मी रांगेतच उभा आहे: वंचित समूहाच्या वेदनांची मालिका

०७ एप्रिल २०२२

वाचन वेळ : ९ मिनिटं


'मी रांगेतच उभा आहे' हा कवी भूषण रामटेके यांचा कवितासंग्रह. वर्षानुवर्ष गरिबीच्या काळोखात आयुष्य रेटत असलेल्या आणि आजही अच्छे दिन येतील अशी भाबडी आशा असणाऱ्या समूहाचं दुःख रामटेके यांनी यात मांडलंय. दलित, वंचित, शोषित, आदिवासी समूहांच्या वास्तववादी दुःखाला त्यांनी या कवितासंग्रहाच्या माध्यमातून वाचा फोडलीय.

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या डिजिटल युगात देश झपाट्याने बदलताना दिसत असला तरी भारताचं मूळ स्थान असलेला ग्रामीण भाग आजही स्वातंत्र्याच्या कित्येक वर्ष मागे आहे. स्वातंत्र्य नावाच्या गंगेत आजही हा ग्रामीण भाग वाहून काळासोबत पुढे आलेला नाही. या समूहाची पाटी 'अच्छे दिन'ची वाट पाहतेय.

सत्ताधारी लोक अच्छे दिन वगैरे भूलथापा मारून त्यांच्या जोरावर निवडून येतात. गरिबांच्याच जोरावर ही मंडळी स्वतःला जगभर मिरवून घेतात. पण अशा वंचित समूहात ते कधीच विकासाला जन्माला घालत नाही.

वर्षानुवर्ष असाच गरिबीच्या काळोखात आयुष्य रेटत असलेल्या आणि आजही अच्छे दिन येतील अशी भाबडी आशा असणाऱ्या समूहाचं दुःख भूषण रामटेके यांनी 'मी रांगेतच उभा आहे' या कवितासंग्रहात मांडलंय. दलित, वंचित, शोषित, आदिवासी समूहांच्या वास्तववादी दुःखाला भूषण रामटेके या कवितासंग्रहाच्या माध्यमातून वाचा फोडतात.

हेही वाचा: ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं

पिढ्यांपिढ्यांची लढाई कवितेतून

शेवटच्या टप्प्यावर असलेला वंचित समूह आपल्यापर्यंत कधीतरी न्याय पोचेल म्हणून अनादी काळापासून रांगेत उभा आहे. हा समूह ऊन, वारा, पाऊस, थंडीला न जुमानता असह्य वेदना सोसत भूक भागणाऱ्या रांगेत आपल्या स्वप्नांचा डोलारा घेऊन उभा आहे. या रांगेत होणारी घुसमट कवी मांडतात. आता हा समूह अच्छे दिनची वाट पाहून थकून गेलाय. रंगीबेरंगी स्वप्न दाखवून नेहमीच या समूहाची लूट केली गेलेली आहे. असा आशय मांडताना 'निव्वळ सावलीतच जगेन' या कवितेत कवी म्हणतात,

'मी अच्छे दिनाचे स्वप्न
पाहून थकलो
आतडं पिळवटलंय
नुसता आगीचा डोंब
मनात खदखदतोय
कित्ती जन्मांपासून उपाशी'

गरिबांचे असंख्य प्रश्न कधी सुटतील? असा प्रश्न कवी व्यवस्थेपुढे उपस्थित करतात. उजेडाची वाट पाहणारे कवी पिढ्यांपासूनची लढाई कवितेतून मांडतात. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवणाऱ्यांना कवी सांगतात की, मी तुझ्या तकलादू साच्यात बसू शकेल इतका सोपा नाही. मी कोर्टात दाद मागणारा सच्चा साथीदार आहे. मी न्यायासाठी सतत लढत राहणारा चळवळ्या आहे.

जगण्याची उमेद, मरणाची इच्छा

अच्छे दिनाच्या काल्पनिक गोष्टी किती दिवस सहन करायच्या. गरिबांच्या स्वप्नांना कुस्करुन, त्यांच्या अपेक्षांचा भंग करून सत्तेत निवडून येतात. फक्त रस्ते चकचकीत झाले म्हणजे जणू विकासच झाला, असा आव सत्ताधारी आणतात. चकाचक रस्त्यांना कवी नव्या नवरीची उपमा देतात.

डिजिटल इंडियाच्या नावाखाली भुकेकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न सुरू आहे, यावर हा डिजिटल इंडिया आहे की भुकेला भारत आहे? असा प्रश्न कवी उपस्थित करतात. नोटाबंदी आणि कॅशलेसच्या काळात या समूहाची झालेली गळचेपीही कवी मांडतात. जगण्याची उमेद आणि मरणाची इच्छा या दोघांमधली अवस्था म्हणजे ही कविता आहे.

भुकेल्या समाजाच्या जखमा

कवितेबद्दलही कवी गांभीर्याने व्यक्त होतात. समाजातलं सारं वास्तवचित्रण, भुकेसाठी सुरू असलेली लढाई, भुकेने होणारे मृत्यू, व्यवस्थेचा दळभद्रीपणा अशा गोष्टी पाहून कवीची अभिव्यक्ती कवीला शांत बसू देत नाही. ही कविता अर्थातच कवितेतले वास्तव संदर्भ कवीला जगूही देत नाही आणि मरूही देत नाही. रात्रंदिवस कवीच्या हृदयात घर करून राहते कविता.

खरं तर कविता हेच कवीचं आयुष्य असतं. कवितेची नशा ही रात्रीसुद्धा शांत झोपू देत नाही. कवीच्या संवेदनशील मनाला नेहमीच अस्वस्थ करत असते. बहुजन, वंचित, शोषित, कामगार, दलित, भटके, स्त्रिया अशा अनेकांच्या होणाऱ्या गळचेपीविरुद्ध कविता लढत असते. अशा वंचित समूहांनी व्यवस्थेच्या विरोधात बंद पुकारला तर जीभ कापून त्याचा आवाज कायमचा बंद केला जातो. प्रसंगी यांचं मुंडकंही छाटलं जातं.

कृषिप्रधान भारतात गावगाडयाकडे दुर्लक्ष करून महानगरांच्या विकासाला चालना दिली जाते. चकाचक रस्ते, जलद धावणाऱ्या मेट्रो, मॉल, स्मार्ट सिटी ही इथल्या व्यवस्थेची विकासाची तोडकी व्याख्या आहे. विकास झाल्याच्या गप्पा मारणाऱ्यांना वस्तीतलं दुःख अजूनही समजलेलं नाही. स्मार्ट सिटी झाली म्हणजे विकास झाला ही समज त्यांच्या मेंदूत कायमची बसलेली आहे.

ताईत, महापुजांनी समाजाला भुरड घातलेली आहे. अंधश्रद्धेनं थैमान घातलंय. अंधश्रद्धेचा पुरस्कार करणाऱ्यांना संताप येतो तेव्हा ते विवेकी विचार करणाऱ्या, अंधश्रद्धेला विरोध करणाऱ्या महापुरुषांचे पुतळे जाळतात. इथल्या व्यवस्थेला अंधश्रद्धा नावाचा महारोग झालाय. भुकेल्या समाजाच्या भडाभड वाहणाऱ्या जखमा पुसायला कुणीच पुढे येत नाही. त्यांनी पाहिलेली स्वप्न त्यांच्याच आसवांच्या महापुरात वाहत आहेत.

हेही वाचा: तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध

बाबासाहेब कवीचं अँटीबायोटिक

व्यवस्थेच्या दंगलीत सापडलेल्या वंचित समाजाने आता व्यवस्थेविरुद्ध आसूड उगारला पाहिजे, अशा इशारा कवी करतात. कवीची वाचनाची प्रेरणा म्हणजे बाबासाहेबांच्या हातातलं पुस्तक होय. हे पुस्तक पाहून कवीला बाबासाहेबांचा हेवा वाटतो. बाबासाहेबांचं घर म्हणजे जणू कवीचं हृदयचं आहे.

बाबासाहेबांचे विचार नेहमी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देतात. आपल्या हक्कांची जाणीव करून देतात. युगानुयुगांच्या जखमांनी भडभडलेला तसेच आयुष्याच्या शेवटच्या प्रवासाला लागलेल्या समूहांना बाबासाहेबांनी वेगळीच कलाटणी दिलेली आहे. बाबासाहेबांना 'गरिबांचं अँटीबायोटिक'ची उपमा देताना 'तू आमचं अँटीबायोटिक्स्' या कवितेत कवी म्हणतात,

'बनून आलास
तू आमचं अँटीबायोटिक्स्
अन् आमच्या वांझ आयुष्याला
येऊ लागल्यात प्रसवकळा'

दलितांवरच्या अन्यायाची नोंद

जगभरात अनेक महारोगांवर संशोधन चालू आहेत, पण गरिबीचं आणि भुकेचं संशोधन करायला कुणीही पुढे येत नाही, हे पाहून कवी अस्वस्थता व्यक्त करतात. बाबासाहेब हे अंगावर भस्म फासून, जटा मोठ्या वाढवून हिमालयात पळून गेले नाहीत, तर आयुष्यभर वंचितांसाठी, त्यांच्या हक्कांसाठी लढत राहिलेत. कित्येक प्रकारची देव, देवांची पुत्रांना या धरतीवर जन्माला घातले गेले, पण बाबासाहेब त्यांच्यासारखे नाटकी आणि बेईमान झाले नाहीत.

बाबासाहेबांची जयंती ही नुसत्या फोटोला हार घालून, मेणबत्त्या लावून साजरी न करता ती बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेऊन साजरी करायची असते. जयंतीला जाहिरातबाजी करणं, मोठमोठी बॅनर लावणं या गोष्टी कवीच्या मनाला न पटणाऱ्या आहेत. बाबासाहेबांचं नाव कवीने हृदयात कोरून ठेवलंय आणि त्यांचे विचार मेंदूत ठासून भरली आहेत.

कवीची लेखणी दलितांवर झालेले अन्याय प्रकर्षाने नोंदवते. 'घरात पीठ नाही अन् पाहिजे विद्यापीठ, असं म्हणून ज्या दलितांना हिनवलं गेलं त्यांच्या दुःखाला कवी वाचा फोडतात. बाबासाहेबांच्या नावाच्या विद्यापीठाच्या मागणीबद्दल 'एकवीस वर्षांनंतर...' या कवितेत कवी म्हणतात,

'बापाच्या नावाचं एक इद्यापीठ मागलं
तं झोंबली मिरची
आन् आता फुटाण्यासारखे वाटले
जातात नावं
तं कुठ्ठे हाक ना बोंब'

विचारी माणसं पेरायचं स्वप्न

बाबासाहेबांच्या विचारांना नष्ट करण्याचं गढूळ राजकारण पाहून कवी चिडतात. व्यवस्थेत रामजादे आणि हरामजादे अशी जाणूनबुजून फूट पाडली जात आहे. गरिबांच्या विकासाची अजिबात चिंता नसलेले नेते सध्या सत्तेवर आहेत. बाबासाहेब नेहमी कास्तकारांच्या, कामगारांच्या न्यायासाठी लढत होते. आजची नेते मात्र कारखानदारांच्या बाजूने उभी असलेली दिसतात.

न्यायाला खिशात लपवून जाती-धर्माचा मोठा बोलबाला व्यवस्थेत आज दिसतोय. या व्यवस्थेला बुद्धाची ऍलर्जी आहे. गरिबांच्या भुकेच्या आगीवर सत्ताधारी आपापली पोळी शेकून घेत असतात. संविधानाला जाणूनबुजून डावलून गीतेचा या व्यवस्थेत बोलबाला सुरू आहे. मेंदूत भुसा भरलेल्या व्यवस्थेत कवी विचार करणारी माणसं पेरायची स्वप्न बघतात.

ज्यांच्या मनातून देव नावाची काल्पनिक संकल्पना कायमची मेलेली असेल. व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारणारी ही कविता आहे. बाबासाहेबांच्या विचारांना नष्ट करण्याचे मोठे कट सध्या रचले जातायत. बाबासाहेबांच्या विवेकी विचारामुळे त्यांची सत्ता धोक्यात आहे. याबद्दल 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर २०१६' या कवितेत कवी म्हणतात,

'आजच्या ग्लोबलाईज्ड दुनियेत
मार्केटिंगचा फंडा जोरात चाललाय
आत्ता त्यांची दुकानदारी फुलून गेलीय
तुम्हाला पळविण्याचे षडयंत्र
चाललंय जोरात
तुमच्यावाचून
त्यांची दुकानदारी चालत नाही
हे आहेत जाणून'

हेही वाचा: मराठीतलं ऐतिहासिक ललित लेखन म्हणजे फॅन फिक्शन: नंदा खरे

धर्माच्या ठेकेदारांविरुद्ध कविता

बाबासाहेबांनी ज्या दिवशी जगाचा निरोप घेतला, त्या दिवसाला 'हिंदू शौर्य दिवस' म्हणून साजरा करण्यासाठीचा सुरू असलेला कट पाहून कवी अस्वस्थ होतात. नवनवीन फंडे आणून ही व्यवस्था गरिबांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. या व्यवस्थेसाठी संघवाद आणि भगवेकरण हेच महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि हेच त्यांचे ध्येय आहे. ओठावर राम आणि पोटात नथुराम असलेली ही व्यवस्था आहे.

अन्यायाविरुद्ध कुणी बोलायला उठलं तर त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जाते. ज्यांच्या आयुष्यात कधी गरिबीचे संदर्भच नाहीत अशा श्रीमंत लोकांना गरिबीच्या असह्य वेदना समजणार नाहीत. त्यांचं आयुष्य म्हणजे बायको, पोरं, रेस्टॉरेंट, बंगला, टीवी यातच मशगुल आहे.

धर्माच्या ठेकेदारांविरुद्ध ही कविता आसूड उगारते. त्यांच्याविरोधात कुणी विवेकी विचार करून बोलला तर इथल्या व्यवस्थेला ते पचनी पडत नाही. मग त्यांचे दाभोळकर, पानसरे केले जाते. हे करणं त्यांच्यासाठी सर्वात सोपा उपाय आहे.

भगव्या कोल्ह्यांचं बेगडी प्रेम

बाबासाहेबांप्रमाणेच कवी शिवाजी महाराजांबद्दलही व्यक्त होतात. फक्त भगव्या रंगाचे आकर्षण असलेल्या आजच्या मावळ्यांनी शिवाजी महाराज दगलबाज आहेत की दगाबाज आहेत हे समजून घेतलं पाहिजे. हिरव्या रंगाबद्दल महाराजांना कधीच द्वेष नव्हता, पण आजच्या धर्माच्या ठेकेदारांनी त्यांना फक्त भगव्या रंगात भिजवून टाकलाय. याबद्दल 'भगव्या रंगात न्हाऊन...' या कवितेत कवी म्हणतात,

'आज पाहतोय
एका रंगाचे दुसऱ्या रंगाशी बिनसलेले नाते
या रंगांना कॅनव्हासवर कस्सं चितारावं ?
माझ्यासमोर प्रश्न ठाण मांडून उभा'

इतिहास न वाचता, न समजून घेता लोक महापुरुषांना डोक्यावर घेतात. खरंतर ही वेळ महापुरुषांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याची आहे. पण इथला समाज या गोष्टीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतो. देशावरचं खोटं प्रेम सजवून दाखवणाऱ्या तथाकथितास कवी 'भगवा कोल्हा' अशी उपमा देतात. या भगव्या कोल्ह्याला वाटतं जणू साऱ्या जगाचं तत्त्वज्ञान मला एकट्यालाच माहिती आहे. देशावरचं बेगडी प्रेम तो जनतेला मूर्ख बनवण्यासाठी प्रत्यक्षात उतरवू पाहतोय. या संदर्भात 'भगवा कोल्हा' या कवितेत कवी म्हणतात,

'साऱ्या विश्वाचं ज्ञान
जस्सं ह्यालाच गवसलेलं
म्हणून मिरवतो तोरा
देशावरचं बेगडी प्रेम उतरवितो प्रत्यक्षात
लब्बाड जख्खड म्हातारा भगवा कोल्हा'

चौकाचौकात संस्कृतीचा बोलबाला

इथल्या व्यवस्थेतला एक घटक हा नेहमी वॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेम आणि संस्कृतीचं घाणेरडं राजकारण करून देशाला पेटवत असतो. देशात जाणूनबुजून फुट पाडण्याचा प्रयत्न करतो. हा सण आपला नसून पाश्चात्यांचा आहे, असं म्हणून हे प्रेमाचे दुष्मन चौकाचौकात संस्कृतीचा बोलबाला माजवत हातात लाठी घेऊन उभे असतात.

प्रेम आणि संस्कृतीच्या घाणेरड्या राजकारणातून मुक्त झालेल्या देशाचं स्वप्न कवी पाहतात. कवी मलालाबद्दलही गौरवार्थ लिहितात. कवीला मलालामधे सावित्रीबाईंची सावली दिसते. चांगलं काम करणाऱ्यांना विशेषतः महिलांना हा समाज नेहमीच इर्षेनं पाहतो. अशा लोकांना समाज व्यवस्थित जगू देत नाही. याबद्दल 'बार्बी खेळण्याच्या वयात' या कवितेत कवी म्हणतात,

'कळी खुडून टाकणाऱ्यांची
कधी तुला भीती वाटलीच नाही काय ग ?
कुस्करण्याच्या भयातून
कसं ग स्वतःला सोडविलंस ?
मलाला, तू छोटीशी पणती
मला तुझ्यात दिसतंय क्रांतीज्योतीची सावली'

हेही वाचा: आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू

स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहिण्याचं स्वप्न

रमाई आंबेडकर यांच्या कर्तृत्वाबद्दल 'रमाई तू कोणत्या विद्यापीठातून शिकलीस?' असा प्रश्न कौतुकाने विचारतात. इथल्या व्यवस्थेच्या मेंदूत कोरून ठेवलेल्या विकासाच्या तकलादू व्याख्येची कवी चिरफाड करतात. बिस्लरीच्या पाण्याने हात धुणं याला विकास म्हणता येत नाही. चमचमीत रस्ते, मॉल, मोठ्या बाजारपेठी बांधल्या म्हणजे विकास म्हणता येत नाही. एसीच्या खोलीत बसून विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांना कवी चांगलीच चपराक देतात.

विकास म्हणजे शेळीवरून मेंढ्या हाकण्याचा प्रकार आहे. स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहिण्याचं स्वप्न उराशी असलेले कवी व्यवस्थेने कितीही डिवचण्याचा प्रयत्न केला तरी मी आत्महत्या करून ढोंग्यांचा विजय होऊ देणार नाही, असा ठाम विश्वास कवी व्यक्त करतात.

सत्ताधाऱ्यांनी कितीही गुन्हा लपवला तरी तो लपत नाही. सत्याला अनेक पदर असतात, म्हणून कधीतरी तो उघड येतोच. घाणेरड्या राजकारणाच्या काळात माझ्यावर कितीही गोळ्या घातल्या तरी मी ब्लॉगर अविजित रॉय बनून येईन, असा आशावाद कवी व्यक्त करतात.

पानसरे कोण होता?

कवी पानसरे यांच्याबद्दलही लिहून कृतज्ञता व्यक्त करतात. शिवाजी महाराज म्हणजे हिरव्या रंगाचा अर्थात मुस्लिम समूहाचा दुश्मन आहे, असं षडयंत्र चालू असताना पानसरेंनी 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच्या माध्यमातून खऱ्या सेक्युलर शिवाजी महाराजांचा इतिहास जगासमोर मांडला.

इथल्या व्यवस्थेविरुद्ध त्यांनी बंद पुकारल्यामुळे त्यांना व्यवस्थेने संपवून टाकलं. पण त्यांच्या विचारांतून हजार पानसरे या मातीत तयार होतील, असा आशावाद व्यक्त करताना 'पानसरे कोण होता?' या कवितेत कवी म्हणतात,

'तुम्ही ठरलात
दाभोळकर प्रवासातले सोबती
तुम्ही सांडलेल्या रक्तातून
जन्माला येतील हजारो पानसरे
अन् म्हणतील
मी पानसरे
मी पानसरे'

कवीला पिळवटून टाकणाऱ्या घटना

समष्टीवर लिहिणाऱ्या नामदेव ढसाळ यांना कोणत्या रंगात रंगवावं असा मुद्दा कवी मांडतात. मार्क्स्, आंबेडकरांवर भाष्य करणारा नामदेव एका रंगात अथवा एका चौकटीत कधीच बांधता येणार नाही. कोणत्याही एका खुंट्याला बांधता येईल इतके संकुचित विचार करणारे नामदेव ढसाळ अजिबात नव्हते.

भुजंग मेश्राम आणि अरुण काळे हे चळवळीतले सच्चे कवी अकाली गेल्याने कवी अस्वस्थता व्यक्त करतात. त्यांच्या जाण्यानं कवीच्या संवेदनशील मनाला वेदना होतात. जगाचा निरखून अनुभव घेणारे हे कवी गेल्याने त्यांच्या वाटेवर चालण्याचा कवी निर्धार करतात.

खैरलांजी प्रकरणातले एकमेव साक्षीदार असलेल्या भय्यालाल भोतमांगे गेल्यावर कवी खूप अस्वस्थ होतात. स्वतःच्या परिवाराचा विचार न करता न्यायासाठी शेवटच्या श्वासापर्यंत भोतमांगे लढत राहिले. रोहित वेमुलाचं जगणही कवीला पिळवटून टाकतं.

हेही वाचा: चर्चा तर होणारचः गुप्तेंच्या भयकथांमागचं उचलेगिरीचं गूढ

स्त्रीवर लादलेलं बाईपण

एकविसावं शतक उजाळलं तरी अजूनही पुरुषी मानसिकतेच्या गुलामगिरीत असणाऱ्या बाईपणाचं दुःखही कवी कवितेतून मांडतात. बाईने अंगावर कितीही वस्त्र घातलं तरी हा समाज तिला वस्त्रांच्या आतून खजुराहोच्या शिल्पांसारखं नागड्या अवस्थेत पाहत असतो. बाईला व्यवस्थेत फक्त भोग आणि वासनेची वस्तू म्हणूनच मर्यादित ठेवलंय. कत्तलखान्यातील कसायाच्या गाईसारखं बाईचं जगणं असतं.

युगायुगांपासून तिला पुरुषी मानसिकतेचा धाक राहिलेला आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात तर तिला गर्भाशयातच संपवलं जातंय. गर्भाशयच स्त्रीचं मरणाचं सरण झालंय. तिचं या जगाला ओझं झालेलं आहे. जन्माने कुणीही बाई अथवा माणूस नसतं. इथल्या पुरुषी मानसिकतेनं तिच्या हातात बांगड्या घालून तिच्यावर बाईपण लादलेलं आहे. याबद्दल 'बाई SSS' या कवितेत कवी म्हणतात,

'जन्मानं कोण्ही बाई नस्तं
कोण्ही बाप्या
बांगड्या हातात घालून
बाईपण लादलं जातं'

बंड करणारी कविता

कवीचा कष्टकरी बापही कवितेतून येतो. जीवनाची कठीण परीक्षा पास करण्यासाठी रस्त्यावर आलू, गोला तर कधी सिनेमागृहात शेंगदाणे विकणाऱ्या बापाबद्दल ही कवी लिहितात. मुलाने पीएचडी केल्यावर आनंदी होणार बापही कवीच्या कवितेचा विषय बनतो.

महापुरुष मांडताना कवी बापाला विसरत नाहीत, हे महत्त्वाचं. निद्रिस्त सत्तेच्या विरुद्ध आवाज उठवणारी ही कविता आहे. आज लोकशाही धोक्यात आहे. राज्यकर्त्यांचं आयुष्य हे सेल्फीपुरतं सीमित झालंय. सेल्फीतून बाहेर यांनी देशाच्या, गरिबांच्या विकासाकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे.

दुसऱ्यांच्या अर्थातच धर्माच्या ठेकेदारांच्या विचारांवर चालणाऱ्या, स्वतःची डोकं नसलेल्या तसंच अक्कलशुन्य असलेल्या लोकांची कवीला चीड येते. कुणी कितीही धमकावलं किंवा गळा दाबण्याचा प्रयत्न केला तरी परिवर्तनाचा मार्ग बदलणार नाही, असं कवी ठामपणे म्हणतात.

भुकेच्या संदर्भातून जन्माला आलेली आणि व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारणारी ही एक महत्त्वाची कविता आहे. गावगाड्यातील, वस्ती-पाड्यावरील प्रत्येक वंचिताचं जगणं या कवितेतून येतं. 'अच्छे दिन येतील' असा भाबडा समज असणाऱ्या समूहाची ही करुणकहाणी आहे.

कवितासंग्रह: मी रांगेतच उभा आहे
कवी: भूषण रामटेके
प्रकाशक: विजय प्रकाशन, नागपूर
किंमत: २००/-
पृष्ठसंख्या: १२७

हेही वाचा: 

जे बोललो तेच लिहित गेलो: अनिल अवचट

तरुण संपादकांनी संपादित केलेले दिवाळी अंक

तंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय होणार?

संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटोंच्या भाषणाचं सारः लेखक हुजऱ्या नसतो

राजस्थानातल्या पुष्करच्या वाळूत उमटलेल्या घोड्यांच्या टापांची गोष्ट