बसभाडं ५ रुपये केल्याने, बेस्ट पुन्हा मुंबईची लाईफलाईन बनेल?

२७ जून २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


कधीकाळी मुंबईकरांसाठी बेस्ट म्हणजे लाईफलाईन होती. पण जानेवारीतल्या संपामुळे समजलं की बेस्ट नसल्याने काही फारसा फरक पडत नाही. पण प्रवाशांविना बेस्ट कशी चालणार? बेस्ट ही बेस्टच होती. पण वेगवेगळ्या कारणांमुळे बेस्ट तोट्यात चाललीय. आता महापालिकेचे नवीन आयुक्त बेस्टला नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्न करताहेत. म्हणूनच बेस्टमधे नवीन प्रयोग होताना दिसतायत.

पृथ्वीवर माणसाचं अस्तित्व असल्यापासून ते आजपर्यंत त्याने भरपूर शोध लावले. त्यातला चाकाचा शोध म्हणजे मानवी जीवनातली क्रांतीच समजली जाते. साधारण इ. स. पूर्व ३५०० वर्षांपूर्वी चाकाचा शोध लागल्याचं सांगितलं जातं. आज चाकाचा वापर आपण अगणित अशा कामांसाठी करतो. यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि मूलभूत वापर म्हणजे गाडी. सगळ्यात जास्त चाकं असलेली गाडी म्हणजे ट्रेन. पण रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांमधे सर्वांना सामावून घेणारी, कमी दरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचवणारी बस जगभरात लोकप्रिय आहे.

बससेवा सगळ्यात आधी पॅरिसमधे १६६२ ला सुरु झाली. तर भारतात इंग्रजांनी १८२३ ला बस आणली. या बसला किंवा बससेवेला मुंबईत बेस्ट म्हणतात. कारण ती खरंच बेस्ट होती. कारण मुंबईची पहिली लाईफलाईन होती. बऱ्याच वर्षांपूर्वी हा लाईफलाईनचा मान लोकल ट्रेनने मिळवला. पण आता बेस्टचं अस्तित्व संपुष्टात आलंय. मुंबईकरांना गेल्या १०० वर्षांपासून बससेवा देणारी बेस्ट कित्येक वर्षांपासून तोटा सहन करतेय. आता तर प्रवाशांना पुन्हा बेस्टकडे आकर्षित करण्यासाठी बसभाडं कमी करण्याची वेळ आलीय.

हेही वाचा: युरोपात धावणारी ट्राम पुन्हा मुंबईची लाईफलाईन होईल?

कधीकाळी १५ पैशांत व्हायचा बेस्टचा प्रवास

बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट म्हणजेच बेस्ट. मुंबईत बससेवेची सुरवात १८७३ पासून झाली. बॉम्बे ट्रॅमवे कंपनीने ही सेवा पायधुणी, कुलाबा कॉजवे, काळबादेवी, मलबार हिल, बोरी बंदर इत्यादी भागात सुरु केली. त्यावेळी कमीत कमी १५ पैसे बसभाडं होतं. 

आता बेस्टचं कमीत कमी भाडं ८ रुपये आहे. जे नुकतंच ५ रुपये करण्यात आलंय. तर एसी बसचं भाडं २० रुपयांवरुन ६ रुपये करण्यात आलंय. हे नवे दर पुढच्या महिन्याभरात लागू होतील. आताच्या जमान्यात जिथे सगळ्याच गोष्टींचे दर वाढत आहेत तिथे बेस्टने दर कमी केले, ही आश्चर्याची गोष्टी असली तरी हा जाणीवपूर्वक बेस्टला वाचवण्यासाठी घेतलेला निर्णय आहे .

हेही वाचा: १५२ वर्षांपूर्वी विरार लोकल सुरू झाली आणि त्यातून एक शहर उभं राहिलं

बेस्ट आणि रीक्षा-टॅक्सीचं भाडं सारखंच

गेल्या ७ ते ८ वर्षांमधे बेस्टची अवस्था बिकट झालीय. त्यामागे अनेक कारणं आहेत. बदलत्या जीवनशैलीबरोबर लोकांनी अनेक सवयी बदलल्या. त्यामुळे रस्त्यावर गाड्या वाढल्या, तसं ट्रॅफिक वाढलं. त्यामुळेच बस ट्रॅफिकमधे अडकते. आणि बस वेळेवर येत नाही ही प्रवाशांची तक्रार सुरु झाली. जी आजही कायम आहे. ट्रॅफिक कमी करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या जाताहेत. पण त्याचे रिझल्ट काही पटकन मिळणारे नाहीत. त्यामुळे बेस्टला ट्रॅफिकचा सामना करावाच लागणार आहे.

तसंच बेस्टने या दोन वर्षांमधे बसभाडं वाढवत कमीत कमी २ किमीसाठी ८ रुपये भाडं केलं. बेस्टने सर्वसामान्य लोक जाण्यामागचं महत्त्वाचं कारण होतं. रिक्षा आणि टॅक्सीचं भाडं परवडत नाही. १.५ किमीसाठी रिक्षाचं १८ रुपये तर टॅक्सीचं २२ रुपये भाडं आहे. मग धंदा वाढवण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सीचालकांनीही मुंबईच्या काही भागात चालणारी शेअर पद्धत सगळीकडे सुरु केली. यातून त्यांना फायदा झाला आणि प्रवाशांचा खर्चही वाचला.

जिथे १८ ते २० रुपये भाडं होणार आहे. तिथे प्रत्येकी १० रुपये घेतले. सहज ३० रुपये रिक्षा चालकाला मिळतात. असंच टॅक्सीच्या बाबतीतही आहे. सध्या मुंबईत ८ ते १२ रुपये शेअरचा भाव आहे. म्हणजे हा दर बेस्टऐवढाच आहे. म्हणूनच इतक्या माफक दरात आरामात बसून जाता येत असेल, तर उगाच बसच्या रांगेत, गर्दीत उभं राहून जाण्यापेक्षा प्रवाशांनी शेअरचा पर्याय निवडला. त्यानंतर उबर, ओलासारख्या सेवा आल्या. बसला कंटाळून अनेकांनी ट्रेनने प्रवास सुरु केलाच होता. पण स्टेशनपासून पुढे कॉलेज, ऑफिसला जाण्यासाठीसुद्धा प्रवाशांनी बसला वगळून रिक्षा आणि टॅक्सीला पसंती दिली.

हेही वाचा: आज रेल्वेचा हॅपी बड्डे, तिला विश केलंय ना!

बेस्ट कर्जात बुडाली

पुढे २००८ मधे एसी बस, लांब पल्ल्याच्या गाड्या, नगरसेवकांनी आपल्या विभागातून गाड्या काढल्या. पण या कशानेच प्रवासी आकर्षित झाले नाहीत. एसी बसमुळे तर बेस्टचं खूप नुकसान झालं. गाड्यांचे ठरवलेले मार्ग चुकले किंवा वेळा चुकल्या. ज्यामुळे प्रवासी अधिकच दूरावले. प्रवाशांची संख्या ४५ लाखांवरुन २८ लाखांवर आलीय, असं लोकसत्ताच्या शहरबातमधील लेखात म्हटलंय.

काही महिन्यांपूर्वी बऱ्याच जुन्या गाड्या भंगारात काढल्यात. त्यामुळे बसची संख्यासुद्धा कमी झालीय. त्यातच बेस्टच्या उत्पन्नात २०१८-१९ या वर्षात ८८० कोटींचा तोटा होत असल्याचं बेस्टने प्रसिद्धी पत्रकातून स्पष्ट केलंय. त्याचबरोबर टाटा पॉवर कंपनीची देणी, इंधन, वेतन, गाड्यांची देखरेख, निवृत्ती वेतन इत्यादींचा खर्चही निघत नाही. त्यामुळे दर महिन्याला वेतनासाठी लागणारी १८० कोटींची रक्कम बँकेकडून कर्ज घेऊन द्यावी लागत आहे. त्यामुळे बँकेचं कर्ज १२०० कोटींचं झालंय.

दरम्यानच्या काळात बेस्टच्या वीज ग्राहकांना वीजेचे अधिक चार्जेस लावून परिवहनाचे पैसे वसूल केले गेले. पण ग्राहकांनी यास नकार दिला. आणि आता जमवलेली ३५०० कोटींची रक्कम आता ग्राहकांना परत करावी लागणार आहे. त्यामुळे बससेवा चालवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. यावर अनेक राजकारण्यांनी बेस्टचं खासगीकरण करण्याचं सुचवलं. पण अनेक सरकारी कामं खासगी कंपन्यांना देऊनही काही होत नसल्याचं आपल्याला माहितीच आहे.

हेही वाचा: लाखमोलाच्या टाटा नॅनोचं नॅनो लाईफ

बेस्टच्या मदतीला पालिका धावून आली

जानेवारीत बेस्ट कामगार संघटनांनी त्यांच्या वेतनासाठी संप पुकारला. एकेकाळी बेस्टचा संप असला की मुंबईकरांचे अतोनात हाल होत. पण यंदाच्या संपात संप असल्यासारखं काही वाटलंच नाही. संपाचा लोकांना फारसा काही त्रास झालाच नाही. ‘ओला, उबर, रीक्षा, टॅक्सी, मेट्रो आहेत. त्याचं भाडं जास्त असलं तरी शेअर करून जातो किंवा हायवेला टुरिस्टच्या गाड्या अगदी १० रुपयांमधे सोडतात. तसंही बस कधीच वेळेत येत नाही. मग आम्ही असंच करतो. त्यामुळे बेस्ट नसल्यामुळे फारसं काही वाटलं नाही’, असं मालाड बेस्ट प्रवासी संघटनेच्या सदस्या हेमा पाटील म्हणाल्या.

बेस्ट हा मुंबई महापालिकेचाच भाग आहे. पण बेस्टची जबाबदारी घ्यायला मात्र कोणीही तयार नाही. टाटा पॉवरचं गेल्या आठ महिन्यांमधलं बिल थकवल्यामुळे टाटा कंपनीने वीज कापण्याचा इशारा दिला. मुंबई अंधारात जाईल यामुळे बेस्टच्या मुद्द्यांवर जोमाने काम सुरु झालं. पण अखेर बेस्टला नवसंजीवनी देण्यासाठी पालिकेचे नवीन आयुक्त प्रवीण परदेशी यांनी पुढाकार घेतला.

आता पालिकेकडून पुढचे सहा महिने दर महिन्याला १०० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. तसंच साधारण ५३० बस भाड्याने घेणार आहेत. त्यानंतर बसचं भाडं ५ किमी अंतरासाठी ५ रुपये तर एसी बसचं ६ रुपये असणार आहे. बसचे मार्ग बेस्ट अधिकाऱ्यांनी अभ्यास करून ठरवावेत, मेट्रोला जोडून बससेवा सुरु करावी इत्यादी गोष्टींची सूचना पालिकेकडून करण्यात आलीय.

या सर्व उपायांतून बेस्टकडे ग्राहक आकर्षित होऊन बेस्टला फायदा होईल. आणि बेस्टची राजवैभव पुन्हा बेस्टला मिळेल अशी आशा बेस्ट कर्मचाऱ्यांना वाटत आहे. जर असं झालं तर नक्कीच बेस्ट पुन्हा एकदा मुंबईची लाईफलाईन बनेल.

हेही वाचा: 

शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी भाषणातून दिला पुरोगामी राष्ट्रवादाचा धडा

शाहू महाराजांनी खरंच ब्रिटिशांना मदत केली होती?