संचारबंदीतही साताऱ्यात सर्वधर्म भाईचारा सभा झाली, कारण

१३ नोव्हेंबर २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


साताऱ्यात पुरोगामी विचाराच्या संस्थांनी मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त १० नोव्हेंबरला सर्वधर्म भाईचारा सभा घेतली. बाबरी मशीद निकालामुळे देशभरात कुठंही जाहीर सभा घ्यायला बंदी होती. असं असताना साताऱ्यात सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या या सभेला प्रशासनाने परवानगी दिली. हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या तिन्ही धर्मांचे प्रतिनिधी या सभेला उपस्थित होते.

मानवाच्या कल्याणासाठी अल्लाहने जो संदेश दिला तो मोहम्मद पैगंबरांकरवी जगाला मिळाला, असं इस्लाम धर्म मानतो. म्हणूनच मुस्लिम धर्माचे अनुयायी या महामानवाची जयंती उत्साहात आणि जोशात साजरी करतात. मात्र यावेळी ही जयंती आली तीच काहीशा तणावपूर्ण वातावरणात. १० नोव्हेंबरला मोहम्मद पैगंबर जयंती आणि त्याच्या आदल्या दिवशीच म्हणजेच ९ तारखेला रामजन्मभूमीचा निकाल होता.

रामजन्मभूमी-बाबरी मशीद निकालामुळे सगळीकडेच कडेकोट बंदोबस्त होता. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून देशभरात कर्फ्यू लागू करण्यात आली होती. धार्मिक भावना दुखवणारी भाषणं करण्याची, जाहीर सभा घेण्याची, जमाव करून उभं राहण्याचीही परवानगी नव्हती.

असं तणावाचं वातावरण असतानाही साताऱ्यात मुस्लिम समाज मात्र मोठ्या आनंदानं आणि एका वेगळ्याच पद्धतीनं पैगंबर जयंती साजरी करत होता. इतरत्र जाहीर सभा घेण्याची परवानगी नव्हती. पण साताऱ्यातल्या मुस्लिम जागृती अभियान आणि परिवर्तनवादी संघटना या संस्थांनी पुढाकार घेत प्रशासनाकडे सलोख्याचा प्रस्ताव दिला. आणि साताऱ्यात मोहम्मद पैगंबर जयंतीचा जंगी कार्यक्रम साजरा झाला.

हेही वाचा : अध्यात्माच्या बाजारात गाडगेबाबांच्या कीर्तनाचं अँटीवायरस मारा!

पैगंबर जयंतीनिमित्त भाईचारा सभा

पैगंबर जयंतीनिमित्त १० नोव्हेंबरला साताऱ्यात एक सभा आयोजित करण्यात आली होती. सर्वधर्म भाईचारा सभा. या सभेच्या नावातच या कार्यक्रमाचं वेगळेपण दिसतं.

कुणा धार्मिक पुरुषाची जयंती, पुण्यतिथी असेल तर त्या धर्मातले लोक एकत्र येतात आणि त्या महापुरुषाच्या कामाचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून भाषणं आयोजित करतात, असं सर्वसाधारण चित्र आपल्याला दिसतं. पण साताऱ्यातल्या या दोन संस्थांनी सगळ्याच धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन मोहम्मद पैगंबर जयंती साजरी केली.

या सर्वधर्म भाईचारा सभेत विचारवंत आणि अभ्यासक जावेद पाशा कुरेशी यांच्यासोबत पंढरपूरचे कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज बंडगर, साताऱ्यातल्या शाही मशिदीचे इमाम हफीज खली अहमद आणि सातारच्या शालोम चॅरिटेबल ट्रस्टचे फादर प्रमोद लोंढे यांनी सहभाग घेतला, अशी माहिती या सभेचे आयोजक विजय मांडके यांनी दिली.

प्रश्न संवादाचा आहे!

जावेद पाशा यांच्या भाषणाला उपस्थितांनी अक्षरशः डोक्यावर घोतलं. ते म्हणाले, 'मूळ प्रश्न संवादाचा आहे. माणसामाणसांत, धर्माधर्मात सध्या संवाद होत नाही. म्हणून धर्माभोवती तटबंदी तयार झालीय. ही तटबंदी आता भेदायला हवी. प्रत्येक तटबंदीत माणूस अडकलाय. माणुसपण जिवंत करण्यासाठी माणसामाणसांत, धर्माधर्मात संवाद होणं गरजेचं आहे. हेच प्रत्येक धर्माचं मर्म आहे.' या त्यांच्या वाक्यावर उपस्थितांतून टाळ्यांचा कडकडाट झाला. या टाळ्या कुणाच्याही मनातल्या भेदभावाच्या भावनेला छेदून जातील.

जगाला इस्लामने दहा महत्त्वाच्या गोष्टी दिल्यात. एकेश्वरवाद, महिलांचा सन्मान, समानता या मुलभूत गोष्टींचा त्यात समावेश आहे, असं सांगून जावेद कुरेशी यांनी प्रस्थापित विषमव्यवस्थेला छेद देत समानतेचा , शांतीचा संदेश देत इस्लामचा उदय झाल्याची बाब अधोरेखित केली. धर्माधर्मात, माणसामाणसात समन्वयाचा संदेश देणारा साताऱ्यातला कार्यक्रम दूरदृष्टीचा आहे. देशाला अशा व्यापक कार्यक्रमांची गरज आहे, असंही कुरेशी म्हणाले.

गोरखनाथ आणि पैगंबर यांच्यात साम्य

कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज यांनी आपल्या भाषणात धर्माधर्माला जोडणाऱ्या धाग्यांचा उलगडा केला. मोहम्मद पैगंबरांनी इस्लामचा प्रसार आणि प्रचार केला तर गोरखनाथांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला हे सांगत त्यांनी यंदा गोरखनाथांचीही जयंती १० नोव्हेंबरलाच असल्याचं लक्षात आणून दिलं. या दोन्ही महापुरुषांच्या जयंत्या एकाच दिवशी आहेत हा धागा पकडून इस्लाम आणि वारकरी संप्रदायातल्या सारखेपणावर ते बोलले. काहींकडून मुस्लिम समाज हा वारकऱ्यांचा दुश्मन असल्याचं सांगितलं जातं. त्याचाही ज्ञानेश्वर महाराजांनी खरपूर समाचार घेतला.

वारकरी संप्रदायाच्या सर्वसमावेशक समानतेचं आणि प्रस्थापित वर्णवर्चस्ववादी व्यवस्थेविरुद्धच्या विद्राहाचं इस्लामशी असलेलं नातं उलगडून दाखवताना बंडगर यांनी संप्रदायाची चळवळ समतेचा संदेश पुढे नेण्यासाठी कटीबद्ध आहे, असं प्रतिपादन केलं.

हेही वाचा :  तुकोबांच्या अभंगांना तात्विक अधिष्ठान मिळवून देणाऱ्या संत बहिणाबाई

म्हणून पोलिसांनी दिली परवानगी

‘आम्ही आधी साताऱ्यात जे काम केलं हे ते इथल्या लोकांनी आणि पोलिसांनी वारंवार पाहिलंय. आमचा उद्देश खूप निर्मळ आणि चांगला आहे याची खात्री पोलिसांना होती. म्हणूनच देशभरात इतर कोणताही कार्यक्रम घ्यायला बंदी असतानाही पोलिसांनी काही अटी घालून आम्हाला सभा घेऊ दिली’ असं विजय मांडके म्हणाले.

वियज मांडके, मिनाझ सय्यद, जयंत उथले, अहमद कागदी, कौशीक शेख, मुझप्पर सैय्यद, ऍड. मिलिंद पवार, अनिल मोहिते आणि डॅनिअल खुडे अशा तरुणांनी आणि कार्यकर्त्यांनी मिळून या कार्यक्रमाचं आयोजन केलं. १० तारखेला संध्याकाळी सहाला साताऱ्यातल्या ऐतिहासिक महात्मा गांधी मैदानावर हा कार्यक्रम झाला. तरुण मुलांसोबतच मुस्लिम महिला मुलींसोबतच इतर धर्मियांनीही या कार्यक्रमाला चांगली गर्दी केली.

 ‘साताऱ्यात मुस्लिम समाजाची संख्या मोठी आहे. मुस्लिम असो किंवा त्यांच्यासारखे इतर अल्पसंख्यांक या सगळ्यांविषयी गेल्या ७ ते ८ वर्षांपासून अविश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झालेत. हा अविश्वास दूर करून मोकळ्या मनाने आपण समाजात वावरू शकतो ही भावना सर्वसामान्यांमधे रुजवण्यासाठी हा कार्यक्रम घेतला,’ असं मांडके यांनी सांगितलं.

माणसानं माणूस असावं

अयोध्याप्रश्नी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर देशभरात कायदा सुव्यवस्था प्रश्नाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. शांतता आणि बंधुभावाचा संदेश देणारी सातारची सर्वधर्म भाईचारा सभा नक्कीच देशाला दिशादर्शक ठरेल.

जब जुबान पे साथ कान हो तो सब कुछ है
जब दिल के साथ इमान हो तो सब कुछ है
जो भी हो चाहे किसी भी मजहब को मानने वाला
वो शख्स अगर इन्सान हो तो सबकुछ है

साहिल शेख यांच्या या शायरीनं भाईचारा सभेचा समारोप झाला. या शायरीनं संपूर्ण सभेचा गोळीबंद निष्कर्षच आपल्यासमोर मांडला..

हेही वाचा : 

बसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं

राष्ट्रपती राजवट हे राजकीय पक्षांचं नाही तर राज्यपालांचं अपयश!

…म्हणून आजच्या पिढीनं शेषन यांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे!

मुख्यमंत्री कोणः राज्यपाल फक्त घोड्याला विहिरीपर्यंत नेऊ शकतात