‘ब्राह्मणी अरेरावीपणा आणि मुसलमानी धर्मवेडेपणा या दोन्हीला आव्हान देण्याची नामदेवाची पद्धत अतिशय सूक्ष्म आणि नम्र, क्षमायाचक पण प्रतिस्पर्ध्याला जिंकून घेणारी अशी होती,’ अशा शब्दांत ज्येष्ठ भाष्यकार भालचंद्र नेमाडे यांनी नामदेवांच्या बंडखोरीचं वर्णन केलं. नामदेवांच्या मोठेपणाची नेमाडे यांनी केलेली ही मीमांसा.
संत नामदेवांची आज ६६९ वी पुण्यतिथी. संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. भागवत धर्माची पताका महाराष्ट्रबाहेर फडकावली. दक्षिणेकडचा संतविचार उत्तरेत पोचवण्यासाठी संत नामदेवांनी पुढाकार घेतला. महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणाऱ्या रिंगण या वार्षिकाने २०१२ ला संत नामदेव विशेषांक काढला होता. या विशेषांकातला भालचंद्र नेमाडे यांचा हा लेख खास कोलाजच्या वाचकांसाठी देत आहोत.
वारकरी चळवळीचं आध्यात्मिक आणि वाङ्मयीन कर्तृत्व तर मोठं आहेच. पण मुख्य म्हणजे जो सामाजिक बदल तिला अभिप्रेत होता तोच तिच्या संघटनेचा आधारही होता. वारकरी परंपरेचे निर्माते हे चातुर्वर्ण्याच्या व्यवस्थेतून उघडपणे बाहेर पडले होते. ही व्यवस्था जुनाट धर्मग्रंथांची मान्यता असलेली, कोणत्याही परिवर्तनास अनुकूल नसणारी आणि भेदभाव विषमता वाढीस लावणारी होती.
ब्राह्मणांनी ही व्यवस्था टिकवून ठेवली. कारण ती त्यांचे आर्थिक आणि सामाजिक अधिकार अबाधितपणे टिकवून धरत असे. वैदिक पंडितांना मानणाऱ्या जातपंचायतींच्या धार्मिक अधिकारांत मुसलमानी राज्यकर्त्यांनीदेखील कधीही ढवळाढवळ केली नाही. उलट ते या धार्मिक परंपरांना मान देत असत. क्रांतिकारी विचार आणि कृती असणाऱ्या शिवाजीसारख्या थोर पुरुषालादेखील ब्राह्मणी दंडक मानावे लागले.
अशा वातावरणात गोरगरीब वर्ग साहजिकपणे पिढ्यानपिढ्या दबून गेला होता. नेमक्या या मूक, गरीब वर्गातच वारकरी चळवळीला आपली मुळे पसरवता आली. वारकरी चळवळीतील उत्तुंग प्रतिभेचा ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे म्हणजे ब्राह्मणांनी बहिष्कृत ठरवेले लोक होते. सनातनी ब्राह्मणांनी त्यांचा अवमान केलेला होता. एकनाथ आणि बहिणाबाई हे उदारमतवादी ब्राह्मण असल्याने त्यांचाही छळच झाला.
हेही वाचा: ज्ञानोबा तुकारामः जातीच्या पलीकडे नेणारा क्ल्यू
वारकरी चळवळीचा ज्ञात असणारा पहिला थोर नेता म्हणजे नामदेव. परंतु नवीन विद्रोही विचारांची शिकवण देणारा शूद्र म्हणून त्यालादेखील उन्मत्त ब्राह्मणांसमोर क्षमायाचना करावी लागली. उदाहरणार्थ, खालील अभंग पाहा:
परसा म्हणे नामयासी। अरे नामदेवा परियेसीं।
तू तंव दवडिल्या न जासी। मनीं लाजसी अझुनी ।।१।।परसा वदे नामयासी। तुझे पूर्वज माझे चरणापाशीं।
जरी तूं हरिदास झालासी। तरी याती हीनची।।२।।तुवां कोठवरी काय देखिलें। नाही वेदशास्त्र म्हणितलें।
एक तुजची जाणितलें। इतुकें झालें सांगावया।।३।आणिक सांगेन एक। तूं तर ठायींचाची वासनीक।
मातें लाविसी मौन टिलक। तेथें पाईक काय करी।।४।।तयासी त्वां कौटिल्य केलें। सहस्र वैष्णवांमाजी भुरळे ठेले।
तंव ते उमगो लागले। मग भुलले आपोआप।।५।।ऐसा तूं कवटाळिया पाही। तुझे पूर्वज माझे पायीं।
मग शंका धरिसी कांहीं। अझुनी तरी विचारी पां।।६।।तुजसी करितां वादक। तरी हे शंकतील लोक।
तूं तंव माझाची सेवक। विष्णुदास म्हणे परसा।।७।।श्री संत नामदेव महाराज यांची अभंगांची गाथा
(पुणे : चित्रशाळा, १९५७, अभंग २८४१)
वैदिक ब्राह्मण आणि जोर धरू लागलेला वारकरी पंथ यांच्यातील सुरवातीच्या चकमकी अशा अभंगांतून दिसतात. अर्थातच चक्रधाराप्रमाणे नामदेवाने संघर्ष प्रखर न करता नम्रतेची शैली हेतुपुरस्सर वापरलेली दिसते. पाहा:
यावरी नामदेव काय बोंलला। आजि मनीं संतोष फार झाला।
शब्द पूर्वजांचा ऐकिला। आनंदें भरला सागर।।१।।परसोबास म्हणे नामा। चरणतीर्थ द्यावे आम्हां।
तुमचे चरणींचा महिमा। माझ्या पूर्वजा आतुडला।।२।।इतुके दिवस गिवसितां पाहीं। परी हे व्यवस्था न पडे ठावी।
पूर्वज आहेत तुझे पायीं। ते म्यां आजि जाणितले।।३।।तयासा आपुले चरणीं रहाविलें। म्यां काय पूर्वीं कर्म केलें।
त्वां मज वेगळें धरियलें। थितें अंतरले चरणतीर्थ।।४।।ब्राह्मण क्षत्रिय वैश्य समस्त। हे तंव तुमच्या पायां पडत।
तया दंडवत घडत। दोष जाती तयांचे।।५।।ऐसें ठायींचेच जाणतों। तरी कासया हिंडतो।
चरण धरूनीच रहातों। विष्णुदास म्हणे नाम।।६।।(नामदेव गाथा, अभंग २८४२)
तुकाराम (१६०८ ते १६५०) तर वारकरी तत्त्वज्ञानाचा सर्वश्रेष्ठ भाष्यकार. पण त्याचादेखील अतोनात छळ झाला. क्रांतिकारी विचारांमुळे त्याला भयंकर दिव्य सोसावं लागलं. त्याच्या कविता नदीत बुडवण्यात आल्या. सामाजिक परिवर्तनाची बांधिलकी मानणाऱ्या अशा इतर अनेक गरीब अधिकारहीन संतकवींच्या संघर्षाची उदाहरणं वारकरी चळवळीच्या इतिहासात सलगपणे दिसतात.
ज्याच्या चारित्र्याविषयी थोडीफार माहिती उपलब्ध आहे असा पहिला क्रांतिकारी संतकवी म्हणजे नामदेव हा होय. वारकरी चळवळीच्या आविष्कारतंत्रांना बळकटी देणारा नामदेव हा पहिला असल्याने त्याच्या चरित्राचा बारकाईने विचार करणं आवश्यक ठरतं.
गरीब शिंप्याच्या घरी जन्मलेला नामदेव सर्वांचा नेता म्हणून आपल्या काळात एवढं आदराचं स्थान मिळवू शकला. याचं कारण म्हणजे त्याने निरनिराळ्या जातीजमातींतील कृतीशील माणसांचा मोठाच जथा वारकरी चळवळीच्या झेंड्याखाली एकत्र आणला.
देशभर प्रवास केलेल्या नामदेवाने भक्तीचा हा नवीन विचार दक्षिणेतून घेतला असावा, असं समजलं जातं. या विचाराचा प्रसार त्याने उत्तरेत चौदाव्या शतकाच्या सुरवातीस केला याबद्दल पुरावे उपलब्ध आहेत. तरीही नामदेवाच्या चरित्राच्या आणि कार्यक्षेत्राच्या मानाने फारच थोडी माहिती उपलब्ध आहे, असं म्हणावं लागतं. गुजरात आणि उत्तरेतील पंजाबपर्यंतचे त्याच्या नंतरच्या कालखंडातले अनेक कवी, विशेषतः नरसी मेहता, मीरा, रोहिदास, कबीर आणि नानक हे त्याचे नाव अत्यंत भक्तिभावाने घेताना दिसतात.
नामदेवाने विशद केलेल्या भक्तिपंथाची संरचना व्यापक असल्याने चौदाव्या शतकाच्या अखेरीस उत्तरेत त्याचा प्रसार झपाट्याने झाला आणि कोणताही प्रखर संघर्ष येऊ न देता निरनिराळे प्रादेशिक पंथभेद सहजपणे एका विशाल भक्तीच्या प्रवाहात मिसळून उत्तरेत अभूतपूर्व सर्जनशील भक्तीचळवळ पसरत गेली. उत्तरेत भक्तिमार्गाचे प्रसारकार्य करणाऱ्यांशी नामदेवाचा जवळचा संबंध आला होता.
हेही वाचा: गुरुपंरपरेला फाटा दिला म्हणूनच वारकरी संप्रदाय सगळीकडे पोचला
हिंदू आणि इस्लाम या दोहोंतील इतिहासप्रसिद्ध धर्मांधता दाखवून देऊन त्याने या दोन्ही धर्मांतील सीमारेषा मिटवून टाकल्या. यातूनच त्याने मुसलमान आणि ब्राह्मण या आपल्या दोन मोठ्या शत्रूंवर उघडउघड टीका करण्याचे खास तंत्रही विकसित केले. यामुळेच नामदेव आपल्या काळातील पददलितांचा सर्वांत लोकप्रिय असा धार्मिक-वाङ्मयीन नेता बनला. हिंदू आणि इस्लाम या दोन्हींमधील कट्टर धर्मश्रद्धेला छेदून जाणावे हे नेतृत्व होते. आपल्या एका हिंदी पदात नामदेव म्हणतो:
हिंदू अंधा तुरक काणा। दो हाते ग्यानी श्याना।
हिंदू पूजे देहुरा। मुसलमान मसीद।
नामें सोई सेव्या। जह देहुरा मसीति ना ।(नामदेव गाथा, अभंग २२२७)
त्याने केलेली मुसलमानी अत्याचाराची मीमांसाही एकदम वेगळ्या प्रकारची आहे:
देव दगडाचा भक्त हा मायेचा। संदेह दोघांचा फिटे कैसा।
ऐसे देव तेही फोडिले तुरकीं। घातले उदकीं बोभातीना।(नामदेव गाथा, अभंग २२२७)
एवढा हिंदू-मुसलमान धर्मांच्या सरहद्दींचा व्यापक आधार घेऊन नामदेवाने आपल्या पंथाचा प्रसार केला. या पंथाला त्याच्या काळात विशिष्ट असं नावदेखील नव्हतं. नंतरच्या शीख धर्मगुरुंनी आपल्या पवित्र ग्रंथसाहेबात नामदेवाच्या अभंगांचा समावेश केला. ब्राह्मणी अरेरावीपणा आणि मुसलमानी धर्मवेडेपणा या दोहोंनाही आव्हान देण्याची नामदेवांची पद्धत अतिशय सूक्ष्म आणि नम्र, क्षमायाचक पण प्रतिस्पर्ध्याला जिंकून घेणारी अशी होती.
आपल्या चळवळीत प्रत्येक प्रसंगी साध्य कोणते आणि साधन कोणते, यासंबंधी नामदेवाचे भान नेहमीच जागृत असे. त्याने बंड केले ते गाजावाजा न करता, शांतपणे, पण ते अतिशय परिणामकारक ठरले. अस्पृश्यांना आपल्या उदार पंथात आश्रय देणारा तो पहिलाच होता. वेगवेगळ्या जातींमधले सुमारे २४ कवी त्याच्या बैठकीतले ज्ञात आहेत. त्यात ब्राह्मण, शूद्र, अस्पृश्य आणि स्त्रिया असे अनेक प्रकार दिसतात.
त्याच्या घरी दासी म्हणून लहानपणापासून राहणाऱ्या जनाबाईने त्याचं वर्णन गाढा भक्त, प्रेमळ व उदार मित्र, थोर मार्गदर्शक, गरिबांचा आधार, विनयशील साध्या वृत्तीचा, क्रियावाचामने करून पंथाला वाहून घेणारा – असे ठिकठिकाणी मायेने ओथंबून केले आहे. एका अभंगात तिने त्याचे वर्णन
सुंबाचा करदोडा रकट्याची लंगोटी। नामा वाळवंटी कथा करी।।१।।
ब्रह्मादिक देव येवोनि पाहाती । आनंदे गर्जती जयजयकार ।।२।।
जनी म्हणे त्याचे काय वर्णूं सुख । पाहती जे मुख विठोबाचे ।।३।।(नामदेव गाथा, अभंग २६५१)
असं केलेलं आहे. कीर्तनातून लोकशिक्षण साधणाऱ्या क्रांतिकारी लोकप्रिय शैलीच्या वारकरी विद्येच्या इतिहासातला हा पहिला उल्लेख ठरतो. नामदेव स्वतः म्हणतो:
नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावूं जगीं।
(नामदेव गाथा, अभंग १३८८)
दुसऱ्या एका अभंगात तो म्हणतो :
अवघा संसासर सुखाचा करीन । अवघा भावें धरीन विठ्ठल एक ।।
अवघा शीणभाग हिरोन घेईन । अवघेचि तोडीन मायाजाळा।।
अवघ्या संसाराचे बैंसणे मोडील । अवघेचि तोडील मायाजाळ।।(नामदेव गाथा, अभंग १७९३)
यातील शेवटचे दोन चरण जरी विठ्ठलाला उद्देशून असले तरी सुरवातीचा नामदेवाचा आत्मविश्वास त्याचा स्थायिभाव म्हणून अचानक प्रकट झाला आहे. सर्व लोकांना आपल्या पंथात येण्यास उत्तेजन देणारा नामदेव चळवळ्या, विचारवंत होता. सगळ्या प्रकारच्या लोकांना आपल्या मार्गात समाविष्ट करून घेण्यात आयुष्य खर्ची घालणाऱ्या या गरीब चळवळ्याच्या बायकापोरांवर मात्र उपासमारीची पाळी येई. एका अभंगात त्याची आई म्हणते:
गोणाई म्हणे नाम्या सोडी देवपिसें । बुडविसी कैसें घर बळें ।।
तुज सईल लेकुरें वर्तताती कैसीं । तू मज झालासी कुळक्षय ।।
धन धान्य पुत्र कलत्रें नांदती। तुज अभाग्या तो चित्तीं पांडुरंग।।
कैसी तुझी भक्ती लौकिकावेगळी । संसाराची होळी केली नाम्या ।।(नामदेव गाथा, अभंग १२६३)
आणि त्याची बायको म्हणते:
वस्त्र पात्र नाही खाया जेवायासी । नाचे अहर्निशी निर्लज्जसा।।
चवदा मनुष्यें आहेत माझ्या घरीं। हिंडती दारोदारी अन्नासाठी।।(नामदेव गाथा, अभंग १३१८)
हेही वाचा: जैतुनबींच्या निमित्ताने महाराष्ट्राचं व्यापक तत्त्वज्ञान भारतभर पोचलं असतं पण?
नामदेवाच्या कुटुंबातील सर्वांनीच बरीवाईट अशी अभंगरचना केलीय. त्याने या सर्वांना उत्तेजन देऊन लिहिते केले असावे. ‘आपले दुःख, मोह, यातना यांचा विसर पडण्यासाठी आपण मुक्तपणे आविष्कार केला पाहिजे.’ हा नामदेवाचा उपदेश तर सर्वश्रुतच आहे. नामदेवानंतर त्याचे अनुयायी असलेल्या चोखामेळ्यासारख्या गरीब लोकांच्या सगळ्या लहानमोठ्या कुटुंबियांनी अभंगरचना केली आहे. हे सुद्धा खरे म्हणजे त्या काळच्या प्रस्थापित वाङ्मयीन संकेतांविरुद्ध एक बंड होतं.
कारण तो काळच असला होता की माणसाला दुःख भोगावे लागे ते केवळ परकी आक्रमण, लढाया, दुष्काळ आणि सर्वनाश या कारणांमुळेच. केवळ नव्हे, तर कदाचित आतल्या आत होणाऱ्या आध्यात्मिक प्रश्नांमुळे त्याहीपेक्षा भयानक दुःख भोगावे लागत असावे.
अशा या समाजरचनेत, स्वतःच्या अभिव्यक्तीतून दीनदुबळ्या वारकऱ्यांनी आत्मविश्वास कमावला. कोणतीही सामाजिक प्रतिष्ठा वा राजकीय आधार नसतांना या मूक शूद्रसमूहाच्या एकाएकी असे लक्षात आले की आपल्याला आवाज आहे. आता जबाब मागणे आणि विरोध करणे त्यांना शक्य झाले. उदाहरणार्थ, जनाबाई म्हणू शकली,
स्त्री जन्म म्हणवुनी न व्हावे उदास । साधुसंता ऐसे केले जनी।।
भक्तिसाठी याति नाही, असेही तिने ठामपणे म्हटले आहे.
नामदेवाचा आणखी एक समकालीन वारकरी सांगाती चोखामेळा हा अस्पृश्य महार होता. चोखामेळा आपल्या नैतिक महतीबद्दल आणि संतत्वाचा आदर्श म्हणून आपल्या काळात प्रसिद्ध होता. या काळातली संतकवयित्री जनाबाई हिने आपल्या अनेक अभंगांमधून चोखा किती ‘थोर भला’ उमदा होता, हे लिहून ठेवले आहे. तरी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या देवळात त्याला प्रवेश करू दिला जात नव्हता.
हलक्या जातीचा असून गुणी ठरल्यामुळे त्याचा छळही झाल्याचे समकालीनांच्या अभंगांवरून दिसते. मंगळवेढे इथे वेठबिगारीचे काम करतांना त्याच्या अंगावर तिथले कुसू ढासळून पडले. त्या दगडविटांच्या ढिगाऱ्यात तो गाडला गेला. ही घटना इ.स. १३३८ च्या सुमारास घडली. त्याचा मृतदेह नंतर उकरून ओळखण्यात आला आणि नामदेवाने त्याची समाधी पंढरपूरच्या विठ्ठलमंदिराच्या महाद्वाराखाली पायरीवर देवळाच्या बाहेर बांधवली. ही दंतकथा असो की खरी गोष्ट, ती प्रतीकात्मक निश्चितच आहे. चोखामेळ्याचे एकूण आयुष्यच अस्वस्थ करणारे आहे.
असा हा चोखामेळा विटाळाला कंटाळून देवळाच्या पायरीवरून विठ्ठलाला कडवटपणे विचारू लागला :
आता कोठवरी । भीड तुमची धरू हरी ।।
दार राखीत बैसलों। तुम्ही दिसे मोकलिलों ।।
ही नीत नव्हे बरी । तुमचे साजे तुम्हा थोरी ।।
चोखा म्हणे काय बोलों। आमुचे आम्ही वाया गेलों।।(श्रीसंत चोखामेळा महाराज यांचे चरित्र व अभंग गाथा)
संपा. स. भा. कदम (मुंबई : कदम, १९६९), अभंग १०१)
हेही वाचा: संत कबीरांची पालखी वाराणशीतून पंढरपूरला वारीत सामील व्हायची
द्वारी बैसोनि हाका मारी । म्हणे चोख्याची महारी ।। असे नमूद करून ठेवणारी सोयराबाई, त्याची बहीण निर्मळाबाई, भाऊ बंका आणि मुलगा कर्ममेळा या सर्वच कुटुंबियांनी अस्पृश्यांवर लादण्यात आलेल्या अमानवी परिस्थितीचे वर्णन आपापल्या अभंगांतून केलेले आहे.
उपासमार, अवहेलना, असहायता या सर्व गोष्टी सहन करीत सामाजिक समानतेचा मोकळा श्वास घेण्यासाठी हा संघर्ष चालला होता. बहिष्कृत अस्पृश्यांवर भक्तिपंथाचा उदारमतवादी प्रभाव किती पडला होता, हे प्रस्तुत संघर्षावरून दिसून येते. चोखामेळ्याचा मुलगा कर्ममेळा याने आपल्या जातीच्या हतभागी स्थितीचे वर्णन खालीलप्रमाणे केले आहे:
गोड कधी न मिळेचि अन्ने। सदा लाजिरवाणे जगामध्ये।।
तुम्हासी आनंद सुखाचा सोहळा । आमुचे कपाळा वोखटपणा।।(चोखामेळा गाथा, अभंग ६)
इतरत्र अधिक आत्मविश्वासाने तो म्हणतो :
आता येथवरी । मज नका बोलू हरी ।।
तुमचे आहे तुम्हा ठावे । माझे म्यांच करावे ।।(चोखामेळा गाथा, कर्ममेळा, अभंग १७)
आणि सुमारे तीन शतकांनंतर देहूसारख्या एका लहानशा खेड्यात आपल्या अखंड कीर्तनांनी दूरदूरच्या लोकांना आकर्षून घेणारा महाकवी तुकाराम (१६०८-१६५०) हा केवळ आपल्या भाषिक सामर्थ्यावर सनातनी ब्राह्मणांचा सर्वांत प्रबळ शत्रू ठरला. निंदावे हे जग। ऐसा भागाआला भाग ।। असा स्वतःचा कार्यभाग त्याने ओळखून घेतल्यामुळे तो निर्भयपणे म्हणू शकला,
महारासी शिवे । कोपे ब्राह्मण तो नव्हे ।।
तया प्रायश्चित्त काही । देहत्याग करितां नाही ।।(श्री तुकाराम महाराज यांच्या अभंगांची गाथा, अभंग २५३८)
पुणे : त्र्यंबक हरी आवटे, १९२७
नामदेवाने प्रथमतः वापरलेल्या लोकशिक्षण आणि आत्माविष्कार या प्रभावी साधनांचा विकास वारकरी चळवळीच्या इतिहासात अशा रीतीने घडून आला. कोणत्याही दृष्टिकोनातून पाहिले तरी नामदेवाने केलेले बंड हे अपरिमित महत्त्वाचे ठरते. प्रभावी ठरतील अशा आविष्कारतंत्रांचा वापर करून त्याने हिंदी जातीजातींचे नरकप्राय भेदभाव पुसून टाकले आणि अखंड मानवतेचा आदर्श वारकऱ्यांसमोर ठेवला.
हेही वाचाः
आज देहूत संत तुकारामांचा तारखेनुसार जन्मोत्सव