भारतीय पुरातत्त्व विभागानं बाबरी मशिदीच्या जागी राम मंदिर होतं हे सिद्ध कऱण्याचा वारंवार प्रयत्न केलाय. पण, १६ व्या शतकाआधीच्या एकाही संस्कृत ग्रंथात अयोध्येत राममंदिर असल्याचा उल्लेख आढळत नाही. दोन धर्मांमधे काडी पेटवून आपल्या भाकऱ्या भाजण्याचं काम राजकारण करतंय. याने फक्त राजकारणाचंच पोट भरेल.
बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरून अनेकांच्या सत्ता आल्या आणि पडल्या. बाबरी मशीद पडणार नाही, त्याला पूर्ण संरक्षण दिलं जाईल अशा प्रकारची वचनं उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंग यांचं सरकार सुप्रीम कोर्टाला आणि केंद्र सरकारला देत होतं. तरीही ६ डिसेंबर १९९२ ला कारसेवकांनी सगळ्या सीमा ओलांडल्या.
मोहिमेवर चढाई करण्यासाठी लागणाऱ्या दोऱ्या आणि इमारत पाडण्यासाठी लागणारी सगळी हत्यारं घेऊन कारसेवक आले होते. जसं काही मशीद उद्ध्वस्त करण्याचं प्रशिक्षणच त्यांना दिलं होतं. हा सगळा घटनाक्रम बीबीसीच्या विडिओ रिपोर्टिंगमुळे आजही आपल्यासाठी उपलब्ध आहे.
प्रोफेसर फैजान मुस्तफा सांगतात, या सगळ्यात एका हिंदू माणसानं फारच हुशारीचं काम केलं. १९४९ मधे रात्रीच्या अंधारात गुपचूप ज्या मूर्त्या मशिदीत ठेवण्यात आल्या होत्या त्या मूर्त्या कारसेवक मशीद उद्ध्वस्त करत असताना कुणीतरी व्यवस्थितपणे बाहेर काढल्या. आणि सगळं वावटळ शांत झाल्यावर पुन्हा संध्याकाळी मूर्त्या त्या जागी ठेवण्यात आल्या.
६ डिसेंबरला मशिदीबरोबर कौशल्या रसोई आणि इतर १६ मंदिर पाडली. इतकंच काय, तर हा वाद ज्यावरून सुरू झाला होता तो राम चबुतराही ६ डिसेंबरला उद्धवस्त केला गेला. पत्रकारांवर हल्ले झाले. या घटनेमुळे सर्वसासामान्य हिंदू माणसाला फारच आनंद झालेला. तर अडवाणींसारखे मोठे नेते या घटनेबद्दल दुःख जाहीर करत होते, असं मुस्तफा सांगतात.
या घटनेनंतर कल्याण सिंग सरकार पडलं असं म्हटलं जातं. खरंतर बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यापूर्वीच मुख्यमंत्री कल्याण सिंग यांना राजीनामा द्यायचा होता. पण अडवाणींनी त्यांना मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर राजीनामा द्या असं सांगितलं. कल्याण सिंग यांनी राजीनामा दिला तर उत्तर प्रदेशचा कारभार केंद्र सरकारच्या अखत्यारित आला असता आणि मशीद उद्ध्वस्त करण्याच्या प्लॅनसाठी ही गोष्ट अनुकूल नव्हती, असा मुद्दा फैजान मुस्तफा यांनी आपल्या विडिओ सिरिजमधे अधोरेखित केलाय.
अंजु गुप्ता तेव्हा अयोध्येमधे पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या मते, अयोध्येत सीआरपीएफला जाऊ दिलं जात नव्हतं. लिब्रहन कमिशनसमोर त्यांनी ही गोष्ट मान्य केलीय. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी रिझर्व फोर्सची एक तुकडी मागवली होती. पण राज्य सरकारकडून या मागणीला परवानगी मिळाली नाही. आणि या वादग्रस्त जागेवर सीआरपीएफला ८ डिसेंबरनंतर प्रवेश मिळाला. तोपर्यंत बाबरी मशीद उद्ध्वस्त होऊन मंदिराचा पायाही टाकून झाला होता.
तत्कालीन पंतप्रधान पी. वी. नरसिंहराव यांनी बाबरी मशिदीच्या जागेवर पुन्हा मशीद बांधली जाईल, असं वचन दिलं. त्यांनी विश्व हिंदू परिषद, आरएसएस आणि बजरंग दल यांच्यावर बंदी घालण्याची घोषणा केली. जमाते इस्लामी आणि इस्लामी सेवा संघावरही बंद घालण्यात आली.
मुस्तफा यांच्या मते, ‘बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यामधे आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि राज्य-केंद्र सरकार जबाबदार आहे, तितकीच किंवा त्याच्याहून जास्त जबाबदारी सुप्रीम कोर्टाची आहे. कोर्टाला वारंवार माहिती देऊनही कोर्टानं वेळेवर कोणतीच हालचाल केली नाही. कोर्टाच्या निर्णयाची अवहेलना होतेय हे स्पष्ट समोर दिसत असतानाही कोर्टानं काहीएक भूमिका घेतली नाही.’
मशिदीचं जे काही बरं वाईट व्हायचं होतं ते झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाला जाग आली. ६ डिसेंबरला पुन्हा कोर्ट भरलं तेव्हा सुप्रीम कोर्टाचे तत्कालीन न्यायमूर्ती वेंकटचल्लईय्या म्हणतात, ‘दुर्दैवानं, या प्रश्नाचं गांभीर्य कोर्टाच्या लक्षात यायला वेळ लागला. आता आपण एकच गोष्ट करू शकतो आणि ती म्हणजे लवकरात लवकर मशिदीचे तीन कळस होते तसे परत बांधून देणं.’
पुन्हा वेंकटचल्लईय्या यांच्या वक्तव्यावर पी. वी. नरसिंहराव म्हणतात असं करणं बरोबर नाही. असं केल्याने देशात असंतोष आणखी पसरेल. त्यामुळेच काँग्रेस आणि भाजपमधे फारसा फरक नाही, असं मुस्तफा यांना वाटतं. हिंदुत्वाच्या चुलीवर दोन्ही पक्षांनी आपापल्या भाकऱ्या चांगल्याच शेकलेल्या आहेत आणि आज त्याच मुद्द्यावरून एकमेकांच्या विरूद्ध उभं आहेत.
हेही वाचा : ६ डिसेंबर १९९२ : साडेचारशे वर्षांची वास्तू साडेचार तासात जमीनदोस्त
७ डिसेंबरला सुप्रीम कोर्टाच्या बेंचने १९९१ मधे कोर्टाच्या निर्णयाची अवहेलना झालेली होती, त्यासाठी शिक्षा सुनावणी सुरू केली. या शिक्षेची अमंलबजावणी व्हायलाही १९९४ साल उजाडलं. पण बाबरी मशिदीचं रक्षण करण्याची जबाबदारी कल्याण सिंग सरकारनं घेतली होती. त्याचं उल्लंघन झाल्याबद्दल कोणतीही शिक्षा केली नाही. इतकंच काय, ज्यांनी मशिदीवर हल्ला केला त्यांनाही आजपर्यंत कोणातीही शिक्षा झालेली नाही.
बाबरी मशीद पाडून एक महिनाही झालेला नव्हता तेव्हा विश्व हिंदू परिषदेने हायकोर्टात एक याचिका दाखल केली. कशासाठी? तर मशीद पाडून जे छोटं मंदिर उभारलं गेलंय तिथं लोकांना दर्शन घेण्याची परवानगी दिली जावी म्हणून. आता या प्रकरणात न्यायमूर्ती तिलहरी यांची भूमिका स्पष्ट होते.
राम मंदिराच्या केसमधे न्या. तिलहरी स्वतः वकील होते. त्यानंतर ते न्यायमूर्ती झाले. न्यायमूर्ती झाल्यानंतर तिलहरींनी रामाबद्दलची आस्था, श्रद्धा हे मुद्दे मधे आणले. कोणत्याही धर्माविषयी आस्था किंवा श्रद्धा असणं ही काही वाईट गोष्ट नाही. पण त्याचा वापर कोर्टातल्या एखाद्या केसमधे करणं बरोबर नाही, असं मुस्तफांना वाटतं.
बाबरी केसमधे रामलल्ला ही स्वतः एक पार्टी होती. आपल्या आस्थेवरून तिलहरी यांनी या पार्टीचं कौतूक केलं. आणि बाबरी मशिदीच्या जागी उभारलेल्या छोट्या मंदिरामधे पुजाअर्चा करण्याची परवानगी दिली. याच न्यायमूर्ती तिलहरी यांना मुलायम सिंग यांनी राष्ट्रीय अल्पसंख्याक शिक्षण संस्थान अयोगाचं अध्यक्ष बनवलं होतं. तेव्हा मुस्लिम अल्पसंख्यांक नाहीत, असं तिलहरी म्हणाले होते, या मोठ्या विरोधाभासाकडे मुस्तफा आपलं लक्ष वेधतात.
७ जानेवारीला भारत सरकारने अध्यादेश काढला. बाबरी मशिदीच्या आसपासची ६७.७० एकर जमीन सरकारनं ताब्यात घेतली. त्याबाबत सुप्रीम कोर्टाला दिलेल्या प्रेसिडेन्शिअल रेफरन्समधे सरकारनं म्हटलं, ‘बाबरी मशीद बांधण्याआधी त्या जागेवर एक हिंदू मंदिर किंवा हिंदू धार्मिक स्थळ अस्तित्वात असू शकतं का?’
मुस्तफा प्रेसिडेन्शिअल रेफरन्सचा उल्लेख करून सांगतात, इथेही सरकारने राम मंदिर असं न म्हणता हिंदू धार्मिक स्थळ असं म्हटलंय. या अध्यादेशाचा ३ एप्रिल १९९३ ला संसदेत कायदा झाला. पुन्हा १९९४ मधे डॉक्टर इस्माईल फारूकी यांनी या कायद्याला आव्हान दिलं.
मुस्तफा यांच्या मते, इस्माइल फारूकी प्रकरणात न्यायाधीशांकडून एक मुद्दा उगाच उठवला गेला. मशीद हे इस्लामिक धर्माचं अत्यावश्यक वैशिष्ट्य नाही असं या न्यायाधीशांनी म्हटलं. सरकार ही जागा ताब्यात घेऊ शकतं की नाही असा साधा सोपा प्रश्न होता. त्याचं उत्तरंही तितकंच साधं आणि सोपं असायला हवं होतं. देशातली कुठलीही इमारत, कुठलीही जमीन ताब्यात घेण्याचा सरकारला अधिकार आहे. पण कुठलीही आवश्यकता नसताना मशीद गरजेची नाही, असं चुकीचं विधान न्यायाधीशांनी केलं.
‘२३ फेब्रुवारी १९९६ ला या प्रकरणात पुन्हा एक छोटीसी केस झाली. स्टेटस को म्हणजे जैसे थे परिस्थितीसाठी ही केस होती. १९९६ ची केस फार महत्वाची नाही. पण २००२ मधे कारसेवकांच्या ट्रेनला लागलेली आग, त्यातून झालेली धार्मिक दंगल, त्यात लोकांचे गेलेले जीव आणि बेघर झालेले लोक यांच्याकडे आपण कसं बघतो हे फार महत्वाचं आहे.’
हेही वाचा : एका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १
रामाचा जन्म झालेली अयोध्या असा अयोध्येचा आज फार उदोउदो होतो. अयोध्या म्हणजे पवित्रभूमी. आमच्या रामाची जागा अशी भावना हिंदू भाविकांच्या मनात असते. १६ व्या शतकाच्या आधी कधीही अयोध्येला रामजन्मभूमी म्हटलंच गेलं नव्हतं याचे ठोस पुरावेही मुस्तफा आपल्यासमोर ठेवतात.
हे पुरावे त्यांनी कुठून मिळवले? तर अयोध्येतच लिहिलेल्या, अयोध्येतच सापडलेल्या संस्कृत शिलालेखातून त्यांना हे पुरावे सापडलेत. हे पुरावे पाहुन अयोध्याच रामाची जन्मभूमी होती का, की राजकीय स्वार्थासाठी ती जन्मभूमी बनवली गेली असा प्रश्न निर्माण होतो. बाबरी मशीद – राम जन्मभूमी प्रकरण समजून घ्यायला मुस्तफा संस्कृत शिलालेख आणि ग्रंथांची मदत घेतात.
फैजान मुस्तफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘१५२८ मधे बाबरी मशीद बांधली. त्याआधी लिहिलेल्या कोणत्याही शिलालेखात अयोध्येत रामाचा जन्म झाला किंवा अयोध्या ही राम जन्मभूमी आहे, असा उल्लेख सापडत नाही. इतकंच नाही, तर एखाददुसरा अपवाद सोडला इतर कोणत्याही ग्रंथात रामाचा उल्लेखही येत नाही. त्या एक-दोन ग्रंथातही रामाला ‘राम’ हे नाव न देता फक्त विष्णुचा अवतार म्हटलंय. या ग्रंथांवरून अयोध्येमधे रामाची किंवा विष्णुची नाही तर शंकराची पुजा केली जात होती हे स्पष्ट होतं.’
मुस्तफा ज्या ग्रंथांचा संदर्भ देतात त्यातल्या पहिल्या ग्रंथाचा संदर्भ भारतीय पुरातत्त्व विभागाच्याच एपिग्राफीया इंडिया या मोठ्या पुस्तकातून घेतलाय. पहिला संदर्भ येतो तो, पहिल्या शतकातल्या धनदेव या कौशाला राज्याचा राजा On Paleographic grounds या ग्रंथाचा. या ग्रंथात कुठेही कोणत्याही देवतेचा संदर्भ आढळत नाही. रामाचाही नाही.
असाच एक शिलालेख कर्नाटकातल्या बेळगावमधे इसवीसन १०५ साली मिळाला. या शिलालेखात एका ब्राम्हणाविषयी लिहिलंय. कश्यप गोत्रातल्या साकेतमधल्या या ब्राम्हणाचं यजुर्वेदात नैपुण्य होतं, असं लिहिलंय. साकेत म्हणजे काय? तर अयोध्या! अयोध्येला ‘साकेत’ असं म्हटलं जायचं. अयोध्येतल्या एका अतिशय हुशार ब्राम्हणाविषयी लिहिलं जातं. पण अयोध्येत राम मंदिर आहे, असा उल्लेख या शिलालेखात येत नाही.
दुसरा संदर्भ येतो ते गुप्त काळातल्या एका तांब्याच्या पाटीचा. इसवी सन ३२८-२९ मधला हा संदर्भ असावा. डी. आर. भांडारकर यांच्या कॉर्पस इंस्क्रिपशनम इंडिकेरम या ग्रंथात याचा उल्लेख आढळतो. या कॉपर काळात गुप्तांनी अयोध्या जिंकली आणि अयोध्येत बोटी आहेत, हत्ती आहेत, घोडे आहेत असा उल्लेख येतो. पण इथंही अयोध्या ही रामाची पवित्र भूमी आहे असं लिहिलेलं सापडत नाही.
तिसरा संदर्भ येतो तो कुमारगुप्त यांच्या काळातल्या एका दगडी शिलालेखाचा. फैजाबादपासून १२ मैल लांब असणाऱ्या कर्मनंदा या गावात इसवीसन ४३५-३६ मधे हा शिलालेख लिहिला गेलाय. या मजकुरात महादेवाविषयी लिहिलंय. महादेवाची स्तुतीसुमनं गाण्याबरोबरच अयोध्येचे ब्राम्हण किती हुशार आहेत याचंही कौतुक या शिलालेखात सापडतं.
वेद आणि इतर ग्रंथांमधले श्लोक कसं म्हणायचं याचं व्यवस्थित ज्ञान या ब्राम्हणांना असतं असं म्हटलंय. पण इथंही अयोध्येत रामाची पुजा केली जाते किंवा अयोध्येचे ब्राम्हण रामाची पुजा करतात असा थोडासाही उल्लेख केलेला नाही, असं मुस्तफा सांगतात.
अशीच एक चंद्रदेव नावाच्या राजाची चंद्रावती नावाची तांब्याची पाटी वाराणसीजवळ मिळाली होती. या राजाने आपल्या अयोध्या भेटीचं वर्णन केलंय. हा शिलालेख इसवीसन १०९३ मधला आहे. राजाने अयोध्येत आल्यानंतर सगळी पापं धुण्यासाठी शरयू आणि घागरा नदीच्या संगमावर आंघोळ केली. ‘उत्तरकौशल्या’ असं या संगमाचं नाव आहे. तो रविवारचा दिवस होता, सुर्यग्रहण होतं, असं सगळं वर्णन या पाटीत करण्यात आलंय. या आंघोळीनंतर देवीदेवतांची आणि सूर्याची पुजा केली गेली आणि त्यानंतर महादेवाची पुजा अर्चा सुरू झाली.
महादेव म्हणजेच शंकराची स्तुती करणारी वाक्य या राजाने लिहिलीत. पण मी अयोध्येत जाऊन आलो, रामाच्या पवित्र जन्मस्थानी जाऊन आलो असा उल्लेख आढळत नाही. अयोध्येत जाऊन आल्यानंतर पापं धुतली जातात. पण याचा संबंध या राजानं तिथल्या नदीशी लावलाय. कुठंही रामाची पवित्र भूमी म्हणून अयोध्येचा उल्लेख समोर येत नाही, या मुद्द्याकडे फैजान मुस्तफा लक्ष वेधतात.
हेही वाचा : एका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग २
बाबरी मशीद पाडल्यावर त्या अवशेषात ‘विष्णु-हरी शिलालेख’ नावाचा एक ग्रंथ आढळला. या ग्रंथावरून इथं राममंदिर होतं यावर शिक्कामोर्तब होतो, असं अनेकांचं म्हणणं होतं. काही इतिहासकारांच्या मते, हा अनेक वर्षांपूर्वीचा ‘विष्णु हरी शिलालेख’ लखनऊच्या एका संग्रहालयातून उचलण्यात आलाय. नंतर हा शिलालेख अयोध्येत सापडला. या शिलालेखाची तारीख नाही, ती पुसली गेलीय. पण हा ग्रंथ गंधवाला काळातला आहे. ११८४ मधे लिहिला गेलाय.
ए फ्ररर यांनी या शिलालेखावर एक प्रबंध लिहिला होता. हा प्रबंध कोलकाता इथल्या भारतीय पुरातत्त्व विभागानेच प्रकाशित केलाय. या प्रबंधात स्पष्ट लिहिलंय, ‘विष्णू हरी मंदिर बांधलं गेलं होतं. पण या देवतेला राम हे नाव कधीच दिलं गेलं नव्हतं.’
विष्णू हरी शिलालेखातही शिवाची स्तुती केलीय. अयोध्येच्या सुंदरतेचं वर्णन केलंय आणि अयोध्येत शिव, पार्वती आणि दुर्गा असल्याचं सांगितलंय. इथंही रामाचं नाव घेतलेलं नाही. पण या ग्रंथात एका वाक्यात विष्णुचा उल्लेख होतो. विष्णुचे ४ अवतार होते असं सांगितलं गेलंय. हे हिरण्यकश्यपूला मारणारा, बाना राक्षसाला मारणारा, ब्रहराजा राक्षसाची शक्ती संपवणारा आणि दहा तोंडांच्या दुष्ट रावणाला मारणारा असे हे चार अवतार. हा ग्रंथ अयोध्येत मिळालाय. मग निदान या ग्रंथात तरी रामाचा आणि त्याच्या जन्मभूमीचा उल्लेख हवा. पण तो दिसत नाही. कारण, अयोध्येची मूळ देवता ही महादेव होती. विष्णू नाही.
आणखी दोन महत्वाचे ऐतिहासिक संदर्भ प्रोफेसर मुस्तफा देतात. यातला पहिला संदर्भ येतो चीनचा बुद्धिस्ट यात्रेकरू हुएन स्वांग याचा. ७ व्या शतकात हा चिनी यात्रेकरू अयोध्येत आला होता. त्याने अयोध्येवर ५ पानांचा एक लेख लिहिलाय. अयोध्येत काय काय केलं हे सगळं त्याने या ५ पानांमधे लिहिलंय. पण अयोध्या रामाची जन्मभूमी आहे किंवा अयोध्येत रामाचं खूप मोठं मंदिर आहे असा कोणताही उल्लेख तो करत नाही.
दुसरा उल्लेख येतो तो प्रसिद्ध इतिहासकार अल बेरूनी यांच्या ‘हिंद’ या अरेबिक भाषेतल्या पुस्तकाचा. १००५ मधे या पुस्तकाचं संकलन झालंय आणि भारतीय संस्कृतीविषयी बोलणारं सगळ्यात भारी पुस्तक म्हणून याकडे पाहिलं जातं. १८८८ मधे या पुस्तकाचं एडवर्ड सॅच्यू यांनी इंग्रजीत भाषांतर केलंय. या पुस्तकात मात्र रामाचा उल्लेख येतो. एकदा नाही तर अनेकदा येतो. रामानं कशाप्रकारे रावणाचा वध केला याची स्तुती या पुस्तकात आहे. रामाचा रामेश्वरपर्यंतचा प्रवास त्यांनी लिहिलाय. रामाच्या मूर्तीचा आकार कसा असावा हेही या पुस्तकात आलंय.
बेरूनी यांच्या पुस्तकाच्या पान नंबर २०० वर अयोध्येचा उल्लेख आलाय. अयोध्येमधून कुठं कुठं कसं जाता येतं, कोणते मार्ग निघतात असं हे सगळं वर्णन आहे. पण अयोध्येचा आणि रामाचा संबंध काय याविषयी तो काही बोलत नाही. त्याचवेळी मथुरेबद्दल लिहिताना अल बेरूनी यांनी मथूरा आणि वासुदेव, कृष्णाचं नातं व्यवस्थित स्पष्ट करून सांगितलंय.
हेही वाचा : एका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग ३
हे सगळे संदर्भ दिल्यानंतर मुस्तफा पुन्हा एकदा स्पष्ट करतात की अयोध्याच रामाची जन्मभूमी आहे आणि बाबरी मशिदीच्या केंद्रस्थानीच रामाचा जन्म झाला होता, असं सांगणारा १६ व्या शतकापूर्वीचा एकही संस्कृत ग्रंथ अलाहाबाद हायकोर्टासमोर सादर करण्यात आला नाही. इतकंच काय, ज्याला इतकं महत्व दिलं जातं त्या वाल्मिकी रामायणातही अशाप्रकारचा कोणताही स्पष्ट उल्लेख दिसत नाही.
तुलसीदासांनी इसवीसन १५७० मधे रामचरित्रमानस लिहिलंय. त्यामधेही रामजन्मस्थानाचा उल्लेख येत नाही. यात थोडासा उल्लेख उत्तराखंडबद्दल येतो. तुलसीदासांनी अवधपुरीत गेल्यावर रामाच्या जन्माच्या महोत्सव पाहिल्याचंही लिहिलंय.
बाबरी मशीद १५२८ मधे बांधली गेली. जर रामाचं मंदिर तोडून मशीद बांधली गेली असेल तर तुलसीदासांनी त्यावर राग व्यक्त केला असता. त्यानंतर मुस्तफा अबुल फजल यांनी लिहिलेल्या आईन-ए-अकबरी या इसवीसन १५९५ मधल्या ग्रंथाविषयी सांगतात. या ग्रंथातही अयोध्येचा उल्लेख आहे. यात अयोध्येला ‘बंगा’ म्हटलं गेलंय. बंगा म्हणजे राहण्याची जागा. यात अयोध्येचा उल्लेख रामजन्मभूमी म्हणून होत नाही.
अयोध्या रामजन्मभूमी असल्याचा उल्लेख फक्त एका ग्रंथात येतो. स्कंधपुराण हा तो ग्रंथ. स्कंधपुराण फार जुना ग्रंथ असल्याचं म्हटलं जातं. विश्व हिंदू परिषदेचे टी. पी. वर्मा स्वतः मोठे विद्वान आणि संस्कृत पंडित होते. हायकोर्टात साक्ष देताना त्यांनी हे मान्य केलंय की स्कंध पुराण ४०० वर्षांहून जुनं नाही. या ग्रंथात वेळोवेळी भर घालण्यात आलीय हेही त्यांनी सांगितलं. त्यामुळे स्कंध पुराण हा पुरावा मानता येणार नाही, ही गोष्ट मुस्तफा स्पष्ट करतात.
रामाचा जन्म अयोध्येत आणि तेही बाबरी मशिदीच्या केंद्रस्थानीच झाला होता असा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याची गोष्ट प्रोफेसर मुस्तफा वारंवार लक्षात आणून देतात. तरीही, या एका कारणावरून देशात एवढा मोठा वाद गेल्या अनेक वर्षांपासून चाललाय. त्यात अनेकांना नाहक आपला जीव गमवावा लागलाय. दंगली होतायत. हिंसेला वाव मिळतोय. हे सगळं कशामुळे?
१९९४ मधे सरकारच्या अध्यादेशाला इस्माइल फारूकी यांनी आव्हान दिलं होतं. तेव्हा हे प्रकरणात सुप्रीम कोर्टात चालू असताना कोर्टानं जोनाथन स्विफ्ट यांचं म्हणणं कोट केलं. स्विफ्ट म्हणतात, ‘एकमेकांचा तिरस्कार करायला लावणारे अनेक धर्म आपल्याकडे आहेत. पण एकमेकांवर प्रेम करायला लावणारा एकही धर्म आपल्याकडे नाही.’
समाजात द्वेष पसरवणारे, हिंसा पसरवण्यासाठी सगळेच धर्म सज्ज आहेत, पण अहिंसा सांगणारा, प्रेम शिकवणारा एकही धर्म आपल्याजवळ नाही ही फारच दुर्दैवाची गोष्ट आहे! स्वीफ्ट यांचं म्हणणं डोक्यात कायमचं फिट करून मगच बाबरी मशीद - राम जन्मभूमीच्या या वादाकडे पाहिलं पाहिजे, असं मुस्तफा यांना वाटतं.
हेही वाचा :
६ डिसेंबर १९९२ला नेमकं काय झालं?
भारताने आरसीईपीमधे सामील होणं का टाळलं?
शिवसेना-भाजपमधला सध्याचा पेच निव्वळ सत्तेपुरता नाही, तर
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार म्हणजे ‘तीन पायांचा तमाशा’