सर दोराबजी टाटांनी बायकोचे दागिने विकून टाटा स्टीलला सावरलं!

२७ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


आज मंगळवार, २७ ऑगस्ट. सर दोराबजी टाटा यांचा जन्मदिवस. टाटा कंपनीसाठी दोराबजींनी त्या काळात केलेल्या कामाची गोड फळंही आजही कंपनीला मिळतायत. त्यांनी स्टील कंपनीच्या वाईट काळात आपल्या बायकोचे दागिने विकले. आणि कर्मचाऱ्यांचे पगार दिले. पण कंपनी बंद पडू दिली नाही.

टाटा हे नाव आपण किती अदबीने घेतो. खूपशा मोठमोठ्या कंपन्या या फक्त फायद्याचा विचार करतात तिथे टाटा समाजाचा विचार करतं. एकीकडे भारतीय कंपन्या या एम्प्लॉयी फ्रेंडली नाहीत असा ठपका गेल्या ८ ते १० वर्षांपासून ठेवला जातोय. याला टाटा मात्र अपवादच आहे. याच टाटा कंपनीची सुरवात जमशेदजी टाटांनी १८६८ मधे केली. त्यांच्यानंतर टाटा उद्योगाची धुरा सर दोराबजी टाटा यांच्या खांद्यावर आली.

टाटा स्टीलचं आधीचं नाव काय?

सर दोराबजी टाटा यांचा जन्म आजच्याच दिवशी २७ ऑगस्टला १८५९मधे झाला. त्यांना या कंपनीचं प्रमुखपद वारसा हक्काने मिळालं असलं तरी त्यांनी या संधीचं सोनं केलं. आणि कंपनीला मोठं केलं. खूपदा गंमतीने एक म्हण सांगितली जाते, चपलांमधे बाटा आणि स्टीलमधे टाटा. याच टाटा स्टीलची स्थापना सर दोराबजी यांनी केली.

सर दोराबजी यांनी १९०४ला टाटाच्या प्रमुख पदाची जबाबदारी घेतली. स्टील उद्योग हे जमशेदजींचं स्वप्न होतं. त्यांनी स्टील कंपनीची स्थापना केली होती. पण सर दोराबजींनी १९०७मधे ती कंपनी प्रत्यक्ष सुरू केली. आणि जमशेदरपूरला कारखाना सुरू झाला. त्यावेळी या कंपनीचं नाव टिस्को होतं. म्हणजेच टाटा आयर्न अँड स्टील कंपनी लिमिटेड. या कंपनीला त्यांनी मॉडर्न तंत्रज्ञानाचा वापर करून देशातली मोठी कंपनी बनवण्यासाठी प्रयत्न केले.

हेही वाचा: अँग्री बर्ड्स मोबाईलवरच नाही, तर मोठ्या पडद्यावरही सुपरहिट

दोराबजींनी बायकोचे दागिने गहाण टाकले

टाटा स्टील सुरवातीच्या काळात खूपच वाईट परिस्थितीत होतं. कारण तेव्हा वर्ल्ड वॉर सुरू होतं. १९१९ला वॉर संपल्यानंतर जगात मंदीचं वातावरण पसरलं. त्याचा भारतावरही परिणाम झाला. पण जपानकडून स्टीलला मागणी असल्यामुळे टाटा स्टील व्यवस्थित चालू राहिलं.

जपान हा टाटा स्टीलचा सगळ्यात मोठा ग्राहक. पण १९२३ला जपानमधे भूकंप आला. या भूकंपात साधारण दीड लाख लोक मारले गेले. अशा परिस्थितीत जपानकडून येणारी मागणी बंद झाली. आणि टाटा स्टीलवर संकट कोसळलं.

टाटा स्टीलच्या मागणीत घट झाली. तशी उत्पादनातही घट झाली. कंपनी बंद करावी लागणार अशी वेळ आली. त्या परिस्थितीत सर दोराबजींपुढे कर्मचाऱ्यांचे पगार आणि कंपनीचा इतर खर्च कसा भागवायचा हा प्रश्न होता. तो प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आपल्या बायकोचे दागिने गहाण टाकले. आणि पहिले कर्मचाऱ्यांना पगार दिला. नंतर इतर बँकाकडून कर्ज घेत कंपनी सुरू ठेवली.

टाटा स्टीलच्या यशामागे सर दोराबजी टाटा

सर दोराबजी यांनी कंपनीला पुन्हा उभं करण्यासाठी खूप प्रयत्न केले. आणि त्यातूनच कंपनीची परिस्थिती सुधारू लागली. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणलं. नव्या बाजारपेठांसह, देशातल्या व्यापारावर भर दिला. ब्रिटीश काळातला सगळ्यात मोठा कारखाना बनला, अशी माहिती आपल्याला टाटा स्टील कंपनीच्या वेबसाईटवर सापडते.

खरंतर जेआरडी टाटांच्या काळात टाटा स्टीलचा सुवर्णकाळ सुरू होता. पण सर दोराबजींनी कर्ज काढून, बायकोचे दागिने गहाण टाकून कारखान टिकवला नसता तर कंपनीची गाडी रुळावर आली नसती. आणि कदाचित जेआरडींनासुद्धा टाटा स्टील जगातली मोठी कंपनी बनवता आली नसती. म्हणून आजही टाटा स्टीलच्या यशामागे सर दोराबजी टाटा आणि मग जेआरडींंचं नाव घेतलं जातं, असं टाटा स्टीलच्या २००९ च्या प्रेस रिपोर्टमधे म्हटलंय. त्यावर्षी सर दोराबजींचा १५० वी जयंती होती.

हेही वाचा: सांगली, कोल्हापुरातल्या महापुरापासून आपण काय धडा घेणार?

दोराबजींना सर ही पदवी मिळाली

सर दोराबजींचं लग्न १८९८ला मेहरबाई भाभा यांच्याशी झालं. आणि ते फेमस शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांचे काका झाले. त्यांच्या रिसर्चच्या कामात दोराबजींनी त्यांना आर्थिक मदत केली. तसंच त्यांनी टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटरची स्थापना केली. आणि त्याचं पूर्ण काम डॉ. होमी भाभा यांनी केलं. जे आता इंडियन इन्स्टिट्युट फॉर सायन्स म्हणून ओळखलं जातं.

तसंच सर दोराबजींनी १९११मधे टाटा पॉवर सुरू केलं. जी आज टाटा ग्रुपमधली महत्त्वाची कंपनी आहे. तसंच कापड गिरण्या, ताज हॉटेल, न्यू इंडिया अशोरन्स ही इन्शुरन्स कंपनी त्यांच्या काळातच बनली आणि चाललीसुद्धा. जमशेदपूरला आदर्श शहर बनवण्यात सगळ्यात मोठा वाटा सर दोराबजींचा होता. त्यांनी भारतात ऑलिम्पिक सुरू केलं. त्यांनी भारतीय ऑलिंम्पिक संघाचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं. त्यांचं हेच काम बघून ब्रिटीश राजा एडवर्ड ७ यांनी दोराबजींना सर ही पदवी बहाल केली.

उद्योगपतीसोबतच पत्रकारिताही

महत्त्वाची गोष्ट म्हणजे टाटा कंपनीमधे आपल्या वडलांबरोबर काम सुरू करण्यापूर्वी सर दोराबजी पत्रकार होते. त्यांनी बॉम्बे गॅझेट बातमीपत्रात दोन वर्षं बातमीदारी करत होते. सर दोराबजी हे समाजवादी विचारांचे होते. त्यांनी नेहमीच कर्मचाऱ्यांचा विचार करून कंपनी चालवली. आणि हीच टाटा कंपनीची खरी ओळख आहे.

१९३२मधे ७२व्या सर दोराबजींचा मृत्यू झाला. पण त्यांचं नाव टाटा कंपनीच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरलं गेलंय. तसंच त्यांनी केलेल्या कामाची फळं आजही कंपनीला आणि पर्यायाने देशाला मिळतायत.

हेही वाचा: 

'फँड्री'च्या दानपेटीने गणपती बाप्पा होतो प्रसन्न

राज ठाकरेंच्या ईडी नोटीसमागे घोटाळा आहे की राजकारण?

अमेझॉनच्या जंगलातली आग विझवण्यासाठी ब्राझीलने चक्क मिलिट्री पाठवली