चार्ल्स शोभराज : ग्लोबलायझेननं घडवलेला डेंजर किलर

२५ डिसेंबर २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


पैसा, प्रसिद्धी, सेक्स आणि त्यासाठी चोरी, लूट, खून ही काही मानवी इतिहासाातली नवी गोष्ट नाही. पण या सगळ्याच्या पलिकडे जाऊन, जगातल्या अनेक देशांमधे वीसहून अधिक मुलींना फसवून त्यांचे खून पाडणारा चार्ल्स शोभराज नुकताच नेपाळच्या तुरुंगातून सुटलाय. जागतिकीकरणाच्या विस्तारासोबत वाढणाऱ्या मानसिक विकृतीचं तो एक भयानक नमुना आहे.

चार्ल्स शोभराज आणि जागतिकीकरण याचा संबंध काय? असा प्रश्न कोणीही विचारू शकेल. त्यासाठी जागतिकीकरणाची फक्त व्यापारापुरतीच व्याख्या डोळ्यासमोर ठेवून चालणार नाही. आज आपण जागतिकीकरणाला व्यापाराच्या पलिकडे पाहत नाही. पण जागतिकीकरण हे व्यापाराच्या पलिकडे संकल्पनांचं, नातेसंबंधांचं आणि त्याहून मुख्य म्हणजे सुखाच्या कल्पनांचं आहे. भौतिक सुखासाठी वाट्टेल ते करायला तयार असणारी समाजव्यवस्था आणि त्यातली मूल्यव्यवस्था या जागतिकीकरणानं सर्वदूर पसरली. त्यातूनच चार्ल्स शोभराज ही विकृती घडलीय, हे समजून घ्यायला हवं.

अनेक देशांमधल्या वीसहून अधिक मुलींना फसवून, त्यांच्याशी संबंध ठेवून त्यांची विवस्त्र अवस्थेत हत्या करणारा, तिहारच्या तुरुगांतून पोलिसांना गंडवून फरार होणारा, अत्यंत गप्पिष्ट, चिकनाचोपडा चार्ल्स शोभराजचं आयुष्य हे दंतकथा वाटावं असचं आहे. त्याच्या या मनोवृत्तीबद्दल अनेक जणांनी अभ्यास केलाय, सिनेमे काढलेत, पुस्तकं लिहिलीत. त्याच्या या मनोविकारांचं मूळ हे त्याच्या उद्ध्वस्त बालपणात आहे. त्या उद्ध्वस्ततेलाही जागतिकीकरणाची भीषण किनार आहेच.

विएतनामी आई, भारतीय वडलांचा फ्रेंच मुलगा

चार्ल्स शोभराजची आई विएतनामची होती तर त्याचे वडील भारतीय होते. ६ एप्रिल १९४४ ला जन्मलेल्या त्याचं पूर्ण नाव हतचंद भाओनानी गुरुमुख चार्ल्स शोभराज. त्याची विएतनामी आई त्याच्या भारतीय वडलांपासून वेगळी राहिली होती कारण दोघांनी कधीही लग्न केलं नव्हतं. म्हणूनच चार्ल्सच्या भारतीय वडलांनी त्याला कधीही दत्तक घेतलं नाही.

शोभराजच्या आईने नंतर विएतनाममधे तैनात असलेल्या फ्रेंच सैनिकाशी लग्न केलं आणि ते पॅरिसला गेले. फ्रेंच सैनिकाने चार्ल्सला दत्तक घेऊन त्याला फ्रेंच नागरिकत्व दिलं. पण, एकंदरितच भावनिकदृष्ट्या उध्वस्त अशा वातावरणात त्याचं बालपण गेलं. दुसरीकडे युद्धाची पार्श्वभूमी होतीच. त्यामुळे एकीकडे युद्ध आणि दुसरीकडे कौटुंबिक तुटलेपण यामुळे चार्ल्सच्या मनावर भयंकर परिणाम होत गेले.

गुन्हेगारी मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या अनेकांनी त्याच्या विकृतीचा अभ्यास केला आहे. त्यातील काहींचं म्हणणं असं आहे की, चार्ल्स शोभराज आपल्या भारतीय वडलांचा प्रचंड तिरस्कार करतो. केवळ त्यांच्या बदनामीसाठी त्यानं गुन्हेगारीचा मार्ग निवडला असू शकतो. त्याच्या द्वेषाचा परिणाम एवढा होता की, त्यानं आपल्या तावडीत अडकलेल्या बहुतेक सुंदर मुलींना ठार करुन टाकलं.

हेही वाचा: १५० वर्षांपूर्वी २०० शोध लावणारे, भारताचे एडिसन शंकर आबाजी भिसे

पोरींनांच काय पोलिसांनाही गुंडाळलं

डोक्यावर सनकॅप, उंची गॉगल, उंची कपडे आणि रुबाबदार पर्सनॅलिटी... तोंडात हायफंडू इंग्लिश आणि त्यापेक्षाही डेंजर असलेला त्याचा अॅट्यिट्यूड… मौजमजा करायला आलेल्या पोरींना तर त्यानं गंडवलंच पण पोलिसांनाही त्यांन कित्येक वेळा उल्लू बनवलंय. तेही एका देशाच्या नाही तर जगभरातल्या अनेक देशांच्या.

एक वेळ अशी होती की, चार्ल्सच्या मागावर भारत, नेपाळ, म्यानमार, थायलंड, फ्रान्स, इराण, ग्रीस, तुर्कस्तान यासह किमान नऊ देशांचे पोलिस लागले होते. एवढंच नाही त्याने तब्बल चार देशांमधे शिक्षा भोगलीय. आज त्याचं वय ७८ झालं आहे. १९७६ ते १९९७ या काळात त्याला भारतातल्या जेलमधेही ठेवण्यात आलं होतं.

शिक्षा पूर्ण झाल्यावर तो फ्रान्सला गेला. त्या नंतर नेपाळ दौऱ्यावर असताना त्याला पुन्हा अटक झाली आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. १९ वर्ष नेपाळमधे जन्मठेपेची शिक्षा भोगून त्याला फ्रान्समधे पाठवण्यात आलंय. फ्रान्सला जातानाही त्यानं खूप काही सांगितलंय. पाकिस्तानशी असलेल्या संबंधांबद्दल आणि काठमांडूत झालेल्या विमान हायजॅकिंगच्या वेळच्या त्याच्या भूमिकेबद्दल त्यांनी कबुली दिली.

चार्ल्स शोभराजची मोडस ऑपरेंडी

एखाद्या गुन्हेगाराची मोडस ओपरेंडी म्हणजे त्याच्या कृरकर्म करण्याची पद्धती गुन्हेविश्वात फार महत्त्वाची मानली जाते. परदेशी पर्यटक हे चार्ल्सचं मुख्य टार्गेट असायचं. स्वतःच्या पर्सनॅलिटीची आणि बोलण्याची छाप परदेशी तरुणींवर पाडून त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचा. आपली भूक भागवत नंतर त्यांचा खून करायचा. ज्या मुलींचे खून त्याने केले त्यांच्या मृतदेहावर फक्त बिकिनी होती. त्यामुळेच त्याला बिकिनी किलर म्हणतात.

सत्तरच्या दशकात शोभराजने बऱ्याच थायलंड, नेपाळ आणि भारतातल्या पर्यटकांची हत्या केली. सुरवातीला मैत्री करणं, त्यांना ड्रग्ज देणं, त्यानंतर त्यांची हत्या करणं आणि त्यांच्या मृतदेहाची क्रुरपणे विल्हेवाट लावणं, यात तो माहीर होता. दिल्लीतल्या अशोका हॉटेलमधे त्याने मोठी चोरी केली होती. तो मुंबईत एअर इंडियांच्या कार्यालयावर दरोडा टाकून मोठी रक्कम पळवणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

शोभराज ताज हॉटेलमधे उतरल्याची पक्की खबर पोलिसांकडे होती. खबऱ्याला सोबत घेऊन पोलिसांनी तीन दिवस हॉटेलवर पाळत ठेवली. ११ नोव्हेंबर १९७१ च्या संध्याकाळी तो सुटाबुटात आला. खबऱ्याने त्याला ओळखलं. काही कळायच्या आत त्याला अटक करण्यात आली आणि त्याच्याकडचं रिवाॅल्वर ताब्यात घेण्यात आलं. ही कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव होतं, इन्स्पेक्टर मधुकर झेंडे.

हेही वाचा: गडाफी जिवंत असता तर जग आणखी चांगलं झालं असतं?

मराठमोळ्या झेंडेंचा पोलिसी खाक्या

मुंबईत झालेल्या अटकेनंतर त्याला दिल्लीला नेलं. पण त्याने तब्येत बिघडल्याचं सोंग केलं आणि त्याला दवाखान्यात नेण्यात आलं. त्यावेळी भारत-पाक युद्ध सुरू झालं असल्याने देशात ब्लॅक आऊट करण्यात यायचं. त्याचा फायदा घेऊन तो फरार झाला. त्यानंतरही त्याचे कारनामे सुरू होतेच. मुंबईच्या ताज हॉटेलमधेही त्याने एका परदेशी जोडप्याचा खून केला.

दिल्ली पोलिसांनी त्याला नंतर १९७६ मधे अटक केली. तिहार जेलमधे त्याला ठेवण्यात आलं. तिथं त्याने तिथल्या कैद्यांना, पोलिसांना एवढंच काय तर जेलरलाही आपल्या गप्पांच्या फडात सामील करून घेतलं. त्याचा फायदा घेऊन त्यानं १६ मार्च १९८६ला वाढदिवसाचं निमित्त करून सर्वांना मिठाई खायला घातली. मिठाई खाऊन सगळेजण गुंगीत गेले. त्याचा फायदा घेऊन तो आणि त्याचे साथीदार यांनी पोबारा काढला.

त्याला शोधण्यासाठी पुन्हा मधुकर झेंडे यांना बोलावण्यात आलं. त्यांना तो गोव्यात पळाल्याची खबर मिळाली. गोव्यात 'ओ कोक्यूरो' हॉटेलमधे त्यांनी सापळा लावला. ६ एप्रिल १९८६ला सायंकाळी एक फियाटमधून दोघेजण या हॉटेलमधे आले. त्यातल्या एकाच्या डोक्यावर सनकॅप होती. त्याला बघून झेंडेंनी त्याला ओळखलं आणि पुन्हा एकदा जेरबंद केलं.

पळून जाण्यात वस्तात असलेल्या शोभराजचे हातपाय हॉटेलमधून दोरी घेऊन बांधले. तो पळून जाऊ नये म्हणून त्याला अक्षरशः पोलिस गाडीत आडवा झोपवून मुंबईत आणलं. गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर झेंडे यांच्यासह पोलीसांचं पनवेलमधे जंगी स्वागत करण्यात आलं.  त्यांनी केलेल्या कतृत्त्वाचं आणि त्यांच्या धाडसाचं कौतुक म्हणून नंतर 'ओ कोक्यूरो' हॉटेलनं त्यांच्या सन्मानार्थ 'झेंडे प्लेटर' नावाची डिश सुरू केली. आजही ती डिश त्या हॉटेलमधे मिळते.

आता पुढे काय?

चार्ल्स शोभराज तब्बल १९ वर्षांच्या नेपाळमधल्या तुरुंगवासानंतर तुरुंगातून बाहेर आला. तसंच नेपाळ सरकारनं त्याला थेट फ्रान्सकडे रवाना केलं. विमानात बसण्यापूर्वी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. यामधे त्याचं पाकिस्तान कनेक्शन समोर आलंय.

तो या मुलाखतीत म्हणालाय, १९९९ मधे भारताचं विमान अपहरण करण्यात आलं. त्यावेळी अनेक प्रवाशांना ओलीस ठेवलं गेलं होतं त्यावेळी मसूद अझहरची सुटका झाली. त्यावेळी जसवंत सिंह हे माझ्या संपर्कात होते. सगळ्यात आधी त्यांनीच मला पॅरीसला भेटण्यासाठी एक माणूस पाठवला. त्या व्यक्तीशी भेट झाल्यानंतर मी जसवंत सिंह यांच्याशीही बोललो.

मी हरकत उल अन्सार या मसूदच्या पक्षातल्या लोकांशी संपर्क साधला. त्यांनी ओलीस ठेवलेल्या प्रवाशांना सोडण्यास नकार दिला. मात्र पुढचे ११ दिवस एकाही ओलीस प्रवाशाला कुठल्याही प्रकारची इजा आम्ही करणार नाही असं आश्वासन मी त्यांच्याकडून मिळवलं असंही चार्ल्स शोभराजने मुलाखती सांगितलं.

आपल्या या कुकृत्यांच्या कहाण्या पत्रकारांना आणि सिनेलेखकांना सांगून शोभराजने खूप पैसा कमावलाय. भारतातून सुटला त्यावेळीच तो अर्धा तास मुलाखत देण्यासाठी दहा हजार डॉलर घेत असे. त्यामुळे तो आता म्हातारपणाचं आयुष्य जगणार की आणखी काही उद्योग करणार, हे त्याचं त्यालाच माहीत. पण जगाच्या भल्यामोठ्या कॅनवासवर ही गोष्ट कायमच भयकथा म्हणून उरणार, एवढं मात्र नक्की.

हेही वाचा: 

'बर्ड फ्लू'से डरने का नय!

ब्रेन ड्रेनपेक्षा विघातक आहे वेल्थ ड्रेन!

पाकिस्तानातल्या अस्थिरतेचं कारण काय?

शपथ घेतल्यानंतरही सोपा नसेल जो बायडन यांचा प्रवास