भाई माधवराव बागलांनी कोल्हापुरात उभारला बाबासाहेबांचा देशातला पहिला पुतळा

२८ मे २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


आज २८ मे. भाई माधवरावजी बागल यांची आज सव्वाशेवी जयंती. कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनंतर नाव घ्यावं असं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे भाई माधवरावजी बागल. राजकारणात असूनही ते कधी आमदार, खासदार, मंत्री झाले नाहीत. किंगमेकरचीच भूमिका त्यांनी घेतली. कोल्हापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा देशातला पहिला पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला.

कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनंतर नाव घ्यावं असं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे भाई माधवरावजी बागल. भाईजी महाराष्ट्राचे एक थोर आणि क्रांतिकारक समाजसुधारक होते. देवावर विश्र्वास नसलेले भाईजी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दैवत मानीत. परंतु त्यांचे विचार आणि आचार या दैवतांच्या पुढे दोन पावले होते असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरु नये.

महात्मा फुल्यांचा देव म्हणजे निर्मिक. त्यांना निर्मिक आणि भक्त यांच्यामधे भटभडजी दलाल नको होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर हिंदू धर्माने अन्याय केला. त्यांच्या समाजाला शेकडो वर्षे जनावरासारखं जिणं जगावं लागलं. म्हणून ‘मी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही’ ही प्रतिज्ञा त्यांनी पूर्ण केली. बौद्ध धर्माची त्यांनी दीक्षा घेतली. परंतु भाईजींनी देव आणि धर्म संकल्पनाच जीवनातून ठोकरुन लावली होती. त्यानी आयुष्यभर देव मानला नाही की धर्म. २८ मे १८९५ ला भाईंचा जन्म झाला.

अष्टपैलू व्यक्तिमत्व

भाईजी पराक्रमी राजकारणी होते. क्रांतिकारक समाजकारणी होते. प्रतिभावान साहित्यिक होते. कुशल चित्रकार, शिल्पकार होते आणि फर्डे वक्ते होते. राजकीय नेत्यात एवढे सर्व गुण एकत्र असणारा माणूस विरळा. राजकारणात असून ते कधी आमदार, खासदार, मंत्री झाले नाहीत. किंगमेकरचीच भूमिका त्यांनी घेतली.

अनेक ज्येष्ठ साहित्यिकांनी आणि आचार्य अत्र्यांनी तर एका प्रस्तावनेत हे मान्य केलं, की भाई बागल राजकारणात पडले नसते तर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष केव्हाच होऊन गेले असते.

स्वभावाने ते अत्यंत भावनाप्रधान होते. हळव्या मनाचे होते. त्यांचा शत्रू-प्रतिस्पर्धी केव्हा त्यांचा सहकारी-सोबती होईल हे सांगता यायचं नाही. परिवर्तनशील विचार, व्यक्तिगत जिव्हाळा, प्रेम आणि दुसऱ्यावर विश्वास ठेवण्याची उदारता हा त्यांचा स्वभावाचा स्थायीभाव होता.

हेही वाचाः वि. रा. शिंदेः ते रोज एकदा अस्पृश्यांबरोबर जेवत

प्रजा परिषदेचा लढा

१९२६ मधे महात्मा गांधींनी कोल्हापुरास पहिली भेट दिली. भाईजींचे पिताजी खंडेराव बागल यांनी त्यांचे गेगावेशीतील सभेत स्वागत करुन गांधीचे भाषण घडवून आणले. त्या वेळेपासून भाईजी स्वत:चे राहिले नाहित. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याने त्यांना पछाडले. १९३७ मधे संस्थांनी राजवटीविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी प्रजा परिषदेची स्थापना केली.

१९३८ च्या डिसेंबरमधे कोल्हापुरात शेतकऱ्यांचा प्रचंड मोर्चा त्यांनी आणला. संस्थानात क्रांतियज्ञ पेटवला. त्यासाठी त्यांना अनेक वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. सध्यासारखा नव्हे. पायात लोखंडी बेड्या घालून त्यांची रस्त्यातून धिंड काढण्यात येत होती. छत्रपतींच्याकडून जमिनी, प्रांत ऑफिसरच्या नोकऱ्यांची आणि अनेक प्रकारची प्रलोभनं त्यांनी ठोकरून लावली.

संस्थानात जबाबदार राज्यपद्धती आणलीच पाहिजे या मागणीसाठी त्यांनी रान पेटवलं. शेवटी १९४७ मधे कोल्हापुरात बागल मंत्रिमंडळ आलंही आणि गांधी हत्येचा नंतरच्या झंझावातात ते विरूनही गेलं. संस्थान विलीन झालं.

भाईजी आणि यशवंतराव

१९३७ मधे कऱ्हाड इथल्या शेतकरी परिषदेचे भाई बागल अध्यक्ष होते. आणि यशवंतराव चव्हाण साधे स्वयंसेवक होते. हे चव्हाण साहेबांनीच नमूद केलंय. परंतु संयुक्त माहाराष्ट्राच्या आंदोलनात भाईजींनी यशवंतरावांची जराही गय केली नाही. भाई संयुक्त महाराष्ट्र समितीचे प्रमुख नेते होते. भाई बागल, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, प्रभातकार वालचंद कोठारी आणि सेनापती बापट संयुक्त महाराष्ट्राचे ’पंचक’ होते.

सीमा आंदोलनाचे तर भाई सेनापती होते. बेळगाव सत्याग्रहात त्यांना हिंडलगा जेलमधे सहा महिन्याची शिक्षा भोगावी लागली. परंतु ६० मधे संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यावर भाईजींचा काँग्रेस पक्षावरील राग कमी झाला. कारण काँग्रेस पक्षाशीच त्यांची नाळ जोडली होती ना? त्यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होतात की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली.

चव्हाणांनी भाईजींचे पाय धरले. तुम्हीच महाराष्ट्राचे आणि काँग्रेसचे खरे जेष्ठ नेते आहात म्हणून. भाईजींनी त्यावेळचे समितीचे आमदार पी. बी. साळुंखे आणि डी. एस. खांडेकर यांना चव्हाणाकडे सुपूर्द केले आणि चव्हाण साहेब महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले.

हेही वाचाः महात्मा फुलेः जितके मोठे समाजसुधारक, तितकेच यशस्वी उद्योजकही

सच्चा सत्यशोधक आणि निस्पृह नेता

देव, धर्म आणि कर्मकांड यावर त्यांचा बिलकूल विश्र्वास नव्हता. घरातले देव त्यांनी नदीत टाकून दिले. १९७३ मधे सत्यशोधक समाजाचा जन्मशताब्दी समारंभ साजरा झाला. भाईजी अध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब देसाई आणि सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष रामराव आदिक व्यासपीठावर होते.

भाईजी कडाडले, ‘मंत्री बाळासाहेब देसाई आणि असे खूप सत्यशोधक प्रत्येकवर्षी जोतीबाच्या जत्रेला लवाजमा घेऊन येतात. आदिकांना सत्यशोधक समाजाचं अध्यक्ष कुणी केलं? ते शिर्डीला साईबाबापुढे नाक घासतात.’ इतकी निर्भयता, निस्पृहता, निर्भिडता सत्ताधाऱ्यांच्या तोंडावर दाखवणारा हा असामान्य नेता होता.

कर्मकांड आणि बुवाबाजीवर प्रखर हल्ला

हिंदू धर्मातील कर्मकांडावर ते तुटून पडत. महात्मा गांधी आणि विनोबांना ते मानत. परंतू त्यांच्या प्रार्थनेला ते थोतांड म्हणत. समाजातले सत्पुरुष, बुवाबाजी, अंधश्रद्धा या विरूद्ध त्यांनी मोठं बंड केलं. रस्त्यावर येऊन त्यांनी लढा दिला. महाद्वार रोडवर एका आरएसएसच्या माणसाने त्यांच्या डोक्यावर लाठीप्रहार केला. बुवाबाजीवर सिद्धार्थ नगरातील सभेत त्यांच्यावर शारीरिक हल्ला झाला.

पद्माराजे दत्तक प्रकरणात त्यांनी आंदोलनाविरूद्ध भूमिका घेतली. संस्थान विलीन झाल्यावर कुठल्या गादीवर कुणाला बसवावं यात लोकांना कशाला रस पाहिजे?  लोकशाहीच्या काळात असल्या चळवळीने लोकांचं काय हित होणार आहे? अशी परखड भूमिका घेतल्यावर त्यांच्या घरावर दगडफेक झाली. शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या गेल्या आणि त्यांच्या प्रेतयात्रा निघाल्या. परंतु भाईजींनी कशालाही भीक घातली नाही.

हेही वाचाः डॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार

नातीच्या लग्नपत्रिकेवरून सोडलं घरदार

जनसारथी साप्ताहिकाद्वारे मी ६५ सालापासून कोल्हापूर शहरात अन्याय, भ्रष्टाचाराविरुद्ध लढत होतो. नगरपालिकेत भयानक भ्रष्टाचार होता. जीवनावश्यक वस्तूंचे भाव कडाडले होते. काळा बाजार जोरात सुरू होता. हॉटेलातला चहासुद्धा सामान्य माणसांना परवडेना. याविरुद्ध बेफाट लेखन करुन रान उठवले. पण यश हाती येईना. त्यासाठी शिवसेनेच्या धर्तीवर जनसेना स्थापन केली आणि शहरात चौफेर धुमधडाका मी उडवून दिला होता. त्यावेळी भाईजींनी मला बोलावलं आणि दत्ताबाळ-बागल प्रचंड वाद सुरु झाला.

तेथून पुढे भाईजींचे आणि माझे संबंध पितापुत्राचे झाले. रोज सकाळी रिक्षाने ते माझ्या घरी यायचे आणि माझी गाडी घेऊन गावभर फिरून आपली काम करुन यायचे. आर्थिक अडचणी, औषधपाणीही मला सांगायचे. शेवटी शेवटी तर त्यांचे घरात जमेना. सारखा त्रास सुरू झाला. शेवटी एकदा या भांडणाचा स्फोट झाला आणि भाईजींनी आपलं घर सोडलं. 

त्याचं असं झालं. त्यांच्या नातीचं लग्न होतं. लग्नपत्रिका छापून आल्या. नेहमीप्रमाणे चारचौघांसारख्याच त्या पत्रिका होत्या. त्यात प्रथम श्री गजानन प्रसन्न, अमका देव, अमकी देवी प्रसन्न असं संबोधन होते आणि खाली त्यांचं नाव होतं. ते वाचून भाईजी उखडले. ही देवांची नावं तर लग्नपत्रिकेतून काढा नाही तर त्या खालचं माझं नाव तरी काढा. संघर्ष विकोपाला गेला आणि भाईजी शिवाजी विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसवर राहायला गेले. कुलगुरु कणबकरांनी त्यांची गेस्ट हाऊसवर कायमची सर्व व्यवस्था केली.

डॉ. आंबेडकरांचा देशातला पहिला पुतळा

महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने आणि कार्याने भाई भारावून वेडे झाले होते. फुले, आंबेडकरांपासून तरुणांना या शाहूनगरीत सतत स्फूर्ती मिळाली पाहिजे हा त्यांचा ध्यास होता. यासाठी त्यांनी बिंदू चौकात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ब्राँझचे पुतळे करून घेतले. आणि ९ डिसेंबर १९५० ला त्यांचे हजारो लोकांसमोर अनावरण केले.

मी त्यावेळी हजर होतो. भाईजींचे स्फुर्तीदायक भाषण झाले. आणि या समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे पुतळे अनावरणासाठी कुणाही बड्या पाहुण्यास आणण्यात आलं नव्हतं. भाईजी म्हणाले, ‘करवीर जनतेच्या हस्तेच हा अनावरणाचा कार्यक्रम होईल’ बिंदू चौकाच्या डाव्या-उजव्या बाजूच्या लोकांतून भाईजींनी दोन सामान्य माणसांना हाताला धरुन नेलं आणि त्यांच्या हस्ते या पुतळ्यांचं अनावरण केलं. खऱ्या अर्थाने जनतेच्या हस्ते होणारा असा हा समारंभ विरळा.

आज देशात सर्वधिक पुतळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत. गिनीज बुकात तशी नोंद आहे. परंतु कोल्हापूरचा यात विक्रम आहे. भारतात डॉ. आंबेडकरांचा पहिला पुतळा त्यांच्या हयातीत शाहू महाराजांच्या नगरीत भाई बागलांनी ५७ वर्षापूर्वी बसवून मोठी क्रांती केली.

हेही वाचाः साईबाबांची कीर्ती दाहीदिशा होईल, असं डॉ. आंबेडकर का म्हणाले?

भाईजींचा हयातीतच पुतळा

मी १९३८ पासून भाईजींचं कोल्हापुरातलं राजकीय आणि सामाजिक कार्य पाहात आलोय. स्वराज्य, स्वातंत्र्य, काँग्रेस, जबाबदार राज्यपद्धती हे शब्द करवीरकरांनी ६०-७० वर्षापूर्वी भाईजींच्या मुखातूनच ऐकले. जुलमी संस्थानिकांविरुद्ध जिवाची पर्वा न करता ते लढले. संस्थानी काळात ते फार मोठं धाडस होतं. कुठे तरी मारुन टाकलं असतं. तरी काही झालं नसतं. अशा माणसाची आठवण आम्हाला कायम राहिली पाहीजे.

आम्ही त्यांचे सदैव कृतज्ञ राहिलो पाहिजे, ही माझी भावना होती. म्हणून मी त्यांचा पुतळा त्यांच्या हयातीत कोल्हापुरात उभारायचं ठरवलं. एके दिवशी दुपारी शाहूपुरातील त्यांच्या घरी जाऊन त्यांना हे सांगितले. दोन मिनिटे ते मुग्धच राहिले. गहिवरून आले. पुढे पी. बी. साळुंखे याच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. नानासाहेब गद्रे कोषाध्यक्ष आणि मी सेक्रेटरी झालो.

शिल्पकार बाळ चव्हाण यांनी भाईजींच्या पुतळ्याचे क्ले मॉडेल तयार केले. पुतळ्यास दहा हजार रुपये खर्च येत होता. ८० मधे रक्कम मोठी होती. आम्ही निधी गोळा करण्यास सुरवात केली. पाच हजार जमले. मग मी. पी. बी. साळुंखे आणि नाना गद्रेंना घेऊन मदनमोहन लोहिया यांच्याकडे गेलो. ते निश्र्चित पाच हजार रुपये देतील असं वाटत होतं. परंतु प्रथम पी. बी. आणि नाना याला नाखूशच होते पण गेलो. 

लोहीयांनी आमचा घोर भ्रमनिरास केला. ते म्हणाले, ‘मी एक रुपयाही भाईजींच्या पुतळ्यासाठी देणार नाही.’ आम्ही गार झालो. लोहियांच्या आणि भाईजींच्या संबंधाबद्दल कोल्हापुरात बरेच गैरसमज होते. पण या प्रकाराने आमचा समज मात्र स्पष्ट झाला. पुढे जिल्हा परिषद समाजकल्याण खात्याकडून मी पाच हजार रुपये मिळवून पुतळा करून घेतला.

२८ मे १९८२ ला यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांना बोलावून त्यांच्या हस्ते शाहू मिल चौकात मोठा समारंभ केला. ७८ मधे दादाच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा राजकीय इतिहास गाजत होता. परंतु चव्हाणसाहेब ८१ मधे आय काँग्रेसमधे आल्यावर त्या दोघांना कोल्हापुरात आम्ही या कार्यक्रमाने प्रथमच एका व्यासपीठावर आणलं.

शेवटीही देवाचं नाव नाही

८६ च्या सुमारास सुरवातीपासूनच भाईजींची प्रकृती ढासळत चालली. फेब्रुवारींच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना आम्ही दवाखान्यात ठेवलं. त्यांची प्रकृती गंभीर झाली. महाराष्ट्र शासनास आम्ही कळवलं. माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे मुंबईहून डॉ. गोयल यांना घेऊन विमानाने आले. परंतु प्रकृतीत उतार पडला नाही. त्यांना असह्य वेदना होऊ लागल्या. मलाही ते पहावेना.

भाईजी कण्हत, कुथत मला म्हणत, ‘बाबूराव मला असह्य होतंय. कुठं आहे तुझा ईश्वऱ्या? असेल तर सोडवं म्हणवं मला.’ असा हा असामान्य माणूस, प्राण सोडतानाही त्यांनी ईश्र्वराला मानले नाही. आणि मग तासाभराने त्यांची शुद्ध हरपली ती हरपलीच. ६ मार्च १९८६ ला रात्री १२ वाजता त्यांचं देहावसान झालं. त्यांची अंत्ययात्राही मोठ्या सन्मानाने आणि इतमामाने शासनाने काढली.

नंदकुमार त्यावेळी जिल्हाधिकारी होते. माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे विमानाने कोल्हापुरास आले आणि त्यांनी शासनाच्या वतीने त्यांना आदरांजली वाहिली. पोलिसांनी त्यांना बंदुकीच्या फैरी झाडून आणि शोकगीत वाजवून अखेरचा निरोप दिला. हजारो लोक प्रेतयात्रेत सहभागी झाले होते. कोल्हापूर बंद होते.

हेही वाचाः 

सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर

नरेंद्र मोदींना एवढं घवघवीत यश कशामुळे मिळालं?

खरंच वंचित आघाडीमुळे काँग्रेस, राष्ट्रवादीचा पराभव झाला?

शस्त्र घेऊन गुंडागिरीचा सामना करायला सांगणारे गांधीजी माहीत आहेत?