सुखकर्ता दुखःहर्ता ही आरतीच्या पलीकडे छान कविताही

०५ सप्टेंबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


भारतात कुठेही जा, कोणत्याही पूजेनंतर देवाची आरती होतेच आणि त्यात पहिलं स्थान अर्थातच श्रीगजाननाचं असतं. गणपतीची आरती म्हणजे सुखकर्ता दुखःहर्ता हे समीकरणच आहे. समर्थ रामदासांच्या प्रतिभासंपन्न लेखणीतून उतरलेल्या या काव्यातला प्रत्येक शब्द अर्थपूर्ण आहे. पण या आरतीतल्या शब्दांच्या अर्थाचा पत्ताच नसल्यामुळे ती गाताना आपण चूकत तर नाही ना?

मागे एकदा कुठल्याशा कामाच्या निमित्ताने उत्तर भारतात जाण्याचा योग आला, तेव्हा एका कुटुंबात गेलो असताना तिथे धार्मिक विधी चालू होता. उपचाराचा भाग म्हणून नंतर होणाऱ्या आरतीसाठी थांबावं लागलं. आरती सुरु झाली आणि पहिलीच आरती होती, ‘सुखकर्ता दुखःहर्ता वार्ता विघ्नाची...’ मी चकीतच झालो.

वास्तविक तिथे जमलेल्या पंधरा, वीस लोकांपैकी कुणीही मराठी भाषिक नव्हते. कुणालाही या भाषेचा गंधही नव्हता. समर्थ रामदास यांचे नावही त्यांना ठाऊक नव्हते. तरीही ही आरती का?  मी चौकशी केली, तेव्हा समजलेली माहिती विलक्षणच होती.

गणपतीची आरती म्हणजे सुखकर्ता दुखःहर्ता

श्रीगजानन हे आद्य दैवत आहे. त्यामुळे त्याची आरती सर्वप्रथम होणं गरजेचं असल्याने ही आरती ते आळवत होते. तशी पंचक्रोशीत गेल्या कित्येक पिढ्यांची प्रथा असल्याचे साऱ्यांनी सांगितलं. ही आरती मराठीत आहे, हेही अनेकांना ठाऊक नव्हते. त्यामुळे त्यातील शब्दांचा अर्थ माहीत असणं शक्यच नव्हतं. नंतर दक्षिण भारतात, गुजरातेत, पंजाबमधे मुद्दाम हिंदू कुटुंबात जाऊन याविषयी चौकशी केली.

बहुतेक सर्वत्र सुखकर्ता दुखःहर्ता ही आरती ठाऊक होती. शब्दांची चिरफाड करून ती गायलीही जात होती. पण त्याविषयी बाकी काहीच ठाऊक नाही. अलीकडे महाराष्ट्रात फिरलो. सत्यनारायणाच्या सार्वजनिक महापूजेपासून उच्चविद्याविभूषित कुटुंबाच्या घराघरांतील मंगळगौरीपर्यंत सर्वत्र पाहिलं. आरत्या सुरू झाल्या की, पहिली आरती सुखकर्ता दुखःहर्ताच.

भारताच्या धार्मिक कर्मकांडांच्या दुनियेत सुखकर्ता दुखःहर्ताचं स्थान अनन्यसाधारण आहे. कोणत्याही पुजेनंतर देवाची आरती होतेच. तिच्यातच पहिलं स्थान अर्थातच श्रीगजाननाचं असतं. विशेष म्हणजे सर्वत्र गणपतीची आरती म्हणजे सुखकर्ता दुखःहर्ता हे समीकरण होऊन बसलं आहे. असं काय विशेष आहे या आरतीत?  मी धांडोळा घेऊ लागलो.

हेही वाचाः गणपती अथर्वशीर्ष १: हा तर मिनी संस्कृतीकोशच

वास्तविक कोणतीही आरती त्या त्या दैवताचं गुणगाण गाणारी, त्याचं उदात्त वर्णन करणारी असते. सुखकर्ता दुखःहर्ता हीसुद्धा अशीच.

सुखकर्ता दुखःहर्ता वार्ता विघ्नाची।
नुरवी, पुरवी प्रेम, कृपा जयाची।
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची।
कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥

जय देव, जय देव जय मंगलमूर्ती।
दर्शनमात्रे मनकामना पुरती॥

रत्नखचित फरा, तूज गौरीकुमरा।
चंदनाची उटी, कुंकुम केशरा।
हिरेजडित मुकुट, शोभतो बरा।
रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया॥
जय देव, जय देव जय मंगलमूर्ती।

लंबोदर पीतांबर, फणिवरवंदना।
सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना।
दास रामाचा, वाट पाहे सूदना।
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना॥

जय देव जय देव, जय मंगलमुर्ती|
दर्शनमात्रे मनकामना पुरती||

ही गणपतीचं वर्णन करणारी आरती आहे. समर्थ रामदास यांच्या प्रतिभासंपन्न लेखणीतून ती उतरली. त्यामुळे त्यातील प्रत्येक शब्दाला स्वत:चं सौष्ठव आणि सौंदर्य आहे. यामुळे ही आरती गाण्यात मजाही आहे. मात्र गोष्ट अशी आहे की, ती गाणाऱ्यांपैकी बहुतेकांना त्याच्या अर्थाचा पत्ताच नसल्याने आपण जी आरती भक्तिभावाने आळवतो, तिच्या चालीमुळे आपण अर्थभेदच करत आहोत, याचं भान कुणालाही राहत नाही.

हेही वाचाः गणपती अथर्वशीर्ष २: पारायण करण्याआधी अर्थ समजून घेऊया

चालीमुळे होतोय अर्थभेद

`सुखकर्ता दुखःहर्ता वार्ता विघ्नाची`, इथे पहिलं चरण संपतं. दुसरं चरण आपण `नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची` असं म्हणतो. इथे `वार्ता विघ्नाची` म्हणजे काय? कुणी विचार केला? वास्तविक समर्थांनी रचलेली आरती अशी आहे, `सुखकर्ता दुखःहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी` आणि दुसरं चरण `पुरवी प्रेम कृपा जयाची।` कोणत्याही विघ्नाची म्हणजेच संकटाची बातमीही न उरवणारी म्हणजेच नुरवी अशी ज्याची कृपा तो श्रीगणेश, अशी ही चरणं आहेत.

त्याच्या पुढच्या चरणांतही असाच अर्थभेद आणि त्यामुळे अर्थहानी होते. ‘दर्शनमात्रे मन:’ला आपण चालीनुरूप पॉझ घेतो आणि पुढे म्हणतो, ‘कामनापूर्ती... जय देव जय देव…’ वास्तविक समर्थांनी ‘मन:कामना’ असा शब्दप्रयोग वापरला आहे. त्याचा  अर्थभेद आपण सर्रास करतो.

शेवटच्या कडव्यातही तसाच अर्थभेद, ‘लंबोदर पितांबर फणिवर वंदना’ या चरणानंतर 'सरळसोंड वक्र’ असं दुसरं चरण म्हणून तिसऱ्या चरणात ‘तुण्ड त्रिनयना’ असे शब्द घेतो. त्याचा अर्थ काय? वास्तविक ओळी अशा आहेत, ‘सरळ सोंड वक्रतुण्ड त्रिनयना’ सरळसोंड असलेले, मात्र तिरकी मान केलेले श्रीगणेशाचे रुप स्वामी समर्थांना अभिप्रेत आहे. आपल्या ओळीच्या तोडफोडीमुळे काहीच अर्थबोध होत नाही. 

संकष्टी नव्हे तर संकटी!

तशीच एक नेहमी होणारी चूक म्हणजे, 'दास रामाचा वाट पाहे सदना, संकष्टी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवर वंदना’ या ओळी. यातील ‘वाट पाहे सदना’ म्हणजे काय? याबाबत अभ्यास केला असता, असं समजलं की, हा शब्द ‘सदना’ असा नसून ‘सूदना’ असा आहे. ‘सूदन’ म्हणजे रक्षणकर्ता. अर्थात याबद्दल अधिक अभ्यास व्हायला हवा. 

पुढच्या चरणातील अर्थभेद अधिक महत्वाचा. आपण आळवतो, यातील ‘संकष्टी पावावे, निर्वाणी रक्षावे’ यातील संकष्टी हा अपभ्रंश आहे. दर महिन्याच्या वद्य चतुर्थीला संकष्टी म्हणतात. या दिवशी चंद्राला नैवेद्य ठेवून श्रीगजाननाची पुजा केली जाते. त्यामुळे आरतीतही कुणीतरी संकष्टी घुसडली असावी. वास्तविक गणपतीने केवळ महिन्यातील एकाच दिवशी संकष्टीला भक्तांना पावावे, अशी समर्थांची अपेक्षा नसावी. हा शब्द `संकटी पावावे` असा आहे. असो. हे सारं असलं, तरी `सुखकर्ता दुखःहर्ता`चं महत्व आणि पावित्र्य यत्किंचितही कमी होत नाही, हेही खरंच.

हेही वाचाः 'फँड्री'च्या दानपेटीने गणपती बाप्पा होतो प्रसन्न

कुणी लिहिली ही आरती?

समर्थांनी श्री गणेशाचं वर्णन करणारी ही आरती १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात रचली असावी. त्या काळात आरती हा प्रकार अस्तित्वात होता की नाही, हे ठाऊक नाही. त्यांनी ही रचना श्रीगणेशस्तुती म्हणून केली. पुढे तिची आरती झाली. इतके मात्र खरं की, छत्रपती शिवाजी महाराजांनंतरच्या काळात, विशेषतः छत्रपती राजाराम महाराज आणि पेशवाईच्या काळात सुखकर्ता दुखःहर्ता गायली जात होती.

पेशवे पानिपताच्या लढाईसाठी उत्तरेत गेले आणि अनेक मराठी कुटुंबं पुढे तिथंच राहिली. बडोदे, इंदूर, ग्वाल्हेर, झांसी अशा ठिकाणी मराठी संस्थानं जन्माला आली. पुणे, कोकणातील मराठी मंडळी उत्तरेत गेली. छत्रपती राजाराम महाराज दक्षिणेत जिंजीला पोचले. त्यांच्याबरोबर त्यांचं सैन्यही गेलं. या सर्वांनी मराठी संस्कृतीबरोबर  महाराष्ट्राचे गणेशपूजन आणि सुखकर्ता दुखःहर्ता ही तिथे नेली.

जसं संत नामदेवांच्या पंजाब भ्रमणामुळे मराठी संस्कृतीचे अंश गुरु ग्रंथसाहेबातही सापडू लागले. तसंच पेशवे आणि मराठा संस्थानिकांमुळे गणेशपूजन सर्वत्र गेले. टिकले. सुखकर्ता दुखःहर्ता बरोबरच `शेंदूर लाल चढायों अच्छा गजमुख को, दौदील लाल विराजे सुख गौरीहरको`, ही ‘गोसावीनंदन’ कृत गुजराती मिश्रित हिंदी आरतीही प्रसिद्ध आहे.

जय जय श्री गणराज विद्या सुखदाता।

धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता॥धृ॥

 

शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुखको।

दोंदिल लाल बिराजे सुत गौरीहरको॥

हाथ लिए गुड-लड्डू साई सुरवरको।

महिमा कहे न जाय लागत हूँ पदको॥१॥

 

अष्टौ सिद्धि दासी संकटको बैरि।

विघ्नविनाशन मंगलमूरत अधिकाई॥

कोटीसूरजप्रकाश ऐसी छबि तेरी।

गंडस्थल-मदमस्तक झूले शशिबहारि॥२॥

 

भावभगतिसे कोई शरणागत आवे।

संतति संपति सब ही भरपूर पावे।

ऐसे तुम महाराज मोको अति भावे।

गोसावीनंदन निशिदिन गुण गावे॥३॥

 

पुण्यातून पोचली देशभर

गोसावी नंदन म्हणजे पुण्याजवळच्या चिंचवडचे प्रसिद्ध मोरया गोसावी. ते गणपती भक्त होते. आणि ही आरती ही त्यांचीच, असं तिथले लोक सांगतात. त्यात तथ्य आहे. कारण मोरया गोसावींच्या अन्य रचना आणि `शेंदूर लाल चढायों`ची शब्दकळा यात बरेच साम्य आहे. मोरया गोसावी आणि स्वामी रामदास हे दोघंही पुणे परिसरात वास्तव्य असणारे. प्रसिद्ध अष्टविनायकांपैकी पाच विनायक मंदिरे पुणे जिल्ह्यातच पसरलेली आहेत. सुखकर्ता दुखःहर्ता इतकी प्रसिद्ध होण्याचं एक कारण पुणे जिल्ह्याची महती हेही आहेच.

नंतर श्रीगणेशाच्या अनेक आरत्या आणि स्तुतीपर गाणी झाली. त्यांच्या रेकॉर्डर्स बाजारात हातोहात खपत राहिल्या पण त्यामुळे सुखकर्ता दुखःहर्ताच्या विक्रमाला बाधा आली नाही. ज्या अनेक संगीतकारांनी सुखकर्ता दुखःहर्ताला नवनवे स्वरसाज दिले आणि ख्यातनाम गायकांनी त्या गायल्या, त्यांचं नाव झालं.

आता यंदाही गणेशोत्सवात टाळ-मृदंगाचा गजर सुरु झाला. देवळातून घंटानाद होऊ लागला आणि वेचे सुरु झाले की, आपण आपसूक आणि अनाहतपणे वाट पाहतो, सुखकर्ता दुखःहर्ताची. ही सुरू झाली की, टाळ्या वाजू लागतात आणि वातावरण भक्तिरसाने भारून जाते. 

जाता जाता; समर्थ रामदासांनी गणपतीचं वर्णन करताना ‘सरळसोंड, वक्रतुण्ड’ असं केलं आहे. हे जर खरं मानायचं, तर डाव्या सोंडेचा गणपती, उजव्या सोंडेचा गणपती, हा काय प्रकार आहे? याला खरोखर पुराणातील शास्त्रार्थ आणि संदर्भ आहे की,  ती नंतर काही कथित धर्ममार्तंडांनी उठवलेली निव्वळ अफवा? विचार व्हायला हवा!

हेही वाचाः 

आता या मंटोचं करायचं काय?

मुंबईच्या सिद्धिविनायकाचा महिमा

पुढच्या वर्षी लवकर आलाय माघी मोरया

'फँड्री'च्या दानपेटीने गणपती बाप्पा होतो प्रसन्न