कंप्युटर सिस्टीम तयार करणं हे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचं काम. या सिस्टीममधल्या वायरसची खडानखडा माहिती असणाऱ्या गेट्स यांना कोरोनाची चाहूल मात्र ५ वर्षांपूर्वीच लागली होती. जगाला वायरसशी दोन हात करावे लागतील, असा इशारा दिला होता. इतकंच नाही, तर अशा वायरसशी दोन हात कसं करायचं हेदेखील त्यांनी सांगून ठेवलं.
कोरोनामुळं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या मोठ्या अडचणीत सापडलेत. वेगवेगळी कारणं सांगून ते अडचणीतून पळवाट काढताहेत. पत्रकार परिषदेत तर त्यांची तारांबळच उडते. मग ते पत्रकारांवरच तू फेक न्यूज देतो असे आरोप करू लागतात. कोरोनासारख्या भयानक वायरसचा अंदाज आतापर्यंत कुणीही लावलेला नव्हता, असं सांगत ट्रम्प स्वतःला वाचवण्याचा प्रयत्नही करतात. ट्रम्प हे वायरसाचा कुणीच अंदाज लावला नाही, असं सांगताहेत तर आपल्याकडे धर्मग्रंथांमधे अगोदरच हे सांगून ठेवल्याचा दावा केला जातोय. ज्ञानेश्वर महाराज, रामदास स्वामी यांनी असा वायरस येईल, असं सांगितल्याच्या बातम्या फिरत होत्या. त्या खोट्या असल्याचं जाणकारांनी वेळीच सिद्धही केलंय.
आपण माणसं फार फार तर कम्प्युटरमधल्या वायरसचा अंदाज लावू शकू. पण माणसांना मारणाऱ्या एखाद्या छोट्या पेशीचा, वायरसचा अंदाज कसा लावणार? त्यामुळे असली भविष्यवाणी कधी कुणीही करू शकलेलं नाही, असंच सगळ्यांना वाटेल. पण गंमत म्हणजे, कम्प्युटरमधला वायरस शोधणाऱ्याच एका प्रसिद्ध सेलिब्रिटीनं कोरोनासारख्या वायरसचा अंदाज ५ वर्षांपूर्वीच लावल्याचं समोर आलंय. आणि ही व्यक्ती म्हणजे तर मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स.
टेड ही अमेरिकेतलीच एक मीडिया संस्था आहे. या संस्थेद्वारे एखाद्या मोठ्या व्यक्तिला बोलावून त्याचं भाषण आयोजित केलं जातं. या भाषणाचं शुटींगही होतं. आणि ते सगळ्या जगाला पाहता यावं म्हणून युट्यूबवर मोफत उपलब्ध करून दिलं जातं. त्यालाच टेड टॉक असं म्हणतात. याच टेड टॉकवर ३ एप्रिल २०१५ मधे बिल गेट्स यांचं भाषण शूट करून अपलोड करण्यात आलं होतं.
जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत बिल गेट्स यांचं नाव घेतलं जातं. १९७५ मधे त्यांनी शुन्यातून मायक्रोसॉफ्ट ही कंपनी उभी केली. आज प्रत्येक कम्प्युटरमधे ही सिस्टीम वापरली जाते. एवढंच नाही तर बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन या आपल्या संस्थेच्या माध्यमातून बिल गेट्स यांनी खूप मोठं समाजकार्यही उभं केलंय.
कोरोनाचा प्रसार वाढल्यानंतर टेड टॉक्सवरचा बिल गेट्स यांचा 'द नेक्स्ट आऊटब्रेक? वुई आर नॉट रेडी' हा वीडियो प्रचंड वायरल होऊ लागला. आता पुढचा जागतिक महारोग कसा असेल आणि आपण त्याचा सामना करण्यासाठी कसं तयार नाही, हे बिल गेट्स यांनी या वीडियोमधे सांगितलंय. आठ मिनिटांच्या या वीडिओत त्यांनी चक्क कोरोना सदृश्य साथीच्या आजाराचा तंतोतंत अंदाज वर्तवला होता.
हेही वाचा : कोरोनाशी धर्माचा संबंध लावणाऱ्यांचं काय करायचं बरं?
आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगून बिल गेट्स यांनी या वीडियोची सुरवात केली. बिल गेट्स यांचा जन्म १९५५ चा. त्यावेळी जगावर अणूयुद्धाचं सावट होतं. म्हणून प्रत्येकांच्या तळघरात धान्याने आणि पाण्याने भरलेला एक कॅन असायचा. पुढेमागे आपत्ती आली तर जगण्यासाठी ही तरतूद केलेली असायची. बिल गेट्स सांगतात, हे धोक्याचं स्वरूप आता बदललंय. सध्या जगाला खरा धोका हा अण्वस्त्रांपासून नाही तर वायरसमुळे होणाऱ्या महारोगापासून आहे.
अण्वस्त्र हल्ल्याने एकाचवेळी कोट्यवधी लोकांचा जीव जातो. अशाच प्रकारे एकाचवेळी कोट्यवधी लोकांचा जीव घेणारी अण्वस्त्राव्यतिरिक्त कुठली गोष्ट भविष्यात आलीच तर ती नक्कीच वायरस असेल, असं बिल गेट्स यांनी म्हटलंय. अणुयुद्धाचा धोका लक्षात घेऊन सगळेच देश अण्वस्त्र सज्जतेसाठी मोठी आर्थिक गुंतवणूक करतायत. पण वायरससारखा महारोग थांबवण्यासाठी अगदीच अल्प गुंतवणूक केली जातेय, असंही ते म्हणतात.
२०१४ मधे आफ्रिकेत आलेल्या इबोलाच्या साथीचं उदाहरण त्यांनी दिलं. आपल्याकडे अशा प्रकारच्या जागतिक साथीचा सामना करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. प्रशिक्षित मनुष्यबळ नाही, सुसज्ज अशी वैद्यकीय टीमही नाही. त्यामुळेच आपल्याला इबोलाच्या संकटावर मात करायला खूप वेळ लागला. याविरोधात आपण लवकर सज्ज झालो नाही तर यापेक्षाही भयंकर जागतिक साथ येण्याची शक्यता आहे, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला होता.
नशीबानं इबोलाचा प्रसार पश्चिम आफ्रिकेतल्या फक्त तीनेक देशांपुरताच मर्यादित राहिला. तरीही त्यावर मात करायला आपल्याला भरपूर वेळ लागला. हे तीन देश सोडून इबोलाचा प्रसार जगभर का होऊ शकला नाही, याची तीन कारणं बिल गेट्स देतात. पहिलं म्हणजे आरोग्य क्षेत्रातल्या अधिकारी, कर्मचारी यांनी उल्लेखनीय काम केल्यानं हा प्रसार लवकर थांबू शकला.
दुसरं कारण म्हणजे इबोला वायरसचं स्वरूप. इबोला हवेतून पसरत नाही. तसंच त्याची एखाद्याला लागण झाली तर तो रुग्ण अंथरुणाला खिळतो. बाहेर फिरू शकत नाही. त्यामुळे त्याचा बाहेर प्रसार झाला नाही.
इबोला मोठ्या शहरांपर्यंत पोचलाच नाही. हे त्याचा जगभर प्रसार न होण्याचं तिसरं कारण. फक्त जगाचं नशीब बलवत्तर होतं म्हणून इबोलापासून आपण वाचलो, असं बिल गेट्स म्हणतात.
इबोलाचा प्रसार शहरांत झाला असता तर मोठी जीवित हानी झाली असती. पण आता आपण इबोलापासून वाचलो तरी पुढच्या वेळी कदाचित नशीब आपल्याला साथ देणार नाही, असंही गेट्स म्हणाले. कारण अशा वायरसची लागण झालेले लोक सहजपणे समाजात वावरतील, विमानाने प्रवास करतील आणि मार्केटमधे खरेदीही करतील. त्यामुळे त्याचा प्रसार सहजरीत्या आणि जलदपणे होऊ शकेल. त्यामुळे तो आटोक्यात आणणं अवघड ठरेल. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे विधान तंतोतंत खरं ठरलंय.
हे कोरोना स्पेशल लेखही वाचा :
कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोत
एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?
कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया
विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, मुंबईची पत्रकार सांगतेय स्वानुभव
जय शेंडुरे: कोरोना आणि ट्रम्प प्रशासनाला पुरुन उरणारा रांगडा कोल्हापूरकर
कॉंटेजियन या हॉलिवूडमधल्या सिनेमातही वायरसमुळे सगळ्या जगात एका महारोगाचा प्रसार होत असतो, असं दाखवण्यात आलंय. सिनेमात, हे संकट रोखण्यासाठी शास्त्रज्ञांचा एक गट तयार असतो. हे शास्त्रज्ञ पटापट पावलं उचलतात आणि जगाला वाचवतात. पण अर्थात हा सिनेमा आहे. प्रत्यक्षात असे देवदूत असणं अशक्य आहे, असं बिल गेट्स यांचं म्हणणं आहे.
भविष्यात जागतिक साथीचा सामना करायची सध्या तरी कोणतीही तयारी आपण केलेली नाही. यासाठी हजारो वैद्यकीय कर्मचारी आणि प्रशिक्षित स्वयंसेवकांची आवश्यकता आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्लूएचओ आपल्या मदतीला येईल. पण असे साथरोग नियंत्रित करण्यासाठी डब्लूएचओ फार फार तर निधी पुरवू शकते. पण त्याचा सामना करू शकेल अशी व्यवस्था उभी करू शकत नाही. ती आपल्यालाच बनवायची आहे.
१९१८ मधे जगभर पसरलेल्या स्पॅनिश फ्लूचा दाखलाही बिल गेट्स यांनी दिला. ते म्हणतात, या फ्लूची कोट्यवधी लोकांना लागण झाली. अनेकांचा मृत्यूही झाला. भूतकाळातल्या अशा उदाहरणावरून काहीतरी शिकण्याची आवश्यकता आहे. असं पुन्हा होऊ द्यायचं नसेल तर आधुनिक व्यवस्था उभारणं आवश्यक आहे.
अत्याधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून सॅटेलाईट, मोबाईल आणि बायोटेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टींना जागतिक आरोग्य व्यवस्थेत फिट बसवावं लागेल. यासाठी बिल गेट्स नाटोचा अर्थात नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन या लष्करी गटाच्या व्यवस्थेचा दाखला देतात. नाटोमधे पूर्णवेळ युनिट आणि राखीव युनिट असे वेगवेगळे गट आहेत.
नाटोचं एक मोबाईल युनिटदेखील आहे. त्याद्वारे कुठंही तात्काळ हालचाल केली जाऊ शकते. कर्मचाऱ्यांना सातत्याने वॉर गेम्सचं प्रशिक्षण दिलं जातं. रेडिओ फ्रिक्वेन्सी, लॉजिस्टिक्स अशा अनेक प्रकारच्या गोष्टींसाठी सातत्याने तयारी करून घेतली जाते. भविष्यातल्या जागतिक साथीचा सामना करण्यासाठी अशीच एक सुसज्य जागतिक आरोग्य व्यवस्था असावी, अशी अपेक्षा बिल गेट्स यांनी या वीडियोत केली होती.
हेही वाचा : लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं होतंय जगभर कौतूक
भविष्यातलं अशा प्रकारचं आव्हान पेलण्यासाठी बिल गेट्स यांनी एक पाच सुत्री कार्यक्रमच आपल्या हातात दिलाय.
१) गरीब देशांत अत्याधुनिक आणि बळकट आरोग्यव्यवस्था निर्माण करावी. गरिबीमुळे निर्माण झालेल्या वेगवेगळ्या समस्यांमुळे अशा देशांत जागतिक साथीचा प्रसार झटकन होण्याची शक्यता जास्त असते.
२) वैद्यकीय तज्ञांचा सहभाग असणाऱ्या मेडिकल रिझर्व कॉर्पसची गरज आपल्याला आहे. त्याद्वारे प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती केली जाऊ शकेल.
३) वैद्यकीय आणि लष्करी तज्ञांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचंय. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अपेक्षित ठिकाणी सहज आणि सुरक्षित स्थलांतरित करता येणं शक्य होईल.
४) जर्म गेम्स सारखे प्रकार. लष्करात वॉर गेम्ससारखे कार्यक्रम होतात. त्याप्रमाणे आरोग्य व्यवस्थेनं महारोगाशी लढण्यासाठी जर्म गेम्स आयोजित करावेत. याने आपली तयारी नेमकी किती आहे हेही समजेल.
५) वेगवेगळ्या लसी आणि आजार निदान क्षेत्रात संशोधन आणि विकासाची गरज असल्याचं गेट्स यांनी स्पष्ट केलंय. अशा प्रकारची तयारी ही आपली प्राथमिकता असायला हवी. असं केलं तरच जग अधिक सुरक्षित राहील, असं ते म्हणतात.
‘इबोलामुळे जवळपास दहा हजार लोकांचा बळी गेला. पण त्याला घाबरून जायचं कारण नाही. तर इबोलाच्या अनुभवापासून आपण काहीतरी शिकणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला भविष्यातल्या रोगांची धोक्याची घंटा समजली आहे आणि अशा तयारीसाठी इबोला हा जगासाठी एक वेक अप कॉल आहे. यासाठी किती पैसे लागतील हे माहीत नाही. पण अशा महामारीपासून जेवढं नुकसान होण्याची शक्यता आहे त्या तुलनेत हा खर्च अल्प आहे.’ कोरोनामुळे जगातल्या भल्या भल्या अर्थव्यवस्था डबघाईला आल्या.या पार्श्वभूमीवर बिल गेट्स यांचं त्यावेळचं मत किती अचूक होतं हे लक्षात येतं.
बिल गेट्स यांच्या मते, मानवाला इतर कोणत्याही संकटाच्या तुलनेत वायरसचा धोका सर्वाधिक आहे. आपण अजूनही त्याविरोधात लढण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज झालो नाही. सर्व देशांनी आंतरराष्ट्रीय समन्वय साधून जागतिक स्तरावर एक आरोग्य व्यवस्था उभारणं अत्यावश्यक आहे. त्यामधे मोठी गुंतवणूक करणं अपेक्षित आहे. यासाठी गेट्स सातत्याने, संधी मिळेल तेव्हा जगाला सावध करतात. कोरोना संदर्भातही त्यांचं हेच मत आहे.
वीडिओच्या शेवटी ते म्हणतात की, भविष्यातल्या महारोगाशी लढण्यासाठी आपल्याला लगेच तयारीला लागावं लागेल. कारण वेळ आपल्या बाजूने नाही. आता लगेच तयारी सुरू केली तरच या संकटाला आपण यशस्वीपणे तोंड देऊ शकू. विंडोज ९५ मधील वायरसची माहिती असणाऱ्या या व्यक्तीला माणसाच्या आत घुसणाऱ्या आणि सिस्टीम बिघडवणाऱ्या वायरसबद्दलही अचूक माहिती होती, हे विशेषच म्हणायला हवं.
हेही वाचा :
कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?
तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
कोरोनाः जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केल्याने काय होणार
कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!
भारत कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजमधे गेलाय, म्हणजे धोका किती वाढलाय?