केशवराव धोंडगे :  मन्याडच्या तोफेचे बुलंद किस्से

०२ जानेवारी २०२३

वाचन वेळ : ५ मिनिटं


राजकारण सगळेच करतात. पण काही राजकारणी आपल्या निष्ठेमुळे, स्पष्टवक्तेपणामुळे आणि लोकांशी राखलेल्या आपल्या इमानामुळे कायमचे लक्षात राहतात. अशा मोजक्या राजकारण्यांमधलं एक नाव म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे मराठवाड्यातले नेते, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक केशवराव धोंगडे. ‘मन्याड खोऱ्याची तोफ' असं ज्यांचं वर्णन केलं जायचं त्या केशवरावांचं नुकतंच निधन झालंय.

केशवराव धोंडगे यांनी १९५७, १९६२, १९६७, १९७२, १९८५, १९९० अशा तब्बल सहा विधानसभा निवडणुका सलग जिंकल्या आणि गाजवल्याही. लोकांच्या प्रश्नांवर आग्रही भूमिका मांडणाऱ्या केशवरावांची विधानसभेतली भाषणं प्रचंड गाजली. यशवंतराव चव्हाण, आचार्य अत्रे, शंकरराव चव्हाण, शरद पवार अशा दिग्गजांना धारेवर धरणारे केशवराव हे तरीही सर्वांसाठी आदराचं स्थान होतं.

नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातल्या गऊळ या गावात त्यांचा जन्म झाला. याच छोट्याशा गावातून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरवातही झाली. शेतकरी कामगार पक्षासोबत त्यांनी स्वतःला जोडून घेत मार्क्सवाद, साम्यवादाशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिले. हैदराबाद मुक्तीसंग्राम, संयुक्त महाराष्ट्राची चळवळीत ते अग्रेसर होते.

केशवराव १९५७ ते १९९५ दरम्यान विधानसभेत आमदार होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी खासदारकीही भूषवली होती. निर्भीड आणि स्वाभिमानी बाणा असलेले केशवराव विधिमंडळाच्या कामकाजात पूर्णवेळ सहभागी असायचे. लोकांचे प्रश्न ठामपणे मांडायचे. त्यामुळेच मराठवाड्याची मुलूखमैदानी तोफ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. त्यांच्या आयुष्यातले हे काही महत्वाचे किस्से.

आणीबाणी ते जनआंदोलनं

१९७५ ला केशवराव धोंडगे यांनी आणीबाणीविरोधातल्या लढ्यातही सक्रिय सहभाग नोंदवला होता. त्यामुळे नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात १४ महिने त्यांना कोठडीही झाली होती. या लढ्याचं नेतृत्व करण्यात त्याकाळी केशवराव धोंडगे आघाडीवर होते. पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत खासदार झाले.

वेगवेगळ्या सत्याग्रहांमधेही त्यांनी सहभाग नोंदवला होता. यामधे पिंडदान सत्याग्रह, बोंबल्या सत्याग्रह, शेणचारू सत्याग्रह आणि खईस कुत्री सत्याग्रहांचा समावेश होता. लोकांच्या प्रश्नांवरची त्यांची ही आंदोलनं आणि त्यासाठी वापरलेली ट्रिक राज्यभर चर्चेचा विषय असायची.

हेही वाचा: प्रा. यशवंत सुमंत: कृतिशील समन्वयी विचारवंत

पत्रकार, संपादक, साहित्यिक

केशवरावांचं सततचं लक्ष वाचनात असायचं. त्यांची विधानसभेतली भाषणंही अभ्यासपूर्ण असायची. त्यांनी 'जय क्रांती' नावाचं साप्ताहिकही काढलं होतं. त्यातून अनेक प्रश्नांना वाचा फोडली. याच साप्ताहिकातून आचार्य अत्रे आणि केशवराव धोंडगे यांच्यातली शाब्दिक चकमकही उभ्या महाराष्ट्राने पाहिली.

मौखिक स्वरूपातल्या साहित्यासाठी त्यांनी गुराखी गड साहित्य संमेलन सुरू केलं होतं. त्यात त्यांचा पुढाकार असायचा. केशवरावांनी जवळपास ४० पुस्तकं लिहिली. ज्येष्ठ संपादक म्हणून त्यांना २०१२ला बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर अमरावती विद्यापीठाने त्यांना डी.लीट दिली होती.

...आणि बाळासाहेबांची अटक टळली

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शीख धर्मियांविरुद्ध एक टिप्पणी केली होती. त्यामुळे शीख धर्मियांमधे असंतोष निर्माण झाला. त्यावेळी शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते. ते अतिशय कडक आणि नियमाने चालणारे होते. घाबरणारे नव्हते. त्यांनी निर्णय घेतला की, बाळासाहेब ठाकरे यांना अटक करायची. ही गोष्ट कानोकानी आमच्या शिवसेनेपर्यंत पोचली.

त्यावेळी शिवसेनेचे फायरब्रँड नेते छगन भुजबळ यांनी केशवराव धोंडगे यांची भेट घेऊन मदत मागितली. अटक झाल्यास जनतेला त्रास होईल, याची खात्री केशवरावांना पटली. त्यावेळी विधानसभा सुरू होती. सभागृहात केशवराव उभे राहिले आणि म्हणाले मला बोलायचं आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री महोदय, आम्हाला असं कळलंय की तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्हाला कल्पना आहे की, जेव्हा बाळासाहेब ठाकरेंना अटक झाली, तेव्हा तीन दिवस मुंबई जळत होती. तुम्ही असा परत निर्णय घेणार आणि मुंबई-महाराष्ट्राला वेठीस धरू पाहत आहात का?

तुम्ही याचा फेरविचार केला पाहिजे. टिप्पणी केली असेल, मीटिंग घ्या, दोन्हीकडच्या लोकांना बोलवा, पण असा निर्णय घेऊ नका आणि मुंबई, महाराष्ट्राला अडचणीत आणू नका. केशवरावांच्या भाषणानंतर प्रसंगी कठोर भूमिका घेणाऱ्या शंकरराव चव्हाणांसारख्या नेत्याने आपला निर्णय मागे घेतला आणि बाळासाहेबांची अटक टळली.

हेही वाचा: जैतुनबींच्या निमित्ताने महाराष्ट्राचं व्यापक तत्त्वज्ञान भारतभर पोचलं असतं पण?

गाडगेबाबांच्या नावे पहिलं कॉलेज काढलं

आयुष्यात ज्यांनी कधी शाळाकॉलेजच्या डिग्र्या घेतल्या नाहीत, पण त्यांनी जेवढं महाराष्ट्राला शिकवलं तेवढं कुणीच शिकवलं नाही, असं ज्यांचं वर्णन केलं जातं त्या गाडगेबाबांच्या नावानं पहिलं कॉलेज नांदेडमधल्या लोहा इथं केशवराव धोंडगे यांनी काढलं.

प्रत्येक राजकीय नेता आपल्या घरातल्यांचं किंवा आपल्या समाजातल्या नेत्याचं नाव कॉलेजला देण्याची परंपरा असताना, केशवरावांनी पहिल्यांदा रुढार्थानं न शिकलेल्या गाडगेबाबांचं नाव कॉलेजला दिलं. नंतर महाराष्ट्रात इतर ठिकाणी गाडगेबाबांच्या नावे कॉलेज निघाली. अमरावतीच्या विद्यापीठालाही नंतर गाडगेबाबांचं नाव देण्यात आलं. पण, महाराष्ट्रात गाडगेबाबांचं शिक्षण क्षेत्रातलं काम नोंदवणारा पहिला राजकारणी म्हणजे केशवराव धोंडगे.

इंग्लंडच्या राणीच्या नाकाचं भोक विधीमंडळात

केशवराव धोंडगे आणि प्रल्हाद केशव अत्रे हे काही काळ एकाच वेळी विधानसभेत होते. दोघे उत्तम वक्ते, भाषेवर प्रचंड प्रभुत्व असलेले नेते. एकदा सभागृहात दोघांनी असे भाषेचे खेळ केले की, ऐकणारे चाटच पडले.

त्याचं झालं असं की, त्या वेळी महाराष्ट्र सरकारने ब्रिटनची राणी एलिझाबेथ हिचा साडीचोळी आणि पारंपरिक नथ देऊन गौरव केला. त्यावर केशवरावांनी राज्य सरकारला विचारलं की, ही भेट देण्यापूर्वी नथ घालण्यासाठी राणीच्या एकातरी नाकपुडीस भोक आहे, याची खातरजमा सरकारने केली होती काय?

या त्यांच्या प्रश्नाने सरकारची अपेक्षित भंबेरी उडाली आणि त्यात काही सदस्यांनी भोक या शब्दाला आक्षेप घेत छिद्र या शब्दाचा उपयोग केला. या चर्चेत अखेर प्र. के. अत्रे यांनी उडी घेतली आणि अत्यंत छिद्रान्वेषी नजाकतीने या दोन शब्दांतल्या फरकाचं विश्लेषण करत नाकाचं भोक हाच शब्द कसा योग्य आहे, हे समजावून सांगितलं. ते ऐकताना संपूर्ण सभागृहाच्या हसूनहसून मुरकुंडय़ा वळल्या.

हेही वाचा: बाळासाहेब ठाकरेंनी सेक्युलर पक्षांबरोबर २२ वेळा केली होती दोस्ती

पवारांचा मुका ते जोरदार टीका

दोन वर्षांपूर्वी नांदेड इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्ष झाल्यामुळे सत्काराचा कार्यक्रम होता. यावेळी केशवराव धोंडगेंनी यांनी केलेलं भाषण चर्चेत राहिलं होतं. शरद पवारांचा स्टेजवरच मुका घेत त्यांनी त्यांच्या एकूण राजकारणावरही जोरदार प्रहार केले होते.

'शरदरावांची बारामती म्हणजे भानामती', 'नारदमुनीही शरद पवारांशी बरोबरी करू शकत नाहीत', 'पवार म्हणजे बिनचिपळ्यांचे नारद', 'माणसं फोडण्यात पवार कुशल' असं म्हणत त्यांनी थेट शरद पवारांच्या उपस्थितीतच त्यांच्यावर निशाणा साधला होता. पवारांचा मुका घेऊन त्यांनी शाब्दिक कोट्यांनी पूर्ण सत्काराचा कार्यक्रम दणाणून सोडला.

कुणीही कुठेही जा, माझ्या घरावर कायम लाल झेंडा

वयाची १०२ वर्ष उलटली तरी आपल्या विचारांशी आणि शेतकरी कामगार पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या केशवराव धोंडगे यांना घरात मात्र अनेक पक्ष पाहायला लागले. त्यांच्या घरातले अनेकजण वेगवेगळ्या पक्षातून सक्रीय राहिले. दोन्ही मुले दोन पक्षात, मुलगी वेगळ्या पक्षात, जावई वेगळ्या पक्षात अशी परिस्थिती राहिली.

या सगळ्याबद्दल केशवराव कायम म्हणायचे की, कुणी कुठेही जावो. कुणी काही म्हणो माझ्या मनात व घरावर लाल झेंडा कायम फडकत राहील. तुम्ही आजकालचे लोक क्षणाक्षणाला पक्ष, निष्ठा बदलता. सध्याचे राजकारणी ‘म्होतूर’ लावत फिरत असतात. ते कोणत्या पक्षात असतात, हे त्यांनाही माहीत नसतं.

आमच्यासारख्यांचा पक्ष दुबळा होतो, पण आम्ही लढत राहू. सध्या एकाधिकारशाही राजकारणाचा जोर आहे. त्याला विरोध करावा लागेल. मी शंभरीत असलो तरी शेवटपर्यंत ते करीन. तत्त्वाचे राजकारण करणारे मोजकेच आहेत. पण रंग बदलणारे खूप. सरडय़ासारखे रंग बदलतात. त्यामुळे एक पक्ष आणि एकच झेंडा घेऊन फिरणाऱ्या आमच्यासारख्याचं फार बळ नसलं तरी आम्ही लढत राहू, जय क्रांती म्हणत राहू.

हेही वाचा: 

शाहू महाराजांनी खरंच ब्रिटिशांना मदत केली होती?

नव्या पिढीनं गांधी-आंबेडकर मतभेदांकडे कसं बघावं?

महाड ते वर्साय, फ्रेंच राज्यक्रांती ते भारतीय राज्यघटना, व्हाया ५ मे

खरोखरचा फुन्सुक वांगडू सांगतोय, लडाखमधे बाहेरचे लोक नकोतच

शाहू महाराजांच्या एन्फ्ल्युएन्झा मंडळानं स्पॅनिश फ्लूला रोखून दाखवलं!