बाप्पाचा प्रवासः सोवळ्यापासून ग्लोबल फ्रेंड गणेशापर्यंत

०७ सप्टेंबर २०१९

वाचन वेळ : ८ मिनिटं


देव नित्य आहे. तो बदलत नाही, असं लिहिलंय पुराणांत. इतर कुठल्या देवाचं माहीत नाही, पण आमचा गणपतीबाप्पा मात्र बदलत आलाय. त्याचे भक्त बदलतायत म्हणून तोही त्यांच्यासाठी बदलत चाललाय. विशेषतः सार्वजनिक गणपती तर पार बदललाय. एकविसाव्या शतकातला ग्लोबल गणेश सगळ्यांचा झालाय.

जगात कायम असतो तो फक्त बदल. सगळंच बदलत राहतं. बदलतं म्हणूनच जग टिकतं, वाढतं, माणसं टिकतात, वाढतात. बदल आहे म्हणूनच जग आहे. किंबहुना बदलतं ते जग आणि हो, बदलत नाही तो देव. देव धर्माच्या, तत्वज्ञानाच्या पुस्तकात लिहिलंय की देव बदलत नाही. जग अनित्य आणि देव नित्य. ब्रम्ह सत्य आणि जग मिथ्या. देवाची संकल्पनाच आहे तशी.

देव बदलतो, त्याचाही अभ्यास होतो

पण हाच न बदलणारा देव बदलणाऱ्या जगाचा भाग बनतो, तेव्हा थोडी गडबड होते. तो अस्थिर माणसांच्या प्रतिमांमधे आणि प्रतिभांमधे ठाण मांडून बसतो. तेव्हा त्याला बदलावं लागतं. तो बदलतो म्हणजे खरं तर माणसाच्या मनातली रुपं बदलतात. हा आज फक्त श्रद्धेचा विषय उरलेला नाही.

उलट थिऑलॉजी म्हणजे दैवतशास्त्रात त्यावर शास्त्रीय संशोधन जगभर सुरू आहे. देवाचा हा वेगळाच शोध माणसाचा सामाजिक इतिहास शोधण्यास मदत करतोय. भारतातल्या दैवतांचा घेतला गेलेला शोध तर पुराणातल्या चमत्कारांपेक्षाही अद्भुत आहे. त्यात कडी केलीय ती आपल्या गणपती बाप्पाने.

विघ्नकर्ता ते विघ्नहर्ता असाही प्रवास

कुणी म्हणतं आपला गणपती बाप्पा द्रविड दक्षिणी आहे, कुणी म्हणतं आर्य. कुणी म्हणतं तो स्त्रीसत्ताकाचा प्रतिनिधी, तर कुणी त्याला आक्रमक पुरूषसत्ताकाचा वीर म्हणतं. कुणी त्याला ब्राम्हणी व्यवस्थेचा रक्षक मानतं, तर कुणी त्याला लोकशाहीचा पुरस्कर्ता मानतं. तो कुठे देवळातला द्वारपाल असतो तर कधी देवांनाही पुजावा लागणारा पहिल्या पूजेचा मानकरी. यज्ञांमधे विघ्न आणणारा विघ्नकर्ता ते भक्तांची संकट दूर करणारा विघ्नहर्ता असं गणरायाचं झालेलं स्थित्यंतर अनेक विद्वानांच्या अभ्यासाचा आणि आश्चर्याचा विषय बनलेलं आहे.

हे स्थित्यंतर रोधक असलं तरी शेवटी संशोधकांच्या काथ्याफुटाचाच भाग. पण आपल्याला सगळ्यांशी थेट संबंधित असलेलं. बाप्पाच्या संबंधितच अणखी एक रोचक स्थित्यंतर आहे. सार्वजनिक गणेशोत्सवातले रंग बाप्पाइतकेच मनोवेधक आहेत. विशेष म्हणजे हे सगळे रंग आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी उधळलेले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाचा शतकोत्तर समृद्ध प्रवास हा साध्या माणसांनी घडवलेला चमत्कार आहे. यातला आजचा म्हणजे एकविसाव्या शतकात बदलणारा गणेशोत्सव बघताना तर हे अधिक उठून दिसतं.

हेही वाचाः स्वतःशी संवाद साधण्यासाठी करावं हरतालिकेचं व्रत

सव्वाशे वर्षांचा सार्वजनिक सोहळा

एकविसाव्या शतकाबद्दल जस उद्याकडे बघून बोलता येतं, तसंच मागे वळूनही. हे आपल्या अजून अंगवळणी पडायचंय. हे गमतीशीर असलं तरी करायलाही हवंय. नव्या शतकातल्या पहिल्या एकोणीस वर्षांबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सवही सव्वाशे वर्षांचा झालाय. एकोणिसावं शतक संपता संपता सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात झाली. त्या सव्वाशे वर्षांच्या पार्श्र्वभूमीवर ही एकोणीस-वीस वर्ष पहायला हवीत.

ही एकोणीस वर्ष फक्त नव्या शतकातली पहिली वर्ष नाहीत. जागतीकीकरण देशात स्थिरस्थावर झाल्यालंतरची वीसेक वर्ष म्हणूनही याचं महत्व आहे. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने १८९३ साली पुण्यात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरु झाला, तोही काळ असाच होता. इंग्रजांचं सरकार पाऊण शतक जुनं झालं होतं. पण त्या सोबत आलेल्या सुधारणेच्या वाऱ्यांनी आसमंत दणाणून टाकला होता.

आधुनिक काळातलं ते पहिलं जागतिकीकरणच होतं. नवे विचार, नव्या संकल्पना यांनी तरुणांना भारुन टाकलं होतं. त्याच बरोबर जुनही सोडायचं नव्हतं. रिफॉर्मेशन म्हणजे सुधारणा आणि रिवायवल म्हणजे पुनरुज्जीवन या दोन विचारधारांच्या संघर्षातून पुढे वाट काढत त्यात समन्वय पूर्णपणे साधला गेला किंवा संघर्ष झालाच नाही, असं नाही. पण त्यामुळे रिनायसन्स म्हणजे प्रबोधनाचं एक महत्वाचं पर्व सुरू झालं, हे गणेशोत्सवाचे टीकाकारही नाकारू शकणार नाहीत.

धार्मिक सण ते राष्ट्रीय पर्व

राजमाता जिजाऊंनी पुण्याचा ग्रामदेव कसबा पेठ गणपतीची स्थापना केली, त्यात अनेक अभ्यासक सार्वजनिक गणेशोत्सवाची मुळं शोधतात. काही जणांना ते मूळ पेशव्यांच्या गणेशप्रेमात सापडंत. पण आजचा सार्वजनिक गणेशोत्सव शोधत लोकमान्यांच्या काळाच्या फार मागे जाऊ नये. पुण्याचे सरदार खासगीवाले यांनी शिंदे संस्थानाची राजधानी असलेल्या ग्वाल्हेरातला चौकांमधे आणि वाड्यांमधे साजरा गणपती पाहिला होता.

त्यातून त्यांनी कसबा पेठेत पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यात पुढाकार घेतला. अर्थातच त्यात लोकमान्य टिळकांचा सक्रिय पाठींबा होता. त्यांनी या उत्सवाच्या पाठिशी फक्त ताकदच लावली नाही. तर ‘केसरी’ त ‘आपले राष्ट्रीय उत्सव’ हा प्रसिद्ध अग्रलेख लिहून सार्वजनिक गणेशोत्सवाच्या उपक्रमाला वैचारिक बैठकच मिळवून दिली.

राष्ट्रीय आणि धार्मिक या संकल्पना वेगळ्या नाहीत असं मानन्याचा तो काळ होता. त्यामुळे हिंदूंच्या जागृतीचा संकल्प मनात ठेवून सुरु झालेला हा उत्सव राष्ट्रीय मानला गेला. पण तो सुरवातीला धार्मिकच होता. मुस्लिमांच्या विरोधात हिंदूंचंही संघटन व्हायला हवं, असा मर्यादित हेतू असलेला उत्सव होता. पुढे लोकमान्य मंडालेतून सुटून आल्यानंतरच्या काळात आणि विशेषत: गांधीयुगात याला खरं राष्ट्रीय स्वरुप आलं.

हेही वाचाः सुखकर्ता दुखःहर्ता ही आरतीच्या पलीकडे छान कविताही

बहुजनांच्या विटाळापायी टिळकांचा गणपती पिंजऱ्यात

त्यातून स्वाभाविकपणे एका देवाची पूजा असूनही त्याच्या सार्वजनिक स्वरुपात धार्मिक भाग बऱ्यापैकी गळून पडला. पण त्यानंतरही बराचं काळ अभिजनांमधील विशिष्ट समाजाची मक्तेदारी या उत्सवावर होती. लोकमान्यांच्या मुलांना म्हणजे रामभाऊ आणि श्रीधरपंत टिळक या दोघांना ब्राह्मणेतर मेळ्याचा कार्यक्रम करण्याची इच्छा होती. मेळे म्हणजे गाणी गाणारे संच. पण लोकमान्य गेल्यानंतरच्या सहा वर्षातच हे शक्य झालं नाही.

बहुजनांचा स्पर्श होऊ नये म्हणून लोकमान्यांच्या गायकवाड वाड्यातला लोकमान्यांचा गणपती त्यासाठी पिंजरा लावून कड्याकुलुपात बंद करण्यात आला होता. लोकमान्यांच्या वाड्यावर लोकमान्यांच्या मुलांना ही साधी गोष्ट करता येणं शक्य नव्हतं, त्यामुळे इतर ठिकाणी परिस्थिती कायम असेल याची कल्पनाच केलेली बरी. पण शिक्षण सामाजाच्या ताळागाळात पोहचू लागलं तसा या मक्तेदारीला दणका बसला.

प्रबोधनकारांची मूर्ती फोडण्याची धमकी

मुंबईत दादरच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात १९२२ साली त्याचा आक्रोश नोंदवला गेगेला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे त्यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात दलित नेते मडके बुवा यांच्या हाताने गणपतीची पूजा झाली. पण त्या साठी प्रबोधनकारांना गणपतीची मूर्ती फोडण्याची धमकी द्यावी लागली. त्यानंतर आयोजन समित्यांमधे आणि गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात सर्वांना स्थान मिळावं अशी मागणी सर्वत्र जोर धरू लागली.

प्रतिगाम्यांचे अड्डे वगळता हे फार वादावदी न होता झालंदेखील. कारण या उत्सवाच अर्थकारण वर्गणीवर अवलंबून होतं. जिथे हे होऊ शकलं नाही, तिथे नवी गणेशोत्सव मंडळ उभी राहिली. सार्वजनिक गणेशोत्सव खऱ्या अर्थाने सार्वजनिक बनला. मंडळांची संख्या वाढली. महाराष्ट्राच्या प्रमुख शहरात उत्सवाचं सार्वजनिक रूप पोहोचू लागलं. त्यातला उत्साह वाढू लागला. तरुणांची संख्या वाढली.

गणेशोत्सवाच्या बाजाराची सुरवात

स्वातंत्र्यापर्यंतच्या ध्येयवादात आणि नंतरच्या आदर्शवादात उत्सवातलं प्रबोधनात्मक स्वरूप बऱ्यापैकी टिकून होतं. पण त्यातलं नंतरच प्रबोधन हे व्याख्यानं, भाषणांचं कोरड नव्हतं. त्यात मेळे आले. लोकनाट्य आली. पौराणिक नाटकांऐवजी सामाजिक आणि विनोदी नाटकं येऊ लागली. कीर्तन आणि भजनं देखीलं मनोरंजन करू लागली. शास्त्रीय संगीताच्या जागी सुगम संगीत आलं. स्पर्धांची संख्या वाढली.

सत्तर ऐंशीच्या अस्वस्थ दशकांमधे मात्र चित्र बदललं. गणेशोत्सव मंडळांतली व्याख्यानं, कीर्तनं, प्रवचनं जवळपास संपली. मेळेही उरले नाहीत. सुगम संगीतही क्वचित ऐकू येऊ लागलं. त्या जागी सिनेमाचं संगीत आलं. रस्त्यावर पडदे लावून बघण्याच्या सिनेमाचा सुकाळ झाला. भव्य आरास आली. महाप्रचंड देखाव्यांनी गर्दी खेचण्यासाठी धावाधाव सुरू झाली. मुर्त्यांची  उंची एकमेकांशी स्पर्धा करू लागली.

ती गणेशोत्सवाच्या बाजाराची सुरूवात होती. अर्थात त्याची मुळं स्थापनेपासूनच दिसत होती. कारण लोकमान्य जिवंत असतानाच गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांवर फंडगुंड म्हणून टीका होत होती. टिळकांनी देवाधर्माचा बाजार मांडल्याच्या पुस्तकंही लिहिली गेली.

हेही वाचाः गणपती अथर्वशीर्ष १: हा तर मिनी संस्कृतीकोशच

गणेशोत्सवातून शिवसेनेची पक्षबांधणी

याच काळात एक मोठा बदल झाला होता. ते म्हणजे या उत्सवावर झालेलं पक्षीय राजकारणाचं कलम. मुंबई ठाण्याच्या गणपतीवर नव्वदच्या दशकापर्यंत शिवसेनेचं वर्चस्व निर्माण झालं. प्रत्तेक महापालिकेच्या वॉर्डात शिवसेनेची शाखा झाली. प्रत्येक शाखेचा गणपती आला. शिवसेनेने प्रभाव वाढवण्याच साधन म्हणून गणेशोत्सवाचा वापर केला.

वर्गणीच्या माध्यमातून गणेशोत्सव हा कार्यकर्त्यांसाठी अर्थकारणाचंही साधन बनला. वर्गणीवसुलीसाठी जबरजस्ती होत असल्याच्या तक्रारीही वाढल्या. जिथे दंगली झाल्या तिथे वर्गणीचं रुपांतर ‘प्रोटेक्शन मनी’त झालं. नव्वदच्या दशकात शिवसेना हिंदुत्वाच्या घोड्यावर बसून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पोहोचली. सोबत ती गणेशोत्सवाचा यशस्वी पॅटर्नदेखील घेऊन गेली.

गणेशोत्सव समाजोपयोगी कामांच्या दिशेने

जागतिकीकरणाची धावपळ याच नव्वदच्या दशकात सुरू झाली होती. अपवाद वगळता सार्वजनिक गणेशोत्सवाचं पावित्र्य रसातळाला पोहोचलं होतं. आधी भ्रष्टाचार फक्त आर्थिक असतो. तो आपल्या सोबत सगळीच अंग भ्रष्ट करुन टाकतो, तसं घडलं. गणपतीचे मंडप जुगाराचे अड्डे आधीच बनले होते. राजकारणातली चिखलफेक गणेशोत्सवाच्या मंडपापर्यंत पोहोचली होतीच. ते सगळच टोकाला पोहोचलं.

याचा अर्थ या काळात काहीच चांगल घडत नव्हतं असं नाही. गणेशोत्सव मंडळांमध्ये काम करणारे चांगले लोक ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या नेतृत्वात एकत्र आले. त्यामुळे गणेशमूर्तीच्या उंचीची स्पर्धा बऱ्यापैकी थोपवण्यात आली. मंडपांमधे सिनेमाच्या किंवा अश्र्लील गाण्यांच्या चालींवर रचलेली गणपतीची गाणी वाजवू नयेत, असं ठरलं. नाशिवंत गोष्टींपासून मूर्ती बनवू नयेत, यासाठी प्रयत्न झाले. क्रिकेटपटू, गणपती किंवा प्रसिद्ध व्यक्तींच्या रूपात गणपती बनवण्याचा प्रघात होता. त्याला विरोध करून तेही थांबवण्यात आलं.

या सोबतच पोलिस, महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि गणेशोत्सव मंडळांमधे समन्वय साधण्यात आला. या सगळ्यांपेक्षा महत्वाचं होतं ते गणेशोत्सव मंडळांना सामाजिक कामांकडे वळवण्यात काही प्रमाणात थोडफार मिळालेलं यश. काही मंडळांनी ग्रंथालयं सुरू केली, वाचनालयं सुरू केली, शाळांना मदत केली, अभ्यासिका सुरू केल्या, शिक्षण- आरोग्यामध्ये हजारो जणांना सहाय्य केलं. नेत्रदान, रक्तदानाचे संकल्प केले. अम्ब्युलन्स तर अनेक मंडळांनी सुरू केल्या. नव्या शतकाच्या उंबरठ्यावर गणेशोत्सव चांगल्या-वाईटाच्या उंबरठ्यावर उभा होता.

हेही वाचाः मुंबईच्या सिद्धिविनायकाचा महिमा कसा पसरला?

माध्यमांवर स्वार होऊन गणपती जगभर

नव्या शतकात सार्वजनिक गणेशोत्सव नव्याने बदलू लागला. त्यात प्रमुख भूमिका होती ती माध्यमांची. नव्या शतकात माध्यमांचा विस्फोट होऊ लागला होता. नवी वर्तमानपत्रं सुरू होत होती. त्यांच्या नवनव्या आवृत्या सुरू होत होत्या. टीवी या माध्यमातल्या बातम्यांचं समाजावर गारूड होऊ लागलं होतं. इंटरनेट या माध्यमाचा पायरव ऐकू येऊ लागला होता.

या सगळ्या माध्यमांनी गेल्या वीसेक वर्षांत हातपाय पसरण्यासाठी गणेशोत्सवाच्या लोकप्रियतेचा उपयोग करून घेतला. पण त्याच बरोबर गणेशोत्सवानेही यत्र तत्र सर्वत्र आपला प्रभाव पोहोचण्यासाठी या माध्यमाचा उपयोग करून घेतला. मुंबईतील ‘लालबागचा राजा’ हा याचं उत्तम उदाहरण होता.

वर्तमानपत्रासाठी गणेशोत्सवाचं रिपोर्टिंग हे आता एक बीट बनलं आहे. गणपतीच्या छोट्या मोठ्या बातम्या वर्तमानपत्रामधे पसरलेल्या असतात. मोठ्या गणपतीचे पानपानभर फोटो छापले जातात. अगदी घराघरातले गणपतीही वर्तमानपत्रांच्या पानापानांवर दिसतात. गणेशोत्सवांच्या निमित्ताने वर्तमानपत्रं विविध स्पर्धा आयोजित करतात. असं पूर्वी होत नसे.

टीवीने तर दिवसदिवसभर गणपती लाईव दाखवायला सुरूवात केली. गणेशोत्सवाचं कवरेज करण्यासाठी नवनव्या क्लृप्त्या काढण्यात येऊ लागल्या. त्यामुळे फक्त गणेशोत्सवाच्या मूर्ती आणि देखावे याच्यापलीकडे अनेक तपशील टीवीवर येऊ लागले. त्याला नाही म्हणता वेगळंच ग्लॅमर लाभलं. त्याचबरोबर अनेक गणपतींच्या नवसाच्या गोष्टीही कानोकानी गेल्या. गर्दी प्रचंड वाढली. गणेशोत्सवात वाढलेली प्रचंड गर्दी हे सध्याच्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य बनलंय. वर्षाचे नवस बोलणारी ही नवी पिढी आहे. टार्गेट आणि रिसेशनच्या धामाधुमीत त्यांना आधार हवा आहे. गणपती बप्पा त्यांना आधार देत आहे.

गणेशोत्सवावरचा मराठी पगडा सुटतोय

टीवीने आणखी एक घडवलं. मुंबई-पुण्याचा गणपती छोट्या पडद्यातून देशभर पसरला. एवढच नाही तर तो महाराष्ट्राच्याही प्रत्येक गावागावत गेला. आजवर देशभर सार्वजनिक गणेशोत्सव नव्हता असे नाही. महाराष्ट्रीय संस्कृती जिथे आहे तिथे गणपती होताच. वाराणसीपासून चेन्नईपर्यंत स्थानिक मराठी माणसं उत्साहाने गणेशोत्सव साजरा करत होतीच.

पण टीव्हीवरचे गणपती पाहून आता देशभरातल्या मराठी माणसांनी नाही, तर तिथल्या स्थानिकांनी गणेशोत्सव सुरू केला आहे. तिथे हा मोठ्या उत्साहाने गर्दी होते आहे. पण तिथला गणपती  तिथल्या पद्धतीचा आहे. तेच मुंबईसारख्या महानगरामधल्या अमराठी मंडळींच्या घरातही घडत आहे. हा गणपती मराठी पद्धतीचा नाही तर त्या त्या राज्यांतल्या पद्धतीचा हे. त्यावरचा मराठी पगडा सुटत चाललाय.  

आताआतापर्यंत सोवळ्याआवळ्यात असणारा गणपती आधीच मोकळाढाकळा झाला होता. आता त्यावरचा मराठी पगडा संपत असताना त्यातल्या रीतीभातीच्या चालीरीतीही आऊटडेटेड ठरत चालल्या आहेत. ज्याला हवं तसं तो आपल्या परीनं, आपापल्या पद्धतीने गणेशाला भजतोय. आपला राजाधिराज गणेश जगभरात ‘माय फ्रेंड गणेशा’ बनलाय. गणेशोत्सव आता सोपा बनलाय. सोशल नेटवर्किंगने त्याला आणखी सोपं बनवलंय. आता मोबाईलवरचे मंत्र ऐकत गणपतीची प्रतिष्ठापना होतेय.

हिंदूंच्या संघटनापासून सर्वधर्मीय उत्सवापर्यंत

या नव्या शतकातल्या बाप्पाला आता कशाचंच वावडं नाही. तो सगळ्यांचा झालेला आहे. फक्त मराठी अमराठीच नाही तर सर्व धर्माचे लोकही यात सामील होताना दिसत आहेत. मुस्लिम, बौद्ध, जैन, शीख, पारशी, ख्रिश्र्चन पदाधिकाऱ्यांची नावं गणेशोत्सव मंडळं अभिमानानं मिरवत आहेत. मुंबईत नोकरीसाठी आलेली परदेशी कुटुंबही मुलांच्या हट्टाखातर घरी गणपती आणताना दिसत आहेत. कधीकाळी हिंदूंच्या जागृतीसाठी सुरू भालेला गणेशोत्सव सगळ्या धर्मांना आकर्षून घेतोय.

पण हे होताना आपला लाडका गणेशोत्सव बाजाराचाही भाग बनलाय. एकविसाव्या शतकात हे टाळणं तसं गणरायालाही कठीण होतं. या उत्सवातील उत्साहाचा, लोकप्रियतेचा वापर आपआपल्या बाजारपेठेसाठी करण्याची संधी हे नवं शतक शोधतंय.  त्यासाठी त्याला अनेक शक्यता दिसत आहेत. त्यामुळे विश्र्वविनायकाचा उत्सव उद्या ग्लोबल गणेशोत्सव बनला तर आश्चर्य वाटू नये.

हेही वाचाः 

'फँड्री'च्या दानपेटीने गणपती बाप्पा होतो प्रसन्न

गणपती अथर्वशीर्ष २: पारायण करण्याआधी अर्थ समजून घेऊया

आसाममधे फेल गेलेली एनआरसी महाराष्ट्राच्या उरावर बसणार?

काश्मीरसारखी मेगा नोकरभरती, सरकार इतर राज्यांत का करत नाही?