आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना उभारणाऱ्या विठ्ठलराव विखे पाटील यांचा आज ११९ वा जन्मदिवस. महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या सहकारी जगतातील एक कधीही पुसलं न जाणारं सहकारी रामायण त्यांनी रचलं. देशातल्या सहकार चळवळीचा पाया त्यांनी रचला.
विठ्ठलराव विखे पाटील हे महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीतलं एक महत्त्वाचं नाव. सहकार चळवळीतलं त्यांचं योगदान अनन्यसाधारण आहे. कादंबरीकार शिवाजी सावंत यांनी 'विठ्ठल विखे पाटील: मातीचा सच्चा देशभक्त' या पुस्तकात विखे पाटलांच्या कार्याचा आढावा घेतलाय. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक जडणघडणीत योगदान दिलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या योगदानाचा महाराष्ट्र सरकारने पुस्तक रुपाने गौरव केलाय. हे पुस्तक त्यातलंच एक. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्याची ओळख करुन देणारा पुस्तकातला हा संपादित भाग .
विठ्ठलरावांचा जन्म १ जुलै १८९७ ला अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरमधल्या लोणी बुद्रुक इथं झाला. विठ्ठलराव ज्या घराण्यात जन्मले ते विखे पाटील घराणं हे पुण्याजवळच्या जेजुरीकडचं. विठ्ठलरावांच्या आजी राधाबाईं सांगायच्या तसं, विठ्ठलरावांच्या खापर पणजोबांपासून विठोजी हे नाव मुलाला देण्याची प्रथा चालत आली असावी.
विठ्ठलरावांचे वडील एकनाथराव विखे पाटील. एकनाथरावांच्या वडलांच नाव खंडोबा होतं. हे नाव जेजुरीचं प्रसिद्ध देवस्थान खंडेरायाच्या नावानं दिलं असावं. खंडोजीच्या वडलांच नावंही विठोजीचं होतं. आजोबांच स्मरण म्हणून मुलाला नाव ठेवण्याची प्रथा विखे पाटलांच्या घरात असावी. विठ्ठलरावांच्या मुलाच नाव बाळासाहेब पाटील त्यांच मूळ नाव एकनाथ होतं. ते आजोबांच्या स्मरणार्थ ठेवलेलं.
पद्मश्री विखे पाटील यांचे वडील लोणी बुद्रुकचे शेतकरी. ते वारकरी होते. त्यांच्याकडे शेतीही अगदी मोजकीच होती. विठ्ठलरावांच्या आईचं नाव गंगुबाई. त्यांना मायेनं गंगाई म्हणत. त्यांचं कुटुंब खूप मोठं होतं. त्यांना पाच सख्ख्या बहिणी होत्या. या पाच बहिणींच्या मेळ्यात, सहवासात त्यांच बालपण गेलं. शाळेत ते जास्तकाळ रमले नाहीत. जेमतेम चौथी झाले. चौथीतच शाळेतून पारख्या झालेल्या विठ्ठलरावांनी लोणी भोवतीच्या मोकळ्या आभाळाखालच्या निसर्गाला आपली शाळा मानली.
१९ व्या शतकाचं पहिलं दशक. त्या काळात शेतकऱ्यांच्या पिकानं भरलेल्या शिवारांवर मोठ्या प्रमाणात टोळधाडी पडत. लहानपणी पडणाऱ्या या टोळधाडी विठ्ठलरावांच्या बालमनावर परिणाम करुन गेल्या. यावेळी गावकरी आणि मुलंबाळं टोळांची अंडी बावचावडीवर पायली मापट्यानं मोजून घालून त्यासाठी आणे, रुपये घेताना त्यांनी बघितलं होतं. उभं पीक फस्त करणारे टोळ आणि त्याचीच अंडी विकणारी माणसं असा जीवनातला कमालीचा विरोधाभास त्यांना स्पर्शून गेला.
हेही वाचा: वडेट्टीवारांना विरोधी पक्षनेता केलं काँग्रेसनं आणि थँक्स म्हणाले बाळासाहेबांना, कारण
विठ्ठलरावांचं पहिलं लग्न त्यांच्या बालपणीच झालं. त्यांच्या पत्नीच नावं जाईबाई. तर सासरचं पार्वतीबाई ठेवण्यात आलं. त्यांच्या किशोर वयात दोन गावांना फार महत्त्व आलं. एक होतं सायळ आणि दुसरं पुणतांबे. सायळ हे नाथपंथांचे मूळ पुरुष अवधूत दत्तांत्रयांचं ठिकाण होतं. शंकरबाबांचा मठ म्हणून ते प्रसिद्ध होतं. तिथं एक चांगलं टुमदार दत्तमंदीरही होतं.
या साळदला महादूबाबा नावाचे तथाकथित साधू होते. हा बाबा दत्ताचा अवतार आहे असं ते येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनावर ठसवत. याचा परिणाम असा झाला की विठ्ठलरावांनी संसार सोडून संन्यास घ्यावा अशी चर्चा रंगली. त्यांचे परममित्र बाबूराव महाराज जोशी यांनी त्या काळात विठ्ठरावांना नाना गोष्टी सांगून त्यांचं मन थाऱ्यावर आणलं. जवळच्या पुणतांबे या चांगदेव महाराजांच्या गावाची गोडी त्यांच्या मनात उत्पन्न केली. याचा परिणाम म्हणून विठ्ठलराव चांगदेव, ज्ञानोबा यांच्या वारकरी पंथाकडे वळले.
हेही वाचा: जी २० परिषद नेमकी काय आहे? आणि तिथे जाऊन मोदी काय करणार?
१९१८ ला नगरमधे फार मोठा दुष्काळ पडला. त्याचा लाभ उठवत तिथल्या सावकारानं अडाणी आणि नडलेल्या शेतकऱ्यांच्या कित्येक जमिनी खिशात घातल्या. या दुष्काळामुळे नगरी शेतकऱ्यांची झालेली ससेहोलपट प्रत्यक्ष बघताना दत्तभक्त विठ्ठलराव विखे पाटलांचा ऐन तारुण्यातला आत्मा कळवळून गेला. पत हरवलेल्या आर्थिक कुचंबणेच्या दलदलीत फसलेल्या आपल्याच हाडामासांच्या शेतकरी बांधवांसाठी काही तरी केलं पाहिजे हे त्यांना प्रकर्षानं जाणवलं.
महाराष्ट्राच्या म्हणजे तेव्हाच्या मुंबई विभागाच्या सहकारी क्षेत्राच्या आघाडीवर एक लक्षणीय घटना घडली. मुंबईत या दरम्यान सेंट्रल कोऑपरेटिव इन्स्टिट्यूटची स्थापना झाली. पण प्रवासाची आणि वाहतूकीची साधन नव्हती. ज्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा आणि विक्रमी जीवनाचा झेंडा विठ्ठलरावांनी लावला त्या क्षेत्राच्या दृष्टीनेही १९१८ मधे एक पायाभूत घटना घडली. ब्रिटिश सरकारने आपल्या सरकारला उपयोगी पडेल असं एक सहकारी क्षेत्र तयार करण्याचं धोरण समोर ठेवलं. बॉंबे प्रॉविन्शिअल कोऑपरेटिव इन्स्टिट्यूटची म्हणजेच आजच्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची स्थापना झाली. नवी पिढी सहकारात येण्याची शक्यता होती.
हेही वाचा: मोदी सरकारमधले बडे अधिकारी कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामे का देताहेत?
याच काळात विठ्ठलरावांनी आपल्या भक्त मित्रांचं एक पोथीमंडळ सुरू केलं. संध्याकाळी रोजच्या पोथीला वाढीव माणसं जमू लागली. विठ्ठलराव आणि शंकररावांनी एका विचारानं हे सगळं वाढवलं. शेतांवर नव्या विहिरी खोदून घेतल्या. उसाच रान वाढीव धरुन त्याला पाणी द्यायचा सपाटा सुरु केला.
विखे पाटलांच्या लोणीतील शेतात मशागतीच काम मोठा मुलगा शंकर याच्यावर पडलं. कमालीचा कष्टाळू होता. १९१९ ला एके दिवशी शंकरदादा शिवारात गेला, तो घरी परतलाच नाही. श्वासाच्या विकारानं तो शेतावरचं मरणं पावला. त्यांच्या जाण्यानंतर सगळी जबाबदारी विठ्ठलरावांच्या खांद्यावर पडली. तेव्हा त्यांचं वय अवघं २३ वर्षं होतं.
१९२० मधे लोणी बुद्रुकच्या गावची पाटीलकी विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांच्याकडे आली. विठोबाचा आता रीतसर विठ्ठलराव झाला. डूईला साफ धुलाईचा घेरेदार पांढरा पटका, कपाळी गोपीचंदाचा टिळा, गळ्यात माळ, हातोऱ्याची बंडी, त्यावर खिशांचा पांढरा मातकट कोट, खांद्यावर सफेद उपरणं, धोतर, पायी नगरी बाकदार जोडे, हाती नगरी तडाख्याच्या ऊनतिरिपेला वारण्यासाठी छत्री, गावोगावची रपेट साधण्यासाठी विठ्ठलरावांनी एक नामी, गुणवंत आणि चपळ अशी घोडीही खरेदी केली. अत्यंत कौतुकानं तिचं नाव सारंगी ठेवलं.
सारंगी हा विठ्ठलरावांच्या जीवनचरित्रातला एका पर्वाचाच विषय आहे. या इमानदार सारंगीला एखाद्या एकनिष्ठ सेवकासारखं सोबतीला घेऊन विठ्ठलरावांनी पुढं महाराष्ट्राच्या सहकारी जगतातलं एक कधीही पुसलं न जाणारं सहकारी रामायण रचूनही दाखवलं.
हेही वाचा: अधीर रंजन चौधरीः माजी नक्षलवादी ते काँग्रेसचा संसदीय दलाचा नेता
ऐन जवानीत असलेले विठ्ठलराव विखे पाटील छोट्याशा लोणी गावात गावकामगार पाटील म्हणून असंख्य आघाड्यांवर झुंजत होते. गावोगावचे शेतकरी अडाणी होते, कर्जबाजारी होते. ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांची शिवार लहानसहान कारणासाठीसुद्धा सावकार निर्दयपणे भर चौकात लिलावात काढत होते.
भवतीच्या सर्व प्रतिकूल स्थितीत २३ जानेवारी १९२३ मधे 'लोणी बुद्रुक सहकारी पतपेढी' ही संस्था त्यांनी उभारली. अख्ख्या आशिया खंडातली ही पहिलीच सहकारी संस्था होती. आपल्या जिवाचं उडाण घालून त्यांनी हे सहकारी रोप लोणी बुद्रुक या एका खेड्यात शेतकरी मनानं लावलं होतं. पहिल्या पतपेढीचे अध्यक्ष मात्र ते स्वत: झाले नाहीत. ती जबाबादारी त्यांनी दगडू रामचंद्र विखे पाटील यांच्यावर सोपवली. तेही निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते निघाले. विठ्ठलरावांनी स्वत:साठी एक पण केला. कुठल्या म्हणून अधिकाऱ्याच्या खुर्चीवर आपण बसायचं नाही. पण सर्वांना सांभाळून घेईल, असा माणूस त्या खुर्चीवर बसवल्याशिवाय रहायचं नाही.
हेही वाचा: मुंबईचा श्वास असणारी खारफुटीची ५४ हजार झाडं बुलेट ट्रेनसाठी तोडणार
अशातच १९२८ मधे विठ्ठलराव डी.एल.बीच्या निवडणूकीत निवडून आले. त्यांनी गावोगावी उभ्या केलेल्या पतपेढ्या यासाठी त्यांना उपयोगी पडल्या. १० डिसेंबर १९२९ ला विठ्ठलरावांनी राजूरी या छोट्या गावात सहकारी सोसायटी स्थापन केली. एवढंच नाही तर भारतातल्या शेवटच्या टोकावर असलेल्या अकोल्यातल्या चास या गावीही सोसायटी उभी केली. भारतातली अशा प्रकारची ही पहिलीच सोसायटी होती.
१९३० मधेच विठ्ठलरावांच्या सहकारी जीवनयात्रेला दोन अधिक ठळक पायवाटा येऊन मिळाल्या. ते राहूरी तालुका सुपरवायझींग युनिअनचे अध्यक्ष झाले. त्यापूर्वीच ते कोऑपरेटिव इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष होते. या दरम्यान सत्यशोधक चळवळीची मुलूखमैदान तोफ असलेले प्रबोधनकार ठाकरे यांचं ‘शेतकऱ्यांचं स्वराज्य’ पुस्तक प्रकाशित झालं. हे पुस्तक म्हणजे महात्मा फुले यांनी पूर्वी लिहिलेल्या ‘शेतकऱ्यांचा असूड’ या पुस्तकानंतरचं एकमेव नाव घ्यावं असं हे पुस्तक होतं. या दोन्ही पुस्तकांतले विचार महाराष्ट्रभर पसरलेल्या आर्थिक आघाडीवरच्या विचारांना विठ्ठलराव कसून भिडले होते.
हेही वाचा: सुप्रिया सुळेः लढणाऱ्या लेकीची बुलंद कहाणी
आशिया खंडातला पहिला साखर कारखाना महाराष्ट्राच्या मातीत सुरु झाला. १५ मे १९६१ मधे लोणी बुद्रुक इथं तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ह्या कारखान्याचं रीतसर उद्घाटन झालं. पूर्वी भुताचा माळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या साखर कारख्यान्याच्या जागेत प्रचंड संख्येने जनता सहभागी झाली होती. जमलेल्या हजारो शेतकरी स्त्री, पुरुषांच्या कलकलाटानं भुताचा माळ रोमांचून उठला होता.
केवळ अहमदनगर आणि महाराष्ट्रच नाही तर भारतातल्या कृषी क्षेत्राला झळाळी मिळाली होती. त्यावेळेच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, थोर अर्थशास्त्रज्ञ धनंजयराव गाडगीळ, तत्कालीन राज्यपाल श्रीप्रकाश यांचा समावेश होता. तसा हा कारखाना १९५० लाच तयार झाला होता. मात्र विठ्ठलरावांनी त्याचं उद्घाटन तब्बल १० वर्ष थांबवलं. त्यांना पंडित नेहरुंच्या हस्तेच कारखान्याचं उद्घाटन करायचं होतं. १५ मे १९६१ ला पंडितजींच्या उपस्थितीत कारखान्याचं लोकार्पण झालं.
उद्घाटनावेळी पंडित नेहरू आपल्या भाषणात म्हणाले, 'विद्वान आणि श्रीमंत अशी मोठी माणसं मोठी कार्य करतात, हे मला माहीत आहे. परंतु कमी शिकलेली, लहान माणसेही मोठं कार्य करू शकता, हे मला आज कळलं! विखे पाटलांसारखा सामन्य शेतकरी केवढे मोठे कार्य करू शकतो, हे मी आज पाहिलं. खरोखर आज देशाला, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अशाच राष्ट्रभक्तीची गरज आहे. श्री. विखे पाटील हे त्या अर्थाने खरे 'देशभक्त' आहेत!'
अंगभूत शहाणपणानं, अपार परिश्रमानं भारतीय शेतकऱ्यांच्या आर्थिक आघाडीसाठी जिद्दी आणि चिवट लढत देणारा विठ्ठलराव विखे पाटील हा एक दुर्मिळ आणि सच्चा शेतकरी होता. २७ एप्रिल १९८० ला वयाच्या ८२ व्या वर्षी या मातीतल्या देशभक्ताचं निधन झालं.
हेही वाचा:
वर्ल्डकप जिंकलेल्या टीममधले खेळाडू नंतर काय करतात?