पश्चिम बंगालच्या रणांगणात कुणाचं पारडं होतंय जड?

२८ डिसेंबर २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


२०२१ च्या मे महिन्यात पश्चिम बंगालमधे विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकीच्या तयारीत भाजपच्या वाढलेल्या आत्मविश्वासाचं कारण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेलं यश आहे. पण, भाजपकडे ममतादीदींना आव्हान देऊ शकेल, असा प्रादेशिक चेहरा नाही. मुकुल रॉय, सुविंदू अधिकारी अशा तृणमूल काँग्रेसमधून आयात केलेल्या नेत्यांमधे ती क्षमता नाही. सध्या प्रचारात दिसणारा मुख्य चेहरा अमित शहा यांचा आहे. ममतादीदींच्या ‘मा-माटी-मानुष’समोर पश्चिम बंगालबाहेरच्या व्यक्तीचा टिकाव लागणं कठीण आहे.

पश्चिम बंगालची निवडणूक एप्रिल - मे २०२१ मधे होणार आहे. साधारणपणे निवडणुकीच्या एक-दोन महिने आधी वातावरणनिर्मिती होत असते. पश्चिम बंगालमधे मात्र आतापासूनच त्याची सुरवात झालीय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप २०० जागा जिंकेल, अशी गर्जना केलीय.

तर तृणमूल काँग्रेसचे ‘इलेक्शन मॅनेजमेंट’ करणारे स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांनी ट्विटर या समाजमाध्यमावर भाजप दोन अंकी आकडाच्या पुढे जाणार नाही. गेल्यास आपण काम करणं सोडू, अशी घोषणा केलीय. त्यामुळे पश्चिम बंगाल निवडणुकीचा निकाल काय असेल, याची आतापासूनच उत्सुकता निर्माण झालीय.

भाजपचा आत्मविश्वास कसा वाढला?

पूर्व भारतात आपली राजकीय पकड मजबूत करण्यासाठी पश्चिम बंगाल भाजपसाठी महत्त्वाचं राज्य आहे. पश्चिम बंगाल ताब्यात आल्यास भाजपच्या राज्यसभेतल्या जागाही वाढतील. राज्यसभेवर पश्चिम बंगालमधून १६ खासदार जातात. शिवाय, आगामी लोकसभा निवडणुकीत हिंदी पट्ट्यात पीछेहाट झालीच तर त्याची भरपाई पश्चिम बंगालमधून करता येईल, असंही भाजपचं गणित आहे.

१० वर्षांपूर्वी भाजपचा पश्चिम बंगालमधे नगण्य प्रभाव होता. २०११ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ४ टक्के मते मिळाली होती. तेव्हा भाजपला एकही जागा जिंकता आली नव्हती. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ११ टक्के मतांसह २९४ पैकी अवघ्या ३ जागा जिंकता आल्या होत्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या २ जागा भाजपने जिंकल्या होत्या.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपने जोरदार मुसंडी मारली. तब्बल ४१ टक्के मतं भाजपनं मिळवली, तर ४० पैकी १८ जागांवर विजय मिळवला. एकूण १२१ विधानसभा मतदारसंघांत भाजप आघाडीवर होता. पश्चिम बंगालमधे बहुमताचा आकडा १४८ आहे. लोकसभा निवडणुकीत वाढलेला प्रभाव अजून थोडा वाढवल्यास सत्तेत बसता येईल, असं भाजपचं समीकरण आहे. त्यामुळे भाजपच्या वाढलेल्या आत्मविश्वासाचं कारण २०१९ लोकसभा निवडणुकीत मिळालेलं यश आहे.

हेही वाचा : लोकशाहीमुळे आर्थिक विकास खुंटतो?

भाजपची खेळी काय?

भाजपने देशाला माहीत असलेला राजकीय खेळ सुरू केलाय. तो म्हणजे, विरोधी पक्षाचे महत्त्वाचे नेते फोडणं. याची सुरवात भाजपने २०१७ मधे तृणमूल काँग्रेसचे नंबर २ नेते मुकुल रॉय यांना फोडून केली होती. आता दुसरे महत्त्वाचे नेते सुविंदू अधिकारी यांना फोडलंय. ज्या नंदीग्राम आंदोलनामुळे ममता बॅनर्जींनी डाव्या पक्षांच्या ३४ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला होता, त्या आंदोलनाचे सूत्रधार अधिकारी होते. दक्षिण भागातल्या ३-४ जिल्ह्यांवर त्यांचा प्रभाव आहे. असे आयात नेते तृणमूल काँग्रेसला खिंडार पाडतील, असं भाजपला वाटतं.

ममता बॅनर्जी यांच्यावर अमित शहा घराणेशाहीचा आरोप करतायंत. त्यामागचा रोख ममतादीदींचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर असतो. बाहेर पडणारे नेतेदेखील अभिषेक बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडतात. शिवाय, ‘धार्मिक ध्रुवीकरण’ हा भाजपच्या प्रचाराचा अपेक्षेप्रमाणे मुख्य भाग आहे.

पश्चिम बंगालमधे मुस्लिम मतदारांची संख्या अंदाजे २७-३० टक्के आहे. त्यामुळे ममतादीदींवर अल्पसंख्याकांच्या लांगुलचालनाचा आरोप भाजपकडून केला जातो. पश्चिम बंगाल हे राज्य बांगलादेशला लागून आहे. त्यामुळे बेकायदेशीर स्थलांतरित, सीएए, एनआरसी हे मुद्दे उपस्थित करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय.

भाजपसमोरच्या अडचणी

भाजपकडे ममतादीदींना आव्हान देऊ शकेल, असा प्रादेशिक चेहरा नाही. मुकुल रॉय, सुविंदू अधिकारी अशा तृणमूल काँग्रेसमधून आयात केलेल्या नेत्यांमधेही ती क्षमता नाही. सध्या प्रचारात दिसणारा मुख्य चेहरा हा अमित शहा यांचा आहे. ममतादीदींच्या ‘मा-माटी-मानुष’समोर पश्चिम बंगालबाहेरच्या व्यक्तीचा टिकाव लागणं कठीण आहे.

लोकसभा निवडणुकीत जो प्रतिसाद भाजपला मिळतो, तेवढा विधानसभा निवडणुकीत मिळताना दिसत नाही. २०१९ लोकसभेपूर्वीच्या ५ आणि लोकसभेनंतरच्या ५ विधानसभा निवडणुकीत, लोकसभेत मिळालेल्या मतांपेक्षा तब्बल ९ ते २२ टक्के किंवा सरासरी १३ टक्के इतकी कमी मतं भाजपला मिळाली आहेत. पश्चिम बंगालमधे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला १७ टक्के मतं मिळाली होती. ती टक्केवारी २०१६ च्या निवडणुकीत ११ टक्क्यांवर आली होती.

थोडक्यात, मोदींचा करिष्मा लोकसभेवेळी जितका चालतो तितका विधानसभेला चालत नाही. तसंच मतदार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील फरक जाणून आहेत. याची पुनरावृत्ती पश्चिम बंगालमधे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा : आरएसएस आणि रिलायन्सच्या ब्रँड वॅल्यूला मोदींमुळे धोका?

ममता बॅनर्जींची व्यूहनीती

२०११ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला काँग्रेससह ४० टक्के मतं मिळाली. त्यावेळी तृणमूलला १८४ जागा मिळाल्या. २०१६ मधे तृणमूलने २११ जागा आणि तब्बल ४५ टक्के मतं मिळवली. २०१९ लोकसभा निवडणुकीत तृणमूलने ४४ टक्के मतं कायम ठेवली. लोकसभा निवडणुकीत १६४ विधानसभा मतदारसंघांमधे तृणमूलला आघाडी होती. त्यामुळे तृणमूल काँग्रेसची व्होटबँक अबाधित आहे. त्याला फारसा धक्का पोचलेला नाही.

‘स्वास्थ्य साथी’, ‘कन्याश्री’सारख्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून ममतादीदींनी भरीव कामं केलीयत. प्रशांत किशोर यांच्या सल्ल्याने त्यांनी ‘बंगाध्वनी यात्रा’ हा कार्यक्रम सुरू केलाय. यामधे तृणमूल काँग्रेसचे ग्रामपंचायत ते विधानसभा/लोकसभेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी घरोघरी जाऊन कल्याणकारी योजना आणि इतर सरकारी कार्यक्रमांची माहिती लोकांना देतायत.

यांतर्गत सगळी गावं आणि घरांपर्यंत तृणमूल पोचणार आहे. किशोर यांच्या सल्ल्याने ममतादीदींनी ‘दीदी के बोलो’ हा कार्यक्रम सुरू केला. यामधे लोकांना थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे तक्रारी दाखल करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. त्या तक्रारींचं निराकरण करणारी व्यवस्थाही बसवण्यात आली.

ममतादीदींचे यशस्वी कार्यक्रम लोकांपर्यंत पोचवणं आणि लोकांच्या नाराजीला वाट करून देणं, चुकीच्या गोष्टींचा दोष ममतादीदींना दिला जाणार नाही, याची तजवीज करणं हा या कार्यक्रमांचा हेतू आहे. भ्रष्ट प्रतिमा असणार्यांीना उमेदवारी न देण्याचं धोरणही त्या राबवणार आहेत. भाचा अभिषेक बॅनर्जी हे कोणत्याही महत्त्वाच्या पदावर नसतील, अशी घोषणा त्या करण्याचीही शक्यता आहे. जेणेकरून घराणेशाहीचा आरोप निरर्थक ठरेल. भाजप पश्चिम बंगालच्या एकोप्याच्या संस्कृतीवर हल्ला करत आहे, असा प्रतिहल्ला ते करतायत.

काँग्रेस-डाव्या पक्षांची भूमिका

भाजपच्या वाढीचा फटका काँग्रेस आणि डाव्या पक्षांना बसला आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत भाजपची वाढलेली मतं आणि काँग्रेस-डाव्या पक्षांची कमी झालेली मतं सारखीच आहेत. दोघांची मिळून मतांची टक्केवारी १३ टक्क्यांवर आलीय. या निवडणुकीत काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी आघाडी केलीय. ही आघाडी कमजोर आहे. या आघाडीची मतं कमी-अधिक होणं याचा भाजपवर परिणाम होणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपकडे गेलेली आपली २ टक्के मतंही त्यांना पुन्हा आपल्याकडे खेचता आली, तरी भाजपच्या आकांक्षांना सुरुंग निश्चित लागेल. त्यामुळे या अर्थाने या आघाडीची भूमिका कळीची आहे.

राजकारणात एक आठवड्याचा वेळही खूप असतो, असं म्हटलं जातं. पश्चिम बंगालच्या निवडणुकीला अजून ४-५ महिन्यांचा अवधी आहे. तरीही ज्या पद्धतीने दोन्ही बाजूने प्रचार सुरू झालाय ते पाहता ही निवडणूक रंगत आणणारी ठरेल, असं दिसतंय. बिहार, हैदराबाद निवडणुकीतल्या यशामुळे भाजपचा आत्मविश्वास दुणावलाय. असं असलं तरी ममता बॅनर्जी यांचा करिष्मा, त्यांचा टिकून असलेला मतदारवर्ग पाहता त्यांचं पारडं जड आहे, हे निश्चित.

हेही वाचा : 

आम्ही हिंदूही आणि मुसलमानही!

नेपाळमधल्या सत्तासंघर्षामागचं कारण काय?

'ब्रोकन’ तरूणाई ‘ब्रेक’ डान्सवरच थिरकणार ना!

नवा कोरोना वायरस भारतात 'सुपर स्प्रेडर' ठरेल?

सत्तरीतल्या रजनीकांतची नवी राजकीय इनिंग कुणाच्या फायद्याची?

आप्पासाहेब सा. रे. पाटील: असाही असतो 'साखर कारखान्याचा चेअरमन'

(लेखक राजकीय विश्लेषक आहेत)