भाई उद्धवराव पाटलांचा वारसा कोण चालवणार?

३१ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


महाराष्ट्राला सत्यशोधकी बहुजनवादी राजकारणाची थोर परंपरा आहे. या परंपरेचे शिलेदार असलेल्या भाई उद्धवराव पाटील यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालंय. घरात शिक्षणाचा, राजकारणाचा कुठलाही वारसा नसलेल्या भाईंनी वकिलीचं शिक्षण घेऊन राजकारणात स्वकर्तृत्वाने विचारवंत नेता म्हणून नाव कमावलं. यशवंतराव चव्हाणांसारख्या अनेकांनी भाईंचं मोठेपण मान्य केलं. पण आज उभ्या महाराष्ट्राला हे मोठेपण कधी आणि कसं कळणार?

भाई उद्धवराव पाटील दिल्लीत होते. संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमधे त्यांची आणि यशवंतराव चव्हाण यांची भेट झाली. त्यांनी भाई उद्धवरावांची आपुलकीने चौकशी केली. उद्धवरावांचा निरोप घेताना ते म्हणाले, ‘उद्धवरावजी, तुम्ही खूप काम करता. परंतु महाराष्ट्राला तुमच्या कामाची योग्य ओळख होत नाही. त्यासाठी तुम्ही पुण्यामुंबईसारख्या शहरात येऊन स्थायिक झालं पाहिजे. म्हणजे तुमच्या कार्याचं योग्य मूल्यमापन होईल.’

अत्यंत साधी राहणी, सत्ता, पैसा यांचा मोह आपल्या आयुष्यालाही शिवू न देणाऱ्या भाई उद्धवराव पाटील यांच्याबद्दल यशवंतरावांनी हे गौरवोद्गार काढलेत. भाईंनी तत्त्वनिष्ठ राजकारणाने आपली वेगळी छाप पाडली. सर्वसामान्यांचे प्रश्न हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. लोकशाही समाजवाद हे त्यांच्या मूल्यप्रधान तात्विक राजकारणाचं मूळ होतं. १९२० मधे जन्मलेल्या उद्धवरावांचा ३० जानेवारीला आज जन्मदिवस आहे.

परांडा हा उस्मानाबाद जिल्ह्यातला मागासलेला दुष्काळी भाग. याच भागातल्या इर्ला हे त्यांचं गाव. मानकेश्वर नावाच्या गावात उद्धवरावांचा जन्म झाला. सगळा घरखर्च शेतीवर चालायचा. लहानपणापासूनच शेतीत राबणाऱ्या उद्धवरावांना शेती आणि शेती प्रश्नांविषयीची तळमळ होती. उद्धवरावांचं प्राथमिक शिक्षण काटी इथे झालं. 

त्यावेळी तुळजापूरच्या भोसले कुटुंबात महाराष्ट्राच्या डाव्या चळवळीतल्या लोकांचा राबता असायचा. याच भोसले कुटुंबाने उद्धवरावांचं शैक्षणिक पालकत्व घेतलं. त्या घरातल्या चर्चा आपसूकच बालपणीच उद्धवरावांच्या कानावर पडत असत. त्यामुळे उद्धवरावांचं बालपण वैचारिकदृष्ट्या समृद्ध होत गेलं. नंतर कॉलेजच्या शिक्षणासाठी त्यांनी हैदराबादच्या उस्मानिया युनिवर्सिटीत अॅडमिशन घेतलं. गणितात बीए केलं. उस्मानिया युनिवर्सिटीतूनच एलएलबी पदवी घेऊन त्यांनी वकिलीला सुरवात केली.

वकिलीला रामराम, सावकारशाहीविरोधात बंड

१९४५ मधे उद्धवरावांनी आपलं वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यावेळी त्यांचे मेहुणे नरसिंहराव देशमुख काटीकर शेतकऱ्यांचं वकीलपत्र घेत. नरसिंहराव आणि उद्धव म्हणजे गुरू शिष्याची जोडी होती. उद्धवरावांनी सुरवातीला वकिली केली. मात्र तत्वनिष्ठ स्वभावामुळे ते जास्त काळ यात रमले नाहीत. खोट्याचं खरं करणं त्यांना जमलं नाही.

शेवटी यातून काढता पाय घेत त्यांनी वकिलीला कायमचा राम राम ठोकला. या सगळ्या काळात उस्मानाबादमधे फुलचंद गांधी या सावकाराचं प्रस्थ वाढतं होतं. त्याला राजकीय पाठबळही होलं. सावकारीतून लोकांच पर्यायाने शेतकऱ्यांचं शोषण व्हायचं. लोकांच संघटन तयार करत उद्धवरावांनी या सावकारशाहीला समर्थपणे तोंड दिलं.

शेतमालाला रास्त भाव मिळायला हवा आणि सरकारने त्यासाठी योग्य ती धोरणं आखावीत यासाठी त्यांनी प्रयत्न केले. व्यवस्थेत आमुलाग्र बदल झाल्याशिवाय शेती आणि शेतकऱ्याची दैनावस्था दूर होणार नाही याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे शेतकरी हा त्यांच्या संपूर्ण लढ्याचा केंद्रबिंदू होता. या सगळ्या लढ्यात त्यांनी लोकशाही समाजवादाचा आधार घेतला किंबहूना या भुमिकेवर ते ठाम राहीले. शोषित, वंचितांच्या प्रश्नांवर सातत्याने आपला आवाज उठवला.

संसदीय राजकारणात प्रवेश

लोकशाही समाजवादातून लोकांचं कल्याण शक्य आहे ही त्यांची धारणा होती. सुरवातीच्या काळात भाई कॉंग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यानंतर स्थापन झालेल्या शेतकरी कामगार पक्षाचे ते संस्थापक सदस्य होते. आणि इथूनच त्यांच्या संसदीय राजकारणाला सुरवात झाली. १९५२ मधे त्यांनी पहिली सार्वत्रिक निवडणूक लढवली. याच काळात शेकापला फुटीचं ग्रहण लागलं. त्यावेळच्या हैद्राबाद असेंब्लीत त्यांनी कडवी झुंज देत दणक्यात एंट्री केली.

महाराष्ट्रभरात उद्धवराव एसटीनेच प्रवास करायचे. मतदारसंघाच्या दौऱ्यासाठी एसटी, बैलगाडी यांचा वापर करत. १९५७ च्या निवडणूकीत तर फुलचंद गांधींसारखा आर्थिक शक्तींनी बलाढ्य असलेला उमेदवार समोर असतानाही लोकांच्या पाठिंब्यावर ते निवडून आले. या काळात संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न ऐरणीवर होता. पुढे १९५८-५९ मधे द्वैभाषिक मुंबई राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांची वेगळी ओळख लोकांनी पाहिली.

१९६४-६६ मधे त्यांनी खासदारकीही भुषवली. अभ्यास आणि वक्तृत्व या बळावर उत्कृष्ट संसदपटू म्हणुन नावलौकीक मिळवला. संसदीय राजकारणाची वेगळी वाट त्यांनी स्वीकारलेली होती. अनेकवेळा पराभव झाला मात्र त्यांच्यातला कार्यकर्ता कायम जिवंत राहिला.

त्यांची भाषणं सरकारला धडकी भरवायची

विधानसभेत उद्धवरावांचा सक्रिय सहभाग असायचा. ते बोलायला उभे झाले तर बाहेर निघालेले मुख्यमंत्री आपल्या जागेवर बसत आणि अत्यंत नम्रपणे त्यांचं मुद्देसूद भाषण ऐकत. आणीबाणी आणि दुष्काळ या दोन प्रसंगांत त्यांच्या नेतृत्वाचा झंझावात महाराष्ट्राने अनुभवला. शरद पवारांच्या भाषेत सांगायचं, तर एखाद्या माणसाला बोराटीच्या फांदीने झोडपल्यावर जशा वेदना होतात तशा वेदना उद्धवरावांच्या भाषणाने सरकारी पक्षाला व्हायच्या.

त्यांच्यातल्या साधेपणामुळेचं स्वार्थ, सत्ता, पैसा यांचा मोह त्यांना आयुष्यभर शिवला नाही. त्यांचं हे वेगळेपण पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाला पुढे टिकवता आलं नाही. अस्मितांचं, सांप्रदायिकतेचं, जातीयवादाचं राजकारण नंतरच्या काळात वाढलं. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे उद्धवरावांसारख्या राजकारण्यांचा विचार, आचार महाराष्ट्राला पचवता आला नाही. म्हणूनच उद्धवरावांच्या कार्यकर्तृत्वाची आज प्रकर्षाने आठवण होते.

शेतकरी कामगार पक्षाचा कणा

सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते केशवराव जेधे यांच्या नेतृत्वात भाई स्वातंत्र चळवळीत सामील झाले. १९३७ ला प्रांतोप्रांती आलेली काँग्रेसची मंत्रिमंडळं भांडवलधार्जिणी काम करू लागली. तरीही महाराष्ट्र काँग्रेसमधला डाव्या विचारांचा गट काम करत होता. केशवराव जेधे, शंकरराव मोरे आणि भाऊसाहेब राऊत यांच्या नेतृत्वात हा गट काँग्रेसमधे सक्रीय होता. १९४७ मधे महाराष्ट्रात काँगसचं सरकार आलं. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर भांडवलधार्जिण्या धोरणांना पुरक असं काम करत राहीले. तेव्हा जेधे, मोरे, राऊत या जोडीने काँग्रेस अंतर्गत शेतकरी कामगार पक्ष स्थापन करुन जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं.

मूळ काँग्रेस संघटनेशी मतभेद जाहीर करत ३ ऑगस्ट १९४७ ला शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली. २६ एप्रिल १९४८ ला हा पक्ष काँग्रेसपासून पूर्णपणे वेगळा झाला. यासाठी शंकरराव मोरे, केशवराव जेधे, तुळशीदास जाधव, भाऊसाहेब राऊत या महत्वाच्या नेत्यांनी पुढाकार होता. अनेक अभ्यासू, तत्वनिष्ठ, मातब्बर नेते या पक्षाला लाभले.

उद्धवरावांनी शेकापमधून खासगीकरणाला सतत विरोध केला. तसंच भांडवली अर्थकारणाविरोधात ठाम भुमिका घेतली. महाराष्ट्राच्या डाव्या चळवळीला उभं करण्यात उद्धवरावांचं योगदान न विसरता येण्यासारखं आहे.

अनेक चळवळींमधे सक्रीय सहभाग

हैद्राबाद मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमा चळवळ अशा वेगवेगळ्या लढ्यांमधे उद्धवरावांचा सक्रीय सहभाग होता. या सगळ्या लढ्यांतून त्यांनी सामाजिक सौहार्द, समतेचा विचार ग्रामीण भागात रुजवण्याचा प्रयत्न केला. १९५४-१९५५ मधे गोवा मुक्ती आंदोलनातही सहभाग घेतला. हैद्राबाद मुक्ती संग्राम चालू असताना तर त्यांनी सशस्त्र लढा दिला. प्रत्यक्ष त्यात सहभागी झाले. रझाकार आणि पोलिस ठाण्यावर हल्ले, सारा लुटून आणणे, लोकांना एकत्रीत आणणे अशी कामेही त्यांनी केली. या सगळ्या चळवळींचे ते खंदे समर्थक होते.

भाईंनी निवडणुकांना तत्वनिष्ठेच्या लढ्याचं शास्त्र मानलं. आपल्या तत्वनिष्ठ राजकारणावरही ते कायम ठाम राहिले. ज्यांच्याशी राजकीय संषर्घ करावा लागला त्या फुलचंद गांधींकडून आपण बरंच काही शिकलो, हे भाईंनी उदारमनाने मान्य केलं. आजच्या नीती, तत्त्व आणि मूल्यांच्या पडझडीच्या काळात उद्धवराव अधिक प्रकर्षाने जाणवतात. आपल्या राजकीय विरोधकांवरही प्रेम करणारे राजकारणी तसे विरळाच.

भाईंचं सबंध राजकारण सामान्य माणसाला उभं करणारं होतं. जातीपातीवर मात करायची असेल तर सवर्ण आणि दलितांनी एकत्र येऊन राजकीय क्षेत्रात काम केलं पाहीजे, असं त्यांच मत होतं. त्यांचं हे मत त्यांची दूरदृष्टी अधोरेखित करणारं होतं.

उद्धवराव आयुष्यभर गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, कामकरी, वंचित, शोषितांसाठी झटले. या अविरत संघर्षाच्या काळात तब्येतीकडे दुर्लक्ष झालं. माणुसकीचं राजकारणं करणारा हा अवलिया जिवाची पर्वा न करता शेवटपर्यंत लढत राहीला.

संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचं श्रेय उद्धवरावांचंच

पान खायची प्रचंड आवड असणाऱ्या भाई उद्धवरावांना शेवटी शेवटी कॅन्सरचं निदान झालं. त्यांची प्रकृती वरचेवर खालावत होती. आयुष्यभर समतेच्या चळवळीत झुंजलेल्या झुंजार सेनानीचा अशा परिस्थितीत औरंगाबादला सर्वपक्षीय नागरी सत्कार करण्याचं ठरलं. ९ ऑक्टोबर १९८३ ला यशवंतराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्काराची सभा झाली. यावेळी चव्हाण म्हणाले,

‘उद्धवरावांनी स्वातंत्र्य चळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोलाचं कार्य केलं आहे. उद्धवराव आणि विरोधी पक्षांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रतापगडावर नेहरूंच्या विरोधात आणलेल्या प्रचंड मोर्चाबद्दल मी त्यावेळी त्यांच्यावर टीका केली होती. त्यांना संकुचित प्रवृत्तीचं ठरवलं होतं. पण आज मी प्रांजळपणे सांगतो, की प्रतापगडाच्या मोर्चामुळेच संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात येणं शक्य झालं. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचं श्रेय मला दिलं जातं. पण माझ्याइतकाच त्या श्रेयात महाराष्ट्र जागृत करणाऱ्या उद्धवरावांचाही वाटा आहे.’

सत्कारानंतर वर्षभरातच कॅन्सरने भाईंचा १२ जुलै १९८४ ला त्यांचा उस्मानाबाद इथे मृत्यू झाला. आजपासून त्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतंय. पण महाराष्ट्र घडवणाऱ्या या नेत्याचा वारसा चालवण्यासाठी कुठेच काही घडताना दिसत नाही.