मराठ्यांना रोखण्याचा प्रस्ताव मांडणाऱ्या गोळवलकरांना बाबासाहेबांनी काय उत्तर दिलं?

२९ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ७ मिनिटं


सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सगळ्याच विचारधारांना हवेहवेसे वाटू लागलेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही त्याला अपवाद नाहीच. त्याचाच एक भाग म्हणून द प्रिंट या वेबपोर्टलवर बाबासाहेब हे संघाचे प्रशंसक असल्याचे दावे केले गेले. आंबेडकरी विचारांचे अभ्यासक हरी नरके यांनी ते दावे सबळ पुराव्यांनिशी खोडून काढले. महामानवांना हायजॅक करण्याचे प्रयत्न कसे केले जातात, तेही यातून कळतं.

इतिहासाबद्दल वाद निर्माण होतात तेव्हा तिथं डावपेचांना थारा नसतो. सबळ पुरावे, संदर्भ देऊन असे डावपेच वेळीच उधळून लावायचे असतात. सध्याचा वॉट्सअप युनिवर्सिटीचा काळ हा असाच आहे. खोटं हेच खरं म्हणून लोकांसमोर आणलं जातंय. ऐतिहासिक संदर्भांची मोडतोड करून मनातल्या गोष्टी लोकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न होतोय. म्हणून त्यातले दावे प्रतिदावे फक्त अभ्यासकांनीच नाही, तर सर्वसामान्यांनीही समजून घ्यायला हवेत.

१४ एप्रिलला 'द प्रिंट' या वेबपोर्टलवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं औचित्य साधत पत्रकार अरुण आनंद यांचा एक वीडियो आणि लेख आला. साडे सहा मिनिटांच्या वीडियोत त्यांनी बाबासाहेब आणि संघ यांच्या विचारधारा एकच असल्याचा दावा केलाय. त्यांचे हे दावे खोडून काढणारा लेख ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांनी १९ एप्रिलला द प्रिंटसाठी लिहिला. नरके हे महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या मालिकेतल्या खंड १७ ते २२चे संपादक आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिल्लीतले एक पदाधिकारी असलेल्या राजीव तुली यांचा हरी नरकेंचा प्रतिवाद करणारा लेख पुन्हा २३ एप्रिलला द प्रिंटमधे आला. या लेखाची चिरफाड करणारा हरी नरकेंचा अजून एक लेख २५ एप्रिलला द प्रिंटमधे छापून आला.

हेही वाचा : सावरकरांना भारतरत्नः भाजपला अडचणीत आणणारी राष्ट्रपुरुष यादी काय आहे?

अरुण आनंद यांचे दावे आणि वस्तुस्थिती

अरुण आनंद हे पत्रकार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या दिल्लीच्या विश्व संवाद केंद्राचे सीईओ आहेत. संघाशी संबंधित अनेक विषयांवर त्यांनी लेखन आणि संशोधन केलंय. द स्टेट्समन, दैनिक जागरण, मिडडे, आयएएनएस आणि टीवी टुडे अशा महत्वाच्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियात त्यांनी महत्वाच्या पदांवर कामही केलंय. १४ एप्रिलला त्यांचा एक वीडियो आणि लेख द प्रिंट या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आला. वीडियो अजूनही यूट्यूबवरही उपलब्ध आहे. त्यात त्यांनी एकूण तीन दावे केलेत.

अरुण आनंद यांनी केलेले दावे खोटे असल्याचा प्रतिवाद करणारा पहिला लेख हरी नरके यांनी १७ एप्रिलला लिहिला. मोठ्या प्रमाणात तो वायरलही झाला. त्यानंतर १९ एप्रिलला द प्रिंटवर हाच प्रतिवाद इंग्रजीत छापून आला. त्यात नरके यांनी पुराव्यानिशी अरुण आनंद यांचे दावे खोडून काढलेत. ते दावे आणि त्याचे प्रतिदावे असे, 

दावा: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संघाचं कौतुक वाटायचं.

वस्तुस्थिती: हरी नरके यांनी या दाव्यामधला फोलपणा दाखवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या संसदेतल्या १४ मे १९५१ च्या भाषणाचा संदर्भ दिलाय. बाबासाहेब म्हणतात की, 'मी आता संघाचा आणि अकाली दलाचा उल्लेख करतो. या अत्यंत धोकादायक संघटना आहेत.' बाबासाहेब संघाचा उल्लेख धोकादायक संघटना असा केलाय. अरुण आनंद यांनी दावा करताना कोणताही पुरावा दिला नाहीय.

संदर्भ: संसदेतील चर्चेचे खंड, ११ वा, भाग, २, लोकसभा सचिवालय प्रकाशन, भारत सरकार, नवी दिल्ली, पृष्ठ ८६८७-९० आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे, खंड, १५, महाराष्ट्र सरकार, मुंबई, १९९७, पान ५६०.

दावा: १९५२च्या निवडणुकीत बाबासाहेबांनी मध्य प्रांतात जनसंघाबरोबर युती केली होती.

वस्तुस्थिती: ९५२च्या निवडणूक जाहीरनाम्यात बाबासाहेब म्हणतात, 'इतर राजकीय पक्षांच्या संदर्भात शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचा निर्णय स्पष्टपणे अधोरेखित करता येईल. शेड्युल कास्ट फेडरेशन प्रतिक्रियावादी, विघटनवादी असलेल्या हिंदू महासभा किंवा आरएसएसबरोबर काहीही झालं तरी युती करणार नाही.' १९५१ मधेच थेट संसदेत बाबासाहेबांनी संघाला धोकादायक संघटना असल्याचं म्हटलं होतं. पुढे त्यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यातही हीच भूमिका कायमही राहिली आणि राजकीय पर्याय अधिक स्पष्ट करणारी आहे.

हेही वाचा : भाजप नेत्यांना ट्रोल करून महाआघाडी चकमकी जिंकेल, युद्ध नाही

दावा: संघाचे नेते आणि प्रमुख प्रचारक दत्तोपंत ठेंगडी यांना बाबासाहेबांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे सेक्रेटरी नेमलं होतं. ठेंगडी हे आरएसएसचे प्रमुख प्रचारक आणि संघाशी संलग्नित भारतीय मजदूर संघ, स्वदेशी जागरण मंच सारख्या डझनभरापेक्षा अधिक संघटनांचे संस्थापक होते. यंदा त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे.

वस्तुस्थिती: फक्त अनुसूचित जातीची व्यक्तीच शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाचा सभासद किंवा पदाधिकारी बनू शकत होती. ठेंगडी अनुसुचित जातीचे नव्हतेच, मग त्यांना डॉ. बाबासाहेब सेक्रेटरी कसं नेमतील?

दावा: सप्टेंबर १९४९ ला सरसंघचालक गोळवलकर गुरुजी संघावरची बंदी उठवण्यासंदर्भात केलेल्या मदतीचे आभार मानण्यासाठी डॉ. आंबेडकरांना दिल्लीत भेटले.

वस्तुस्थिती: तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी बाबासाहेबांना भेटायला गेले त्याचा संघावरच्या बंदीशी काहीही संबंध नव्हता. ते मराठ्यांना रोखण्यासाठी मदत मागायला भेटले होते. बाबासाहेब तेव्हा देशाचे कायदामंत्री होते. अनेकजण त्यांना भेटायला येत. तसंच गुरुजीही आले होते. ७ सप्टेंबर १९४९ या दिवशी गुरुजी दिल्लीत बाबासाहेबांना भेटले.

गुरुजींचा प्रस्ताव होता की, मराठा समाजाचा सामना करण्यासाठी, त्यांना रोखण्यासाठी आम्हा ब्राह्मणांना मदत करा. नाही तर मराठे आपल्या सर्वांनाच संपवतील. आपण सारे मराठेतर एकत्र येऊन मराठ्यांचा बंदोबस्त करू.'

यासाठी हरी नरकेंनी बाबासाहेबांचे जवळचे सहकारी सोहनलाल शास्त्री यांच्या `बाबासाहेब डा. अम्बेडकर के सम्पर्क में २५ वर्ष' या पुस्तकाचा संदर्भ दिलाय. त्यात सोहनलाल लिहितात,

`गोळवलकर गुरुजींना भेटल्यावर बाबा्साहेब म्हणतात की, 'पेशवाईत तुम्ही लोकांनी आमच्यावर किती तरी अत्याचार केले, हे मी कसं विसरू? तुम्ही पुन्हा पेशवाईची स्वप्नं बघता आहात. त्यासाठी तुम्ही संघाच्या रुपात ब्राह्मण महासंघ सुरू केलाय. तुमच्या संघात सारे ब्राह्मणच तर आहेत. तिथे ना मराठे आहेत, ना महार. तुमचा संघ हा विषवृक्ष आहे. त्याचे परिणाम फार वाईट होणार आहेत.`

`तुम्हाला संघटनाच बनवायची असेल तर ती जातीनिर्मुलनासाठी आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा नाश करण्यासाठी सुरू करा. तरच तुम्हाला पेशवाईतल्या पापांपासून मुक्ती मिळेल. जुन्या चुका सुधारा. ब्राह्मण राज्याची स्वप्नं विसरा. मी तुम्हाला काहीही मदत करू शकत नाही,' बाबासाहेबांच्या एकाही प्रश्नाला ते उत्तर देऊ शकले नाहीत. चडफडत ते तिथून निघून गेले.

या भेटीचा एक विस्तृत रिपोर्ट १० सप्टेंबर १९४९ ला जनतामधे छापून आला होता. त्यातही हे संदर्भ आहेत.

हेही वाचा : तुमचं जळकं हिंदुराष्ट्र नको, असं प्रबोधनकारांचा वारसदार का म्हणतोय?

राजीव तुली यांचे दावे आणि वस्तुस्थिती

२३ एप्रिलला द प्रिंटमधे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिल्लीचे पदाधिकारी असलेल्या राजीव तुली यांचा लेख छापून आलाय. त्यात त्यांनी हरी नरकेंच्या लेखाचा प्रतिवाद केलाय. त्याला नरके यांनी २५ एप्रिलला द प्रिंटमधेच उत्तर दिलंय.

दावा: दत्तोपंत ठेंगडी हे डॉ. आंबेडकरांचे अत्यंत विश्वासू होते. त्यामुळे बाबासाहेबांनी त्यांना १९५४च्या भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीत निवडणूक प्रतिनिधी नेमलं.

वस्तुस्थिती: तुली आणि आनंद या दोघांच्याही मूळ लेखात या दाव्याचा उल्लेख आहे. पण दोघांनीही ठेंगडींच्या नियुक्तीचा लेखी पुरावा दिलेला नाही. निवडणूक प्रतिनिधी नेमताना निवडणूक अधिकाऱ्यांना तसं लेखी कळवावं लागतं. असा कोणताही पुरावा संघाने दिला नसल्याचं आपल्या लेखात हरी नरके सांगतात. निवडणूक भंडाऱ्याची आणि वर्धा जिल्ह्यातल्या आर्वीतले ठेंगडी प्रतिनिधी म्हणून नेमणं साधं व्यवहारालाही धरून नाही.

भंडाऱ्यातली लोकसभा पोटनिवडणूक २ ते ५ मे १९५४ दरम्यान पार पडली. या निवडणुकीसाठी डॉ. आंबेडकरांनी केलेले प्रचार दौरे, भाषणं आणि इतर बातम्या जनता या डॉ. आंबेडकरांच्या स्वत:च्या वर्तमानपत्रात सविस्तर प्रकाशित झाल्यात. जनताचे अंक पुराव्यासाठी आजही उपलब्ध आहेत. या सर्व सभांना उपस्थित असलेले नेते, सभेत भाषणे केलेले नेते यांच्या नावांची मोठी यादी आलीय. त्यात कम्युनिस्ट नेते कॉ. ए. बी. वर्धन यांचं नाव आहे, पण ठेंगडींचं नाव नाही. तुली म्हणतात, तसं जर ते डॉ. आंबेडकरांचे विश्वासू असे निवडणूक प्रतिनिधी होते, तर मग ते प्रचारसभांना गैरहजर का होते?

दावा: १९३९ मधे आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिराला भेट दिली.

वस्तुस्थिती: राजीव तुली यांच्याप्रमाणे अरुण आनंद यांनीही द प्रिंटवरच्या वीडियोत १९३५ मधे पुण्यातल्या एका शिबिराला बाबासाहेबांनी भेट दिल्याचा दावा केलाय. संघ शिबिराच्या भेटीची १९३९ची कहाणी केवळ कल्पना असल्याचं हरी नरके म्हणतात. हे खरं असेल तर त्या काळातले लिखित पुरावे, फोटो उपलब्ध असायला हवे होते. तसंच संघ आणि बाबासाहेब यांच्यातल्या भेटीबाबतचा पत्र्यव्यवहार किंवा तेव्हाच्या वर्तमानपत्रातले बातम्यांचे पुरावे असायला हवे होते. बाबासाहेबांच्या संघ शिबिराच्या भेटीचा दावा करताना तुली यांनी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत.

हेही वाचा : महात्मा जोतीराव फुलेच पहिले शिवचरित्रकार आणि शिवजयंतीचे उद्गातेही

दावा: देशाची फाळणी आणि इस्लाम याबाबतची डॉ. आंबेडकरांची आणि संघाची मतं यात साम्य आहे.

प्रतिवाद: डॉ. आंबेडकरांच्या ज्या 'थॉट्स ऑन पाकिस्तान' या पुस्तकाचा हवाला तुली यांनी दिलाय. त्याच पुस्तकात आंबेडकरांनी संघाबद्दल संतप्त उद्गार काढलेत.

डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या राज्यघटना निर्मितीच्या कामकाजात अडथळा आणण्याचं काम संघाने केलं. त्यांनीच हिंदू कोड बिलालाही विरोध केला होता. बाबासाहेबांच्या मनुस्मृती जाळणं, हिंदू धर्म नाकारून त्याचा त्याग करणं, त्याच्यातल्या उणिवा दाखवून देणं, बौद्ध धर्माचा स्वीकार, राम आणि कृष्णावरची टीका अशा सगळ्याच गोष्टींविषयी संघ बाबासाहेबांशी सहमत असू शकत नाही. संघाला समरसता हवीय तर बाबासाहेबांना जातीसंस्थेचं उच्चाटन हवंय.

दावा: आम्ही म्हणतोय ती तथ्यं तोंडी इतिहासावर आधारित आहेत. त्यांचं महत्व नाकारता येणार नाही.

वस्तुस्थिती: तोंडी इतिहास हा प्राचीन काळाविषयी योग्य मानता येतो. कारण त्या काळातले लिखित पुरावे उपलब्ध नसतात. पण सत्तर वर्षांपूर्वीचा इतिहास तोंडी पुराव्यांच्या आधारे मांडता येत नाही. असं हरी नरके आपल्या प्रतिवादात म्हणतात. तुली आणि आनंद यांनी केलेले तथाकथित दावे हे उपलब्ध असलेल्या लिखित पुराव्यांच्या कसोटीवर टिकणारे नाहीत हे स्पष्टच आहे. त्यामुळे तोंडी पुराव्यांपेक्षा लेखी पुरावे इतिहास समजून घ्यायला अधिक महत्त्वाचे आहेत. संघासाठी मात्र ते अडचणीचे आहेत.

हेही वाचा : 

आम्हाला गुजरात ऐवजी केरळ मॉडेलच हवंय!

नेशन वॉन्ट्स टू नो अर्नब, ये जबां किसकी हैं?

इरफान खान: त्याला जातानाही चमेलीचा सुगंध हवा होता!

किम जोंग उन गेले, तर उत्तर कोरियाचा वारसदार कोण होणार?

आखाती देशांतल्या तन्मय चिन्मयमुळे मोदींच्या अडचणीत होणार वाढ

शंभूराजांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडवण्याचे प्रयत्न का झाले नाहीत?

शंभुराजेंच्या बदनामीचा दोनशे वर्षांपासूनचा कट एका मालिकेने उधळला!

बाबासाहेबांनी कधी न दिलेली फेक मुलाखत मराठी पेपरात छापून येते तेव्हा,

राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना आमदार बनवणं, हे कायद्याला धरून आणि देशभक्तीलाही

कोर्टाचं आदेशपत्र जसंच्या तसं: राहुल कुलकर्णींना कोर्टाने जामीन दिला पण `सपोर्ट` का केलं नाही?