बलविंदर संधूची ती न विसरता येणारी विकेट

०४ जुलै २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


२५ जून १९८३ ला कपिल देवने इंग्लंडमधल्या लॉर्ड्स मैदानाच्या गॅलरीत वर्ल्डकप उंचावला होता. आता या संस्मरणीय विजयावर ‘८३’ हा हिंदी सिनेमा येतोय. यात रणवीर सिंह कपिल देवची भूमिका करणार आहे. त्याला आणि इतर कलाकारांना ते क्रिकेटपटू शोभावेत म्हणून बलविंदर संधू यांनी प्रशिक्षण दिलं. बल्लू ८३च्या त्या विजयाच्या शिल्पकारांपैकी एक. यानिमित्त त्याने जागवलेल्या काही आठवणी.

भारताने २५ जून १९८३ ला इंग्लंडमधे इतिहास रचला. कपिल देवच्या टीमने वर्ल्डकप जिंकून साऱ्या जगाला आश्चर्याचा धक्का दिला. हे सांघिक यश होतं. त्या स्पर्धेतले अनेक क्षण आजही रोमांच उभे करणारे आहेत. मग ते कपिल देवचं झिम्बाब्वेविरुद्धचं शतक असो, सेमी फायनलमधे संदिप पाटीलने विंडीजला एका ओवरमधे लगावलेले सहा चौकार असो, फायनलमधे कपिलदेवने विव रिचर्डसचा मदन लालच्या बॉलवर मागे धावत जात पकडलेली कॅच असो. सगळे क्षण जसेच्या तसे आजही क्रिकेट प्रेमींच्या डोळ्यासमोरून हलत नाहीत.

फायनलमधला आणखी एक क्षण म्हणजे बलविंदर संधूने गॉर्डन ग्रीनीजचा त्रिफळाबाद केला. ग्रीनीज हा विंडीजचा भरवशाचा बॅट्समन. कसायाप्रमाणे तो बॉलर्सवर तुटून पडायचा. त्याचे फटके विलक्षण ताकदीने लगावलेले असायचे. तो आणि डेसमंड हेन्स ही विंडीजची यशस्वी सलामीची जोडी होती. टेस्ट आणि वन डे क्रिकेटमधे बहुतेक सर्वच सलामीच्या जोडीचे विक्रम त्यांच्या नावावर होते. असा हा ग्रीनीज स्वस्तात आणि ‘मामा’सारखा बाद झाला. इथेच विंडीजचा डाव कोसळायला लागला तो कायमचा.

ग्रीनीजची विकेट हे भारताला पहिलं यश मिळालं आणि तो शुभशकूनही होता. बलविंदर संधूशी मला त्याच्या घरी याबद्दल बोलायला मिळालं होतं. आचरेकर सरांवर पुस्तक लिहिताना त्यांचा पठ्ठ्या शिष्य असलेल्या संधूला त्या विकेटबद्दल विचारल्याविना रहावलं नव्हतं. चेंबूरमधल्या हायफाय सोसायटीत रहाणाऱ्या संधूची स्वतः चहा बनवून देताना कळी खुलली.

ग्रीनीजची विकेट महत्त्वाची

संधू सांगत होता, ’त्या खेळपट्ट्या टणक होत्या. त्यामुळे मला बॉल उसळवता येत होता. मला तिथे चांगलं यशही मिळालं होतं. इंग्लंडमधे गेल्यावर मला कपिलदेव आणि बिन्नीने सावध केलं होतं. ते म्हणाले होते, इथल्या खेळपट्ट्या टणक नाहीत. तेव्हा बॉल नुसता हवेत बरोबर सोडण्यावर भर दे. मी कष्ट घेतले. हवेतल्या दमटपणामुळे बॉल तिथे चांगला स्विंग व्हायचा, माझ्या हेही लक्षात आलं की बॉलची लकाकी गेली असेल तर तो अधिकच चांगला स्विंग होतो. वर्ल्डकप स्पर्धेत मला चांगले बळी मिळाले होते. पण अंतिम सामन्यातल्या ग्रीनीजच्या विकेटने माझं आजवर कौतुक होत आलंय. मीसुद्धा तो क्षण कधीच विसरू शकत नाही.'

'आमच्या १८३ रन्स विंडीज बॅटींगसाठी फारसे नव्हते. अतिशय आत्मविश्वासाने ग्रीनीज आला होता. मी काय केलं सुरवातीला त्याला आउट स्विंगर टाकले. पण ग्रीनीजने प्रतिसाद दिला नाही. नंतर मी माझं अस्त्र काढलं. एक इनस्विंगर टाकला आणि ग्रीनीजने आरामात तो सोडून दिला. तो चांगलाच आत आला आणि स्टंप वाकवून गेला. ग्रीनीजही अवाक झाला. त्या विकेटने सगळीकडे चैतन्याची लहरच पसरली. मला झालेला आनंद शब्दांत सांगणं कठीण आहे.'

'वास्तविक आधीच्याही काही सामन्यांत मी त्याला बाद केलं होतं. पण आजसुद्धा मी असं म्हणणार नाही की ग्रीनीज हा माझा गिऱ्हाईक होता. तो रिचर्डस आणि लॉईड यांच्याएवढाच धोकादायक बॅट्समन होता. त्या स्पर्धेतले दोन क्षण माझ्या मनावर कायमचे कोरले गेले. पहिला ग्रीनीजच्या त्या विकेटचा आणि कपिलने वर्ल्डकप उंचावला तो क्षण.’

हेही वाचा: अंबाती रायडूमधेच तोंडावर राजीनामा फेकून मारण्याची हिंमत

संधूने किरमणीचं कौतुक केलं

संधूने त्यानंतर बाप्टीस्टचा बळी मिळवला. पण त्यात किरमणीचा वाटा अधिक होता. विकेटकीपर किरमणीने मोठी झेप टाकून झेल पकडला होता. गंमत म्हणजे काही दिवसांपूर्वी किरमाणी आणि संधूमधे थोडा वाद माजला होता. किरमाणीच्या मते संधूला ग्रीनीजची मिळालेली ती विकेट ‘रामभरोसे’ होती. तो बॉल अप्रतिम पकडला होता. पण ग्रीनीजसारख्याने तो सोडला काय आणि तो बाद झाला काय हा सगळा नशिबाचा भाग होता.

त्याच्या मते त्याचा इनस्विंगरसुद्धा छान पडायचा आणि काही वेळा भले भले बॅट्समन स्विंग ओळखताना चुकतात. तसा ग्रीनीजही चुकला होता इतकंच. किरमाणीने नंतर आपलं हे विधान मागं घेतलं. दोघांनी दिल साफ केलं. आता संधूने तर १९८३ च्या या विजयातल्या सगळ्या हिरोंवर पुस्तकच लिहिलंय. त्यात त्याने अर्थातच किरमणीचंही कौतुक केलं.

ती विकेट ग्रीनीजलाही धक्का देणारी

संधूच्या त्या विकेटच्या कथा आजही निघतात हे विशेष. नुकताच मुंबईत वर्ल्डकप स्पर्धेच्या निमित्ताने एक पुरस्कार सोहळा झाला. ह्या सोहळ्यात आतापर्यंतच्या सगळ्या विजयी कर्णधाराला आणि प्रत्येक स्पर्धा गाजवणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार दिले. १९७९ च्या वेळचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरण्याचा मान ग्रीनीजला मिळाला. तो पुरस्कार स्वीकारायला आला होता. नंतर पत्रकारांशी गप्पा मारताना त्याने पहिल्यांदा कुणाची चौकशी केली असेल तर ती संधूची.

’कुठे आहे तो. त्याच्या मी शोधात आहे. मी इंटरपोलला पण कळवलंय त्याला शोधून काढा म्हणून’ असं ग्रीनीजने गंमतीने सांगितलं. ’तो भेटला की त्याचा मी गळा आवळणार आहे.’ असंही पुढे त्याने गंमतीने म्हटलं. पण गंमतीचा भाग सोडला तर ग्रीनीजलासुद्धा त्याची त्या पद्धतीने आणि अगदी सुरवातीलाच गेलेली स्वतःची विकेट केवढी धक्का देऊन गेली हे समजतं.

ग्रीनीजच्या मते त्यानंतर विंडीजचे फलंदाज व्यवस्थित खेळले नाहीत. १८३ हा रन्सचा आकडा दडपण घेण्यासारखा नव्हता आणि नवा फलंदाज येत नाही तोच आधीचा फलंदाज बाद होत गेला. पहिल्या पाच सहा विकेट्स लवकर पडल्याने भारतीयांचा आत्मविश्वास साहजिकच वाढला. भारतीय त्यादिवशी जिद्दीने खेळले आणि म्हणून विजयी झाले.

हेही वाचा: वर्ल्डकप जिंकलेल्या टीममधले खेळाडू नंतर काय करतात?

काका, पुतणे विश्वविजेते ठरले

ग्रीनीजसाठी तो काळ वाईटच होता. ही स्पर्धा सुरु होण्याच्या काही दिवस आधीच त्याची लाडकी अडीच वर्षांची लेक दिया किडनीच्या आजाराने दगावली. अँटीग्वाला तो भारताविरुद्धच कसोटी खेळत होता. तेव्हा ती खुपच आजारी झाल्याने त्याची १५४ धावांची खेळी झाली असताना निवृत्त होत बार्बाडोसला हॉस्पिटल गाठावं लागलं. अतिशय हुशार आणि खेळकर अशी ही आपली लेक या आजाराला बळी पडेल असं ग्रीनीजला वाटलं नव्हतं. पण दुर्दैवाने ती चटका लाऊन गेली. पाठोपाठ महिन्याभरात वर्ल्डकप स्पर्धेत हा असा जबरदस्त फटका खावा लागला.

याउलट संधू वर्ल्डकप स्पर्धेमुळे भारताच्या क्रिकेट इतिहासात सोन्याचे पान लिहिलं. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा चुलता हरचरण सिंग हा उत्कृष्ट हॉकीपटू. १९७५ मधे भारतीय हॉकी संघाने कौलालंपूरला पाकिस्तानला लोळवत हॉकीतला वर्ल्डकप जिंकला होता. ह्या विजयात आघाडीला खेळणाऱ्या ह्या हरचरणचाही मोलाचा वाटा होता. अशा तऱ्हेने दोन वेगवेगळ्या खेळातले विश्वविजेते होण्याचा मन एकाच घराण्यातल्या दोघांना मिळाला. काका आणि पुतण्या ह्यांनी विश्वविजेते होण्याचं असं उदाहरण सापडणं मुश्कीलच.

बलविंदरला ‘बल्लू’ असे लाडक्या नावाने सहकारी हाक मारतात. खरंच बल्लू बल्ले बल्ले म्हणायला हरकत नाही.

हेही वाचा: 

धर्म कसला बघताय क्रिकेटपटूंची जिगर बघा

आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा

राहुल गांधींचा अख्खा राजीनामा समजून घ्या ८ पॉईंटमधे

टीम इंडिया निळ्याऐवजी केशरी रंगाच्या जर्सीमधे का खेळणार?