प्रचारात तर ते खूपच आक्रमक दिसले. त्यांनी आपल्याकडचं सारी अस्त्र बाहेर काढली. याबद्दलचं संजयकुमार यांचं निरीक्षण खूप महत्त्वाचं आहे.

ते म्हणतात, ‘इलेक्शन कॅम्पेनमधे खूपवेळा बदल झाल्याचं आपण बघितलंय. सहाव्या टप्प्यातल्या मतदानाआधी गेल्या रविवारी त्यांनी आपलं जातीचं, गरीबीचं कार्ड बाहेर काढलं. मी मागास वर्गातून आलोय, पण मला सगळ्यांना पुढं न्यायचंय असं ते म्हणाले. या एकाच वाक्यात त्यांनी दोन्ही वर्गांना आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न केला. पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या मतदानात या विधानाचा प्रभाव होईल.’

दोन महिन्यांच्या कॅम्पेनमधे मोदींनी काँग्रेसवर खूप वार केलेत. आता त्यांना एका गोष्टीचं भान आलंय. ते म्हणजे, निव्वळ काँग्रेसवर वार करून किंवा एकच मुद्दा घेऊन मतदारांना आपल्याकडे वळवता येत नाही. त्यामुळे त्यांनी दरवेळी आपल्या कॅम्पेनचा मूड बदललाय. एका फेजमधे त्यांनी गांधी घराण्यावर टीका केली. तर दुसऱ्यावेळी ते जात आणि वर्गाची भाषा बोलतात. तसंच प्रादेशिक पक्ष, महागठबंधनला महामिलावटी संबोधत टीका करतात.

हेही वाचाः आपला आपला अंदाजः महाराष्ट्रात भाजप महायुतीला मोठा फटका

४. विरोधक बेरोजगाराचा मुद्दा पोचवण्यात अपयशी

विरोधकही सत्ताधारी भाजपवर टीका करताहेत. राहुल गांधींच्या चौकीदार चोर हैं कॅम्पेनलाही जोरदार प्रतिसाद मिळतोय. एवढंच नाही तर काँग्रेसप्रणित युपीएमधे न आलेल्या प्रादेशिक पक्षांनीही हे कॅम्पेन डोक्यावर घेतलं. पण त्यांचे हे कॅम्पेन मोदींच्या कॅम्पेनविरोधात प्रभावी ठरत नाही, असं संजकुमार यांना वाटतं.

संजय कुमार म्हणतात, ‘मोदींनी प्रादेशिक पक्षांची खूप खिल्ली उडवलीय. प्रादेशिक पक्षांचे नेते म्हणजे जोकर्सचा समूह आहे, अशा शब्दात त्यांनी टीका केली. जे लोक स्थानिक पातळीवरच्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेऊ शकत नाहीत ते नॅशनल सिक्युरिटाचा मुद्दा कसं हाताळणार, असा सवाल करत मोदी प्रादेशिक पक्षांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. एवढंच नाही तर मोदी उचलत असलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावर ना काँग्रेस बोलू शकते ना प्रादेशिक पक्ष. अशावेळी खूप कमी सीटवर लढत असलेल्या प्रादेशिक पक्षांच्या शक्यता कमी होताना दिसतात.’

५. आकडेवारीने भाजपची अडचण

संजयकुमार पुढे सांगतात, भाजपला फक्त एकाच मुद्द्यावर बोलता येत नाही. ते म्हणजे बेरोजगारी. ग्रामीण भागातही सरकारविरोधात असंतोष आहे. तसंच दुसरे काही मुद्देही आहेत. महत्त्वाचं म्हणजे, प्रशासनाच्या मुद्द्यावरून काँग्रेसवाले भाजपला धारेवर धरतात. आकडेवारी दिल्यावर भाजपवाले तिथे प्रतिवाद करण्यात कमी पडतात. पण दुसऱ्या सगळ्या मुद्यांवर विरोधकांना गप्प बसावं लागतं. राष्ट्रीय सुरक्षा, स्थैर्य आणि इतर मुद्द्यांवर काँग्रेस आणि विरोधी पक्षांना भाजपच्या कॅम्पेनला सडेतोड उत्तर देता आलं नाही. लोकांना आपला मुद्दा पटवून देण्यात ते फेल गेलेत. एवढंच नाहीतर वाढत्या बेरोजगारीचा मुद्दा पटवून देण्यातही काँग्रेस अपयशी ठरलीय. दुसरीकडे बेरोजगारीचा मुद्दा काँग्रेस नाही तर मोदीच सोडवू शकतात, असं लोकांना वाटतं.

हेही वाचाः 

महाराष्ट्राचं राजकारण समजून घेण्यासाठी ही आत्मचरित्रं वाचायला हवीत

मॅकडोनल्ड खाऊच्या ठेल्यापासून फास्टफूड इंडस्ट्रीचा बादशाह कसा बनला?