आयसीसीची वनडे क्रमवारी जाहीर झाली. त्यात विराट कोहली एक नंबरवर तर रोहित दुसरा आहे. तुफान खेळूनही वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे सीरिजमधे रोहित नाही तर विराटच मॅन ऑफ द सीरिज ठरला. विराटसमोर रोहितची गुणवत्ता झाकोळून जाते का? पण त्याला रोहितची गॉड गिफ्टेड गुणवत्ताच कारणीभूत असावी.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे सीरिजमधे दुसऱ्या आणि तिसऱ्या मॅचमधे विंडीजने टीम इंडियाच्या तोंडचं पाणी पळवलं. होप आणि हेटमेयर यांच्या सातत्यपूर्ण बॅटींगमुळे विंडीजने मालिका बरोबरीत आणली. त्यामुळे भारतासाठी चौथी मॅच महत्वाची ठरली. या मॅचमधे सगळ्यांच्याच नजरा फक्त विराट कोहलीवर होत्या. कारण त्याने या सीरिजमधे सलग ३ मोठी शतकं ठोकली होती. पण तसं झालं नाही.
टीम इंडियाकडून चौथ्या मॅचमधे दोघांनी सेंच्युरी काढली. रोहित शर्मा आणि अंबाती रायडू यांनी. रोहितने तर १६२ धावांची धडाकेबाज खेळी केली. महत्वाच्या चौथ्या मॅचमधे रोहितने पहिल्या बॉलपासूनच विंडीजला विजयापासून दूर नेण्यास सुरवात केली. सीरिजमधली महत्वाची मॅच पहिल्या ५० ओवरमधेच रोहितच्या १६२ धावांच्या मोठ्या खेळीच्या जीवावर भारत जवळपास जिंकला होता. बॉलिंग ही फक्त औपचारिकता राहिली होती. इतक्या मोठ्या धावांचा डोंगर भारताने उभा केला होता.
हेही वाचाः विराटचं बर्थडे गिफ्ट टीमला भोवणार नाही ना?
दुसऱ्या आणि तिसऱ्या मॅचमधे विंडीजने केलेल्या ‘सरप्राईज अटॅक’मुळे टीम इंडियाच्या गडाला चांगलेच तडे गेले होते. पण, चौथ्या मॅचमधील रोहितच्या झुंजार प्रतिआक्रमणामुळे हा गड पडण्यापासून वाचला. त्यामुळे देशात एकाच नावाचीच चर्चा सुरु झाली. ती म्हणजे रोहित, रोहित आणि रोहित. रोहितच्या १६२ धावांच्या खेळीने आता विराटच्या तीन सेंच्युऱ्याही मागं पडल्यात. चौथ्या मॅचमधेपण विराटला फार खेळण्याची संधी मिळाली नाही. रोहितने मात्र हाफ सेंच्युरी केली. आता ही चर्चा किती काळ टिकणार हा मोठा प्रश्न आहे.
आपण फक्त वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजकडे विराट आणि रोहित यांच्या कामगिरीची झलक म्हणून बघता येतं. वनडे मॅचमधे रोहित आधी आला. तसंच या सीरिजमधे सगळ्यात आधी सेंच्यूरीही रोहितनंच ठोकली. रोहितची वनडे कारकीर्द बघितली तर एखादी सेंच्युरी ठोकून तो अक्षरशः झोपेत जातो. तसंच या दौऱ्यातही पहिल्या १५२ धावांच्या खेळीनंतर तो झोपी गेला. हा झोपी गेलेला कुंभकर्ण उठला तो चौथ्या मॅचमधे. या सगळ्या काळात विराटने सलग तीन सेंच्युरी काढल्या होत्या.
क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिनच्या म्हणण्यानुसार त्याने उभारलेला विक्रमी शतकांचा डोंगर दोनच भारतीय पार करू शकतात. एक म्हणजे रोहित आणि दुसरा विराट. त्यातल्या एकानं आपली चढाई इतक्या वेगाने सुरु केलीय की तो आता शिखराच्या जवळदेखील पोचलाय. तर दुसरा आरामात आपला वेळ घेत चढाई करतोय. रोहित जणू म्हणतो, दोन मॅचमधल्या धावा आपण एकाच मॅचमधे काढल्यात, आता जरा आपण निवांत बसू. तो असा शांत निवांत प्राणी आहे. अशाने कसा शतकांच्या शतकांचा पर्वत सर होणार?
सचिनने २०१२ मध्येच हे भाकीत केलं होतं. ते विराट आणि रोहित या दोघांकडे अससेल्या अंगभूत कौशल्यांकडे बघून. विराटकडे प्रचंड फायटिंग स्पिरिट आहे. कष्ट करण्याची मानसिकता आहे आणि तो प्रचंड कष्ट करतोही. त्याने त्याचं शरीर पूर्ण ट्रान्सफॉर्म केलंय. स्वतःवर बंधनं घालून घेतलीयत.
प्रत्येक क्रिकेट प्रशिक्षक खेळाडूंना एकच सांगत असतो. ते म्हणजे, मैदानावर १०० टक्के देण्यासाठी तुम्हाला सरावाच्यावेळी १५० टक्के द्यावे लागतील. त्यानंतर कुठं मॅचवेळी तुम्ही सरावाच्या ९० टक्के देऊ शकाल. हे सूत्र विराटने मनावर घेत कसून सराव कायम ठेवलाय. त्याचं फळ त्याला मिळतही आहे. या उलट गोष्ट रोहितची.
रोहित शर्माने सुरवातीपासूनच वेगवेगळ्या वयोगटात नॅशनल लेवला चमकदार कामगिरी दाखवली. तेव्हापासूनच त्याचा लौकिक टीमचा स्टार बॅट्समन असाच आहे. त्याच्या बॅटिंगची चर्चा प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू कायम करत असत. याच त्याच्या ‘एफर्टलेस’ फलंदाजीने त्याला टीम इंडियाची दारं विसाव्या वर्षी उघडून दिली.
हेही वाचाः हिरवाणी आणि शोधन : वाढदिवस सारखा आणि नशीबही
रोहितचा जन्म ३० एप्रिल १९८७ तर विराटचा ५ नोव्हेंबर १९८८. दीडेक वर्षानं लहान असलेल्या विराटचं पदार्पण रोहितनंतर एका वर्षाने झालं. म्हणजे जून २००७ मधे रोहितची वनडे इंटरनॅशनलमधे एंट्री झाली, तर विराट ऑगस्ट २००८ मधे वनडे खेळू लागला. क्रिकेट जाणकारांकडून रोहितबद्दल दोन शब्दप्रयोग नेहमी वापरले जातात, ते म्हणजे रोहितकडे असणारा ‘टाईम’ आणि ‘टायमिंग’. रोहितकडे शॉट मारण्यासाठी भरपूर टाईम असतो. तो आपला फटका अखेरच्या क्षणीही लीलया बदलू शकतो.
तसंच रोहितचं शॉट मारतानाचं टायमिंग इतकं चांगलंय, की त्याने सहज फटकावलेला बॉल कधी सीमेपार जातो हे कळतच नाही. तो खेळलेल्या प्रत्येक शॉटनंतर कोणत्याही बॅट्समनला असं वाटून जातं की अरे एवढी सोप्पी ब़ॉलिंग तर मला हवी होती. त्यालाही १५० किमीच्या वेगाने येणारा बॉल आपण रोहितसारखा आरामात सीमेपार मारू असा आत्मविश्वास वाटतो. पण, प्रत्यक्ष खेळताना तोच बॉल कधी विकेटकिपरकडे गेला हेही आपल्याला कळत नाही.
मग रोहित कसं काय इतक्या सहजपणे बॉल सीमापार घालवतो? त्याचं कारण आहे, त्याला ‘टाईम’ आणि ‘टायमिंग’चं मिळालेलं ‘गॉडगिफ्ट’. ते विराटलाही नाही. त्यामुळेच रोहित बॅटिंगच्या बाबतीत स्पेशल आहे. इतका सर्वगुणसंपन्न असलेला रोहित क्रिकेट जगतात विराट इतका चर्चेत का नाही? का अजूनही तो टेस्ट टीममधून आत बाहेरच करतोय?
सचिनने २०१२ ला ‘भविष्यवाणी’ केली. त्यानंतर २०१३ पासून विराट आणि रोहितच्या वनडे कारकिर्दीवर नजर टाकली तर सेंच्यूरीच्या बाबतीत रोहित विराटच्या खूप मागं नाही. २०१३ पासून आतापर्यंत विराटच्या नावावर २५ सेंच्युरी आहेत. तर रोहितने १९ सेंच्युऱ्या काढल्यात. मोठ्या शतकांच्या बाबतीत रोहित विराटच्या खूप पुढे आहे. २०१३ पासून सगळ्या हंगामांत भारताकडून सर्वाधिक धावा या रोहितनेच केल्यात. त्यात तीन द्विशतकांचा समावेश आहे. तर सात दीडशतकांचा.
मोठी शतकं करण्यात रोहितचा हात रनमशिन विराटही धरत नाही. रोहितने सातत्य दाखवलं तर आज विराटला सचिनच्या शतकांच्या पर्वताचे शिखर गाठण्यासाठी तगडं आव्हान निर्माण झालं असतं. एक मुंबईचा बॅट्समन सचिनचा रेकॉर्ड मोडण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे, हे चित्र खुद्द सचिनला आणि मुंबईतील क्रिकेट रसिकांना किती सुखावणारं असतं.
प्रतिभेच्या बाबतीत विराटच्या तुलनेत रोहितला अधिक झुकतं माप मिळालंय. असं असतानाही विराट रोहितच्या पुढंय. याचं कारणही या प्रतिभेतच दडलंय. एखाद्याकडे ‘टाईम’ भरपूर आहे मग त्याला जास्त धावपळ करावी लागत नाही. त्यामुळे तो इतरांच्या तुलनेत ‘निवांत’ असतो. रोहितच्या बाबतीतही काहीसं असंच घडताना दिसतंय.
बॅटिंग करताना रोहितकडे भरपूर ‘टाईम’ असतो. त्याच्याकडे बॅटिंगमधे फटक्यांची भरपूर विविधता आहे. त्यात हे ‘गॉड गिफ्टेड’ आहे. त्यामुळे तो ‘निवांत’ आहे. त्याच्या बॅटमधून लीलया धावा होतात. याच निवांतपणामुळे त्याला कष्ट करायची गरज नाही. हे त्याच्या सुटलेल्या पोटावरुन दिसून येतं. याच त्याच्या निवांतपणाला इंग्रजीत ‘लेझी ॲलेगन्स’ या गोंडस नावानं ओळखलं जातं.
असा हा ‘निवांत’ रोहित एकीकडे आणि दुसरीकडे एका ध्येयाने पेटलेला विराट. याच्याकडेही प्रतिभा आहे. पण रोहित इतकी नाही. विराटकडे एक गोष्ट अशी आहे जी ‘गॉड गिफ्ट’ म्हणून मिळत नाही. ध्येय गाठण्यासाठी अपार कष्ट उपसण्याची तयारी आणि त्यासाठी लागणारं फायटिंग स्पिरीट. जर रोहितने प्रतिभेसोबतच विराटसारखी मेहनत केली असती, तर तो आज कोणत्या शिखरावर असता, याचा विचारही करवत नाही. पण तसं झालेलं नाही. रोहित सर्वगुणसंपन्न आहे, पण परिपूर्ण नाही, हे या वेस्ट इंडिज वनडे सीरिजनेही दाखवून दिलंय.
हेही वाचाः दंगल आणि लीगपेक्षा तर राणादादाने कुस्तीला ग्लॅमर दिलं
(लेखक पत्रकार आहेत. ते ज्युनियर लेवलवर महाराष्ट्र संघाकडून क्रिकेट खेळलेत.)