खलील जिब्रान : प्रेमाची देववाणी सांगणारा प्रॉफेट!

०६ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


आज खलील जिब्रान यांची १३७ वी जयंती. इंग्लिश रोमॅन्टीसिझम काळातला एक महत्त्वाचा लेखक आणि कवी म्हणून त्यांच्याकडे पहावं लागेल. त्यांचं 'द प्रॉफेट' हे पुस्तक फार गाजलं. या पुस्तकात प्रेमाविषयी खलील जिब्रान यांनी कविता लिहिली होती. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या या कवितेचा लेखक डॉ. प्रदीप आवटे यांनी केलेला भावानुवाद प्रत्येकाने नक्की वाचावा असा आहे.  

‘त्याचे नाव अल् मुस्तफा.

परमेश्वराला तो विशेष पसंत होता. देवाचा तो अत्यंत लाडका होता, तो आपल्या काळातल्या प्रकाशाचा अग्रदूत होता.

आपल्या जन्मभूमीला परत घेऊन जाणाऱ्या जहाजाची वाट पाहत तो गेली बारा वर्षे ऑरफालीझ या शहरात राहिला होता.

आणि आता बाराव्या वर्षी, कापणीचा हंगाम चालू असताना, ईलूल महिन्याच्या सात तारखेला, शहराबाहेरच्या टेकडीवर तो चढला; आणि त्याने समुद्राकडे पाहिले. तेव्हा त्याला आपले जहाज येत असलेले दिसले.’

खलील जिब्रान यांच्या ‘द प्रोफेट’ अर्थात ‘प्रेषित’ या पुस्तकाची सुरवात या वरच्या ओळींनी होते. आणि पुढे वाचत गेलं की कधीही न विसरता येणारी एक अद्भूत गोष्ट आपल्या हाती लागते. देवाला विशेष पसंत असणारा प्रॉफेट लग्न, स्वातंत्र्य, मैत्री, शिक्षण, सौंदर्य अशा अनेक विषयांवर बोलतो. त्याचं बोलणं नुसतं बोलणं असत नाही. त्याची आपसुक एक कविता होऊन जाते. वेगवेगळ्या विषयांवरच्या अशा २६ कविता 'द प्रॉफट' या पुस्तकात खलील जिब्रान यांनी लिहिल्या आहेत.

हेही वाचा : फुले दांपत्याचं काम फक्त स्त्री शिक्षणापुरतंच आहे?

‘द प्रॉफेट’ म्हणजे देववाणीच!

खलील जिब्रान  यांचा जन्म ६ जानेवारी १८८३ मधला. आज त्यांची १३७ वी जयंती. सिरिया जवळच्या लेबनान या देशात एका मॅरोनाईट ख्रिश्चन कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील टॅक्स कलेक्टर अर्थात कर संकलक म्हणून काम करत. जिब्रान लहान असतानाच त्यांच्या वडलांवर गोळा केलेला कर चोरल्याचा आरोप करण्यात आला. त्या आरोपाखाली त्यांना अटक झाली आणि त्यांची सगळी मालमत्ता जप्त करण्यात आली.

वडलांना अटक झाल्यानंतर जिब्रान यांच्या आईने तिच्या भावासोबत अमेरिकेत जायचा निर्णय घेतला आणि १८९५ मधे जिब्रान आपल्या आईसोबत अमेरिकेत स्थलांतरित झाले. आपल्या मूळ गावी असताना त्यांनी बायबल आणि अरेबिक भाषेचे धडे गिरवले होते. अमेरिकेत आल्यावरही त्यांची अरेबिक भाषेची आवड कमी झाली नाही. त्यांचा सारा कल साहित्य आणि कलेकडे होता. त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली. आपल्या लिखाणानं त्यांना इंग्लिश रोमॅन्टीसिझम काळातला एक महत्वाचा लेखक आणि तत्त्वचिंतक म्हणून ओळख मिळवून दिली.

१९२३ मधे अमेरिकेतच त्यांचं ‘द प्रोफेट’ हे पुस्तक प्रकाशित झालं. एका देवाच्या दूताला परकीय देशात १२ वर्ष काढल्यावर आपलं जहाज येताना दिसतं. तेव्हा तो निरोपाची तयारी सुरू करतो. जहाज किनाऱ्यावर येईपर्यंत काही वेळ असतो. त्या वेळात शहरातले लोक त्याच्याभोवती जमतात आणि त्याला वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी आग्रह करू लागतात, अशी या पुस्तकाची थीम आहे.

शेवटी मृत्यू या विषयावर बोलून हा प्रोफेट शहराचा निरोप घेतो. त्याचं बोलणं म्हणजे देववाणी असते. खलील जिब्रान यांनी या प्रोफेटच्या तोंडून सांगितलेल्या या कविता फार सुंदर आहेत. या पुस्तकातली सर्वात सुंदर आणि गाजलेली कविता कोणती असेल तर ती म्हणजे प्रेमावरची!

एकाच वेळी प्रेमात अध्यात्म, विवेक आणि आंधळी भक्ती दाखवणारी दुसरी कविता आजवर कुणीही लिहिली नसेल. लेखक डॉक्टर प्रदीप आवटे यांनी केलेला जिब्रान यांच्या प्रेम या कवितेचा भावानुवाद इथं देत आहे.

हेही वाचा : इंदिरा संत यांची कविता एकाचवेळी स्वतःशी आणि जगाशी बोलते

प्रेम 

खडकाळ आणि जीवघेण्या चढाचा असतो त्याचा रस्ता
तरीही प्रेम जेव्हा तुला हाक देईल,
तेव्हा तू चालत रहा त्याच्या मागोमाग..
आणि ते जेव्हा पांघरेल त्याचे पंख तुझ्याभोवती
तेव्हा शरण जा त्याला;
जरी त्याच्या पंखात दडवलेल्या तलवारी जखमी करतील तुला…!
विश्वास ठेव त्याच्या प्रत्येक शब्दावर,
जेव्हा ते बोलू लागेल तेव्हा..
जरी..
उत्तरेच्या वा-यानं बागेत नुसता कचरा करुन ठेवावा
तसं त्याच्या नुसत्या आवाजानं विदीर्ण होतील तुझी स्वप्नं..!
कारण
प्रेम जसं ठेवू शकतं मुकुट तुझ्या डोक्यावर,
तसंच ते चढवू शकतं तुला क्रुसावर ..
जसं ते आवश्यक असतं तुझ्या वाढीकरता तसंच तुझ्या छटाईकरता देखील..
प्रेम जसं उभं राहतं उंच तुझ्या इतकं आणि हलकेच गोंजारतं सूर्यप्रकाशात थरथरणा-या तुझ्या फांद्या,
तसंच ते जातं खोलवर तुझ्या मूळापर्यंत आणि
मातीला मिठी मारुन बसलेल्या मुळांना देतं हादरा…!
कुरपाच्या थरासारखं ते तुझा लेप चढवतं स्वतःवर
ते सोलून नागवं करतं तुला
तुझ्या टरफलापासून वेगळं करतं तुला
ते दळत राहतं तुला, शुभ्रता येईस्तोवर
ते निवडत राहत तुला, लवचिकता येईस्तोवर
आणि मग
ते तुला पवित्र अग्नीच्या हवाली करतं,
त्या आभाळीच्या बापाच्या पवित्र मेजवानीतील तू पवित्र ब्रेड व्हावंस म्हणून..!
तुला उमगावं रहस्य तुझ्या हृदयाचं
आणि तू व्हावास एक इवलासा अंश जीवन हृदयाचा;
म्हणून या सगळया गोष्टी प्रेम तुझ्यासाठी करत असतं
पण तू भितीने गारठून
प्रेमाकडून मागू पाहत असशील केवळ
अपार शांतता आणि नितळ समाधान;
तर तू  झाकून घ्यावं आपलं नागवेपण आणि सोडून जावी सोलकाम सुरु असलेली ही भूमी,
हेच अधिक बरं !
या ऋतू हरवलेल्या जगात तू हसशील पण तुझं  संपूर्ण हसू नाहीच उमलणार
रडशीलही तू पण तुझे सगळेच आसू नाही तरळणार तुझ्या डोळयांमध्ये ..!
प्रेम स्वतःशिवाय दुसरं काही देत नाही आणि स्वतःशिवाय दुसरं काही घेतही नाही.
प्रेमाची नसते मालकी कशावरही आणि
प्रेमावरही कुणी सांगू शकत नाही आपली मालकी
कारण प्रेमातच असते प्रेमाची इतिकर्तव्यता..
प्रेमासाठी प्रेमच असतं सारं काही !
तुम्ही जेव्हा प्रेम करता तेव्हा असं म्हणू नका की ,देव माझ्या हृदयात आहे.
खरे तर तुम्ही देवाच्या हृदयात आहात.
आणि तुम्ही ठरवू शकाल प्रेमाचा मार्ग असा विचारही करु नका बिलकुल...
तुम्ही जर वाटलातच योग्य प्रेमाला तर प्रेमच ठरवते तुमचा रस्ता हे लक्षात ठेवा...!
स्वतःचंच चित्र पूर्ण करण्याशिवाय प्रेमाला नसते दुसरी कसलीच इच्छा ..
पण तुम्ही प्रेम करत असाल आणि असतीलच तुमच्या काही इच्छा ..तर त्या इच्छा या असू देत –
वितळावं स्वखुशीनं आणि रात्रीवर मेलडी कोरत झ-यासारखं वाहत रहावं..
उमजून यावी वेदना आत्यंतिक हळवेपणाची
प्रेमाच्या आपल्या समजेपायी व्हावं आपण जखमी
आणि वाहत रहावं रक्त स्वेच्छेने आणि आनंदाने..
 पंख फुटल्या हृदयानं भल्या पहाटे यावी जाग आणि मानावे आभार आपण आणखी एका प्रेममय दिवसासाठी
थकल्याभागल्या दुपार प्रहरी विसावावं क्षणभर आणि आठवावा प्रेमाचा अनिवार आनंद ..
कृतज्ञेतेनं भारुन गाईगुरांसोबत परतावं घरी
आणि अंथरुणावर पाठ टेकताना उमटावी प्रार्थना हृदयस्थ प्रियसाठी
आणि हलकेच ओठांवर यावं कौतुकभरलं गाणं..!

हेही वाचा :

यल्लम्मा देवीची यात्रा अनुभवायलाच हवी अशी आहे

टॉलस्टॉयची बायको मेल्यावर डायरीमुळे झाली जगप्रसिद्ध

ग दि माडगूळकर: भूमिकेला माणूसपण देणारा कलाकार

किती भाषा मारल्या याचीही यूएन मानवाधिकार संस्थेने नोंद करावीः भालचंद्र नेमाडे