इंदिरा गांधीः गुंगी गुडिया ते देशाची दुर्गा

२० नोव्हेंबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


काँग्रेस पक्षातल्या बड्या बड्या नेत्यांनी गुंगी गुडिया म्हणून इंदिरा गांधी यांना पंतप्रधान बनवलं. पण त्यांची दादागिरी मोडून काढत त्यांनी काँग्रेसवर स्वतःचा एकमुखी अंमल बसवला. पाठोपाठ बांगलादेश युद्धात अपूर्व विजय मिळवून देशाची दुर्गा बनल्या. आज इंदिरा गांधींच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या आयुष्यातल्या या पर्वाविषयी.

१९६९चं साल होतं. पावसाळा सुरू होता. पावसाळ्यात देशातली हवा तशी सर्द होते. पण राजधानीतल्या राजकारणाची हवा मात्र चांगलीच तापली होती. त्याचं असं झालं, मे महिन्यात तत्कालीन राष्ट्रपती झाकीर हुसेन यांचं निधन झालं. त्यामुळे नवीन राष्ट्रपती निवडण्यासाठी निवडणुका घेणं क्रमप्राप्त होतं. राष्ट्रपती पदभार स्वीकारेपर्यंत उपराष्ट्रपती काळजीवाहू म्हणून कार्य करतात, अशी घटनात्मक तरतूद आहे. त्यानुसार वीवी गिरी कारभार पाहत होते.

`राष्ट्रपतीपदी कोण?` यावर दिल्लीत बरीच खलबतं सुरू झाली होती. काँग्रेस वर्किंग कमिटीनं पसंत केलेले उमेदवार होते नीलम संजीव रेड्डी. हे उमेदवार तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना काही पसंत पडेना. त्याला कारणही तसंच. तत्कालीन काँग्रेसमधे सिंडिकेट गट वरचढ होता आणि इंदिरा गांधींना काबूत ठेवण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. या उलट जुन्या नेत्यांना कालबाह्य ठरवण्याचं राजकारणं गांधी बाई करत होत्या. त्यातून निर्माण झालेल्या कुरघोड्यांची परिसीमा म्हणजे ही निवडणूक!

हेही वाचाः कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमधला शेतकरी कोलमडलायः राजू शेट्टी

पक्षाचा उमेदवार हरवून पसंतीचा उमेदवार जिंकवला

नेहरूंच्या शेवटच्या काळात हा सिंडिकेट जास्त ताकदवान बनत गेला. के. कामराज, नीलम संजीव रेड्डी, एस. निजलिंगप्पा, मोरारजी देसाई हे या गटाचे धुरीण. पंतप्रधानपदी इंदिरा गांधींना बसवायचा निर्णय या गटाचाच होता. राजकारणाचा अनुभव नसलेली 'गुंगी गुडीया' सत्तेवर आणायची आणि तिच्यामार्फत सूत्र आपल्या हातात हा त्यामागचा होरा असावा.

काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत इंदिराजींनी दुसरा उमेदवार सुचवला. हा उमेदवार म्हणजे बाबू जगजीवन राम. तो नाकारला जाणार याची त्यांनाही कल्पना असावी कदाचित. झालंही तसंच. पंतप्रधानांच्या पसंतीशिवाय राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरला. हे अतीच होत होतं.

नेमकं त्याचवेळी वीवी गिरी यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. इंदिराजींनी त्यांना समर्थन दिलं. 'आतला आवाज' ऐकून कोणाला मतदान करायचं ते ठरवा असा इंदिराजींनी काँग्रेस खासदार-आमदारांना दिला.

इंदिरा गांधींची काँग्रेसमधून हकालपट्टी

नीलम संजीव, गिरी आणि सीडी देशमुख यांच्यात सामना झाला आणि अखेर वीवी गिरी निवडणूक जिंकले. राष्ट्रपती झाले. स्वतःच्या पक्षाचा उमेदवार पाडून स्वतःच्या पसंतीचा उमेदवार जिंकवण्याचं अचाट राजकारण इंदिरा गांधींनी करून दाखवलं. 

पण यानंतर शांत बसेल ती सिंडिकेट कसली! पक्षाध्यक्ष निजलिंगप्पांनी पक्षविरोधी कारवाई केली या आरोपाखाली इंदिरा गांधीची पक्षातून हकालपट्टी केली. यामुळे त्या अल्पमतात गेल्या. 
 
मग डावे, प्रादेशिक पक्ष अशा सगळ्यांची मोट बांधत इंदिराजी सत्तेत राहिल्या. पण या घटनेनंतर काँग्रेसमधे दोन गट पडले. इंदिरा गांधींना पाठिंबा देणारा काँग्रेस ‘आर’ आणि दुसरा काँग्रेस ‘ओ’. त्यावेळी देशात इंदिरा गांधीं लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या. १९७१ साली याच लोकप्रियतेच्या जोरावर इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या ते विराट बहुमताच्या जोरावर. देशाचं राजकारण कूस बदलत होतं.

हेही वाचाः ५० वर्षांआधीच्या बँक राष्ट्रीयीकरणाने घातला मोदी सरकारच्या जनधन योजनेचा पाया

म्हणून बांगलादेशी शरणार्थी भारतात आले

१९७० साली पाकिस्तानमधे निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत शेख मुजिबुर रहमान यांच्या आवामी लीग या पक्षाला बहुमत मिळालं. पण झुल्फिकार अली भुट्टो यांनी मुजीब यांना पंतप्रधान करण्यास नकार दिला. पंजाबी मुस्लिम आणि बंगाली मुस्लिम या वादाची त्याला किनार होती. या घटनेनं पूर्व पाकिस्तानात स्वतंत्र देशाची चळवळ सुरू झाली. याचं नेतृत्व होतं अर्थात शेख मुजीब यांचं. त्यांना बंग जनतेनं त्यावेळी ‘वंगबंधू‘ ही पदवी दिली. आजच्या बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना त्यांच्याच कन्या.

पुर्व पाकिस्तानातील या बंडानं अर्थातच इस्लामाबाद मधील नेतृत्व खवळलं आणि मुजीब यांना अटक झाली. पुर्व पाकिस्तानात अटक आणि दमनसत्र सुरू झाले. पूर्व पाकिस्तानचे गवर्नर यावेळी एका सैनिकी अधिकाऱ्याकडे होते. त्याचं नाव टिक्का खान.

आपल्याच जनतेवर टिक्का खान यांनी नृशंस अत्याचार सुरू केले. त्याला नाव दिलं गेलं ‘ऑपरेशन सर्चलाईट’. हे अत्याचार इतके वाईट होते की त्याची तुलना हिटलरनं ज्यूंच्या केलेल्या शिरकाणाशी केली जाते. अँथनी मॅस्केरनिस या ‘संडे टाइम्स’ च्या वार्ताहरानं त्याचं अगदी सविस्तर वर्णन केलंय. अगदी अंगावर काटा आणणारं.  त्याच्या वार्तांकनाप्रमाणे सुमारे तीन लाख निशस्त्र आणि निरपराध नागरिकांना ठार मारण्यात आलं. 

याचा परिणाम म्हणून या भागातील लोक भारतात शरणार्थी म्हणून येऊ लागले. बंगाल, बिहार, ओरिसा, त्रिपुरा, आसाम या भागात रिफ्युजी शरण घेऊ लागले. १९७१ साली निवडणुकीत भरघोस यश मिळवणाऱ्या इंदिरा गांधींसाठी हा दुहेरी आव्हानाचा क्षण होता.

बांगलादेश स्वातंत्र्ययुद्धाला पाठींबा

एक म्हणजे येणारे रिफ्युजी मुस्लिम. त्यामुळे हिंदू-मुस्लिम सांप्रदायिक तणाव निर्माण होण्याची चिन्हं होती. तर दुसरं म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था शरणार्थींचा भर उचलण्यास सक्षम नव्हती. जागतिक मंचांवर यावेळी इंदिराजी आग्रहानं या प्रश्नाकडे लक्ष वेधू पाहात होत्या. पण हा पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न आहे, असं सांगून इतर देश त्यांच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करत होते. मार्च १९७१ पर्यंत शरणार्थींची संख्या एक कोटीच्या घरात गेली आणि त्यानंतर इंदिराजी अधिक आक्रमक झाल्या.

‘या प्रश्नावर शांत बसणे म्हणजे त्याला समर्थन देणे. त्या स्त्रियांवर बलात्कार होऊ द्यायचे का? त्या नागरिकांच्या हत्या होऊ द्यायच्या का?’ अशी आग्रही भूमिका त्यांनी या काळात बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत घेतली. २५ मार्च १९७१ ला त्यांनी बांगलादेश स्वातंत्र्ययुद्धाला आपला पाठींबा जाहीर केला.

२५ मार्चलाच भरलेल्या एका कॅबिनेट बैठकीत त्यांनी लष्करप्रमुख माणेकशॉ यांना लष्करी कारवाईची सूचना दिली. पण भौगोलिक परिस्थिती आणि सैन्य व्यस्तता यामुळे स्ट्रॅटेजीनं कारवाईची करण्याची ही योग्य वेळ नाही, असं माणेकशा यांचं मत पडलं. ते इंदिराजींनी समजून घेतलं आणि याकाळात त्या भारताच्या बाजूनं जनमत तयार करण्याच्या कामाला लागल्या.

हेही वाचाः संजय गांधींनी खरंच पंतप्रधान असलेल्या आईला थापड मारली होती?

रशियाशी केला वीस वर्षांचा मैत्री करार

एप्रिल महिन्यात बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स इथून त्यांनी त्रिसाप्ताहिक पाश्चिमात्य देशांत भेटी देण्यास सुरवात केली. त्याच वेळी भारतीय लष्करानं बंगालमधील तरुण स्वयंसेवकांना प्रशिक्षित करण्यास सुरूवात केली. त्याला नाव दिलं गेलं ‘मुक्तिबाहिनी‘. यात भारतीय गुप्तचर संस्थेने मोठी भूमिका निभावली.

इंदिराजींच्या या प्रयत्नांना अमेरिकेनं सातत्यानं विरोध केला. हा पाकिस्तानचा अंतर्गत मामला आहे, अशीच या देशाची भुमिका राहिली. त्याला कारणही तसंच. याकाळात चीन-पाक-अमेरिका असं नवं जागतिक समीकरण आकाराला येत होतं. शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर सोविएत रशियाला शह देण्यासाठी त्यांना ही फळी आवश्यक होती. 

पण इंदिराजींनी इथं त्यांच्या राजनायिक कौशल्याची म्हणजे डिप्लोमसीची मोठी हुशारीची चाल खेळली. ऑगस्ट महिन्यातल्या रशिया दौऱ्यात त्यांनी रशियाशी २० वर्षांचा मैत्री करार केला. त्यानुसार भारतावरील आक्रमणाला रशिया स्वतःवरील आक्रमण समजून युद्ध पुकारणार होता. आता त्या शांतपणे पाकिस्तानच्या भूमिकेकडे लक्ष देत होत्या.

गुंगी गुडिया झाली दुर्गा 

नोव्हेंबर १९७१ मधे पाकिस्तानचे प्रमुख जनरल याह्या खान यांनी आणीबाणी जाहीर करून युद्धाला तयार राहण्याचं आवाहन केलं आणि ३ डिसेंबर रोजी भारतावर  आक्रमण केलं. इंदिराजी त्यावेळी कोलकात्यात एका जनसभेला संबोधित करत होत्या. त्या तातडीनं दिल्लीला निघाल्या. या प्रवासातून आपण सुखरूप दिल्लीला पोहचू की नाही याबाबत त्या साशंक होत्या, असं त्यांचे निकटवर्तीय आणि बंगालचे माजी मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे यांनी लिहिलंय.

त्याच दिवशी भारतानेही युद्ध सुरू केलं. तिन्ही सैन्यदलांना बाईंनी ‘if there is a war, there is a war.’ असं सांगून मोकळीक दिली होती. त्याचा परिणाम म्हणजे १६ डिसेंबरला हे युद्ध संपलं आणि बांगलादेशचा जन्म झाला. १९व्या शतकातली सर्वात वेगवान सैन्य कारवाईंपैकी एक म्हणून हे युद्ध ओळखलं जातं. भारताचा एकहाती विजय ही पुढील पिढयांसाठी एक प्रेरणादायी गोष्ट.

भारताबरोबरच जगाच्या राजकारणानेही आता कुस बदलली होती. जग भारताला आता एक सामरिक शक्ती म्हणून गांभीर्यानं घेऊ लागलं होतं. जिचा गुंगी गुडिया म्हणून उपहास उडवला गेला त्याच इंदिरा गांधींना जनतेनं नवं आदराचं नाव दिलं होतं. सज्जनांचे रक्षण करणारी आणि दुष्टांचा विनाश करणारी, दुर्गा!

हेही वाचाः 

बाजार समित्या बरखास्ती ही तर दुसरी नोटाबंदीच

पंतप्रधान इंदिरा गांधींवर गोळ्या झाडल्या आणि...

जागतिक पुरुष दिन विशेषः लैंगिकतेला आधार बदलत्या माध्यमांचा

सरकारनं गुंतवणूकदारांवर विश्वास ठेवायला पाहिजे: मनमोहन सिंग