बसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं

०२ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


महात्मा गांधीजींची तीन माकडं जगप्रसिद्ध आहेत. पण या तीन माकडांची प्रेरणा गांधींना कुठुन मिळाली याची गोष्ट फारशी कोणाला माहीत नाही. ही प्रेरणा गांधींना तुकाराम आणि बसवण्णांकडून मिळाल्याचं दिसतं. त्याची मूळ आपल्याला तुकाराम आणि महात्मा बसवण्णा यांच्या रचनांमधे सापडतात.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि महात्मा गांधी यांचं परस्परांशी असलेलं नातं सर्वश्रुत आहे. येरवडा कारागृहात असताना महात्मा गांधी यांची जगद्गुरू तुकाराम महाराजांशी उराउरी भेट झाली असं म्हणता येईल. ‘माणूस आणि माणुसकी हेच केंद्रबिंदू’ असलेल्या या विभूतींच्या या भेटीला म्हणूनच विलक्षण महत्त्व आहे. तुकारामांच्या अभंगांतला मानवतेचा पाझर बापूंसाठी आयुष्यभर प्रेरणास्रोत राहिल्याचं दिसतं.

बापूंनी येरवडा कारागृहातल्या आपल्या १५ ते २८ ऑक्टोबर १९३० या १४ दिवसांच्या कालावधीत तुकोबारायांचे १६ अभंग इंग्रजीत अनुवादित केले. त्या १६ अभंगांच्या अनुवादाची तारीखाही बापूंनी नोंदवून ठेवलीय.

गांधीजींची माकडं तुकारामांच्या अभंगातली

‘गांधीजींच्या विचारांवर तुकारामांचाही प्रभाव’ या लेखात सुनील बडूरकर लिहितात, ‘गांधीजींच्या प्रार्थनेत तुकारामांच्या अभंगाचा समावेश होता.’ डॉ. इंदुभूषण भिंगारे आणि कृष्णराव देशमुख यांनी ‘श्री संत तुकारामांची राष्ट्रगाथा’ हा संग्रह १९४५ मधे प्रकाशित केला. त्या ग्रंथास स्वत: गांधीजींनीच प्रस्तावना लिहिलीय. त्यात ‘तुकाराम मुझे बहुत प्रिय है।’ असं त्यांनी नमूद केलंय.

शांतिनिकेतनमधले प्रसिध्द चित्रकार नंदलाल बोस यांना खास विनंती करून गांधीजींनी त्या संग्रहात समाविष्ट करण्यासाठी तुकारामांचं चित्र काढून घेतल्याचं सांगितलं जातं. तुकोबांच्या अभंगांतून व्यक्त झालेल्या विचारांची वैश्विकता बघून गांधीजी भारावून गेले. हे १६ अभंग निवडताना सर्वोदयाचा विचारच गांधीजींनी केंद्रस्थानी ठेवला.

तुकोबांचा विचार गांधीजी साक्षात जगले. दुर्दैवानं गांधीजी आणि तुकोबांचं हे अद्वैताचं नातं, समाजासमोर आलंच नाही. ‘वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका’ असा संदेश देणारी गांधीजींची तीन माकडं सर्वांना माहीत असतात. मात्र, ही माकडं गांधीजींनी तुकोबांच्या अभंगातून घेतलीत, याकडे कुणाचं फारसं लक्षच गेलं नाही.

हेही वाचा: नर्मदेत बुडणारं गाव बघत गांधी शांत बसलेत!

वारकरी संप्रदायावर बसवण्णांचा प्रभाव

पापाची वासना नको दावू डोळा। त्याहुनि आंधळा बराच मी ।।१।।
निंदेचे श्रवण नको माझे कानी । बधिर करोनि ठेवी देवा ।।२।।
अपवित्र वाणी नको माज्या मुखा। त्याजहुनि मुका बराच मी ।।३।।

गांधीजींनी अनुवादित केलेल्या १६ अभंगांच्या क्रमवारीत हा अभंग दुसऱ्याच क्रमांकावर आहे. यावरून गांधीजींची तुकारामांवरची श्रद्धा आपल्याला लक्षात येईल. आता प्रश्न उरतो तुकोबारायांकडे ही माकडं कुठून आली असावीत? याचं उत्तरं महात्मा बसवण्णा आणि शरण चळवळीकडे बघुन मिळेल. ही माकडं तुकोबांना वैचारिक वारशातून मिळाली असं म्हणता येईल.

वारकरी चळवळीचं मूळ आपल्याला शरण चळवळीत सापडतं. संत परंपरा ही शरण परंपरेची थोडी लवचिक आणि थोडी मवाळ आवृत्ती आहे. कावेरी ते गोदावरी खोऱ्यात बसवयुगाचा म्हणजेच कल्याणपर्वाचा इतिहास घडला. संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या वचनांवर बसवण्णा आणि अल्लमप्रभुदेवांसह इतर शरणांच्या वचनांचा प्रभाव दिसतो. 

ज्ञानेश्वरीतील कित्येक ओवी आणि चन्नबसवण्णांच्या वचनांमधे विलक्षण साम्य दिसतं. एकनाथ महाराजांच्या भारूडांचं मूळ शरणांच्या कूट वचनांत (कन्नड शब्द: बेडगीन वचनगळु) दिसून येतील. शरणांच्या वचनांतील धग आपल्याला संतांच्या अभंगातून जाणवते. हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.

हेही वाचा: गांधीजींना तुकोबा भेटले होते

मानवी मनाला माकडाची उपाधी

ज्या १६ अभंगांचा महात्मा गांधीजींनी इंग्रजीत अनुवाद केला, त्या १६ अभंगांचा आशयाच्या पातळीवर नव्हे तर रचनेच्या पातळीवरही साम्य असणारी वचनं बसवण्णा, सिध्दरामेश्वर आणि अल्लमप्रभु यांची मूळ वचनं आहेत. हाही स्वतंत्र लेखाचा विषय ठरेल.

शरणांनी मनाला मर्कट म्हटलंय. तीन माकडांचं रूपक म्हणून व्यक्त झालेला आशय मांडताना महात्मा बसवण्णा आपले आराध्यदैवत कुडलसंगमदेवाला विनंती करताना म्हणतात,

इकडे तिकडे जाऊ नये यासाठी पांगळा कर देवा,
वळून वळून पाहू नये यासाठी आंधळा कर देवा,
दुसरे काही ऐकू नये यासाठी बहिरा कर देवा,

तुमच्या शरणांच्या चरणांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही विषयापासून दूर ठेवा कुडलसंगमदेवा
(बसवण्णांची वचने : समग्र वचन संपुट : १ वचन क्रमांक ५९)

याचं मूळ वचन कन्नडमधे असं आहे,

अत्तलित्त होग दंते हेळवन माडय्या तंदे
सुत्ती सुळीदु नोडदंते अंधकन माडय्या तंदे
मत्तोंद केळदंते किवुडन माडय्या तंदे
निम्म शरणर पाद वल्लदे
अन्य विषयक्केळसदंते इरीसु कुडलसंगमदेवा

हेही वाचा: बाप एकच असतो, तो कसा बदलणार?

गांधींना बसवण्णांची भेट घालून देणारी व्यक्ती

एकूणच बाराव्या शतकातील शरण चळवळ समजून घेताना, नव्यानं अन्वयार्थ लावताना आपल्याला लेकुरवाळ्या विठ्ठलाला केंद्रबिंदू मानून उदात्त मानवी मुल्यांवरील संतांची अढळ श्रध्दा आणि त्या मुल्यांसाठी सर्वस्व त्यागण्याची टोकाची निष्ठा खुणावत राहते. तीच महात्मा बसवण्णा, संतश्रेष्ठ तुकाराम आणि महात्मा गांधीजी यांच्यासारख्या काळाच्याही दोन पावलं पुढे असणाऱ्या विभुतींच्या जीवनांची प्रेरणा आहे.

आता महात्मा गांधी यांना बसवण्णांची ओळख होती़ आणि ती करून देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे हर्डेकर मंजप्पा़ यांना कर्नाटकचे गांधी म्हणूनच ओळखलं जातं. मंजप्पा यांचा स्वातंत्र्य चळवळीशी थेट संबंध होता़. लोकमान्य टिळकांनी केसरीतून प्रसिध्द केलेले अग्रलेख मंजप्पा यांनी कन्नडमधे अनुवादित करून प्रकाशित केल्याचा इतिहास धगधगता आहे.

१९२४ मधे बेळगावला झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात गांधींजींच्या सेवेसाठी मंजप्पांनी स्वयंसेवकांचा एक गट तैनात केला होता. त्या गटाचं नावच होतं ‘बसवेश्वर युवा संघ.’ स्वत: हर्डेकर मंजप्पांनी गांधींजीसोबत अनेक सत्याग्रह चळवळीत सहभाग घेतला होता़. ते बरेच दिवस अहमदाबादलाही राहिले. मंजप्पांनी महात्मा बसवेश्वरांवर अनेक पुस्तकंही लिहिलीत.

तुकाराम आणि रस्कीनच्या विचारांत साम्य

जॉन रस्कीन यांच्या ‘अन्टू धिस लास्ट’ या पुस्तकाचा गांधीजींवर प्रभाव होता़ इतका की त्यांनी त्याचा ‘सर्वोदय’ या नावाने अनुवाद केला. या अनुवादाने एक नवी विचारधाराच भारताला दिली. त्यालाच सर्वोदयवाद असं म्हणतात. या पुस्तकाचा गाभा गांधीजींनी तीन वाक्यांत सांगितलाय. ही वाक्ये अशी,

१. सर्वांच्या कल्याणात आपलं कल्याण आहे.

२. वकील काय किंवा केस कापणारा सलूनवाला काय, सर्वांच्या कामाची किंमत सारखीच आहे.

३. साधं अंगमेहनतीचं शेतकऱ्याचं जीवन हेच खरं जीवन आहे.

हा विचार खरोखरच क्रांतिकारक होता. पण नवा नव्हता! रस्कीनचे हे पुस्तक प्रसिद्ध होण्याच्या २०० वर्षे आधी तुकोबांनी हा विचार भारतीय समाजाला देऊन ठेवला होता. रस्कीनची वाक्यं तुकोबांच्या अभंगांचा अनुवादच वाटतात. ‘तुका म्हणे सुख पराविया सुखे। अमृत हे मुखे स्रवतसे।।' हे तुकोबांचं वचन आणि ‘सर्वांच्या कल्याणात आपलं कल्याण आहे,' हे रस्कीनचे वचन यात शब्दाचाही फरक नाही.

हेही वाचा: कस्तुरबाई १५०: आपण दोघं ‘दोघं’ नाही

बसवण्णांचा विचारही तोच

रस्कीनला वकील आणि सलूनवाला यांच्या कामाची किंमत सारखीच वाटते. तुकोबांना स्वत:चा मुलगा आणि नोकर यांची माणूस म्हणून असलेली किंमत सारखीच वाटते. म्हणूनच ते ‘ह्यदया करणे जे पुत्राशी । तेचि दासा आणि दासी।।' असं वचन लिहून जातात. आता महात्मा बसवण्णा यांचे विचार पाहूया,

१) सकल जीवात्म्यांच्या कल्याणाची कास धरणारा कुलज होय.

२) कायकवे कैलास, श्रम हीच पूजा़. आपल्या दैनंदिन कामातच ईश्वराची प्राप्ती होते.

३) कोणतेही काम श्रेष्ठ वा कनिष्ठ नसते त्याच्या कामावरून श्रेष्ठत्व सांगता येणार नाही़.

हेही वाचा: महात्मा बसवण्णाः ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारणारा महापुरूष

माकडांचा संबंध चिनी परंपरांशी

‘वाईट पाहू शकत नाही, वाईट ऐकू शकत नाही आणि वाईट बोलू शकत नाही’ हा संदेश देत तीन माकडांना जपानी संस्कृतीशी जोडलं. १६१७ मधे जपानमधे ‘निक्को’ या ठिकाणी ‘तोगोशूच्या’ समाधीवर हे तीन माकडं आहेत. ही समाधी चिनी दार्शनिक कन्फ्यूसीयसची होती, असं मानलं जातं. आठव्या शतकामधे हे चीनवरून जपानला पोचले.

याच काळात जपानमधे ‘शिंटो संप्रदायाचा’ बोलबाला होता. या संप्रदायामधे माकडांना सन्मान होता. तिथं माकडांना बुद्धिमान मानलं जायचं. या तिन्ही माकडांना प्रेमानं नांव पण दिले होते. ‘मिजारू’ या माकडाने दोन्ही हाताने डोळे बंद केले आहेत. याचा अर्थ वाईट पाहू शकत नाही. जे चांगलं आहे, तेच पाहावं.

‘किकाजारू’ या माकडानं दोन्ही हातानं कान बंद केलेत. म्हणजे वाईट ऐकू शकत नाही. चांगलं ऐकावं. वाईट ऐकू नये. ‘इवाजारू’ या माकडानं दोन्ही हातानं तोंड बंद केलंय. अर्थात वाईट बोलू शकत नाही. नेहमी चांगलं बोलावं. जेणेकरून दुसऱ्याचं मन दुखावलं जाणार नाही. असा संदेश देत ही तीन माकडं ‘बुरा मत देखो, बुरा मत सुनो आणि बुरा मत बोलो’ असं आपल्याला संकेत करतात.

गांधींजींच्या तीन माकडांचा लंडनमधे लिलाव

हेच बापूजींचे सिध्दांत होते. या विचारधारेचा त्यांनी आजन्म स्वीकार केला. म्हणजे ‘जे चांगलं आहे तेच बघावं. वाईट बघू नये. चांगलं ऐकावं. आणि चांगलं बोलावं. वाईट बोलू नये.’

एक चिनी शिष्टमंडळ गांधीजींना भेटण्यासाठी भारतात आलं होतं. त्या शिष्टमंडळाने गांधीजींना तीन माकडांचा संच भेट म्हणून दिला. हा संच पाहिल्यावर बापू खूप खूश झाले. ती भेट त्यांनी जवळ ठेवून घेतली आणि जीवनभर सांभाळून ठेवली. गांधीजींच्या या तीन बुद्धिमान माकडांचा लंडनमधे लिलाव झाल्याचं सांगण्यात येतं.

हेही वाचा: 

खऱ्या गांधींच्या विसरत चाललेल्या आठवणी

गांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल

७० वर्षांपासून भरणाऱ्या गांधीबाबांच्या यात्रेला जायचंय?

अयोध्येत भव्य मंदिर महात्मा गांधींना का नकोसं वाटलं असतं?

खरंच, भगतसिंगांची फाशी रोखण्याचा गांधींजींनी प्रयत्नच केला नाही?

लग्नासाठी जातधर्माचा विचार न करणाऱ्या तरुणांच्या शोधात गणेश देवी

(लेखक शरण साहित्याचे अभ्यासक आणि पत्रकार आहेत.)