ओबीसी राजकारणाचा गुरुमंत्र देणारा भगवानगड

२९ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


दसरा, भगवानगड, मुंडेंच्या घरातली भाऊबंदकी आणि राजकारण या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर गेल्या दोन वर्षांपासून भगवानगडावरच्या दसरा मेळाव्यातली राजकीय भाषणं बंद पडली आहेत. तरी राजकारण आजही भगवानगडाच्या भोवतीच फिरतंय.

बीड जिल्ह्यातील लोक हे राजकीयदृष्ट्या कमालीचे जागरूक म्हणून ओळखले जातात. त्यामुळं गावागावांत तुल्यबळ नेते सापडतात. आमदारकी लढवण्यासाठीही मोठी स्पर्धा आहे. सत्तेजवळ राहण्याची, सत्ता वागवण्याची तीव्र इच्छा असलेले लोक असल्यावर धर्म आणि राजकारण एकजीव होणारच. ते पाहण्यासाठी मात्र बीड जिल्ह्याची सीमा पार करून अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या भगवानगडावर जावं लागतं. बीडच्या सीमेला लागून हा गड जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव टाकतो.

आणि भगवानगडावर राजकारण बंदी आली

मात्र आता भगवानगडावर राजकारण नको, असा पवित्रा घेऊन तिथे राजकीय भाषणांना बंदी घातली आहे. त्याविषयी माहिती देताना बीडचे पत्रकार अशोक देशमुख यांनी सांगितलं, ‘गोपीनाथ मुंडे यांनी ३१ मे २०१४ला दिल्लीत केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. एक जूनला ते गडावर दर्शनाला आले. तीन तारखेला त्यांचं दिल्लीत अपघाती निधन झालं. त्यांच्या अंत्यदर्शनाच्या जागी नेत्यांच्या भाषणासाठी एक चबुतरा उभारण्यात आला होता. हा चबुतरा पाडून त्या परिसरात गोपीनाथगड उभारला. १२ डिसेंबर २०१५ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडाच्या लोकार्पण समारंभाला उपस्थित होते. तेव्हा भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी यापुढं गोपीनाथगड हा राजकीय, तर भगवानगड हा श्रद्धेचा गड असेल, असं जाहीर केलं. यानंतर लगेचच भगवानगडावर दसऱ्याच्या भाषणाचा चबुतरा पाडला. इथूनच भगवानगड आणि राजकारण ही चर्चा नव्यानं सुरू झाली’.

विशेष म्हणजे  मुंडे यांच्या मृत्यूनंतर झालेल्या २०१४च्या दसरा मेळाव्यात राजकीय भाषणबाजी झाल्यावरून नामदेवशास्त्रींवर आचारसंहिता भंगाचा गुन्हाही दाखल झाला. या मेळाव्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचीही उपस्थिती होती. भगवानगडाविषयी इतर माहिती देण्यासाठी तयार असणाऱ्या नामदेवशास्त्रींनी याविषयावर प्रश्न विचारल्यानंतर कॉल कट करण्यात समाधान मानलं.

पंकजा मुंडेंना विरोध कोणामुळे झाला?

सध्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूनंतरही दोन वर्ष  भगवानगडावरून दसऱ्याला भाषण केलं. मात्र २०१६ मधे नामदेवशास्त्रींनी सभेला तीव्र विरोध केला. भगवानगड ट्रस्टनेही गडावरून राजकीय भाषणबंदीचा ठराव आणला. त्यामुळं गडाच्या पायथ्याला खरवंडी शिवारात ही सभा झाली. दुसऱ्या वर्षीही वाद कायम राहिल्याने २०१७ला भगवानबाबांचं जन्मगाव सुपे सावरगाव घाट इथे सभा झाली. गेल्या वर्षभरात इथं भगवानबाबांचं मोठं स्मारक बांधण्याची तयारी सुरू आहे. यंदाही सुपे सावरगावलाच मेळावा होणार आहे, अशी माहिती अशोक देशमुख यांनी दिली.

खरं तर नामदेवशास्त्रींनी गोपीनाथरावांच्या मृत्यूनंतर पंकजा मुंडे गडाची कन्या असल्याचं जाहीर केलं. यातून पंकजा मुंडेंना मोठी राजकीय ताकद मिळाली. याच काळात गोपीनाथ मुंडेंचे पुतणे धनंजय मुंडे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते झाले. तेही गडावर दर्शन घ्यायला गेले. तेव्हा त्यांच्यावर दगडफेक झाली. नामदेवशास्त्रींचे पुतळे जाळण्यात आले. मुंडे कुटुंबातील राजकीय वादावादी गडापर्यंत पोचली. यानंतर महंतांनी भगवानगड श्रद्धेचा तर गोपीनाथगड राजकीय असेल, असं स्पष्ट केलं. यामागे धनंजय मुंडे यांची फूस असल्याचेही आरोप झाले.

पुढे पंकजा मुंडेंनी गडावर सभा घेऊ नये, यासाठी महंतांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फिल्डिंग लावल्याच्या बातम्या आल्या. त्यामुळं फडणवीस हे महंतांचे बोलविते धनी असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली. या चर्चा अजूनही थांबल्या नाहीत.

भगवानबाबांचा प्रभाव आजही कायम

गोपीनाथगड ताब्यात असूनही पंकजा मुंडे दसऱ्याला भगवानबाबांशी संबंधित ठिकाणीच भाषण करण्याचा आग्रह धरतात. आज भगवानबाबांच्या निधनाला ५०हून अधिक वर्षं लोटली तरी भगवानबाबांचा बीड जिल्ह्यावर आणि त्यातही वंजारी समाजावर पगडा आहे. त्यांचा जन्म पाटोदा तालुक्यातल्या सुपे सावरगाव घाट या गावी २९ जुलै १८९६ला झाला. त्यांचं मूळ नाव आबाजी तुबाजी सानप. त्यांना विठ्ठलभक्तीचं वेड लहानपणीच लागलं. ५-६ व्या वर्षीच त्यांनी पंढरपूर वारी केली. हट्टाने तुळशीची माळ घातली. नारायणगडावरच्या माणिकबाबांकडे गुरुपदेशाचा आग्रह केला. माणिकबाबांनी परीक्षा घेतली. त्यानंतरच त्यांना गुरुपदेश मिळाला. माणिकबाबांनीच आबाजीला भगवान हे नवं नाव दिलं.

पुढे भगवानबाबाचं नारायणगडाचे महंत बनले. बरोबर शंभर वर्षांपूर्वी १९१८ला त्यांनी नारायणगड ते पंढरपूर पायी दिंडी सुरू केली. त्यामुळं नारायणगडला आज धाकटी पंढरी अशी ओळख चिकटलीय. त्यांनी १९३४ला पखालडोह या गावी पहिला अखंड हरिनाम सप्ताह केला. इथूनच भगवानबाबा आणि गर्दी हे समीकरण तयार झालं.  आरोपांना कंटाळून भगवानबाबांनी नारायणगड सोडला. ते खरवंडी गावाजवळच्या धौम्यगडावर गेले. हा गडच आता भगवानगड म्हणून ओळखला जातो. याच्या नामांतराची गोष्टी मोठी इंटरेस्टिंग आहे.

१९५१च्या विजयादशमीला भगवानगडाच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू केलं. १ मे १९५८ला तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते गडाचं उद्घाटन झालं. ‘धर्मरक्षणासाठी भगवानबाबांनी भक्तांना एकत्र करून शास्त्राच्या आधाराने भक्तीचा गड उभारला. आजपासून धौम्यगड हा भगवानगड म्हणून ओळखला जावा,’ असं यशवंतराव चव्हाण म्हणाले होते. याची नोंद ठिकठिकाणी मिळते. माजी विधानसभाध्यक्ष बाळासाहेब भारदे हेदेखील यादिवशी उपस्थित होते.

भगवानबाबांवर ते निजाम सरकारचे हस्तक असल्याचे आरोप होत. त्याची शहानिशा करण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील भगवानबाबांना भेटण्यासाठी नारायणगडावर गेले होते. बाबांसोबत झालेल्या चर्चेनंतर नाना पाटील यांनी आपल्याला चुकीची माहिती मिळाल्याचं कबूल केलं, असा दावा भगवानबाबा यांचं चरित्र लिहिणारे भगवान मिसाळ यांनी केला.

भगवानबाबा हे वारकरी कीर्तनकार होते. त्यांना पाहिलेले लोक आजही मराठवाड्यात आहेत. ऊसतोडणीचं काम करणाऱ्या शोषित वंजारी समाजाला बाबांनी आत्मसन्मान मिळवून दिला. भक्तीचा मार्ग दाखवून व्यसनांपासून दूर नेलं. संतांचे विचार सांगून प्रामाणिकपणे जगायला शिकवलं. शिक्षणाचं महत्त्व सांगितलं. त्यासाठी शाळा सुरू केली. यामुळे त्यांच्या हयातीतच त्यांना दैवी वलय मिळालं. त्यांच्या निधनानंतर तर ते वंजारी समाजाचे देवच बनले.

भगवानगड मुंडेंच्या राजकारणाचा बालेकिल्ला

भगवानबाबांनी १९५१मधे दसऱ्याच्या दिवशीच भगवानगडाच्या जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलं. याच दिवशी त्यांनी नारायणगडावर जाऊन माणिकबाबांचं दर्शन घेतलं होतं. त्यामुळे दरवर्षी भगवानगडावर गुरुपदेश, दर्शनाचा कार्यक्रम व्हायचा आणि आताही होतो. त्याच दिवशी महंत गुरुमंत्रही देतात. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी भगवानगडावर फार पूर्वीपासून गर्दी होते.

भगवानगडावर राजकीय नेत्यांची उठबस जुनी असल्याचं पत्रकार अशोक देशमुख सांगतात, ‘खुद्द भगवानबाबांना राजकारणाचं वावडं नव्हतं. जीर्णोद्धारालाच यशवंतराव चव्हाण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भारदे गडाचे विश्वस्त होते. परिसरातील राजकारणीही गडावर जायचे. गडाच्या माध्यमातून बीड, नगर जिल्ह्यातील वंजारी समाजाला राजकीय वलय मिळवून देण्याचा पहिला प्रयत्न गोपीनाथ मुंडेंनी नाही, तर माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे केला. विरोधी पक्षनेते झाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचंही गडावर येणंजाणं वाढलं. याच काळात ढाकणेंनी मुंडेंना गडावर सभा घेण्यास जोरदार विरोध केला.’

भगवानबाबा फक्त वंजारी समाजाचेच नव्हते, असं दैनिक प्रजापत्रचे पत्रकार संजय मालाणी यांनी सांगितलं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आपल्याकडं संतांना जातीत अडकवण्याची स्पर्धा आहे. त्यामुळे आता भगवानगड हा वंजारी समाजाचा अशी प्रतिमा लोकांत तयार झालीय. पण हे खरं नाही. भगवानगडाला व्यापक आधार जरी वंजारी समाजाचा असला तरी भगवानबाबांचे भाविक सर्व जातिधर्मांत आहेत. पूर्वी गडाचे ट्रस्टी हे वेगवेगळ्या जातीधर्मातले होते. सर्व जातींचे भाविक दसऱ्याला भगवानगडावर परिसरातील भाविक बाबांचं दर्शन घेऊन सीमोल्लंघन करायचे. नंतर बाबांच्या समाधीचं दर्शन घ्यायला भाविकांची गर्दी व्हायची.`

भाजपने ओबीसींचं, त्यातही वंजारी समाजाचं महत्त्व आधीच ओळखलं होतं. वंजारी समाजाच्या संघटनासाठी भगवानगडाचा वापर करता येईल हे सर्वात आधी प्रमोद महाजन यांच्या लक्षात आल्याचं सांगितलं जातं. त्यांनीच ते गोपीनाथ मुंडेंच्या डोक्यात घातलं. कोणतीही गाडी न लावता, खर्च न करता एवढी गर्दी होत असेल, तर ती एन्कॅश करता आली पाहिजे, हे डोकं महाजनांचंच. पूर्वी मुंडे गडावर दसऱ्याला छोटं भाषण करायचे. आता दसरा मेळावा म्हणून ओळखली जाणारी सभा मुंडेंनीच १९९६ला सुरू केली. त्यामुळे गडावरील धार्मिक कार्यक्रम झाल्यावर भाविक मुंडेंचं भाषण ऐकण्यासाठी थांबू लागले. हा पुढं एक रिवाजचं बनला. मुंडे उपमुख्यमंत्री बनल्यावर तर गडावर राजकीय मंडळींचा वावर अचानक वाढला. मुंडे आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना वेळोवेळी गडावर न्यायचे.

भगवानगडावर मुंडेंची राजकीय पकड पक्की झाली ती नामदेवशास्त्रींच्या नेमणुकीनंतर. भगवानबाबांचं निधन १८ जानेवारी १९६५ला झालं. त्यांच्या नंतर राजपूत समाजाचे भीमसिंह महाराज भगवानगडाचे महंत झाले. त्यांच्या नंतर २००३ला भीमसिंह महाराजांचे उत्तराधिकारी म्हणून भगवानबाबांच्या भावकीतील नामदेवशास्त्री सानप यांची गडाचे महंत म्हणून नेमणूक झाली. ती करण्यात गोपीनाथ मुंडेंचा मोठा वाटा होता. नामदेवशास्त्री यांनी बनारस संस्कृत विद्यापीठाची न्यायाचार्य ही पदवी मिळवलेली आहे. त्यामुळे मुंडेंच्या राजकीय भाषणांना गडावरून कधीच विरोध झाला नाही. उलट त्यांना नामदेवशास्त्रींची मान्यता असल्याचं वारंवार दिसलं.

भगवानगडाच्या दसरा मेळावा भाषणात गोपीनाथ मुंडेंची जबरदस्त स्टाईल होती. गडावरून आपल्याला काय काय दिसतंय, हे ते सांगायचे. एकदा त्यांनी भगवानगडावरून आपल्याला दिल्ली दिसत असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांना मुंबईही दिसली. धनंजय मुंडेंनी भाजप सोडल्यानंतर गोपीनाथरावांना पंकजा मुंडेंची राजकीय कारकीर्द भगवानगडावरून दिसली. मुंडेंच्या या दिसण्यामागं राजकीय महत्वाकांक्षा दडलेली असायची, हे लपून राहिलेलं नव्हतं. पण आता गोपीनाथ मुंडे नाहीत. पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणासाठी पर्यायी ठिकाण शोधून काढलंय. तरीही दसरा म्हटलं की भगवानगडाचीच आठवण येते.