गेल्या वर्षातल्या वन डे मालिकेत वेस्ट इंडिजला नऊपैकी फक्त दोनच सामने जिंकता आले. पण टी – २० क्रिकेट दरम्यान विडींजला यशाचा मंत्रच मिळाला. त्यांचे शे होप, शिमरोन हेटमायर आणि निकोलस पूरन या तीन दमदार खेळाडू २०२० मधल्या क्रिकेट सामन्यात प्रतिस्पर्धांच्या तोंडचं पाणी पळवणार यात शंका नाही.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन टी- २० आणि तीन वनडे सामन्यांची मालिका नुकतीच खेळली गेली. भारतासह विंडीजचीही सरत्या वर्षातील ही अखेरची मालिका झाली. त्यामुळे दोन्ही टीम या सरत्या वर्षाचा शेवट आपला आत्मविश्वास उंचावणारा करण्यासाठी जीवाचं रान करत होते. कारण हाच उंचावलेला आत्मविश्वास २०२० च्या ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या वर्ल्डकपच्या दृष्टीनं फार महत्वाचाय.
आता सगळीच टीम २०२० मधला टी- २० वर्ल्डकपचा प्रवास सुरु करणार आहे. त्या अनुषंगाने भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातली ही मालिका महत्वाची होती. ज्यांनी ही मालिका हलक्यात घेतली त्यांना दोन्ही मालिकेच्या अखेरीला कळून चुकलं की २०२० चा टी- २० वर्ल्डकप इतका सोपा नाही. कारण दोन टी-२० वर्ल्डकप आपल्या कपाटात सजवणारा विंडीज आपली संघबांधणी मजबूत करतोय.
सरत्या वर्षातच झालेल्या वनडे मालिकेत वेस्ट इंडिजकडे डार्क हॉर्स म्हणून पाहिलं जात होतं. पण, त्यांना नऊपैकी फक्त दोनच सामने जिंकता आले. विंडीज या वर्ल्डकपमधला सर्वात कमी सामने जिंकणारा संघ ठरला होता. त्याच्यापेक्षा बांग्लादेशने एक सामना जास्त जिंकला. वर्ल्डकपमधील या सुमार कामगिरीमुळे विंडीजकडे क्रिकेट पंडित कानाडोळा करत होते. पण, विंडीजने आपल्या संघात अमुलाग्र बदल करत संघबांधणी करण्यास सुरुवात केली.
ही बांधणी करताना त्यांना विजयाची त्रिसूत्री सापडली. ही त्रिसूत्री किंवा त्रिमुर्ती म्हणजे शे होप, शिमरोन हेटमायर आणि निकोलस पूरन. भारतातील क्रिकेट चाहत्यांना ही नावे गेल्या १५ दिवसांपासून पाठ झाली असतील. कारण या त्रिमूर्तींनी भारतीय प्रेक्षकांचा जीव गेल्या १५ दिवसांपासून अनेकवेळा टांगणीला लावला होता.
या त्रिमूर्तींनी या मालिकेतून एक संदेश दिला आहे की येत्या टी - २० वर्ल्डकपमधे विंडीज डार्क हॉर्स नाही तर वर्ल्डकपचा एक दावेदार असणार आहे. ज्या त्रिमुर्तींच्या जोरावर विंडीज दावेदारी सांगत आहेत त्यांच्यावर नजर टाकल्यावर तिघेही लंबी रेस के घोडे असल्याचे दिसते.
हेही वाचा : भारताकडे वेगवान गोलंदाज येण्याचं कारण काय?
भारताबरोबरच्या टी-२० मालिकेत शे होप संघात नव्हता, तरी त्याने २०19 मधे वनडेत केलेली कामगिरी पाहता त्याला टी - २० संघात येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्याने पहिल्या वनडे सामन्यात केलेलं संयमी शतक पहावं. मोठी धावसंख्या चेस करताना एका सलामीवीराने कशाप्रकारे खेळलं पाहिजं याचं उदाहरण त्यानं घालून दिल्याचं दिसतं. त्याने त्याचा रोल ओळखून ५० षटके खेळून काढली. बाकी धावगती चांगली राखण्याचं काम हेटमायर आणि त्यानंतर येणाऱ्या आक्रमक फलंदाजांनी चोख पार पाडलं.
याच भूमिकेतून त्याने दुसऱ्या वनडे सामन्यातही खेळ केला. होपची फलंदाजी पाहिल्यानंतर विंडीजचा संघ आता टी - २० मधून बाहेर पडत इतर दोन फॉरमॅटकडेही गांभिर्याने लक्ष देत असल्याचा संदेश मिळाला. ही एकंदर क्रिकेटचा दर्जा सुधारण्यास पूरक अशी गोष्ट आहे.
आपल्या या मोठ्या इनिंग खेळण्याच्या कसबीमुळेच होपने २०१९ च्या वर्षात सर्वाधिक धावा करण्यामधे विराट रनमशीनला मागे टाकलं. वनडे पाठोपाठ कसोटीतही त्याचं हे कसब विंडीजच्या कामी येणार यात शंका नाही. तसंच विंडीज आता धावांचा रतीब घालणाऱ्या या सलामीवीराचा टी-२० संघासाठी विचार करणार नाही असं होणंही शक्य नाही. अखेर विंडीजच्या फायर पॉवरला स्थिरता देणारा एखादा सलामावीर संघात असावा असं एका चांगल्या प्रशिक्षकाला वाटतंच.
हेही वाचा : मानसिक आरोग्य नीट राहीलं तरच खेळाडू यश मिळवतील
कोणत्याही संघातील तीन आणि चार क्रमांकावर खेळायला येणाऱ्या फलंदाजाकडे परिस्थितीनुसार संयमी आणि आक्रमक दोन्ही प्रकारची फलंदाजी करण्याची क्षमता असावी लागते. अशी क्षमता भारताचा कर्णधार विराट कोहलीकडे आहे. म्हणूनच तो जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांपैकी एक फलंदाज म्हणून ओळखला जातो. विंडीजसाठी हीच भुमिका शेमरोन हेटमायर पार पाडत आहे. त्याच्याकडे विकेट पडल्यानंतर डाव सावरण्याची क्षमता आहे. याची चुणूक त्याने भाताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात दाखवून दिली.
या सामन्यात सुरुवातीला फार जोखीम न घेता तो खेळला. सेट होण्यावर भर दिला. त्यानंतर त्याने आक्रमक फलंदाजी करत धावांची गती वाढवली. होपने त्याला पूरक अशी खेळी करत दमदार भागिदारी रचली. त्यानं १४३९ धावा रचल्या. या दोघांची फलंदाजी पाहताना त्यांना सामन्यात कोणत्या वेळी कोणता पवित्रा घेतला पाहिजे याची उत्तम जाण असल्याचं जाणवलं. ही बाब विंडीज क्रिकेटला भविष्यात मोठा विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणार.
डावखुरा हेटमायर फलंदाजी करताना बऱ्याचवेळा युवराजची आठवण होते. ज्याप्रकारे युवराजकडे चेंडू लिलया मैदानाबाहेर भिरकावण्याचं कसब होतं तसंच कसब हेटमायरकडे आहे. त्याच्याकडे सामन्याची सुत्रं एकहाती फिरवण्याची क्षमता आहे. याचं ताजं प्रमाण म्हणजे त्याला दिल्ली कॅपिटलनं तब्बल 7.75 कोटीला खरेदी केलं. त्यामुळे येत्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर तो युवराजप्रमाणेच आपल्या हिटिंगच्या जोरावर हेटमायर अधिराज्य गाजवणार यात शंका नाही.
हेही वाचा : सगळं संपलंय, असं वाटेल तेव्हा शाहबाज नदीमची ही गोष्ट वाचा
होप आणि हेटमायर यांच्यानंतर विंडीजच्या फलंदाजीतील उगवता तारा म्हणजे त्रिनिदादचा निकोलस पूरन. तो वनडे आणि टी - २० सामन्यात चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. त्याची मुख्य भुमिका ही जलदगतीनं धावा करणं ही आहे. तो ज्यावेळी फलंदाजीला येतो त्यावेळी डाव शेवटाकडे सरकलेला असतो. त्यामुळे त्याला आल्या आल्या फटकेबाजी करावी लागते.
ही लिलया पूरन चोखपणे करतो. त्याच्या भात्यात अनेक शॉट्स आहेत आणि त्याच्यावर त्याची महारथी आहे. त्यामुळे सेट झालेला हेटमायर आणि पूरन ही डावखुरी जोडी घातक ठरते. याचा ३० ते ४० षटकादरम्यान विंडीजला आपली धावगती वाढवण्यात फायदा मिळतो. त्यानंतर पोलार्ड आणि बाकीच्या ताकदवर हार्ड हिटर्सचं काम सोपं होऊन जातं.
अशाच प्रकारे पूरन आणि हेटमायर ही जोडी टी -२० सामन्यातही धावांचा पाऊस पाडून येणाऱ्या हार्ड हिटर्सचं काम सोपं करते. त्यातच सध्या जागतिक क्रिकेट वर्तुळात लेग स्पिनर्स आणि डावखुऱ्या जलदगती गोलंदाजांचे वर्चस्व दिसून येतंय. या डावखुऱ्या गोलंदाजांवर ही डावखुरी जोडगोळी रामबाण तोडगा ठरु शकते.
हेही वाचा : फारुख इंजिनिअर बीसीसीआयच्या कारभारावर बोलले, त्यात चूक काय?
डावखुऱ्या फलंदाजाला डावखुऱ्या गोलंदाजाचा आणि लेग स्पिनर्सचा चेंडू नैसर्गिकरीत्या समजतो. त्यामुळे त्यांना तो खेळण्यास फारशी अडचण येत नाही. त्यांचे चेंडू डावखुऱ्यांच्या हिटिंग झोनमधे पडतात. त्यामुळे हेटमायर हिटिंगसोबत पूरनची फटकेबाजी हे डेडली कॉम्बिनेशन ठरु शकते. त्यामुळे विंडीजच्या संघाची फलंदाजी पूरन परिपूर्ण करतो. तसंही विंडीज डावखुऱ्या आक्रमक अव्वल फलंदाजांची खाणच राहिला आहे.
विंडीजचे हे विशीतील फलंदाज ९० च्या दशकातील ब्रायन लारा, रामनरेश सारवान आणि चंद्रपॉल यांची आठवण करुन देतात. या तिघा फलंदाजांनी एक काळ गाजवला होता. आता तोच वारसा पुढे नेण्यास होप, हेटमायर आणि पूरन सज्ज झालेत. आता फक्त या तरुणांना व्यवस्थापनाची साथ आणि क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमधे खेळण्याची संधी मिळाली पाहिजे. तरच विंडीज तीनही फॉरमॅटमधे यशाची शिखरे पादाक्रांत करेल.
विंडीजकडे कॉट्रेल, अल्झारी जोसेफ आणि होल्डर यासारखे उंचपुरे आणि चांगल्या दर्जाचे फास्ट बॉलर असल्याने येत्या काळात विंडीजचा संघ भल्या भल्या संघाना पाणी पाजेल. त्यामुळेच ऑस्ट्रेलियात २०२० चा टी - २० वर्ल्डकप चुरशीचा होणार यात शंकाच नाही.
हेही वाचा :
कधीकाळी बालिश वाटणाऱ्या विराटची प्रगल्भ तिशी
पुरुषांनी रडायला हवं असं सचिन तेंडूलकर का म्हणाला?