नव्वदच्या दशकात मुलींची रोल मॉडेल असलेल्या महाराणी गायत्री देवी यांचा २३ मे म्हणजे आज जन्मदिन. त्या रॉयल होत्या पण तेवढ्याच त्या सर्वसामान्य जनतेच्याही होत्या. त्या सौंदर्यवती होत्या, त्या ट्रेंड सेटर होत्या. रॉयलनेसमधेही त्यांनी समाजकार्यात स्वत:ला झोकून दिलं, राजकारणात उतरल्या. बऱ्याच जणांनी राजकीय खेळी खेळून त्यांना उद्भवस्त करण्याचा प्रयत्न केला. पण त्या कशालाच बळी पडल्या नाहीत.
जगातली सगळ्यात सुंदर महाराणी म्हणून ओळखली जाणारी जयपूरची महाराणी अर्थात महाराणी गायत्री देवी. फॅशन आणि ब्युटी इंडस्ट्रीतल्या नावाजलेल्या वोग मॅगझिनच्या जगातल्या सगळ्यात सुंदर १० महिलांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. या मॅगझिनने त्यांचा फॅशन आयकॉन म्हणूनही गौरव केला होता. अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी हेसुद्धा देवींच्या सुंदरतेचे दिवाणे होते.
अशा सुंदरतेची मूर्ती असलेल्या गायत्री देवींचा आजच्याच दिवशी २३ मे १९१९ ला बिहारमधल्या कुंछ इथे जन्म झाला. त्यांचे वडील पश्चिम बंगाल प्रांताचे महाराजा जितेंद्र नारायण तर आई बडोदा प्रांताचे महाराजा सयाजीराव गायकवाड तीन यांची राजकन्या इंदिरा राजे. गायत्री देवींचं सुरवातीचं शिक्षण लंडनच्या ग्लेंडोवर प्रिपरेशन स्कूल या मुलींच्या शाळेत झालं. नंतर रवीद्रनाथ टागोरांनी सुरू केलेल्या शांतिनिकेतन शाळेत शिकल्या. तिथे त्यांच्याबरोबर इंदिरा गांधीसुद्धा शिकत होत्या. पुढे त्यांनी लंडनमधून सचिवालय कौशल्यातलं शिक्षण घेतलं.
गायत्री देवी खूप चांगल्या घोडेस्वार होत्या. तसंच त्या एक मास्टर पोलो प्लेयरसुद्धा होत्या. नेमबाजीतही अचूक असल्यामुळे पुढे त्या पिस्तुल चालवण्यातही माहीर झाल्या. मग त्या शिकारीला जाणंही एन्जॉय करू लागल्या. त्याकाळात कोणत्याच स्तरातल्या स्त्रियांना स्वांतत्र्य नसताना गायत्री देवी मात्र बिनधास्त आणि बोल्ड होत्या.
त्यांना सो कॉल्ड पुरुषी आवडींनुसार कार खूप आवडत होत्या. भारतात पहिली मर्सिडीज बेन्झ डब्ल्यू १२६ आणण्याचं श्रेय त्यांनाच जातं. तसंच त्यांच्याकडे बऱ्याच रॉल रायसेस कार आणि एअर क्राफ्टही होते. या सगळ्याबरोबर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा पोशाख परीधान करण्याच्याही शौकीन होत्या. सध्या आपण साडी नेसण्याचे वेगवेगळे प्रकार बघतो. पण त्या काळात बेलबॉटमवर साडी नेसून त्यांनी आपली स्टाईल स्टेटमेंट बनवली. त्यांची स्टाईल कधीच क्वर्की नसून एलिगंट होती. त्या स्टायलिंगच्या खऱ्या ट्रेंडसेटर होत्या.
हेही वाचा: ९am: काय आहेत मतदानाच्या पहिल्या धारेचे अपडेट?
देवी १२ वर्षांच्या होत्या तेव्हा जयपूरचे महाराजा सर सवाई मान सिंह दुसरा हे पोलो खेळण्यासाठी कोलकात्यात आले. त्यावेळी राजा मान सिंह २१ वर्षांचे होते आणि त्यांची दोन लग्नं झाली होती. तेसुद्धा पोलो प्लेयर होते. या कॉमन इंटरेस्टमुळे दोघांमधे जवळीक झाली. पुढे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांचे ६ वर्षं प्रेमसंबंध होते. जे त्यांनी घरच्यांपासून लपवून ठेवले होते. त्यांनी लंडनमधे देवींना प्रपोज केलं, त्या हो म्हणाल्या. पण दोघांच्या घरचे लग्नाला तयार नव्हते.
शेवटी दोघांनी घरच्यांना समजावून लग्न केलं. पण देवींच्या आई वडलांना भीती होती की, उच्च शिक्षित, बोल्ड आणि मॉडर्न मुलीला पडद्याच्या आत बसावं लागेल. पण असं काहीच झालं नाही. म्हणजे गायत्री देवींचं लग्न झालं. त्यांनी जयपूर घराण्याच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या. पण त्यांनी परदा परंपरा मात्र स्वीकारली नाही. त्या मुक्त राहिल्या. ही अशक्य वाटणारी गोष्ट त्यांनी तेव्हा शक्य करून दाखवली.
हेही वाचा: इस्रायलला घडवणाऱ्या आयर्न लेडी गोल्डा मेयर
देवींनी आपल्या रॉयल्टीचा फायदा घेत सामाजिक कार्य केलं. १९४३ मधे त्यांनी मुलींसाठी शाळा काढली. जयपूरच्या कट्टर परंपरावादी वातावरणात त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेलं काम खूप मोठं आहे. त्यांनी ४० विद्यार्थिनींसह पहिला वर्ग सुरु केला. पुढे १९४७ देश स्वातंत्र्य झाल्यानंतर अनेक संस्थानं भारतात विलीन झाली. आणि करारानुसार सर्व संस्थानांना सरकारकडून वर्षाला मानधन आणि सवलती दिल्या जात होत्या.
त्यावेळी अनेक संस्थानं आणि राजांनी वेगवेगळे उद्योगधंदे सुरु केले. गायत्री देवी मात्र सी. राजगोपालाचारी यांची स्वतंत्र पार्टी जॉईन करून राजकारणात उतरल्या. त्या पार्टीमधे खूप एक्टीव होत्या. पुढे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचं ठरवलं. १९६२ मधे त्यांनी कॉंग्रेसच्या विरोधात पहिली निवडणूक लढली. त्यावेळी त्यांनी २ लाख ४६ हजार ५१६ पैकी १ लाख ९२ हजार ९०९ मतं पडली. आणि एवढ्या मोठ्या मताधिक्यानं निवडणूक जिंकण्याचा जागतिक विक्रम केला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमधे त्यांचा हा रेकॉर्ड नोंदवला गेला.
पुढच्या दोन्ही निवडणुकांत त्यांना यश आलं. पण यादरम्यान त्यांच्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ उतार आले. त्यांच्या कुटुंबाला मिळणाऱ्या सवलती सरकारने काढून घेतल्या. आणि सर्व संस्थांनासोबत केलेला करार इंदिरा गांधी यांनी काढून टाकला. त्यामुळे त्यांचे नातेवाईक परदेशी जाऊ लागले. त्यानंतर लगेच त्यांच्या नवऱ्याचा म्हणजे राजा मान सिंह यांचा मृत्यू झाला. आणि त्या राजमाता बनल्या. जयपूरमधले लोक त्यांची आजही आठवण काढताना राजमाताच म्हणतात.
हेही वाचा: भारताच्या शास्त्रीय योगचं रुपांतर मॉडर्न योगात करणाऱ्या इंद्रा देवी
या धक्क्यातून सावरत त्या जिद्दीने उभ्या राहिल्या. आणि लोकांसाठी आणखी काम करण्याच्या उद्दीष्टाने त्यांनी पुन्हा निवडणुक लढली आणि त्या जिंकल्या. पण इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळात त्यांच्यावर कर उल्लंघन केल्याचा खोटा आरोप केला तसंच आणखी काही किरकोळ आरोप करून त्यांना आणि त्यांच्या मुलाला तुरुंगात डांबलं. त्यांनी ५ महिने तुरुंगवास भोगला. तुरुंगात टॉर्चर सहन करावं लागल्याने पॅरोल बाहेर आल्यानंतर देवींना हॉस्पिटलाइज करावं लागलं.
आणीबाणीनंतर लगेचच निवडणुका जाहीर झाल्या. मात्र त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. पण त्या या राजकीय खेळीने खचल्या नाहीत. त्यांनी स्वत:साठी, स्वत:च्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जगण्याचं ठरवलं. त्या शिक्षण आणि खेळाच्या प्रसाराचं कार्य करत राहिल्या. त्यांनी तुरुंगातल्या गुन्हेगारांच्या चांगल्या भविष्यासाठी, त्यांना शिकावं म्हणून प्रोत्साहन दिलं. त्यांनी तुरुंगातल्या यातना अनुभवल्यावर त्या गुन्हेगारांना माणूस म्हणून जगण्याची जणू काही एक संधीच दिली.
तसंच त्यांनी पोलो खेळणं आणि मॅच बघणं थांबवलं नाही. त्या घोडेस्वारीही करत होत्या. जयपूरमधल्या घराघरांतून परदा पद्धत काढण्यात त्यांनी यश मिळवलं. पुढे २९ जुलै २००९ मधे लंग्ज इन्फेक्शमुळे जयपूरच्या राजमाता म्हणजे गायत्री देवींचा मृत्यू झाला. त्या ब्युटी विद ब्रेन होत्या असं म्हणण्यापेक्षा त्यांचं कार्य हे त्यांच्या ब्युटीपेक्षा मोठं होतं असं म्हणणं योग्य ठरेल.
हेही वाचा: २३ मेला कुणाचं सरकार येईल? वाचा पाच शक्यता