रस्त्यावर बेल्ट विकणारी रिहाना बनली बार्बाडोसची राष्ट्रनायिका

०१ जानेवारी २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


तब्बल ३९६ वर्षांनंतर बार्बाडोसची ब्रिटीश राजवटीतून सुटका झाली. एका स्वतंत्र प्रजासत्ताकाचा आनंद साजरा करत बार्बाडोस नव्या वर्षात प्रवेश करतंय. आपल्या या नव्या राष्ट्राची नायिका म्हणून बार्बाडोसने पॉपस्टार रिहानाला निवडलंय. कधीकाळी बार्बाडोसच्या रस्त्यांवर बेल्ट विकणारी रिहाना आता राष्ट्रनायिका बनून जगासमोर आलीय.

गेली ३९६ वर्षं ब्रिटिश राजवटीखाली असलेल्या बार्बाडोसला नोव्हेंबरमधे स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा देण्यात आला. बार्बाडोसला कागदोपत्री स्वातंत्र्य १९६६मधेच मिळालं होतं. पण तेव्हा देशातलं सर्वोच्च अधिकार असलेलं महाराणीपद ब्रिटनची राणी दुसरी एलिझाबेथकडे होतं. तिच्या वतीने गवर्नर जनरल पदावरच्या व्यक्तीकडे देशाची संवैधानिक जबाबदारी सोपवली गेली होती.

सप्टेंबर २०२१मधे आलेल्या संविधान कायद्यानुसार स्वतंत्र देशासाठी महाराणीपदाला पर्याय म्हणून राष्ट्राध्यक्षपद देण्यात आलं. २० ऑक्टोबर २०२१ला तत्कालीन गवर्नर जनरल सँड्रा मेसन यांची देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदी निवड करण्यात आली. ३० नोव्हेंबरला मेसन यांचा शपथविधी पार पडला. त्या कार्यक्रमात बार्बाडोसला जगभर ओळख मिळवून देणाऱ्या पॉपस्टार रिहानाला ‘राष्ट्रनायिका’ हा बहुमान दिला गेला.

हेही वाचा: 'ब्रोकन’ तरूणाई ‘ब्रेक’ डान्सवरच थिरकणार ना!

घरगुती हिंसाचाराची शिकार

रिहानाचा जन्म बार्बाडोसच्या सेंट मायकेल भागात झाला. तिच्या वडलांचा कपड्यांचा एक छोटा स्टॉल होता. पण तिथल्या कमाईतले निम्मे पैसे त्यांच्या दारूच्या व्यसनातच उधळले जायचे. एबीसी न्यूजला तिने दिलेल्या मुलाखतीमधे तिच्या वडलांच्या व्यसनाबद्दल सांगितलं होतं. बऱ्याचदा दारूच्या नशेत असलेल्या तिच्या वडलांनी तिच्या आईला मारहाण केली होती.

त्या दोघांचं भांडण सोडवू पाहणाऱ्या रिहानालाही दरवेळी वडलांचा मार खावा लागायचा. एकदा घरी यायला फक्त दहा मिनिटं उशीर झाला म्हणून तिच्या वडलांनी तिला जोरदार थप्पड मारली होती. पुढचे बरेच दिवस ती तो गालावरचा वळ घेऊनच वावरत होती. घरातल्या रोजच्या भांडणांमुळे तिची डोकेदुखी इतकी वाढली होती कि तिला कदाचित ट्युमर असावा असा तिच्या डॉक्टरांचा अंदाज झाला होता.

वडलांकडून व्यवसायाचं बाळकडू

नवऱ्याच्या व्यसनाला कंटाळून तिच्या आईने शेवटी संसार मोडला. आपल्या भावंडांमधे वयाने मोठ्या असलेल्या रिहानानं घर सांभाळलं. कॉम्बरमेअर स्कूलमधे शिक्षण घेत असताना ती वडलांसोबत त्यांच्या कपड्याच्या स्टॉलवर जाऊ लागली. ‘द सन’ला दिलेल्या मुलाखतीत तिचे वडील म्हणतात, ‘छोटी रिहाना त्या स्टॉलबाहेर टोप्या, बेल्ट, ओढण्यांचा ढीग लावून विकायची.’

ती नंतर नफ्याच्या पैशांतून मिठाया खरेदी करायची. स्वतः बनवलेल्या पुड्यांमधून त्या मिठाया ती शाळेतल्या मुलांना विकायची. नफ्यातून नफा कसा काढायचा हे तिला बरोबर समजलं होतं. आज ती ज्या आत्मविश्वासाने मोठमोठ्या ब्रँडसोबत घसघशीत करार करते, त्याचं खरं गुपित तिच्या लहानपणीच्या धडपडीत दडलंय, असं तिच्या वडलांना वाटतं.

आपल्या वडलांनी व्यसनापायी आपलं किती नुकसान केलंय हे रिहाना आजही विसरली नाही. पण तिच्या आजच्या यशाचं, हिंमतीचं श्रेय मात्र ती तिच्या वडलांनाच देते. त्यांनीच मला पोहायला, मासे पकडायला, गाडी चालवायला शिकवलं आणि जगण्याचं बळ दिलं असं ती कायमच सांगत आलीय.

हेही वाचा: केरळमधल्या जेंडर पार्कमधे फुलतायत स्त्री पुरूष समानतेची फुलं

वर्णद्वेषाशी लढताना वळली संगीताकडे

लहानपणी रिहानाचा रंग ना धड काळा होता ना धड गोरा. पण तिच्या या रंगामुळे शाळेत तिला सतत चिडवलं जाऊ लागलं. जराशी गोरी असल्यामुळे ती कृष्णवर्णीय नक्कीच नव्हती पण तिला त्यांच्यासारखीच वागणूक मिळत गेली. त्यात वयाच्या मानाने इतरांपेक्षा थोडी जाड असल्याने ती तिच्या शाळेत चेष्टेचा विषय बनली होती. एकटी जरी असली तरी तिने प्रतिकार केलाच नाही असं नाही. तिला चिडवणाऱ्या सर्वांना तिनं वेळच्या वेळी उत्तर दिलं, कधी बोलून तर कधी मारून.

जसजशी मोठी होत गेली, तसतसं रिहाना इतरांपासून वेगळी राहू लागली. कवी ‘बीं’च्या चाफ्यासारखी ती आतल्या आत कुढत राहिली. त्यावेळी ‘रेगे’ या जमैकन संगीतशैलीचा आधार तिने घेतला. अश्यातच तिला मिलिटरीच्या एका कार्यक्रमात भाग घ्यायची संधी मिळाली. आई-वडलांची भांडणं आणि शाळेत होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून तिनं संगीतात मन रमवायचं ठरवलं. इतरांसारखी तीही कॉलेज वगैरे करू शकत होती, पण त्याऐवजी तिनं संगीतातच करियर करायचं ठरवलं.

१७व्या वर्षी मिळाली ओळख

वयाच्या १५व्या वर्षी रिहानाने तिच्या दोन मैत्रिणींना सोबत घेऊन एक ग्रुप बनवला. त्यांनी कशीबशी सुप्रसिद्ध रेकॉर्ड निर्माता इवान रॉजर्सची भेट घेऊन त्याला आपली कला दाखवली. इवानच्या मते, रिहानाची एण्ट्रीच इतकी जबरदस्त होती कि तिच्यासोबतच्या मुली त्याला दिसल्याच नाहीत. तिच्या आवाजावर खुश होऊन लगेच इवानने तिच्यासोबत काम करायचं ठरवलं. वर्षभरातच त्याने ‘पॉन दि रिप्ले’ हे गाणं तिच्याकडून गाऊन घेतलं.

हे रेकॉर्डिंग त्याने जे-झी या अमेरिकन रॅपरला ऐकवलं. रेकॉर्ड ऐकल्यावर जे-झीने लगेच रिहानाला बोलवून घेतलं. तो काम करत असलेल्या ‘डेफ जॅम रेकॉर्डिंग्ज’साठी त्याने रिहानासोबत करार केला. या करारानुसार रिहाना ‘डेफ जॅम’साठी सहा अल्बम करणार होती. मे २००५मधे तिचं ‘पॉन दि रिप्ले’ हे गाणं रिलीज झालं. काही दिवसांतच या गाण्याने अमेरिकेत धुमाकूळ घालत रिहानाचं नाव देशभर पोचवलं.

नोव्हेंबर २०११पर्यंत रिहानाचे सहाही अल्बम रिलीज झाले होते. एकापाठोपाठ एक विक्रम नोंदवत रिहानाने जगातल्या आघाडीच्या पॉपस्टारच्या पंगतीत स्थान मिळवलं. तिच्या ‘गुड गर्ल गॉन बॅड’ अल्बमने तिला विशेष प्रसिद्धी मिळवून दिली. आजही तिची सगळी गाणी, सगळे अल्बम एकदम सुपरहिट मानले जातात आणि तितक्याच आवडीने ऐकले जातात. संगीतक्षेत्रात मानाचा समजला जाणारा ग्रॅमी पुरस्कार पटकावणारी ती एकमेव रॅप गायिका आहे.

हेही वाचा: तुम्ही मोबाईल चार्जरशिवाय विकत घेणार का?

बार्बाडोसची आण, बाण, शान

करियरसाठी आपला देश सोडल्यावरही रिहाना आपल्या संस्कृतीला विसरली नाही. ती तिच्या रंगाचा, देशाचा, भाषेचा, संस्कृतीचा अभिमान कायमच मिरवत राहिली. मोठमोठ्या कार्यक्रमात न ढळलेला तिचा बेजन अॅक्सेंट हा तिच्या देशाचं प्रतिनिधित्व करत राहिला. २०१८मधे तिला बार्बाडोसची ‘युवा आणि संस्कृती’ राजदूत म्हणून मान्यता मिळाली. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ‘रिहाना ही स्वाभिमानासाठी लढणाऱ्या लोकांची ताकद आहे’ असं वक्तव्य केलं होतं.

२००८पासून बार्बाडोसमधे रिहानाचा वाढदिवस हा ‘रिहाना दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यादिवशी सरकारी सुट्टी नसली तरी पूर्ण देश हा दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करत असतो. २०१८मधे बार्बाडोसमधल्या शिक्षण, पर्यटन आणि गुंतवणुकीसाठी विशेष प्रयत्न केले जावेत, याची जबाबदारी विशेष राजदूत या नात्याने रिहानावर सोपवण्यात आली. २०२०मधे रिहानाला तिच्या मानवतावादी भूमिकेमुळे एनएएसीपीच्या ‘प्रेसिडेंट’स अवॉर्ड’ ने गौरवण्यात आलं.

शेतकरी आंदोलनाला पाठींबा

आपल्या आवाजाने श्रोत्यांना भारावून टाकणाऱ्या रिहानाने वेळोवेळी तोच आवाज सत्य आणि न्यायासाठीही उठवलाय. इंडियानातल्या एलजीबीटी समूहासोबत होणाऱ्या भेदभावाला तिने कडाडून विरोध केला. अमेरिकेतला वर्णद्वेष आणि पोलीस अत्याचारांच्या विरोधातही तिनं ठाम भूमिका घेतली होती. अन्यायाविरोधात तिची भूमिका फक्त तिच्या समाज किंवा देशापुरती मर्यादित राहिली नाही.

गेलं वर्षभर भारताच्या राजधानीत शेतकरी कायद्यांविरोधात आंदोलन सुरु होतं. शेतकऱ्यांचं हे आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने बरेच प्रयत्न केले पण शेतकरी डगमगले नाही. आंदोलक सरकारपर्यंत पोचू नयेत म्हणून रस्ते खणले गेले. रस्त्यांवर खिळे आणि टोकदार तारांची कुंपणं टाकण्यात आली. इंटरनेट बंद करण्यात आलं. या दडपशाहीला विरोध करताना ‘याबद्दल आपण का बोलत नाही’ असं ट्वीट करत तिनं या आंदोलनाला पाठींबा दिला.

देशाचा अन्नदाता आंदोलन करत असताना भारतीय सेलिब्रिटी मूग गिळून गप्प बसले. पण जसा रिहानाने पाठींबा दर्शवला तसे लगेच देशाचं सार्वभौमत्व जपायची धडपड करू लागले. पण कलाकाराला जर वास्तवाचं भान नसेल, तर त्याच्या कलेला काही अर्थ नसतो. बिनधास्त आणि बेधडक रिहानाच्या एका ट्वीटनं का होईना, पण भारतीय कलाकारांना या आंदोलनाबद्दल शेवटी आपली भूमिका मांडावीच लागली.

हेही वाचा: 

जे झालं ते चुकीचंच पण..

समर्थन किंवा विरोध करण्याआधी शेती कायदे समजून तर घ्या!

दाढी वाढवून गुरुदेव होता येत नाही आणि खादी वापरून महात्मा

एका शिक्षकाला बियरने चीनमधला सर्वात श्रीमंत माणूस बनवलं, त्याची गोष्ट